महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आरसा
दर तीन महिन्यांत सगळ्या टेस्ट, डॉक्टरची घरची व्हिजीट, याकरता लागणारा पैसा, सुविधा भारतात अनेक ज्येष्ठ नागरिकांना मिळत नाहीत. गावात काय, अगदी शहरात रहाणाऱ्या पेशंटस्ना उत्तम सल्ला मिळत नाही, परवडत नाही. तुम्ही तुमच्याच घरात तुमच्या कुटूंबासह रहाता. रोज तुम्हाला हवे नको बघितले जाते.. म्हणजे आजच्या घडीला भारतातल्या २ % नशिबवान ज्येष्ठ नागरिकांपैकी एक असताना तुम्ही कुरकुर करायची एक संधी सोडत नाही. हे बरोबर आहे का? या प्रश्नावर कावेरीताईंकडे उत्तर नव्हते. जणू त्यांना कुणी आरसाच दाखवला होता.
संध्याकाळचे सहा वाजत आले होते. ‘क्रिमझन टॉवर्स'च्या अकराव्या मजल्यावरच्या कावेरीबाईंची लगबग चालू होती. त्यांच्या अटेंडण्टला सांगून त्यांचा मुलगा प्रसन्नजीत स्टडीमध्ये बसला आहे याची खात्री करून घेतली. कावेरीबाईंचे यजमान, विद्याधर बायकोची चाललेली लगबग बघत होते. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर बायकोच्या मनात काय चाललंय हे त्यांनी सहज ओळखले होते. पूर्वी न्यायाधीश असल्याने चाणाक्षपणा त्यांच्यात मुरला होता. विद्याधरपंताच्या स्वभावातच घाई, गडबड, हे नव्हते. त्यांनी इतके दिवसाचा अनुभव लक्षात घेऊन कावेरीबाईंना काहीही न बोलायचे, अजिबात विरोध न करण्याचे धोरण अवलंबले होते.
रोजच्या सवयीने, साडी नि केस आरशात बघून नीट करून कावेरीबाई खोलीबाहेर पडल्या. या खोलीतला आरसादेखील त्यांच्या मनासारखा नव्हता. त्यांनी ‘हं' म्हणत मान उडवलेली त्यांची अटेन्डण्ड, शालूनेपण बरोबर टिपली. तिलाही कावेरीबाईंचा ठसका नवा नव्हता.
"प्रसन्न बाळा, आली का रे लॅबची मेल? काय म्हणतात माझे रिपोर्ट? आजकाल बरे नसतेच मला. खास ठेवणीतल्या आवाजात त्या म्हणाल्या.
"आई, एक मिटींग चालू आहे. बरोबर तीन मिनिटांत बोलतो. इथेच बस.
प्रसन्नने सांगितल्यावर त्यांना थोडा रागच आला. आईचे रिपोर्ट येणार आहेत तर हा घोडा बसलाय मिटींगमध्ये. इतके कसे महत्त्व नसावे आईच्या तब्येतीचे? कावेरीबाईंच्या मनात विचार आला. त्यानी परत ‘हं' म्हणत मानेला झटका दिलेला प्रसन्नजीतने बघितला. त्याला राग नाही आला, हसू आले कारण त्याने आईला लहानपणापासून असेच वागताना पाहिले होते.
सत्तरी पार केलेल्या कावेरीबाईंचे सासर नि माहेर दोन्ही संपन्न. चार भावांची एकुलती एक लाडकी बहीण म्हणजे कावेरीबाई! बुद्धी सर्वसामान्य असली तरी देवाने सौंदर्याचे माप भरभरून पदरात घातले होते. या सौंदर्याने त्या थोड्याशा आढ्यतेखोर झाल्या होत्या. समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे वागवण्यात नि वाकवण्यात त्या तरबेज होत्या. त्यांच्या या स्वभावाला वाढत्या वयाने अधिक धार आली होती. येनकेन प्रकारेण आपल्याच मनासारखे करून घेणे हा त्यांचा आजकालचा एकमेव अजेंडा होता. विद्याधरपंतांसमोर मात्र कावेरीबाईंची अजिबात डाळ शिजत नसे.
बरोबर तीन मिनीटात आईला कबूल केल्याप्रमाणे प्रसन्नजीतने ई-मेल तपासली. कावेरीबाईंचे दर तीन महिन्यांनी होणाऱ्या चाचण्यांचे रिपोर्ट आले होते. त्याने भरभर नजर फिरवली. यावेळेसही रिपोर्ट नॉर्मल होते. म्हणजे आता आई परत चिडचिड करणार हे त्याने ओळखले. त्याने सर्व टेस्टचे प्रिंट आऊटस् काढले.
”गुड आई, रिपोर्ट्स सगळेच चांगले आहेत. आठ वाजता डॉक्टर जयकर येतील घरी तेव्हा सगळेच सांगतील”. असे म्हणत त्याने तो गठ्ठा आईच्या हाती दिला. कावेरीबाईंना इंग्रजीतले रिपोर्ट्स फारसे कळत नसत. त्यांचा थोडा भ्रमनिरासच झाला होता.
प्रसन्नजीतला आठ वाजताचे टेन्शन आले. त्याने ती ईमेल डॉक्टर जयकरांना फॉरवर्ड केली. सोबत चार ओळी लिहून पाठवल्या जेणेकरून डॉक्टर इकडे आल्यावर त्यांना साधारण परिस्थितीची कल्पना असावी.
रात्री सर्व पेशंट तपासून झाल्यावर डॉक्टर जयकर पावणे नवाच्या सुमारास कावेरीबाईंचे रिपोर्ट्स बघायला आले.
"आठची वेळ ठरली होती.” कावेरीबाई ठसक्यात म्हणाल्या.
"होय, आज संध्याकाळी एक अर्जंट केस आली. त्या पेशंटला तपासून, औषध देऊन बाहेर पडायला उशिर झाला. मी तसे मेसेज करून कळवले होते. आम्ही डॉक्टर आहोत.. अशी ऐनवेळेची कामे आम्हाला टाळता येत नाहीत. तुमचे तर फक्त रिपोर्ट्स बघायचेत.” शांत आवाजात डॉक्टर म्हणाले.
"शालू, डॉक्टरना चहा कर नि सोबत बिस्कीटपण आण. ते दमून आलेत.” विद्याधरपंतांनी प्रथमच संभाषणात भाग घेत आपण तिथे आहोत याची कावेरीबाईंना जाणीव करून दिली.
डॉक्टर जयकरांना कावेरीबाईंची केस संपूर्ण माहित होती. उगाच एकदोन रिपोर्ट वर खाली बघत विचार केल्याचा आविर्भावात ते प्रसन्नजीतला म्हणाले, "मला वाटतंय आपण यांना फिजिओथेरपी सुरू करावी. तसे काळजीचे कारण नाहीये काही. मी डॉक्टर सुमेधांना सांगतो. माझ्या मते त्या बेस्ट असतील काकूंकरता. तुमच्या ओळखीत कोणी अनुभवी फिजिओथेरपिस्ट असेल तर तसंही चालेल. मी बोलून घेईन.”
काहीतरी नवे निघाल्याचे समजातच कावेरीबाई अगदीच हताश झाल्या. फिजिओथेरपिस्ट वगैरे त्यांनी ऐकले नव्हते कधी! विद्याधरपंताना माहित होते. ते म्हणाले "माझेही गुडघे आजकाल दुखतात. मला काही मदत घेता येईल का त्यांची?”
"हो, का नाही.. एकाच घरात दोन पेशंट मिळाले तर डॉ. सुमेधाना सोपेच जाईल.” डॉक्टर जयकर म्हणाले. शालूने आणलेला चहा पिऊन ते निघून गेले. कावेरीबाई मात्र काळजीत पडल्या.
आपण वेगळा फिजिओथेरपिस्ट शोधण्यापेक्षा डॉ. जयकरांनी सांगितलेल्या डॉ. सुमेधांकडे आपली केस सोपवावी असे घरात चर्चेत ठरले. डॉक्टर सुमेधांशी बोलून चारची अपॉईंटमेंट ठरवली.
बरोबर चार वाजता बेल वाजली. डॉक्टर सुमेधा म्हणजे विशीतली हसरी तरूणी आहे हे बघून कावेरीबाई फारच नाराज झाल्या. आपली केस डॉक्टरांनी फारच हलक्यात घेतली असे त्यांना वाटले, नव्हे खात्रीच पटली.
"हॅलो आजी, आजोबा, कसे आहात दोघे? मी डॉक्टर सुमेधा, डॉ. जयकरांनी माझे नाव सुचविले.” सुमेधा म्हणजे उत्साहाचा झरा होती. विद्याधरपंताना, प्रसन्नजीतला, शालूला ती खूप आवडली. तिचा आत्मविश्वास, संवाद कला उत्तम होती. तिने दोघांचे रिपोर्ट्स काळजीपूर्वक वाचले आणि एक बेसिक एक्सरसाईज प्लॅन तयार केला. या प्लॅननुसार त्या दोघांकडून व्यायाम करून घेणार होत्या.
दुसऱ्या दिवशी बरोबर चार वाजता सुमेधा हजर झाली. तिचे तिच्या कामावर प्रचंड प्रेम होते. पेशंट्सशी कसे वागावे हे वयाने लहान असून तिला पुरेपूर माहीत होते. तिच्या अधिकारवाणीने सांगण्यावर कावेरीबाई थोड्या नाराज होत्या; पण नाईलाज होता. त्यांच्या मनासारखे अटेन्शन त्यांना मिळत नव्हते.
पंधरा दिवस उलटून गेले होते. विद्याधरपंत मात्र खुश होते डॉक्टर सुमेधांवर. त्यांच्या पायातल्या वेदना कमी झाल्या होत्या. रात्री झोप लागू लागली होती. कावेरीबाईंना मात्र फारसा काही फरक पडत नव्हता. सुमेधा निवांत होती. तिच्या अपेक्षेनुसारच सारे घडत होते.
"कशाची काळजी करता,आजी?” सुमेधाने कावेरीबाईना विचारले.
"कशाची नको करू? काहीच मनासारखे घडत नाही माझ्या. ब्लड टेस्ट केल्या तर व्यायाम सुरू करायला लावला डॉक्टर जयकरांनी. आधीच माझे वय झालेले, हाडे ठिसूळ झालेली. फट् म्हणता काही घडले तर मी कायमची जायबंदी होऊन बेडवर. आमच्या घरच्यांना हेच हवंय बहुतेक. माझी काळजीच नाही कोणाला.. आणि हे? काय हौस आलीये व्यायामाची देवच जाणे.. अगदी वाभरटासारखे करतायत. आजकाल झोप लागते म्हणे.. माझी मात्र पार उडलीये.”. त्या किनऱ्या आवाजात कुरकुरत म्हणाल्या.
हाताची घडी घालून सुमेधा नीट ऐकत होती. "आजी, एक बोलू? तुम्हाला विनाकारण काळजी करायची सवय लागली आहे. वाढत्या वयात स्वतःची काळजी वाटणे साहजिक आहे; पण बघा विचार करा, दर तीन महिन्यांत सगळ्या टेस्ट, डॉक्टरची घरची व्हिजीट, याकरता लागणारा पैसा, सुविधा भारतात अनेक ज्येष्ठ नागरिकांना मिळत नाहीत. गावात काय, अगदी शहरात रहाणाऱ्या पेशंटस्ना उत्तम सल्ला मिळत नाही, परवडत नाही. तुम्ही तुमच्याच घरात तुमच्या कुटूंबासह रहाता. रोज तुम्हाला हवे नको बघितले जाते.. म्हणजे आजच्या घडीला भारतातल्या २ % नशिबवान ज्येष्ठ नागरिकांपैकी एक असताना तुम्ही कुरकुर करायची एक संधी सोडत नाही. हे बरोबर आहे का?”
सुमेधाच्या थेट शब्दांनी कावेरीबाई चमकल्या. आतापर्यंत असे त्यांच्याशी कोणी बोललेच नव्हते. सुमेधाच्या शब्दांनी त्यांना आरसा दाखवून दिला होता. त्या शब्द शोधत राहिल्या बोलायला पण योग्य शब्द सापडेचना!!
दुसऱ्या दिवशी येताना सुमेधाच्या सांगण्यावरून प्रसन्नजीतने एक भला मोठा सहा फुटी उंच नि तीन फूटी रूंद आरसा आणून आजीआजोबांच्या खोलीत बसवून घ्ोतला. दोघांना समजेना याचे प्रयोजन काय? दुपारी सुमेधा आल्यावरच याचा उलगडा होणार होता.
"कसला मस्त बसलाय आरसा !!” सुमेधा कौतुकाने म्हणाली. ”बघा आजी, काल मी नुसते सरांना म्हटले की आरसा असेल तर बरे होईल तर मी यायच्या आधी आरसा बसलेला! आहात ना नशिबवान? पटले का माझे?”
"याचा उपयोग काय पण?” विद्याधरपंतांनी काहीच न समजल्याने विचारले.
"आजोबा, तुम्ही व्यायाम करताना आता या आरशासमोर उभे राहिलात की तुमचे तुम्हालाच समजेल की तुम्ही बरोबर करताय की चुकताय! माझ्याच काय कोणाच्याच मदतीची तुम्हाला गरज वाटणार नाही.” सुमेधाने सांगितलेले विद्याधरपंतांना पटले, आवडले नि ते थोडे चकित झाले.
"आणि मी?” कावेरीबाईंनी न राहवत विचारले.
"जेव्हा तुम्हाला कोणाची तक्रार करावीशी वाटेल त्यावेळेस आरशासमोर उभे राहून स्वतःलाच आधी सांगा. तुमच्या लक्षात येईल की तक्रार करताना प्रत्येक वेळेस आपण किती वाईट दिसतो.. कारण ज्यावेळेस तुम्ही खरंच दुःखी असाल तेव्हा आरशासमोर उभे राहून बोलायचे तुमच्या लक्षातच येणार नाही. एकदा तुमच्या तक्रारी संपल्या की तुमचे तुम्हालाच छान वाटू लागेल!”
विद्याधरपंत सुमेधाच्या चातुर्यावर विलक्षण खूश झाले. उशिरा का होईना, कावेरीबाईंना खरंच कोणीतरी अक्षरशः आरसा दाखवला होता... - अनघा किल्लेदार