महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
ध्वज विजयाचा उंच धरा रे!
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या ज्या हूतात्म्यांनी बलिदान केले, या मातीवर रक्त सांडले त्यांच्या थोर कार्याचे आपण सर्वांनी गौरव करायला हवा. आपले घरदार, संसार सोडून देशकार्यासाठी त्यांनी आपली काया झिजवली त्यांच्याविषयी अभिमान बाळगूया. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप हालअपेष्टा सोसल्या. तुरुंगवासदेखील सहन केला; परंतु शेवटी यश आपल्यालाच मिळाले. इंग्रजांच्या गुलामीच्या शृंखला तुटून पडलेल्या आहेत आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.
आमच्या बालपणी स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन म्हणून २६ जानेवारीला झेंडावंदन असायचे. भल्या पहाटे उठून, प्रातर्विधी उरकून आवरून, कडक इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून सकाळी साडेसात वाजता शाळेत जायचो. सर्व मुले मैदानावर जमलेली असायची. पी.टी.चे सर, मुख्याध्यापिका बाई आणि अतिथी झेंडावंदन करायला झेंड्यासमोर उभे असत. प्रमुख अतिथींच्या हस्ते झेंडावंदन झाले की विद्यार्थी आणि गुरुजन टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करीत. एन्सी.सी.ची मुले परेडची प्रात्यक्षिके दाखवीत. संपूर्ण गावातून प्रभातफेरी निघायची. प्रभातफेरीमध्ये बोधप्रद घोषवाक्ये लिहिलेले फलक घेऊन त्यांच्यामागून सर्व मुले जात असू.
‘भारतमाता की जय' ‘वंदे मातरम' असे नारे बेंबीच्या देठापासुन ओरडून लावले जायचे. आख्ख्या गावातून प्रभातफेरी जायची. काही लोक बिस्कीटे, पाणी, चॉकलेट्स वाटत रस्त्यात उभे असायचे. जागोजागी देशभक्तीपर गाण्यांचे रेकॉर्डस् वाजलेले कानावर पडत. त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी केलेला पराक्रम आठवून ऊर उचंबळून येत असे. थोर नेत्यांच्या गौरवपूर्ण उद्गारांचे मनात आंदोलन चालत असे. खेळण्या बागडण्याच्या वयात शूर शिरीषकुमार, धनसुखलाल वणी, घनश्याम दास, शशीधर केतकर, लालदास या शाळकरी मुलांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान केले. बाबु गेनु, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यासारखे तडफदार वीर हासत फासावर चढले. कित्येकांनी प्राणांची आहूती दिली. घर, संसार त्यागले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी म. गांधी, सावरकर बंधु, टिळक, आंबेडकर, पंडित नेहरू यांनी कारावास सोसला.
या थोर महात्म्याने स्मरण होताना त्यांच्या काय्रााविषयी आमची छाती अभिमानाने फुगून येते.त्यांच्या महतीचे गुणगान आपल्या भाषणातून करताना डोळ्यांतून अश्रुंच्या धारा वहातात. वाटते.. कसे काढले असतील त्यांनी बंदिवासातील दिवस? पाठीवर इंग्रजी अधिकाऱ्यांच्या चाबकाचे फटकारे खाऊनही तोंडाने ‘भारत माता की जय' असा जयघोष करणारे ते स्वातंत्र्यवीर कोणत्या मातीचे बनले असतील? काटा टोचला तरी आमच्या तोंडातून ‘अगं आई ग' असे विव्हळणे बाहेर पडते. मग त्या वीरांनी किती जाच कसा सहन केला असेल. त्यांना मानाचा मुजरा देतानाही ऊर दाटुन येतो. दोन तास उभे राहिले तरी आम्हांला भोवळ येते; मग उपाशी राहून त्या साऱ्यांनी कसे युद्ध लढले असेल. अशा थोरांच्या मातीत आपण जन्माला आलो म्हणून विधात्याचे स्मरण होते आणि आमचा माथा आपसुकच नतमस्तक होतो.
प्रभातफेरीतून पुन्हा शाळेत परतल्यावर मा. अतिथींची ओळख मुख्याध्यापिका बाई करून देत. अतिथींचे भाषण झाल्यानंतर झेंडा, रिंग आणि लेझिमची प्रात्यक्षिके दाखवली जात. प्रमुख अतिथी,मा. मुख्याध्यापिकाभाषण देत. आमच्या शाळेत वर्षभर जिमनॅस्टीवसचा सराव करून घेतला जात असे. स्वातंत्र्यदिनाला त्यांचीही प्रात्यक्षिके दिखवली जात. वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेऊन शिक्षक, कार्यालयीन स्टाफ आणि शिपाई वर्गाला आदर्श म्हणुन पुरस्कृत केले जाई. त्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते हारतुरे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला जाई. त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळत असे. सकाळी दहा वाजेपर्यंत शाळेत बरीच मुले देशभक्ती आणि थोर समाज सुधारकांच्या महत्काय्रााविषयी भाषण देत, काही समूहगीत गात; तर काही नाट्यछटांद्वारे देशाचा आणि राष्ट्रीय हुतात्म्यांचे गौरवगान करत. सर्व कार्यक्रम उरकून उंच आवाजात राष्ट्रगीत गायले जाई.
‘भारतमाता की जय', ‘वंदे मातरम' असे नारे लावले जात. कार्यक्रम समारोपाच्या वेळी सर्वांना चॉकलेट्स वाटले जात. सर्वत्र लाऊड स्पिकरवर देशभक्तीपर गाण्यांनी वातावरणभारून गेलेले दिसे. चॉकलेट्स मिळाले की घरी जाता येत असे. परंतु हल्ली झेंडावंदनाचे स्वरूप पूर्ण बदलले आहे. शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यम करून निरनिराळे राजकीय पक्ष नेते, झेंडावंदनसाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले जातात. त्यांची रटाळ भाषणे ऐकण्यात मुलांना काडीचाही रस नसतो ना शिक्षकांना. पण हांजी हांजी करण्याच्या समाजाच्या या वृत्तीमुळे असतील शिते तर जमतील भूते या उक्तीप्रमाणे नेत्यांना महत्त्व दिले जाते. परेड वगैरे न होता सर्व अतिथींचे स्वागत करण्यातच वेळ जातो. देशभक्तीची वृत्ती दिसून येत नाही. मागील दोन वर्षात कोरोनाच्या परिस्थितीत अजूनच अवघड झाले आहे. त्यामुळे लॅपटॉप समोर उभे राहून ऑनलाइन झेंडावंदनाचे प्रकार झालेले पाहायला मिळाले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयीचा जाज्वल्य अभिमान असुनही प्रसंगानुसार वागावेच लागते.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या ज्या हूतात्म्यांनी बलिदान केले, या मातीवर रक्त सांडले त्यांच्या थोर कार्याचे आपण र्वांनी गौरव करायला हवा. आपले घरदार, संसार सोडून देशकार्यासाठी त्यांनी आपली काया झिजवली त्यांच्याविषयी अभिमान बाळगूया. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप हालअपेष्टा सोसल्या.
तुरुंगवासदेखील सहन केला; परंतु शेवटी यश आपल्यालाच मिळाले. इंग्रजांच्या गुलामीच्या शृंखला तुटून पडलेल्या आहेत आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आजही लाखो जवान आपल्या सीमेवर तैनातीला राहून अविश्रांत असा लढा देत आहेत. आपले वृद्ध आईवडील, पत्नी, मुलेबाळे गावाकडे ठेवून डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेत आहोत. शत्रुने केलेल्या हल्ल्याला ते जीवावर उदार होऊन सामना करत आहेत. आपण आपल्या परिवारात राहून कार्यक्रम, सणसोहळे आनंदाने साजरे करत असतो. परंतु ते मात्र ऊन, वारा, पाऊस, सतत कोसळणारे हिमनग अशा कितीतरी अडचणींवर मात करत आपले जीवन व्यतित करत असतात. ते डोळ्यात तेल घालून आपल्यासाठी पहारा करत असतात. त्यांच्या सुखी आयुष्याची स्वप्ने डोळ्यात साठवून ते सीमेवर लढत असतात.
आपल्या देशात असे शूरवीर जवान आहेत म्हणून आज आपण आपले जीवन सुखमय पद्धतीने जगत असतो, आरामात झोप घेत असतो. या जवानांच्या थोर कार्याची आपण बूज राखायला हवी. त्यांना मानवंदना द्यायला हवी. त्यासाठी स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला जातो. त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. निरनिराळी पदके देऊन त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या काय्रााविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. शालेय शिक्षणापासूनच मुलांना वीरांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांच्यावर आलेले प्रसंग, अनुभवकथन ऐकवले जाते.
आज असे शूरवीर आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती आहेत म्हणून राष्ट्रपतींकडून त्यांना मानवंदना आणि शौर्यपदकही बहाल केले जाते. आपला तिरंगा आपल्याला प्रिय असतो. झेंडावंदन समयी आपण शांत राहून देशाचे गुणगान गायले जाते, राष्ट्रगान केले जाते.
‘सदैव सैनिका पुढेच जायचे' म्हणत पुढच्या पिढीला प्रेरणा दिली जाते. आपल्या भारत देशाला गौरवशाली इतिहास आहे. त्याची सर्वांना आठवण राहावी म्हणून हे दोन दिवस मोठ्या उल्हासाने साजरे केले जातात. - सौ.भारती सावंत