महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
भगवान श्रीकृष्ण केवळ उत्सवापुरतेच ठेऊ नका!
जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी ईश्वर अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धात समोर असलेल्या परिस्थितीचा सर्व अभ्यास करून काय केले म्हणजे आपल्याला यश मिळेल याचा सर्व अभ्यास करूनच निर्णय घेतले. कर्माचा सिद्धांत सांगत अर्जुनाला ज्या प्रकारे त्यांनी कार्यप्रवण केले तो संदेश आज आम्ही स्वीकारत आहोत का? सध्याची बहुतांश मानवी प्रवृत्ती आपले कर्म प्रामाणिकपणे करण्याऐवजी कर्म टाळण्याकडे जास्त कल दिसून येत असल्याने अनेक घृणास्पद गुन्हे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.
समस्त भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला उत्सव म्हणजे आपल्या प्रचंड उत्साहाला आणि आनंदाला उधाण. हा उत्साह आणि आनंद मनाला नुसताच विरंगुळा नाही तर प्रफुल्लित आणि उत्साहीत करून जातो. दहीहंडीत प्रत्यक्ष सहभाग म्हणजे संघभावना, खेळाडू वृत्ती, प्रोत्साहन, नेतृत्व गुण, सराव, सांघिक एकाग्रता, सहकार्याची भावना, जबाबदारीची जाणीव, सामाजिक समरसता व एकात्मतेचा विलोभनीय नजारा. तर लहान थोर अबाल वृद्धांसाठी नयनरम्य सोहळा. खरंतर यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या रूपात श्रावणात येणाऱ्या या भक्तीपर्वात निसर्गासहित आपण सर्वच विविध प्रकारांनी न्हाऊन निघतो.
हे सर्व जरी खरे असले तरी सध्या अवतीभवती घडणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील घटनांचा विचार करता, द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी प्रेम आणि व्यवहार यांचा जो अर्थ सांगितला, त्याचा लवलेशही सध्या दिसत नाही. तेव्हा वाटते फक्त गोपाळकाल्याच्या निमित्ताने ‘गोविंदा रे गोपाळा' केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर पुनश्च एकदा भगवान श्रीकृष्णांच्या कथा मुलांना जगायला शिकवल्या पाहिजेत. त्यात विशेषतः पालक, समाज, शिक्षक यांनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता व महर्षी वेदव्यासांचे महाभारत जाणून घ्यायला हवे. भगवान श्रीकृष्ण हे फक्त उत्सवासाठी न राहता जगण्याचा आधार व्हायला हवे. भगवान श्रीकृष्ण हे जगण्याचे साधन आहे हे राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या मनावर ठसवले. म्हणूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत.
भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाचा सेनापती कालयवनाचा वध करण्यासाठी आधी युद्धभूमीतून पलायन केले व पाठलाग करणाऱ्या कालयवनाचा चातुर्याने गुहेत निद्राधीन असलेल्या राजा मुचकुंदाकरवी वध घडवून आणला. हे एक उदाहरण आजच्या काळातसुद्धा मार्गदर्शक आहे. जीवन संघर्षात अंतिम विजय प्राप्त करण्यासाठी प्रसंगी दोन पावलं यशस्वीरित्या माघार घेता येणे हे तत्व आज आपण खरोखर किती प्रामाणिकपणे वापरतो? की समस्यांपासून कायमचे पलायन करतो?
महाभारत युद्धात युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्धाचे नियम पितामह भीष्मांनी ठरवले होते. दुर्दैवाने ते नियम आपल्या धर्माचेच नियम आहेत असे समजून पुढील कालखंडात भारतीय राजांनी त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसते. पण त्याच महाभारत युद्धात अंतिम विजय मिळविण्यासाठी नियम कुठे व कसे वापरावेत व कुठे वापरू नये याचा आदर्श वस्तूपाठच भगवान श्रीकृष्णाने घालून दिला होता. ‘शरण आलेल्यांना मारू नये' या अशाच नियमामुळे पृथ्वीराज चौहाणने मोहम्मद ग़ोरीला जीवनदान दिले.पण त्याच मोहम्मद ग़ोरीने पुढच्या युद्धात पृथ्वीराजला पकडल्यानंतर जिवंत सोडले नाही. मग इथे प्रश्न पडतो आम्ही आमच्या धर्मग्रंथांमधून आपल्या जीवन उत्कर्षासाठी व विजयासाठी योग्य संदेश घेतो का ? जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी ईश्वर अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धात समोर असलेल्या परिस्थितीचा सर्व अभ्यास करून काय केले म्हणजे आपल्याला यश मिळेल याचा सर्व अभ्यास करूनच निर्णय घेतले. कर्माचा सिद्धांत सांगत अर्जुनाला ज्या प्रकारे कार्यप्रवण केले तोच संदेश आज आम्ही स्वीकारत आहोत का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच आहे. इतकेच काय सध्याची बहुतांश मानवी प्रवृत्ती आपले कर्म प्रामाणिकपणे करण्याऐवजी त्यांचा भर कर्म टाळण्याकडे जास्त दिसून येतो आणि केवळ या आणि याच आपल्या प्रवृत्तीमुळे अनेक घृणास्पद गुन्हे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. आपण त्या घडल्यानंतर त्यांचा निषेध किंवा आक्रोश मोर्चे काढतो. हा खरंच त्यावर उपाय आहे का? आपण समस्येच्या मुळाशी जाऊन खरंच काम करणार आहोत का? तशी आपली धारणा आहे का?
महाभारतात धृतराष्ट्र जन्मतः अंध असल्याने व पुढे पुत्रप्रेमाने स्वतःच्या कर्माला योग्य न्याय न दिल्याने द्रौपदी वस्त्रहरण सारख्या घटना घडल्या. परिणामतः त्याचे पर्यावसान महाभारत युद्धात झाले. एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मला असे सांगावेसे वाटते की आज धृतराष्ट्र किंवा कंस म्हणजे तुम्हां-आम्हां सर्वांना स्वतःच्या योग्य व प्रामाणिक कर्मापासून दूर ठेवते ती प्रत्येक गोष्ट. बऱ्याच वेळेला ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याकडे जर आपण धृतराष्ट्र किंवा कंस या दृष्टीने बघितलं व त्यावर विजय मिळवायचा असा निर्धार केला की आपले काम सोपे होते.
आपल्यातील धृतराष्ट्र किंवा कंस म्हणजे काय तर स्वतःच्या मनातील वाईट विचार, दुसऱ्याला लुबाडून स्वतःला मोठे करणे, कायद्याचे पालन न करणे, चारित्र्यहीन काम, स्वतःमधील अहंकार, स्वतःमधील आसुरी प्रवृत्ती, स्वतःचे काम प्रामाणिकपणे न करणे, दुसऱ्याबद्दलची आपल्या मनातील वाईट भावना, वाईट विचार.
महाभारताच्या युद्धात कर्णपर्वात कर्णाचा सारथी असलेल्या मद्र नरेश शल्याने कर्णाची ज्या प्रकारे अवहेलना केली, मानखंडना केली अगदी त्याचप्रकारे आजच्या समाजात कर्म करणाऱ्यांची अवहेलना करणारे शल्य मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र कर्माचा प्रेरणायुक्त संदेश देणारा श्रीकृष्ण मात्र दिसत नाही. माझ्या मते हेच खरे आजच्या समाजाच्या दुःखाचे कारण आहे.
श्रीकृष्णाचे चरित्र जगणे यातच आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.
- प्रा.प्रशांत शिरुडे के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली