महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
भारतीयत्वाचा सार्थ अभिमान
या स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनी देशासाठी बहुमोल योगदान दिलेल्या थोर नेत्यांचे स्मरण करुन त्यांच्या प्रती नतमस्तक होणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. देशाप्रति जाज्वल्य अभिमान बाळगून या शुभदिनी आम्ही शपथपुर्वक संकल्प केला पाहिजे की, आमच्या देशाच्या स्वातंत्र्याची सुरक्षा करणे हे आमचे एकमेव ध्येय आहे व त्याकरिता आम्हाला निरंतर जागरुक राहण्याची गरज आहे.
आपल्या प्रिय भारत देशाला इंग्रजी राजवटीच्या पारतंत्र्यातून १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला पवित्रतेचे श्रेय मिळाले. ती आजपावेतो आपण जोपासुन इतिहासातील पवित्र घटनांची स्मृती कायम ठेवूनच आज आपण देशात ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिना निमित्त आम्ही भारतीय आहोत याबाबत आम्हाला आत्मविश्वासच नाही, तर अभिमान आहेच. भारतातच नव्हे, तर संपुर्ण जगात आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तो टिकवून ठेवण्याची गरज आज भासू लागली आहे.
भारतीय स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ १८५७ मध्येच रोवली गेली होती. या मुहुर्तमेढीवर भारतीय तिरंगा फडकविण्यास ९० वर्षाचा कालावधी लागला. या कालावधीत ही मुहुर्तमेढ अधिक सक्षम करण्यासाठी थोर क्रांतीकारकांचे बलिदान तसेच थोर नेत्यांची विचारसरणी व परिकाष्ठा लाभलेली आहे. तसेच या थोर नेत्यांची दीर्घ परंपरासुध्दा या देशाच्या अस्तित्वाची साक्ष देते.
भारताची राज्यघटना तयार करण्यात भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणुन त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ‘जन गण मन' हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘वन्दे मातरम' हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले. भारतीय संविधानामुळेच देशाची प्रगत राष्ट्रामध्ये मान उंचावत आहे. तेव्हा संविधानाचा अवमान होता कामा नये, याची दक्षता सरकारने काटेकोरपणे घ्ोण्याची गरज आहे, कारण सध्या तरी संविधानाचा अवमान होत असल्याच्या घटना देशात घडत असतांना शासन हातवारे करीत आहे, असं होता कामा नये. जर असं घडलंच तर त्या व्यक्तिचं नागरिकत्व बरखास्त करण्याची तरतूद करुन त्याला दंडीत केले पाहिजे.
हा ७८ वा स्वातंत्रदिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या भारतास घटना समर्पीत केली, तो आम्हाला भारतीय असण्याचा अभिमान आहे. पं. जवाहरलाल नेहरुंनी ”आराम हराम आहे” हा मंत्र दिला, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवली तर लाल बहादुर शास्त्रींनी ”जयजवान, जयकिसान” चा नारा देत ताश्कंद करार केला. प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी राजे व महाराजे यांचे तनखे बंद केले, बँकाचे राष्ट्रीयकरण केले. तसेच गरीबी हटाव चा नारा दिला २० कलमी कार्यक्रम देशभर लागू करुन देशाला, अर्थव्यवस्थेला नविन आयाम देवून या देशात सामाजिक क्रांती घडविली आणि युवा नेते राजीव गांधी यांनी २१ व्या शतकातील ”माहिती आणि तंत्रज्ञान” असा भारत निर्माण करण्यास समर्थपणे पावले उचलली. १९४७ साली राजकीय स्वातंत्र्य मिळाले; मात्र सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याशिवाय खऱ्या अर्थाने सुराज्य निर्माण करता येणे शक्य नव्हते. हा धागा पकडून विकासाच्या अनेक योजना जाणीवपूर्वक राबविण्यात आल्या. समाजातील तळागाळातील लोकांची प्रगती व विकास साधणे हा या मागील उद्देश होता. पण तोही आजवर साध्य झालेला दिसत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज सहावे हे कायम होते. २६ जानेवारी १९५० रोजी (जो भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो) भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू करून हा देश प्रजासत्ताक बनला. मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. परंतू अशा विपरीत आर्थिक कालखंडातसुध्दा भारत देश वेगळा पर्याय ठरु शकतो, असा एक मतप्रवाह होता. योग्य वैधानिक व कर प्रणाली तसेच योग्य आर्थिक वातावरण उपलब्ध करुन दिल्यास भारत आणि भारतीय व्यवसाय जगातील उत्तमांपैकी एक होऊ शकतो आणि जग भारतात येण्याची इच्छा व्यक्त करेल, असा युक्तिवादसुध्दा या विचारसरणीने केलेलाआहे. हे सर्व देशाचे माजी पंतप्रधान मा.डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक नितीमुळे घडू शकले, ज्याचा पाया या देशाचे दिवगंत पंतप्रधान युवा नेते राजीव गांधी यांनी रचला होता. आज ग्रामीण भारताला एका मोठया आर्थिक तथा सामाजिक बदलाची गरज आहे. ज्यात शिक्षण, सुदृढ आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण विषयक, आर्थिक तसेच सामाजिक दर्जा सुधारणे की, ज्यामुळे ग्रामीण भागातील उत्पादकता तसेच जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल. सरकारने हे धोरण सक्तीने अंमलात आणले पाहिजे, तेव्हाच जीवनस्तर उंचावेल.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती "राष्ट्राला संबोधित” करतात. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळाच्या तटबंदीवर भारतीय ध्वज फडकावतात. आपल्या भाषणात पंतप्रधान गेल्या वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकतात, महत्त्वाचे मुद्दे मांडतात आणि पुढील विकासाचे आवाहन करतात. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना श्रद्धांजली वाहतात. ”जन गण मन” हे भारतीय राष्ट्रगीत गायले जाते. भाषणानंतर भारतीय सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्यांचा मार्च पास्ट होतो. परेड आणि स्पर्धांमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील देखावे आणि भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडते.
इंग्रजांचा कावेबाजपणा ओळखणाऱ्या काहींनी त्यांच्या विरुध्द शस्त्र उगारले. १८५७ मधले स्वातंत्र्यसमर तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे यांनी गाजवले. पुढे सशस्त्र उठाव करुन वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इत्यादींनी आपला निषेध शस्त्रांच्या उपयोगाने नोंदविला. काहींनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली, सावरकर, धिंग्रा इत्यादींनी तसेच प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठी जसे माणसं शहीद झाली तशी वंशावरही संकटे आली. लोकजागृती झाली पण दडपली गेली; रानडे, टिळक, गोखले, आगरकर यांनी लेखणीचे आणि वाणीचे सामर्थ्य वापरुन इंग्रजांकडून होणारा अन्याय आणि जुलूम यांची जनतेला जाणीव करुन दिली. भारतीय समाजाला आपली स्थिती सुधारण्याची प्रेरणा दिली. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रयत्नाने जातीय भेदाभेद किती वाईट आणि त्यामुळे समाज कसा दुर्बल होतो हे लोकांच्या निर्दशनास आले.
"बिझनेस कन्सर्न इन इंडिया” या पाक्षिकामध्ये आम्हाला आमच्या देशाच्या इतिहासाचा थोर अभिमान आहे. आम्ही अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत स्वातंत्र्याची वाटचाल सुरु केली, परंतू इतर देशाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय व्यापार हाच आमच्या आजच्या भौतिक बदलास व आर्थिक स्वातंत्र्यास कारणीभुत असल्याचे आमचे ठाम मत आहे. आमच्या देशाच्या मागील २० वर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केल्यास, आम्ही आमचा जलद आर्थीक विकासास या नविन शतकाच्या सुरुवातीपासूनच सुरुवात केल्याचे स्पष्ट जाणवते, पण तिथेही ठोस अशी पाऊले उचलली नाही.
बहुसंख्य तरुण भारतीयांच्या मते जुनी आर्थिक विषमता कालबाहय झालेली असून येणाऱ्या भविष्यात आम्हाला मोठया सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना पार करावयाचे आहे. परंतू हे करतांना आम्हाला काही संकटांना समोरे जावेच लागेल, कारण पुढील १० वर्षे ही आताच्या काळापेक्षा सर्वदृष्टीने वेगळे असतील आणि आम्हाला या काळात यशस्वी होण्याकरीता आयुष्याच्या सर्वच क्षेत्रात व्यापार, खेळ, आंतरराष्ट्रीय घडामोडीवर मात करावी लागेल. त्यासाठी ठाम निर्णय घेण्याची गरज आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला आज ७७ वर्ष पूर्ण होत आहेत, ही अत्यंत अभिमानाची अन् आनंदाची बाब आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या शुभदिनी राष्ट्राची अस्मिता आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द होऊ या. देश अराजकतेकडे जाणार नाही आणि लोकशाही जिवंत राहिल, याचं भान असणं गरजेचं आहे. देश हा माणसांनी निर्माण होतो म्हणुन देशातला प्रत्येक माणुस हा सुरक्षित असणं म्हणजे देश सुजलाम सुफलाम असणं होय! म्हणूनच माणसांनी माणसाशी सौख्याने वागावे. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा! - प्रविण बागडे