दोन रुपये

रमेश बरोबर चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो. त्याची आणि माझी बाजाराच्या दिवशी नेहमी भेट होते. बाजारात भेटल्यावर आम्ही चहा घेतो. बऱ्याचदा बिल देताना तो त्याच्या पॉकेटमधील एका कप्प्यातून सुटे पैसे काढतो. त्या सुट्या नाण्यात मला एक दोन रुपयाचे एक जुने नाणे पाहायला मिळते. ते नाणे बरेच वर्षे त्याच्या पाकिटात असावे; कारण ते खूपच जुनाट दिसत होते. त्याच्या पॉकेटमध्ये मी ते खूप वर्षांपासून पाहत आहे. कधी त्याला दोन रुपयाच्या सुट्या पैशाची गरज पडली तरी तो ते नाणे कधीच कुणाला देत नव्हता.

 त्या नाण्याविषयी बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी  एकदा मी त्याला विचारले, "अरे तुझ्याकडे ते दोन रुपयाचे नाणे मी खूप वर्षांपासून पाहत आहे, त्याच्या काही विशेष आठवणी आहेत का?”

 "अरे हो, त्याची एक विशेष आठवण आहे, म्हणून मी ते जपून ठेवले आहे,” तो म्हणाला

"काय विशेष आठवणी आहेत?” मी अगदी कुतूहलाने विचारले.

     "अरे, तुला तर माहीत आहे की, आमचा गावी किराणा दुकानाचा व्यवसाय आणि पिठाची गिरणी आहे. मी अगदी नववी, दहावीत असल्यापासून दुकानदारीत वडिलांना मदत करत होतो. वडील पिठाच्या गिरणीकडे ज्यावेळी लक्ष देण्यासाठी जात तेव्हा मी दुकानात लक्ष देत असे.आमचे गाव बागायती असल्याने आमच्या गावात रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक येत असतात. असंच एक रोजगाराच्या शोधात आलेलं कुटुंब आमच्या गावात राहत होतं. ते किराणा घेण्यासाठी आणि दळण दळण्यासाठी नेहमी आमच्या दुकानात येत होते. ते सर्वांशी मिळून मिसळून राहत होते. गावात मिळेल तो रोजगार ते करत होते. त्यांची सूनसुद्धा नेहमी दुकानात येत होती. दुकानदारीमुळे आमचे आणि त्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. सुनबाईचे माहेर खूप लांब होते त्यामुळे ती दरवर्षी मला रक्षाबंधनला राखी बांधत होती. तिचा भाऊ माझ्याच वयाचा होता. ती माझ्यात तिचा भाऊ पाहत होती.”

  तो सांगत असताना मी मधेच म्हणालो,"अरे याचा आणि त्या दोन रुपयाचा काय संबंध?”

"अरे तेच तर सांगतोय,” असं म्हणत त्याने पुढे सांगायला सुरुवात केली,

"एका रक्षाबंधनला ती मला राखी बांधायला दुकानात आली. आमच्या दुकानातून राखी घेऊन ती मला बांधत असे. पण ती जेव्हा दुकानात राखी घ्यायला आली तेव्हा सगळ्या राख्या संपल्या होत्या. पूर्वी दुकानदार फार मोठा राख्यांचा स्टॉक ठेवत नसत. तिला तर मला राखी बांधायची होती. पण राखीच दुकानात शिल्लक नव्हती. गावात दुसरं दुकान नव्हतं. तिने आजूबाजूला राहणाऱ्या बायकांकडे राखी शिल्लक आहे का ते पाहिले, कुठेच राखी तिला मिळाली नाही. ती शेवटी परत दुकानात आली.

बराच वेळ थांबली. तिला मला काहीतरी सांगायचं होते, पण तिच्या चेहऱ्यावर संकोच दिसत होता. मीच तिला म्हणालो, ‘काही काम आहे का?'

 ‘दादा, तुम्ही आज तुमच्या ताईकडे राखी बांधायला जाणार आहात ना,'

‘हो, जाणार आहे की', मी म्हणालो.

‘मग, माझे एक काम कराल का?' ती म्हणाली.

      ‘हो, करेल की', मी म्हणालो.

      ‘हे दोन रुपये घ्या,आणि तुमच्या बहीण्याच्या गावातून एक राखी घ्या, तुमच्या बहिणीला ही माझी राखी बांधायला सांगा,' तिने असे म्हणत माझ्या हातात दोन रुपये दिले आणि म्हणाली, ‘दादा नक्की राखी घ्या आणि बांधा बरं,'

     तिने दिलेल्या दोन रुपयाकडे मी बराच वेळ पाहत होतो. तिची भावना किती चांगली होती. माझ्यात ती तिच्या भावाला पाहत होती. तिची राखी बांधण्याची तळमळ, प्रेम पाहून खूप बरं वाटत होतं.”

      "अरे, मग, का घेतली नाहीस राखी? ते दोन रुपये अजून तुझ्याकडेच आहेत,” मी विचारले.

     "अरे, मी माझ्या पैशांनी तिच्या नावाने राखी घेतली आणि बहिणीकडून बांधून घेतली.  ते दोन रुपये मी तसेच ठेवले, त्या दोन रुपयांशी खूप चांगली भावना जोडली असल्याने मी ते जपून ठेवले आहेत.”  त्याने त्या दोन रुपयाच्या नाण्याविषयी सांगितले.

  "अरे, आता ती तुझी बहीण कुठे असते,” मी विचारले.

 "अरे, ते कुटुंब वीस वर्षांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले आहे. आता काही संपर्क नाही.” मित्राने माहिती दिली.

      ते दोन रुपयाचे नाणे आणि त्यामागील असणारी भावना खूप भावनिक होती. त्या नाण्यामध्ये बहीण भावाच्या नात्याची एक भावना होती. -प्रा. कुंडलिक कदम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतीयत्वाचा सार्थ अभिमान