महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पतेती आणि नववर्ष
सकाळी उठताच घरभर अगरबत्तीचा सुगंध, स्वयंपाकघरात लागन-नु-कस्टर्डचा गोड वास आणि हॉलमध्ये शुभेच्छा देणारे हसतमुख चेहरे हे दृश्य आहे पतेतीचे. हा दिवस पारशी समाजासाठी फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, तर वर्षाचा रिसेट बटन असतो. पतेती हा झोराष्ट्रधर्मीयांचा महत्त्वाचा सण. नवरोज हा त्यांच्या नववर्षाचा दिवस असला तरी पतेती त्याच्या आदल्या दिवशी साजरा होतो. "Pateti" या पर्शियन शब्दाचा अर्थ आहे पश्चात्ताप किंवा चुकांची कबुली. या दिवशी पारशी लोक गेलेल्या वर्षातील चुका मान्य करून, नव्या वर्षासाठी संकल्प करतात. म्हणजे एकप्रकारे वर्षाचे रिपोर्ट कार्ड पाहून पुढच्या वर्षी आणखी चांगलं करण्याचा संकल्प.
झोराष्ट्र धर्म हा इराणमध्ये जन्माला आला. पण तिथे धार्मिक छळ वाढल्यामुळे इ.स. ८-९ व्या शतकात काही कुटुंबं जहाज घेऊन भारतात आली. त्यांनी गुजरातच्या सान्जन किनाऱ्यावर पाऊल ठेवलं आणि इथल्या संस्कृतीत मिसळत आपले सण-संस्कार टिकवले. पतेती हा त्या काळापासून चालत आलेला सण आहे. जेव्हा नवीन वर्ष सुरू होण्याआधी स्वतःला शुद्ध करण्याची प्रथा पाळली जायची.
पतेतीच्या तयारीला आठवडाभर आधीच सुरुवात होते. जुनं फर्निचर पुसलं जातं, भिंतींना नवं रंगकाम केलं जातं. दरवाजाला फुलांचे तोरण, जमिनीवर रंगीत पावडरने अल्पना नावाची रांगोळी काढली जाते. पांढरा पिरान आणि फेटा घातलेले पुरुष, रंगीबेरंगी साडीतल्या महिला दिसून येतात. या दिवशी सकाळी पारशी लोक अग्यारी किंवा आतश बेहराममध्ये जातात. तेथे पवित्र अग्नीसमोर पतेत प्रार्थना केली जाते. ही प्रार्थना म्हणजे देवाजवळ चुकांची कबुली देऊन माफी मागणं.
विधीनंतर घरी येऊन कुटुंबीय एकमेकांना शुभेच्छा देतात. पतेतीच्या दिवशी स्वयंपाकघर म्हणजे पाककलेचं मंदिरच असतं. पारशी जेवणात चव, रंग, सुगंध सगळं अफलातून असतं. यात धनसाक नावाचा पदार्थ मटण, डाळ, मसाले आणि भाज्यांच्या अप्रतिम मिश्रणापासून बनलेला असतो. केळ्याच्या पानात गुंडाळलेली वाफवलेली मासळी, चिकन फर्चा नावाचं मसालेदार तळलेलं चिकन आणि शेवटी लागन-नु-कस्टर्ड असा बेत असतो. मुंबईत कुलाबा किंवा दादरच्या पारशी घरात हा मेजवानीचा नजारा असतो. रायगडात अलिबाग, मुरुड, पेण येथील काही जुन्या पारशी बंगल्यांमध्ये अजूनही पतेतीला ताटं उशीरापर्यंत भरत असतात.
पण पतेती म्हणजे नुसतं खाणं-पिणं नाही. हा दिवस कुटुंब, नातेवाईक, मित्र, आणि शेजाऱ्यांसोबत घालवण्याचा असतो. मुंबईतील पारशी पंचायती, क्लब आणि सामूहिक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होतात. गाणं, नृत्य, नाटिका आणि अर्थातच मेजवानीही असते. रायगडात, विशेषतः मुरुड आणि अलिबाग येथे, पारशी कुटुंबं समुद्रकिनाऱ्यावर एकत्र येतात, गप्पा मारतात आणि पतेतीची आठवणीय रात्र घालवतात.
पतेतीचा सारांश सोपा आहे.. भूतकाळातील चुका विसरा, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा आणि नवीन वर्ष हसतमुखाने सुरू करा.आणि हा संदेश फक्त पारशी समाजापुरता मय्राादित नाही, तर सर्वांसाठी लागू आहे.
पतेती हा फक्त सण नाही, तर जीवनाकडे पाहण्याची पारशी पद्धत आहे.. चुका मान्य करा, मन शुद्ध करा आणि आनंदाने पुढे चला. आणि हो, पुढच्या वेळी पतेतीच्या दिवशी एखाद्या पारशी मित्राच्या घरी गेलात, तर पदार्थांवर ताव मारा आणि निघताना हसत म्हणा "थँक यू, आवजो!” - तुषार म्हात्रे