महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आनंदी सदन
आज सदनात दाखल झालेल्या नवीन जोडप्याचे स्वागत करताना सदानंद आणि सावित्रीबाईंना आनंद झाला नाही, तर त्यांचे मन हेलावले. त्यांना मनापासून वाईट वाटले..कारण आज दाखल झालेले जोडपे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर तीस वर्षांपूर्वी निर्दयपणे त्यांची आश्रमात रवानगी करणारे त्यांचा मुलगा राज नी सून नेहा होते.
मागच्या आठवड्यात आनंदी वृद्धाश्रमाला एक लाख रुपयांचे डोनेशन दिलेल्या माने साहेबांचे आई-वडील आज वृद्धाश्रमात दाखल होणार होते. मॅनेजर साहेबांनी वृद्धाश्रमातील एक रूम माने साहेबांच्या आई-वडिलांसाठी सज्ज करून ठेवली होती. मॅनेजर साहेब वृद्धाश्रमाच्या गेटजवळील रोपांची पाहणी करत असताना एक कार वृद्धाश्रमाच्या गेटपाशी येऊन थांबली.
मी सदानंद माने आणि ही माझी पत्नी सावित्री, साहेबांनी ओळख करून दिली. पंचावन्न-साठ वयोगटातील त्या जोडप्याला पाहून मॅनेजर साहेबांनी विचारले, माने साहेब, तुमचे आई-वडील कुठे आहेत?
माझे आई-वडील? सदानंदांनी आश्चर्याने विचारले. अहो, त्यांना जाऊन तर पंधरा वर्षे झालीत. मग या वृध्दाश्रमात कोण राहणार? मॅनेजर साहेबांनी विस्मयाने विचारले.
साहेब्। आम्ही दोघेच राहणार. तुमची काही हरकत नाही ना? सदानंदांनी विचारले.
माने साहेब, तुम्ही आणि बाईसाहेब अगदी तंदुरुस्त दिसतात, तरी वृध्दाश्रमात? का? कशासाठी?
साहेब, आपण तुमच्या केबिनमध्ये बसूया का? चला, मी तिथे तुम्हाला सर्व काही सांगतो, सदानंद म्हणाले.
साहेब, मी दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालो, माध्यमिक शाळेत शिक्षक होतो आणि सावित्री उत्तम गृहिणी. राज हा आमचा एकुलता एक मुलगा, खूप लाडात वाढलेला. इंजिनीयर झाला आणि एका कंपनीत नोकरीस लागला. सावित्रीने राजसाठी तिच्या माहितीतील एक शिकलेली, हुशार आणि सुंदर मुलगी पसंत केली होती. मलाही ती मुलगी राजसाठी योग्य वाटली. आम्ही राजशी बोललो परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. त्याने एक अतिशय श्रीमंत, सुंदर..पण परजातीतील मुलगी पसंत केली होती. आम्ही विरोध दर्शवला परंतु त्याच्या हट्टापुढे आम्ही हात टेकले. सहा महिन्यांनंतरची लग्नाची तारीख ठरली. आमचे घर खूपच लहान होते. आता एवढी श्रीमंत मुलगी या लहानशा घरात कशी राहणार म्हणून राजने मोठे घर घेण्याचे ठरवले. त्याचा विचार योग्यच होता म्हणून मी माझ्या जवळील सर्व पैसे, सावित्रीचे मंगळसूत्राखेरीज सर्व दागिने इतकंच काय माझे लॅाकेट नी अंगठी देखील राजला घर घेण्यासाठी दिली. राजने लवकरच एक अतिशय प्रशस्त घर विकत घेतले आणि आम्ही नेहा राज या नवीन वास्तूत राहायला गेलो.
राजचे लग्न झाले, सावित्रीने आमच्या सुनेचे म्हणजे नेहाचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. थोड्याच दिवसांत राजची जवळच्या तालुक्याच्या गावी बदली झाली आणि राज सोमवार ते शुक्रवार तालुक्याच्या गावी राहून शनिवार-रविवारी घरी येऊ लागला. हळूहळू नेहाराज मध्ये नेहाचे राज्य नी मनमानी सुरू झाली. अगदी क्षुल्लक कारणांवरून नेहा सावित्रीशी वाद घालू लागली. नेहा नोकरी करत नव्हती; परंतु तरीही ती बराच वेळ घराबाहेर असायची. त्यामुळे घरातील बहुतांश कामे सावित्रीलाच करावी लागत होती. सावित्री एकदा नेहाला त्याबद्दल समजावण्याच्या सुरात बोलली. परंतु नेहाला ते आवडले नाही. त्यानंतर नेहाने सावित्रीवर उगीचच चिडचिड करणे, ओरडणे, तीचा अपमान करणे सुरू केले. मी हे सर्व बघत होतो आणि ज्यावेळी गोष्टी सहनशक्तीच्या बाहेर गेल्यात त्यावेळी मी नेहाशी या विषयावर बोललो, तेव्हा तीने माझाही अपमान केला.
दुसऱ्याच दिवशी नेहाच्या आई आल्या आणि त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा आणि आमच्या सामान्य परिस्थितीचा उल्लेख करत आमचा पाणउतारा केला. सुनेने केलेला अपमान आम्ही पचवत होतो; परंतु तिच्या आईने केलेला अपमान आमच्या जिव्हारी लागला. शनिवारी राज घरी आला, त्यावेळी आम्ही त्याच्याशी या विषयावर बोललो. मी नेहाला समजावतो असे त्याने आश्वासन दिले. परंतु रात्रीत राणीने राजाला फितवले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या बाजूने न बोलता, आमचा मुलगा नेहाच्या बाजूने बोलू लागला.
स्वाभिमानाने जगणाऱ्या आम्हा दोघांना मनस्वी वेदना होत होत्या. हळूहळू गोष्टी सहन करण्या पलीकडे गेल्यात, वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि परिणामी आमची रवानगी वृद्धाश्रमात झाली, हे सांगताना सदानंदांचे डोळे पाणावले.
सदानंद आणि सावित्रीबाई वृद्धाश्रमातील सर्वात तरुण जोडपे होते. ते लवकरच इतरांमध्ये मिसळलेत आणि सदा दादा आणि सावि ताई म्हणून प्रिय झालेत. सदानंदांनी विविध विषयांवरील चर्चा, सर्वांना सहभागी होता येतील असे खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून तर सावित्रीबाईंनी आध्यात्म, योगासने, बागकाम यांत पुढाकार घेऊन प्रसन्न आणि आनंदमय वातावरणाची निर्मिती करण्यात हातभार लावला.
सदानंदांचे डॅाक्टर विद्यार्थी कोणतेही शुल्क न आकारता वैद्यकीय सेवा पुरवु लागले. आनंदी वृध्दाश्रम आता ज्येष्ठांचे आनंदी सदन बनले.
नव्याने दाखल होणाऱ्या मित्रांचे प्रेमाने स्वागत करून मोठ्या आत्मीयतेने त्यांना त्यांच्या नवीन घरात सामावून घेणे सुरू झाले. जगण्याला कंटाळून इथे प्रवेश घेणाऱ्यांच्या जगण्यात आनंद आणि चैतन्य निर्माण झाले. हळूहळू आनंदी सदन नावारूपाला आले, त्याची कीर्ती वाढली, देणग्यांचा ओघ वाढला आणि ते भव्यदिव्य झाले.
आज सदनात दाखल झालेल्या नवीन जोडप्याचे स्वागत करताना सदानंद आणि सावित्रीबाईंना आनंद झाला नाही, तर त्यांचे मन हेलावले. त्यांना मनापासून वाईट वाटले..कारण आज दाखल झालेले जोडपे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर तीस वर्षांपूर्वी निर्दयपणे त्यांची आश्रमात रवानगी करणारे त्यांचा मुलगा राज नी सून नेहा होते.
म्हणतात ना, आपण केलेल्या दुष्कृत्यांची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात. शेवटी काय? करावे तसे भरावे. आपल्याच सून आणि मुलावर ओढवलेली ती परिस्थिती पाहून मातापित्याचे हृदय मात्र पिळवटले. - दिलीप कजगांवकर, पुणे