उद्योजकतेसाठी उपयुक्त अशी छत्रपती शिवरायांची गुणवैशिष्ट्ये

आजच्या मराठी मुलांसमोर उद्योजक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी माणसाने व्यावसायिकता अंगी बाणवली पाहिजे.‘नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे कसे होता येईल' असा विचार त्यांना करता आला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत स्वतः उद्योजक बनत, उद्योग व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे.  बाल शिवबा राजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली, तेव्हा त्यांच्याकडे फक्त त्यांच्या वडिलांना आदिलशहाकडून मिळालेली पुणे व सुपे परिसरातील लहानशी जहागिरी होती.

 पाच वर्षात सव्वा लाख नवे उद्योजक निर्माण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५' ला नुकतीच मंत्रिमंडळाने मंजुरी दिली अर्थात या धोरणाच्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांना उद्योजकतेसाठी उपयुक्त ठरतील असे छत्रपती शिवाजी महाराजांची ही गुणवैशिष्ट्ये आणि या गुणवैशिष्ट्यांचा अंगीकार केल्यास सरकारचे धोरण यशस्वी होण्यास मदत होईल. आयटीआय, पॉलिटेक्निक, शैक्षणिक संस्थांमध्ये मायक्रो इंक्युबेटर मध्येही विद्यार्थ्यांसाठी याचा निश्चितच उपयोग होईल. यामुळे येणारी पिढी नोकरी मागणारी न होता नोकरी देणारी होण्यास मदत होईल यात शंका नाही. 

विको वज्रदंती, पितांबरी पासून ते आजच्या अल अदिल सुपर स्टोअर्सचे मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांच्यापर्यंत व्यवसायात मराठी माणसाने अटकेपार झेंडे फडकवले आहेत. तरी मराठी माणूस व्यवसायात मागे, त्यांना व्यवसाय जमणार नाही हा ग्रह समाजात पसरलेला आहेच. खरंतर हजारो वर्षे चातुर्वर्णातला वैश्य समाज व्यवसाय करीत होता. आताही ती प्रथा सुरूच आहे. एवढेच काय राजा महाराजांनीही व्यवसायाला प्रोत्साहन दिले. राजश्रयही दिला. कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी तर आपल्या संस्थानात व्यवसायाला प्राधान्य दिल्यानेच तर कोल्हापूरची चप्पल आणि तेथील अनेक उद्योगधंदे जगभर पोहचले.

थोडक्यात काय, नोकरी सुरक्षित आणि व्यवसाय असुरक्षित या मानसिकतेतून मराठी समाज आज बाहेर पडत आहे. खरे तर आपली ही परंपराच नाही. आपण म्हणत आलोत ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी' नाहीतर जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करून ‘छत्रपती' होण्याचे स्वप्न लहान शिवबांच्या मनात पेरलंच नसतं. म्हणूनच त्यांच्या चारित्र्यातून उद्योग-व्यवसाय कसा करावा, यशस्वी उद्योजक कसं व्हावं? याचीही प्रेरणा आपल्याला मिळू शकते. आज अनेक छोटे-छोटे व्यवसाय करणारी मुले पुढे उद्योजक होतांना दिसत आहेत. वरील व्यवसायांचे जनक म्हणजे पेंढारकर, परीक्षित प्रभूदेसाई, डॉ. धनंजय दातार ही शून्यातूनच विश्व निर्माण करणारी नावे आहेत. त्यामागे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची दृष्टी आहेच. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन अनेक व्यावसायिक निर्माण व्हावेत यासाठीचा हा लेख प्रपंच.

 १) मानसिकता -  पूर्वीपासून अगदी पंधराव्या, सोळाव्या शतकातसुद्धा मराठी तरुण सुलतानाकडे किंवा बादशाहाकडे चाकरी करण्यात धन्यता व गर्व अनुभव करीत. त्यातून मिळणाऱ्या वतन किंवा जहागिरीतच ते स्वतःला राजे म्हणवून घेत. आपण सुलतान किंवा बादशाहाकडे चाकरी करतो म्हणजे ती एक प्रकारची गुलामगिरीच आहे याचे भान त्यावेळच्या मुलांना नव्हते. स्वतःकडे सर्व प्रकारच्या क्षमता असूनही त्यावेळी त्यांना स्वतःचे राज्य स्थापन करावेसे नाही वाटले. त्याप्रमाणे आजही मोठ्या प्रमाणात मराठी तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा दिसून येत नाही. हा विचार आजच्या मराठी तरुणांबाबत शंभर टक्के बरोबर नसला तरी मराठी तरुणांची मानसिकता व्यक्त करणारा आहे. एकमेकांशी असणारे हेवे-दावे, भाऊबंदकी, आपल्याला जमेल का? आपण अयशस्वी झालो तर, कुणी आपल्याला नावे तर ठेवणार नाही ना? समाज काय म्हणेल? आपले समाजात काय स्थान असेल? आजचा मराठी तरुण या विचारातच इतका गुरफटतो की स्वतःचे स्वातंत्र्य, स्वावलंबन, स्वाभिमान, अभिमान या संकल्पना त्याच्या मनाला शिवतही नाहीत.  

मुलांच्या आयुष्यात आईचे संस्कार फार परिणाम करतात. जर जिजामातेने शिवबांना सुलतानाकडील जहागिरी व त्यांच्याकडून मिळणारा मानसन्मान, पदव्या मिळवण्यास प्रोत्साहन दिले असते, तर शिवबाराजे छत्रपती झाले नसते. असेही शिवबाराजे मोठ्या जहागीरदाराचे सुपुत्र होते. त्यामुळे त्यांना या गोष्टी अनायास मिळणारच होत्या. शिवचरित्र वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या, सांगणाऱ्या प्रत्येकाला असे वाटते की आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते. पण ते माझ्या घरात नको. शेजारच्या घरात, दुसऱ्या कोणाच्याही घरात चालतील. माझी मुलं उच्चशिक्षित होऊन देशात, विदेशात, नाहीतर कुठेही चांगल्या कंपनीत नोकरीला लागावीत आणि त्यांनी त्यांचा संसार करावा. त्यामुळेच आजही काही अपवाद वगळता मराठी तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्यात धन्यता मानतात. त्यांचे विश्व नोकरी, लग्न, घर आणि त्यांच्यासारखाच विचार करणारी त्यांची मुले या पलीकडे नसते.  

२) आजूबाजूची नकारात्मकता - आपल्या आजूबाजूचे नकारात्मक विचार आपल्याला आपल्या उद्दिष्टापासून दूर नेतात. जसे आपण लहान मुलाला म्हणतो, "तू हे करू नको, ते करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, काळोखात जाऊ नको यामुळे आधी निर्धास्तपणे बागडणारं मुल भीतीच्या छायेत येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्य निर्मितीचा विचार मांडला असेल, तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांनी तरी नकारात्मक विधाने केलीच असतील. जसे ‘या आधी कोणी स्वतःचे राज्य निर्माण केलं होते का? कोणाला करायला जमलं आहे का? ज्यांनी असे प्रयत्न केले त्या सर्वांचे शेवटी काय झाले? अगदी पुरंदरच्या तहात स्वराज्याचा बराच मोठा भूप्रदेश मुघलांना दिला तेव्हा निश्चितच अनेकांच्या मनात ह्या भावना निर्माण झाल्या असणार. ‘नाही जमणार आपल्याला, काही लोक बरोबरच बोलत होती, आपण नाही स्वराज्य उभे करू शकणार, ते काम आपले नाहीच'. अशा गोष्टी घडल्याच नसतील असेही नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे. आपल्याकडून धन-संपत्ती, जड-जवाहीर सर्व काही हिरावून घेता येऊ शकते. पण आपले स्वप्न, ध्येय, ज्ञान, अनुभव, उद्दिष्ट, इच्छा, क्षमता, धैर्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महाराजांनी नकारात्मकतेचा विचार न करता आपल्या कर्मावर आणि उद्दिष्टावर ठाम राहत हिंदवी स्वराज्याची उभारणी केली.

असेच एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतांनासुद्धा बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूचे लोक हेच सांगतात 'तू हे करू शकणार नाही, हे तुझे काम नाही, अरे तुला नाही जमणार, तुझ्या वाडवडिलांनी कधी केला आहे का उद्योग-व्यवसाय? की तूच आला मोठा शहाणा, करशील म्हणे उद्योग. इतर आजूबाजूचे अनुभवी जे उद्योगात अपयशी झालेत तेही त्यांचे अनुभव सांगताना नाउमेदच करतात. याशिवाय जे तुमच्या यशावर, संकल्पनेवर जळत असतात तेही तुम्हांला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करतात. तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या सर्व नकारात्मकतेच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत, पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली तर आपण आपले स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकू.

३) आत्मविश्वास - खरंतर आजच्या मराठी मुलांसमोर उद्योजक होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मराठी माणसाने व्यावसायिकता अंगी बाणवली पाहिजे. आपण ‘नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे कसे होता येईल' असा विचार त्यांना करता आला पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत स्वतः उद्योजक बनत, उद्योग व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. आपल्या बाल शिवबा राजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या बाल सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली, तेव्हा त्यांच्याकडे फक्त त्यांच्या वडिलांना आदिलशहाकडून मिळालेली पुणे व सुपे परिसरातील लहानशी जहागिरी होती. त्यांच्या आयुष्यात मोठमोठी संकटे आली पण त्यांनी कधीही ध्येयाचा विसर पडू दिला नाही. याउलट संकटेच आपल्याला संकटांचा सामना करण्याची शक्ती देतात, ताकद देतात, ऊर्जा देतात, जिद्द देतात, तुमची क्षमता वाढवतात,  परिणामी १६४६ मध्ये स्थापन झालेल्या हिंदवी स्वराज्याचे पुढील १०० वर्षात साम्राज्यात रूपांतर झाले.

४) सकारात्मक प्रेरक दृष्टिकोन - छत्रपती शिवाजी महाराजांकडे काम करणारे सर्व कर्मचारी, मग तो साधा शिपाई असला तरी त्याच्या सुखदुःखात महाराज सहभागी होत. त्याच्या परिवाराची सर्वतोपरी काळजी घेत. त्याच्या सुखदुःखात त्याला योग्य ती मदत करत. त्यामुळे रयतेला महाराजांबद्दल सकारात्मक विश्वास निर्माण होण्यास मदत होई. उद्योजकानेसुद्धा आपल्याकडे काम करणारे सर्व कर्मचारी व आपल्या उत्पादनाशी संबंधित असलेले सर्व ग्राहक यांच्याशी शक्य तितके चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात जमेल त्या पद्धतीने सहभागी होत त्यांना योग्य ती मदत केल्यास तेही आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतील.

५) धोरण - महाराजांनी व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेले धडे आज मॅनेजमेंटच्या अनेक कोर्सेससाठी प्रमाण मानले जातात. आजच्या आधुनिक कालखंडातील मॉडर्न मॅनेजमेंट सायन्सच्या अनेक गोष्टींची सुरुवात महाराजांनी आधीच केली होती. उदा. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात कामी येणाऱ्या प्रत्येकाच्या घरातील व्यक्तींना अनुकंपा तत्वावर नोकरीवर घेत. ज्या घरात पुरुष नाहीत त्या घरातील स्त्रीला अर्धे वेतन पेन्शन म्हणून दिले जात असे. त्यावेळी अनुकंपा किंवा पेन्शन हे शब्द नव्हते; पण महाराजांनी या योजना सुरू केल्या होत्या. याच गोष्टी उद्योजकाने स्वीकारल्या तर कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश जातो व ते अधिक मन लावून काम करतात.

६) कमी खर्च जास्त नफा - मित्रांनो व्यवसाय निवडताना तो कमी खर्चात कमी कष्टात जास्त नफा देणारा कसा असेल असा विचार करणे फार आवश्यक असते. महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात याचे तंतोतंत पालन केल्याचे दिसते. हा आदर्शच त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी घालून दिला आहे. महाराजांनी त्यांच्या संपूर्ण जीवनात दक्षिण दिग्विजय ही एकच मोहीम केली. महाराजांचा भर हा लढाई किंवा आक्रमणासंदर्भात गनिमी काव्यावर असायचा. त्यामध्ये शत्रु सैन्य गाफील असताना अचानक छापा टाकून शत्रु सैन्य सावध होऊन प्रतिआक्रमण करेपर्यंत महाराजांचे सैन्य शक्य तेवढे जास्तीत जास्त शत्रूचे नुकसान करून निघून जात असे. यामुळे शत्रू सैन्याच्या मनात एक प्रकारची दहशत, भीती निर्माण करण्यात महाराज यशस्वी होत. अचानक छापा टाकणे या प्रकारच्या युद्धतंत्रामध्ये खर्च कमी व नुकसानही कमी आणि यश मात्र अधिक असे. या प्रकारच्या युद्धतंत्रासाठी आवश्यक असे महाराजांचे गुप्तहेर खाते, जे अत्यंत सक्षम होते. महाराजांना शत्रूची खडान्‌खडा माहिती मिळत असे. शत्रूची विश्रांतीची वेळ, झोपण्याची वेळ, मनोरंजनाची वेळ, युद्धसाहित्य, तोफा, दारूगोळा, अन्नधान्य, पाणी त्याचबरोबर शत्रूची जमेची बाजू व कमकुवत बाजू अशा असंख्य गोष्टी महाराजांना गुप्तहेर खात्याकडून मिळत असत. त्या माहितीच्या आधारे महाराजांना गनिमीकाव्याच्या युद्धतंत्राचा वापर करत शत्रूला जेरीस आणणे सहज शक्य होई. कोणत्याही व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची अशीच सखोल माहिती मिळविली पाहिजे. त्यातील खाचखळगे समजून घेतले पाहिजेत. त्या आधारे त्याला त्याच्या व्यवसायात यश मिळविणे नक्कीच सोपे होईल. व्यवसाय असा करा की ज्यात नफा असेल. ज्या व्यवसायात नफा नाही असा व्यवसाय व्यावसायिकाने करू नये.

७) जोखीम - महाराजांना स्वराज्य निर्मितीच्या कामात अनेकदा जीवावर बेतेल अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण अखंड सावध राहून महाराजांनी त्यावर मात केली. उदा. आर्ग्याहुन सुटका किंवा अफजलखानाची भेट या प्रसंगातील थरार कोणालाही हादरवून टाकणारा आहे. उद्योजकांनी संकटाला न घाबरता अत्यंत सावधपणे हुशारीने त्यावर मात केली पाहिजे. संकटाला घाबरून आपल्या उद्दिष्टापासून माघार घेता कामा नये.

 ८) प्रामाणिकपणा - महाराजांनी सुरत वर छापा टाकला त्यातून जे धन मिळवले, त्यातून त्यांनी किल्ले बांधले. ते सर्व धन त्यांनी स्वराज्याच्या कामासाठी वापरले. स्वराज्याबद्दल जनतेला, सैनिकांना प्रचंड आत्मीयता होती. त्यामुळे भ्रष्टाचाराला थारा नव्हता. शिवाय गैरवर्तनाबद्दलचे महाराजांनी केलेले कायदे अतिशय कडक होते व त्याची अंमलबजावणी करतांना कमालीची समानता पाळत. हा आपला, हा जवळचा आणि तो लांबचा असा विचार ते करत नसत. उद्योजकांनी सुद्धा उद्योग व्यवसाय करतांना अशाच प्रकारचे धोरण स्वीकारावे.

 ९) अखंड सावध - महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सातत्य ठेवले. ते कधी गाफिल राहिले असा क्षण त्यांच्या आयुष्यात कधी दिसत नाही. महाराजांनी त्यांच्या विरोधकांमध्ये कधीही एकजूट होणार नाही ही काळजी घेतली.उद्योजकांनीही उद्योग व्यवसाय वाढविताना कोणत्याही प्रकारे गाफील राहू नये. आपल्याला तुल्यबळ नवीन प्रतिस्पर्धी उभा रहाणार नाही याची काळजी घ्यावी. आपण आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर होत असताना आपल्या उद्योगासंदर्भातील इतर व्यावसायिकांशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्यातील गुण व दोष शोधून काढावे.

१०) प्रभावी सुसंवाद - आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी उद्योजकाने अधिकाधिक माणसे कशी जोडता येतील याचा सतत विचार केला पाहिजे. जोडलेला प्रत्येक माणूस टिकवून ठेवता आला पाहिजे. तो आपल्याला केव्हा, कुठे, कसा उपयोगात येईल हे  सांगता येत नसते. याची जाणीव सतत उद्योजकाने ठेवलीच पाहिजे. उद्योजकाने तडजोड किंवा सुसंवाद  करायलाही शिकले पाहिजे. महाराजांनी त्यांचे अनेक किल्ले व लढाया ह्या तडजोडी किंवा सुसंवादाच्या माध्यमातून जिंकल्या. म्हणजे हल्लीच्या कालखंडात त्याला आपण तडजोड करून मिळवणे असे म्हणता येईल.

११) शाब्बासकीची थाप - जंजिरा किल्ला व त्यातील सिद्धी विरोधात शिवरायांच्या अनेक मोहिमांपैकी एका मोहिमेत रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या एका बाजूला शिड्या लावणे, शिड्या लावून झाल्यावर मराठ्यांनी त्या शिड्यावरून किल्ल्यात प्रवेश करणे व युद्ध करून किल्ला ताब्यात घेणे. साधारण अशी योजना होती. यात शिड्या लावण्याचे काम अलिबागच्या लायजी कोळी पाटलांकडे होते. हे काम करण्यात ते उस्ताद होते. बुरुजावर पहारेकरांचा पहारा होताच, तरी सर्वांच्या नजरा चुकवत अत्यंत हुशारीने त्यांनी काम पूर्ण केले. तिथे त्यांचे काम संपले होते. पण ते मराठी सैन्याची वाट पाहत बघत तिथेच थांबले. मध्य रात्र होऊन गेली तरी मराठा सैन्य येईना. हे बघितल्यावर त्यांनी उजेड पडण्याच्या आत सर्व शिड्या काढल्या व ते परत आले. खरंतर शिड्या काढण्याचं काम त्यांनी स्वतःच्या मनानेच केले होते. तो त्यांना आदेश नव्हता. पुढे दोनच दिवसात त्यांना महाराजांनी बोलावले. त्यांना भीती वाटली. पण जेव्हा महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. ते महाराजांना म्हणाले महाराज मोहीम तर अयशस्वी झाली. मग हा मान का? महाराज म्हणाले आपण शिड्या काढण्याचे काम केले. म्हणजे स्वराज्यासाठी दोनशे टक्के कामगिरी केली. त्यामुळे सिद्धीला संशय येणार नाही. अशाप्रकारे जर उद्योजक आपल्या कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करत असेल तर ते निश्चितच त्या उद्योगासाठी पूरक बाब ठरेल.

 १२) दूरदृष्टी - शिवचरित्र म्हणजे विवेक. हा विवेक प्रत्येकाने जपणं फार आवश्यक असतं. महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सदसद्‌विवेक बुद्धीचा, निरक्षिर विवेकबुद्धीचा यथायोग्य उपयोग केल्याचे दिसून येते. उदा. त्या काळात धर्मशास्त्रानुसार समुद्र लांघणे चूक होते. पण महाराजांनी काळाची पाऊले ओळखली समुद्रमार्गे आपल्याला धोका उत्पन्न होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आले होते. ज्यांच्या ताब्यात समुद्र त्यांच्या ताब्यात सत्ता, संपत्ती, वैभव हे सूत्र राजांनी जाणलं म्हणून त्यांनी स्वतःचे समुद्रावर प्रबळ आरमार उभारले व त्यांनी समुद्रावरून व्यापारही सुरू केला. उद्योजकालासुद्धा आपल्या उद्योग विकासाच्या दृष्टीने काळाची पावले ओळखता येणे व त्यानुसार आवश्यक ते बदल स्वीकारणे आवश्यक असते. तरच उद्योगाचा विकास होऊ शकतो.

१३) कल्पकता - महाराजांना आरमार उभारताना युद्धबोटी व व्यापारी बोटींची आवश्यकता होती. इंग्रजांकडे मागणी केल्यावर त्यांनी देण्यास नकार दिला. तेव्हा महाराजांनी स्वतः इंग्रजांकडील बोटींपेक्षा चांगल्या दर्जाच्या ‘संगमेश्वरी बोटी' निर्माण केल्या व पुढे खंदेरी-उंदेरीच्या युद्धात याच बोटीच्या सहाय्याने इंग्रजांचा आरमारी पराभवसुद्धा केला. त्यामुळे इंग्रजांनासुद्धा महाराजांच्या या बोटींचा हेवा वाटू लागला. उद्योजकाचे उत्पादन कौशल्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण इतरांपेक्षा वेगळे असावे. जर त्यात नाविन्यता, आकर्षकता, चविष्टता, भव्यदिव्यता असेल तरच तुमच्या उत्पादनाला बाजारात उठाव मिळेल. तुमचा व्यवसाय तेजीत येईल. मात्र या गोष्टी नसतील तर उत्पादनाला बाजारात उठाव मिळणार नाही. उद्योजकाने आपल्या उद्योगाचा विस्तार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर केला पाहिजे. असा वापर नाही केला तर कदाचित त्याला मिळणाऱ्या यशात अपूर्णता राहू शकते.

१४ ) व्यसनाधीनता - मित्रांनो आज दारू, बियर पिणे, सिगारेट, विविध प्रकारची व्यसने हा शिष्टाचार होऊन बसला आहे. माझ्या मते जो शिवचरित्र जगतो तो कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडणार नाही. उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे.

आपण नीट अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येते की देशातील सत्तेची सूत्रे ही दर्शनी स्वरूपात जनतेच्या   हाती दिसतात पण अप्रत्यक्षरीत्या उद्योगपतींच्याच हातात असतात. हे तुम्हां आम्हां सर्वांनाच ज्ञात आहे. आज तुम्हीं आम्हीं सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मुजरा असेल. पण देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या देशातील युवकांनीसुद्धा आत्मनिर्भर होणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मनिर्भर होणे म्हणजे दुसऱ्यावर कोणत्याही प्रकारे अवलंबून न राहणे. आत्मनिर्भर होणे म्हणजे नोकरी करणे नव्हे. त्यासाठी देशातील युवकाने उद्योजकतेची कास धरली पाहिजे. आपली प्रतिभा स्वतःच्या उद्योग व्यवसायासंदर्भात वापरल्यास देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल असे मला वाटते. देश उद्योगप्रधान झाला तरच आत्मनिर्भर होऊ शकेल. या महासागररुपी कार्यात आपल्या प्रत्येकामुळे एकेका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या  सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर  होऊन जगात महासत्ता होईल यात शंकाच नाही. एक राष्ट्रवादी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यकर्तृत्वातून घ्यावा असा आदर्श यशस्वी उद्योजकतेचा मार्ग प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावा या उद्देशानेच येथे मांडला आहे. ही व्यक्तिरेखा  पुढील अनेक पिढ्यांना अशीच संघर्षरत राहून यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देत राहील. - प्रा. प्रशांत शिरुडे, के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कबुतरांना आळशी बनवलं कुणी?