महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कबुतरांना आळशी बनवलं कुणी?
सध्या प्रसारमाध्यमांतून कबुतरं बरीच चर्चेत आली आहेत. मुंबईतला कबुतरखाना बंद झाला नी कबुतरांवर प्रेम करन त्यांना दाणा घालणारे जीव तळमळू लागले. तशी कबुतरेही तळमळू लागली. कारण त्यांचा दाणा बंद झाला नी कबुतरं सैरभैर झाली... कबुतरं विचार करु लागली..अचानक असं काय झालं की हे जीव आपल्याला दाणा द्यायचे बंद झाले. नुसते बंदच नाही झाले तर आपल्याला रोज ज्या ठिकाणी दाणा मिळायचा ते ठिकाणही कुणीतरी झाकून ठेवलंय..का झाकून ठेवलंय? आता आम्ही खायचं काय? जगायचं कसं? कुठं जायचं? असे अनेक प्रश्न कबुतरांना पडू लागले.
दाणा मिळण्याची आस अजूनही लागून राहिल्यामुळे ती कबुतरं त्या झाकून ठेवलेल्या ठिकाणी येऊन आशाळभूत नजरेने चालणाऱ्या जीवांकडे बघायची. आता कुणीतरी दाणा घेऊन येईल. मग आपण दाणा खाऊ नी भरल्यापोटी निवांत ‘गुटर्र गु, गुटर्र गु' करीत बसू अशी स्वप्ने पडू लागली. रोज ती झाकलेल्या कबुतरखान्यावर येऊन बसायची. वाट बघायची. कुणी दाणा टाकतोय का? पण रोज त्यांची निराशा होऊ लागली. आता काय करायचं? या माणसांना झालयं तरी काय? अचानक ही माणसं का बिथरली? अशा अनेक प्रश्नांनी कबुतरांना बेजार केलं होतं. त्यांचा दाणा बंद होण्याचं खरं कारण बिचाऱ्यांना काय माहीत?
वास्तविक पाहता या कबुतरांना आळशी माणसानेच दाणा घालून बनवलं होतं. आयतं मिळतंय मग कशाला कष्ट करायचे अन्नासाठी? ही वृत्ती कबुतरांत निर्माण झाली होती. त्यामुळे ही कबुतरं कबुतरखान्याकडे रोज मोर्चा वळवायची. कारण त्यांना माहीत होतं की कुठेही दाण्यासाठी आपल्याला वणवण भटकावं लागणार नाही. इथे हमखास आपल्याला दाणा मिळेल. आणि म्हणून ही कबुतरं जिथे माणसं दाणा टाकतात तिथं जावू लागली. दाणा खावू लागली. आणि कबुतरांची संख्या झपाट्याने वाढू लागली. ही चिंतेची बाब मुंबई महानगरपालिकेच्या लक्षात आल्याने आणि या कबुतरांपासून माणसांना आजार होण्याची शवयता असल्याने लोकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कबुतरखाना बंद केला.
खरं तर या कृतीचे कबुतर प्रेमींनी स्वागत करायला हवं होतं. पण कबुतरांना दाणा घालणारे बिथरले. काय म्हणावं या कबुतर प्रेमाला? ज्या कबुतरांपासून आपल्याला आजार होण्याची शवयता आहे हे मुंबई महानगरपालिकेने सुचना देवूनसुध्दा कबुतरखाना बंद केल्यावर कबुतर प्रेमी हळहळले तेव्हा मी विचारांत पडलो....कबुतरांना आता ‘आ आ आ' म्हणायचे दिवस राहीले नाही. तर कबुतरांना आता ‘कबुतर जा जा जा ..कबुतर जा जा जा' म्हणायचे दिवस आले आहेत. कारण आरोग्यम् धनसंपदा. ही धनसंपदा आपल्याला जपायची आहे. त्यासाठी आपल्याला म्हणावचं लागेल.. कबुतर जा जा जा कबुतर जा जा जा - एकनाथ मढवी