हिंदुस्थानचा पहिला ध्वज फडकावणाऱ्या क्रांतिकारक ‘मादाम कामा'

स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वत्र राष्ट्रध्वज विक्रीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत; मात्र हिंदुस्थानाचा पहिला राष्ट्रध्वज कोणी फडकावला हे आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. हा भीमपराक्रम करणाऱ्या क्रांतिकारक मादाम कामा यांचा १२ ऑगस्ट हा स्मृतीदिन नुकताच सरला. युरोपात अटकेपार तिरंगा फडवणाऱ्या तसेच ‘हिंदुस्थान्यांच्या धडावर मान आहे आणि यापुढे ती नेहमी ताठच राहील, असे ठणकावून सांगणाऱ्या मादाम कामा यांच्याविषयी जाणून घेऊ.

 सोराबजी पटेल व जायजी या पारशी कुटुंबात २४ सप्टेंबर १८६१ या दिवशी भिकू उपाख्य मुन्नी हीचा जन्म झाला. पुढे शाळेत शिकत असतांना मुन्नीला वाचनाची सवय लागली. स्वतःला समेजल, पचेल अशा विषयांवर वाचनातील न पटणारे विषयही ती नजरेखालून घालीत असे. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत होत्या. एकदा ब्रिटीश प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानच्या भेटीवर येणार होता. त्यामुळे जनतेने त्यांचे स्वागत करावे, असे आवाहन केले जात होते. मुन्नी विचार करत होती हा राजपुत्र कोण? याचा नि आपला संबंध काय? त्याच्यावर आपल्या निष्ठा त्या कसल्या? दूरदेशांतून येणारा हा राजपुत्र आपला राजा कसा? ऑगस्ट १८८५ मध्ये मुन्नीचा रस्तुम कामाबरोबर विवाह झाला. ती आता भिकाजी रस्तुम कामा झाली होती; परंतु नियतीला हे लग्न मान्य नव्हते. भिकाजी ही रुस्तुम कामा यांचे घर सोडून परत वडिलांकडे रहावयास आली. लंडनमध्ये शामजी वर्मा, डॉ.पारिख, अब्दुल्ला मजिद, लाला लजपतराय, जे.सी. मुखर्जी ही मंडळी जाहीरपणे ब्रिटिशांविरुद्ध व्यासपीठ गाजवत होती. दादाभाईंच्या ‘लंडन इंडिया सोसायटी'तून त्यांनी आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. हाईड पार्कसारख्या सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांनी आपले प्रखर विचार मांडण्यास सुरुवात केली. ही नवखी स्त्री थेट सिंहाच्या गुहेत शिरून आयाळ विस्कटते आहे, हे पाहून ब्रिटिशदेखील चक्रावले.

ब्रिटिश त्यांना मॅडम म्हणत तर फ्रेंच, जर्मन त्यांना ‘मादाम कामा असे पुकारत. अशा रितीने लवकरच भिकाजी या ‘मादाम कामा या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. हे नाव काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाले. ‘मादाम कामा' हे नाव भविष्यात शेकडो क्रांतीकारकांना एखाद्या तेजःपुंज शलाकेसमान भासणारे होते. एकदा महात्मा गांधींचा मुक्काम लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये होता. मादाम कामाही लंडनमध्येच होत्या. गांधींची भेट मादाम कामा यांच्याशी झाली. बोलण्याच्या ओघात हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विषय निघाला. त्यावर कामा आवेशानं बोलू लागताच गांधीजी त्यांना म्हणाले, "Don't talk of Indias independence” परंतु कामा कसल्या ऐकतात ! कामांनी गांधीजींना तितक्याच ताडकन सुनावले, "India must have independence here & now”

 आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचे अधिवेशन जर्मनीतील स्टूटगार्ड येथे १८ ऑगस्ट १९०७ रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मादाम कामा यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्याच्या संधीचे सोने करण्याचा पक्का निश्चय मादाम कामा यांनी केला. परिषदेत मांडावयाचा ठराव स्वा. सावरकर यांनी तयार करून दिला. परिषदेच्या कामाकाजाच्या तिसऱ्या दिवशी कामा ठराव मांडणार होत्या. अधिवेशनाचे अध्यक्ष पॉल सिंगरे हे जर्मन समाजवादी होते. त्यांनी कामांना सांगितले की, या ठरावावर मतदान घेता येणार नाही; मात्र तो मांडून त्यावर बोलता येईल. कामांना हेच पाहिजे होते. मोठ्या रुबाबात त्या व्यासपीठावर आल्या. त्यांचा आवाज खणखणीत होता. प्रवाही होता. इंग्रजीवरही प्रभुत्व होते. विचारांची बैठक पक्की होती. मनात दृढ विश्वास होता. मादाम कामांनी ठराव मांडला आणि पुढच्याच क्षणी त्यांनी दडवून ठेवलेल्या मातृभूमीचा तिरंगी ध्वज हातात धरीत फडकवला आणि आवेशपूर्ण शब्दांत समोरच्या प्रतिनिधीगृहाला उद्देशून त्या म्हणाल्या, "This is the flag of Indian Independence. Behold it is born. It is already santified by the blood of Indian martyers. I call upon you gentleman to rise and salute the flag” इतिहासानेही श्वास रोखून पहावे असा तो क्षण होता! स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला ध्वज फडकवला गेला तो युरोपच्या भूमीवर आणि तोदेखील मादाम कामासारख्या रणरागिणीच्या हस्ते! त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा जो कडकडाट झाला तो न भूतो न भविष्यती असा होता. अगोदर ठरल्यानुसार कामांच्या ठरावावर मतदान होणार नव्हते. अध्यक्ष सिंगरे यांनी ठरावासंबंधी बोलण्याची परवारनगी दिली. त्यानुसार त्या बोलू लागल्या. त्यांचा शब्द जणू ठिणगीच होती. विचारांचा वडवानल चेतवण्याचे सामर्थ्य त्यांच्या शब्दांमध्ये होते. ठरावाच्या शेवटी त्या म्हणाल्या, ”मी हा राष्ट्रध्वज आपल्यासमोर पुन्हा एकदा फडकवते आणि सांगू इच्छिते की, माझ्या जिवंतपणीच माझा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा मला पहायचा आहे. वंदे मातरम” आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा आवाज उठविणारी ती पहिली वीरांगना ! आणि इतिहासाने नोंद करून ठेवावी असा तो सुवर्णक्षण. राष्ट्रध्वजाशी आपले काय नाते असते, हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांनाच या क्षणाचे महत्त्व समजावे!

 कामांनी स्वतःचे वृत्तपत्र सुरू करण्याच ठरविले. अर्थातच त्याचे नाव ‘वन्दे मातरम' ! नियतीने तर कामांच्या हाती ‘वन्दे मातरम'चा आसूड दिला होता. ‘वन्दे मातरम' च्या प्रत्येक अंकातून कामा इतके प्रक्षोभक नि जहाल लिखाण करीत की ते वाचून एखादी मृत व्यक्तीही जागची उठून पेटून उठावी! क्रांतिकार्यासाठी आवश्यक असणारे जागरण, संघटन आणि कृती या बाबींचे मार्गदर्शन क्रांतिकारकांना ‘वन्दे मातरम' मधून होत होते! १९३५ च्या सुरुवातीला सर कावसजी जहांगीर युरोपला आले. ते कामांना भेटल्यावर कामा म्हणाल्या, "कावसजी, माझा मृत्यू जवळ आलाय, पण मला इथ मरायचं नाही. मला माझ्या मातीत माझ्या मातृभूमीच्या कुशीत घेऊन चल. मृत्यूपूर्वी माझ्या मातृभूमीचं मला एकदा दर्शन होऊ दे!” स्ट्रेचरवर झोपलेल्या स्थितीतच कामांना बोटीत नेण्यात आले. त्यांना निरोप देण्यासाठी राणा तेवढे हजर होते. प्रत्यक्ष निरोप घेतांना कामा आणि राणा दोघांनांही अश्रू आवरेनात. बोट भारताच्या किनाऱ्याला लागली. कामांना खाली आणण्यात आले. त्यांनी हळू आवाजात कावसजींना सांगितले, कावसजी, तेवढी माती माझ्या हाती दे!”  ती हाती घेतांना कामांचे डोळे चमकले. समाधानाने त्या मंदपणे हसल्या व म्हणाल्या, "हिच्यासाठीच तर मी इथे आले!” १९३६ मधील ऑगस्ट आला. कामांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याच स्थितीत १२ ऑगस्ट १९३६ रोजी दुपारी कामांनी इहलोकीची यात्रा संपवली. मायभूमीत देह ठेवण्याची त्यांची इच्छा अखेर नियतीलाही पूर्ण करावीच लागली! त्याच सायंकाळी त्यांचा देह पारशांचा ‘डाकमा मध्ये नेण्यात आला. तेव्हा कुणा एकाचे लक्ष त्यांच्या हाताच्या मुठीकडे गेले. मुठीत काय असावे ते पाहण्यासाठी कामांच्या हाताची मूठ उघडली गेली तेव्हा त्या मुठीत पॅरिसमध्ये असतांना कामा छातीवर लावीत असलेले सोनेरी ब्रुचर होत त्यावर अक्षरे कोरलेली होती....‘वन्दे मातरम!'
- सौ. मोक्षदा घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

उद्योजकतेसाठी उपयुक्त अशी छत्रपती शिवरायांची गुणवैशिष्ट्ये