महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
श्रीराम
भगवंत खरा कर्ता आहे, या जगाचा चालक, पालक, मालक आहे हे अनेकांच्या कानावर असते; पण ते मनावर घेत नाहीत. आपल्या कर्तेपणाचा भयंकर गर्व असलेल्या माणसाला मग तसेच भयंकर दुःख भोगावे लागते. कारण आयुष्यातील सर्वच घटना काही त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाण घडत नाहीत. प्रारब्ध, नियती, भगवद्कृपा हे घटक प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
मुखी नाम नाही तया मुक्ती कैचि।
अहंतागुणे यातना ते फुकाचि।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा।
म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा श्रीराम ९७
ज्याच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही तो मानव नसून दानव समजावा. दानव म्हणजेच ‘असुर'. गीतेमधे भगवंतांनी आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे. (अ.१६-४). दांभिकता, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठूरपणा आणि अज्ञान हे दुर्गुण ज्याच्या ठायी असतात त्याला ‘असुर' अर्थात राक्षस समजावे. हे आसुरी दुर्गुण बंधनाला कारण ठरतात. भगवंताचे स्मरण न होण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे अज्ञान आणि अहंकार. अज्ञान दशेत देवाच्या अस्तित्वाबद्दल अनभिज्ञता असते. मी म्हणजे माझा देह. माझी बुध्दी. त्यांचा वापर करून मी माझ्या कष्टाने कर्तृत्व गाजवतो अशी माणसाची खात्री असते. जे दिसते ते जग, ती माणसे, इतर चराचर सृष्टी हे खरे वाटते. जो दिसत नाही तो देव आहे कसे म्हणावे हा त्याचा प्रश्न असतो. म्हणून जे डोळयांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, स्पर्शाने कळत नाही ते अस्तित्वात नाही असा सोयिस्कर विचार करून देव-बिव काही नाहीच असे तो ठरवून टाकतो. याच अज्ञानातून अहंकार उद्भवतो. स्वतःलाच कर्ता मानून मनुष्य उन्मत्तपणे जगतो, वागतो. भगवंत खरा कर्ता आहे, या जगाचा चालक, पालक, मालक आहे हे त्याच्या कानावर असते; पण ते तो मनावर घेत नाही. आपल्या कर्तेपणाचा भयंकर गर्व असलेल्या माणसाला तसेच भयंकर दुःख भोगावे लागते. कारण आयुष्यातील सर्वच घटना काही त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाण घडत नाहीत. प्रारब्ध, नियती, भगवद्कृपा हे घटक प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
मनापासून, प्रामाणिक आणि भरपूर प्रयत्न करणे हे माणसाच्या हातात असते. ते त्याचे कर्तव्य असते. ती त्याची जबाबदारी असते. पण प्रयत्नांचे परिणाम त्याच्या हातात नसतात. हे लक्षात न घेता तो स्वतःलाच यश आणि अपयशाला जबाबदार मानतो. यशाने अहंता वाढते. अपयशाने दुःख वाढते. आपल्याला फक्त यशच मिळाले पाहिजे याकरिता मनुष्य व्यर्थ शीणत राहतो. त्याच्या नियोजनाच्या वर सर्वश्रेष्ठ परमात्म्याचे काही नियोजन आहे हे त्याला एकतर माहितीच नसते किंवा त्याला ते मान्य नसते. कोणी नाकारले अथवा स्वीकारले तरी हेच अंतिम सत्य आहे की या संपूर्ण विश्वाचा, चराचर सृष्टीचा एक नियंता आहे आणि तीच परम शक्ती आपल्या अंतर्यामी कार्यरत आहे. अंतरात्मारूपाने ती शक्ती आपला देह चालवते, आपल्या इंद्रियांना चेतना देते, आपली बुध्दी प्रकाशित करते. त्या चैतन्याविना हा देह म्हणजे केवळ कलेवर आहे. जो भगवंताची सत्ता मान्य करतो तो आपोआप आपल्या इच्छा भगवंताच्या इच्छेत समर्पित करतो. पण ज्याला भगवंत मान्य नसतो त्याच्या मनात अनेक कामनांचे गाठोडे भरलेले असते. ”मी हे करेन, मी ते मिळवेन” ही अहंता असते. त्यापायी मनुष्य आयुष्यभर श्रमतो आणि शेवटी निराश होतो, दुःखी होतो. कारण कोणाच्याही सर्व कामना कधीच त्याच्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाहीत. फुकटच्या यातना आणि दुःख मात्र भोगावे लागते.
अतृप्त वासना हे पुनर्जन्माचे बीज आहे. तसेच देहबुद्धीच्या प्रभावामुळे क्रोध, द्वेष,मत्सर, सूडबुध्दी इ.दोषमनात ठाण मांडून असतात. त्यामुळेही मनुष्य बांधला जातो. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध, निर्मल होत नाही तोपर्यंत मोक्ष संभवत नाही. कारण मोक्ष ही मनाने, विचार-विवेकाने मिळवण्याची गोष्ट आहे. तेवढ्यासाठीच समर्थ मनाला बोध करत आहेत. मरणाचे स्मरण असावे असे समर्थांनी सांगून ठेवले आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला हा देह सोडायचा आहे. त्यावेळी हा पंचभुतिक जड देह इथेच पडलेला राहील आणि वासनांनी भरलेला सूक्ष्म देह त्यातून बाहेर पडून दुसऱ्या देहाच्या शोधात निघून जाईल. आसुरी संपत्तीने अशुद्ध झालेल्या अंतःकरणामुळे त्या जीवाला पुन्हा लगेच मानवदेह किंवा इतर उच्च योनी न मिळता नीच योनीत अनेक जन्म काढावे लागतील. त्यातून त्याचा पापनाश झाल्यावर कधीतरी भाग्याने पुन्हा नरदेहाची प्राप्ती होईल. पण तोपर्यंत तो बंधनात राहील. अनेक अपूर्ण वासनांमुळे मनुष्य जीवनातील छोट्या छोट्या आनंदाला मुकतो. अति उपभोग, अति हव्यास, अति श्रम, सतत चिंता, अशांत मन यामुळे तो शारीरिक-मानसिक व्याधींनी ग्रस्त होतो. अशा प्रकारे त्याचे जगणेही दुःखाने व्याप्त होते आणि अंतकाळही दैन्यवाणा होतो. माझे माझे म्हटलेले शरीर दुर्बल होते. अहंतेमुळे माणसे दुरावतात. अज्ञानामुळे भगवंताचा आधार मिळत नाही. अशी भयंकर एकाकी अवस्था येते. मृत्यु नक्की असला तरी नेमका कधी येणार व ह्या देह दुःखापासून सोडवणार हे माहित नसते. किती काळ असे खितपत पडावे लागेल हे कोणीच सांगू शकत नाही.
भगवंताची कधी दखलच घेतलेली नसल्याने आता यासमयी त्याची आठवण येईल ही शक्यताही कमीच. तरीही कोण्या भल्या माणसाचे ऐकून किंवा कोण्या काळची पुण्याई जागृत होऊन जर माणसाच्या मुखात भगवंताचे नाम आलेच तर ते कदापि वाया जाणार नाही. "बालपण उतू गेले, अन् तारूण्य नासले। वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी दयाघना !!!” आपल्या आयुष्याचे आपण काय केले याची जाणीव होऊन, उपरती होऊन दयाळू भगवंताचे स्मरण झाले तरच बंदिवासातून सुटका होण्याची शक्यता आहे. म्हणून समर्थ अक्षरशः विनवणी करत आहेत की कोणत्याही कारणाने-निमित्ताने देवाचे नाम घ्या रे, नाम घ्या.
जय जय रघुवीर समर्थ
- सौ. आसावरी भोईर