स्पर्धा मार्कांची असली तरीही, कसोटी मात्र ज्ञानाचीच

अभ्यासक्रम  विस्तृत होत जातात, तशी अभ्यासाची पद्धत आणि अभ्यासाची तंत्रं, दोन्हीही बदलली पाहिजेत. तरच, अभ्यासक्रमांमधलं ज्ञान पुढं कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि उपयोगी पडेल. प्रत्येक विषयाचं रुप वेगळं, त्यातला अभ्यासाचा भाग वेगळा आणि त्याचा उपयोगही वेगळाच असतो. त्यातल्या संकल्पना, त्या विषयातल्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यामुळं प्रत्येक विषयाचं आकलन होण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेमधल्या वेगवेगळ्या क्षमता उपयोगात आणाव्या लागतात. बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची पद्धत बदलली की, त्या विषयाच्या अभ्यासाचं तंत्र, लक्षात ठेवण्याच्या पद्धती बदलाव्या लागतात.

"माझा अभ्यासच होत नाहीये रे” असं म्हणून ती हमसून हमसून रडायलाच लागली. दहावीत ९२ टक्के गुण मिळवून अकरावीत शिकत असलेली ही मुलगी. ट्यूशनमध्ये दर रविवारी होणाऱ्या परीक्षांमध्ये तिला सातत्याने कमी गुण मिळत होते. पण मागच्या सहा टेस्टमध्ये ती नापास झाली होती. आईवडील वैतागून गेले होते. एका हुशार आणि मागच्या वर्षापर्यंत चांगले गुण मिळवणाऱ्या मुलीला असं अचानक काय झालं, याच प्रश्नात सगळेजण होते.

तिनं अधिकाधिक वेळ अभ्यास अभ्यास करायला हवा, असं तिच्या क्लासमधल्या शिक्षकांचं म्हणणं होतं. पण खरी परिस्थिती वेगळीच होती. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ट्यूशन..त्यासाठी पहाटे पाच वाजता उठणं भाग असायचं. क्लास संपवून घरी यायला संध्याकाळी सात वाजायचे. आल्यावर आवरून, उद्याची तयारी करेपर्यंत आठ व्हायचे. रात्रीचं जेवण झालं की, तिला अंथरुण आठवायचं. सुस्ती यायची, झोप अनावर व्हायची. मग झोप टाळण्यासाठी मोठ्ठा मग भरुन कॉफी.. त्यानंतर क्लासचा अभ्यास.. पण कॉफी घेऊन उडवलेली झोप परत यायचीच नाही. मग रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मोबाईल.. पहाटे तीन वाजता डोळा लागायचा खरा,पण लगेच दोन तासात गजर व्हायचा..! उण्यापुऱ्या दोन तासांच्या अर्धवट झोपेच्या विश्रांतीवर बारा तासांच्या बौद्धिक कामाची अपेक्षा करावी तरी कशी?

 "अभ्यासच न होणं” ही कितीतरी मुलामुलींची समस्या आहे. आपल्याकडं ”अभ्यास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी” आणि ”अभ्यास करण्यासाठी आतूनच कळकळ हवी” असे दोन अलिखित सामाजिक सिद्धांत फार पूर्वीपासून चालत आले आहेत. जे आज १०० टक्के जसेच्या तसे मान्य करणं कठीण आहे. कारण, मुलांना विचलित करणाऱ्या अनेकविध गोष्टी वाढल्या आहेत. मुलांचं वेळ वाया घालवण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यांचं एका जागी तासन्‌तास बसून राहणं, एसीच्या थंडगार वातावरणात निवांत सोपयावर लोळत पडून राहणं, मोबाईलवर जे दिसेल ते पाहत दिवस घालवणं, हे प्रश्न आता घरोघरी दिसतात. असंच सुरु राहिलं तर अभ्यासातलंच काय, आयुष्यातलंही अपयश ठरलेलंच आहे.

 "केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे” ही उक्ती कितीही खरी असली तरीही, ”करण्याची नेमकी पद्धत अचूकपणे शिकून घेणं, आत्मसात करणं हेही त्यात गृहीत धरलेलं आहे, हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे.

  आज याच अवस्थेत लाखो मुलंमुली आहेत. त्यांना अभ्यास टाळायचा नसतो, अभ्यासाचा कंटाळाही नसतो. पण अभ्यासाला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करावी, हेच त्यांना सुचत नाही. जेव्हा एका दिवसात दोन किंवा तीन ट्यूशन्स आणि शाळेतल्या पाच ते सहा तासिका यांचा अभ्यास रोजच्या रोज करायचा, हेच मुळात आव्हान आहे. अनेक हुशार मुलांनाही हे दैनंदिन अभ्यासाचं तंत्र अवगत होत नाही. अभ्यासक्रम आटोपण्याच्या मागे लागायचं की, नेमका अभ्यास करायचा तरी कसा? हे शिकवायचं, या संभ्रमात अनेक शिक्षकही असतात.

  घड्याळी चोवीस तासांच्या दिवसात शाळेत येणे-जाणे, क्लासेस, शाळा, तिथले प्रत्येक विषयाचे गृहपाठ, वह्या पूर्ण करणे आणि दर आठवड्याच्या क्लासेसच्या परीक्षा यांत नेमकं कशाला प्राधान्य द्यावं, या प्रश्नात मुलं अडकतात. अभ्यासाची गोळाबेरीज शेवटी मार्कांच्या संख्येपाशी आणि टक्केवारीपाशीच येऊन थांबते. वह्या पूर्ण केल्या नाहीत तर इंटर्नल मार्क्स मिळणार नाहीत, या भीतीपोटी मुलं दिवसरात्र फक्त लिहित राहतात. पण त्या लिखाणामागे अभ्यासाचा उद्देश नसतो, तर मार्क न मिळण्याची भीती असते. आता या परिस्थितीत जगातली कितीही चांगली शिक्षण प्रणाली रुजवण्याचा प्रयत्न केला तरीही, मूळ अभ्यास कौशल्याचाच दुष्काळ असल्याने मुलांमध्ये अस्सल शैक्षणिक गुणवत्तेची कमतरता राहतेच.

  घोकंपट्टी पद्धत कुठपर्यंत उपयोगी पडणार? मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत कुठपर्यंत उपयोगी पडणार? किंवा वह्या भरभरून लिखाणाची पद्धत कुठपर्यंत उपयोगी पडणार? अभ्यासक्रम जसजसे विस्तृत होत जातात, तसतशी अभ्यासाची पद्धत आणि अभ्यासाची तंत्रं, दोन्हीही बदलली पाहिजेत. तरच, अभ्यासक्रमांमधलं ज्ञान पुढं कायमस्वरूपी स्मरणात राहील आणि उपयोगी पडेल. प्रत्येक विषयाचं रुप वेगळं, त्यातला अभ्यासाचा भाग वेगळा आणि अर्थातच त्याचा उपयोगही वेगळाच असतो. त्यातल्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. ज्या त्या विषयातल्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यामुळं, प्रत्येक विषयाचं आकलन होण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेमधल्या वेगवेगळ्या क्षमता उपयोगात आणाव्या लागतात. बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची पद्धत बदलली की, त्या विषयाच्या अभ्यासाचं तंत्र सुद्धा बदलावं लागतं. लक्षात ठेवण्याच्या पद्धती बदलाव्या लागतात. उदाहरणार्थ, संस्कृतचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आणि गणिताचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी. जर दोन्ही विषयांच्या अभ्यासपद्धतींची अदलाबदल केली तर, दोन्ही विषयांचा अभ्यास खराब होईल.

    म्हणूनच, अभ्यास करण्याची विविध तंत्रं नीट शिकून घेणं आणि सुरुवातीपासूनच ती उपयोगात आणणं, त्यांचा पुरेपूर सराव करणं आवश्यक आहे. अभ्यासक्रम आणि आपल्या मुलाला दिवसभरात एकूण किती वेळ उपलब्ध असतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण त्या दिनक्रमातल्या शिस्तीमध्येच यशाची ओपन सिक्रेट्‌स आहेत, हे किती जणांना शिकवलं जातं? विशेषतः सातवीपासून पुढच्या सगळ्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा दिनक्रम, वेळापत्रक आणि त्यातली शिस्त पाळणं हाच भाग अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गरजेचा आहे. अत्यंत हुशार विद्यार्थीसुद्धा याच गोष्टींच्या अभावामुळे मागे पडतात. अभ्यासाची आखणी करणं, त्यासाठी विविध प्रकारच्या पद्धती वापरुन प्रत्येक धड्याची वेगळी रचना करणं, त्यासाठी शास्त्रीय युक्त्या वापरणं, नोंदी करणं शिकून घ्यायला हवं. म्हणजे, अभ्यासाचा कंटाळा आणि टाळाटाळ करणं कमी करता येऊ शकतं.

     अभ्यास करताना तो अधिकाधिक प्रभावी कसा होईल याहीपेक्षा तो पटापट एकदाचा कसा उरकेल, याकडेच बहुतेक विद्यार्थ्यांचा कल असतो. भराभर अभ्यासाचं काम उरकून टीव्ही, मोबाईल, ऑनलाईन गेम्स, रिल्स पाहणं, प्ले स्टेशन बघत बसणं, हा घरोघरच्या मुलामुलींचा आवडता उद्योग आहे. कसाबसा उरकलेला अभ्यास आणि अत्यंत आवडीनं, तल्लीन होऊन, तहानभूक विसरून बघितलेल्या रिल्स यात कशाचा प्रभाव अधिक जास्त होतो? एखादा छंद असो किंवा एखादी कला असो, तिची जोपासना करण्यासाठी वेळही द्यावा लागतो आणि त्यासाठी सरावही करावा लागतो. निरीक्षण करावं लागतं. त्यातल्या अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. ज्या त्या कलेचे वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग चालतात, कार्यशाळा चालतात, तिथं सहभागी व्हावं लागतं. शास्त्रशुद्ध तंत्रं शिकून घेतली आणि नियमित सराव केला की, त्या कलासुद्धा आपल्याला अधिक उत्कृष्ट आनंद देतात. अगदी हेच तत्त्व अभ्यासालाही लागू आहे.

     अत्यंत क्लिष्ट संकल्पना, मोठमोठे धडे, युनिट्‌स, वाढत जाणारे विषय, बदलत्या परीक्षा पद्धती, त्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ न मिळणं यांचा तोल साधता आला नाही तर आपसूकच अभ्यासाचं ओझं वाटायला लागतं, ताण येतो, अभ्यास नकोसा वाटायला लागतो. या सगळ्याचा परिणाम मार्कांवर होतो. आता इथेच मोठा घोटाळा होतो. पालकांना फक्त ”कमी मार्क्स हा शेवटचा परिणामच दिसतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी खाजगी ट्यूशन्स लावणे, वेगवेगळ्या रेडीमेड नोट्‌स आणून देणे, टेस्ट सिरिज लावणे असे उपाय केले जातात. पण आपल्या मुलाला अभ्यासाशी जुळवूनच घेता येत नाहीये, हे आधी समजून घेणं आवश्यक आहे.

   स्पर्धा मार्कांची असली तरीही, कसोटी मात्र ज्ञानाचीच असते. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी जसे मार्क लागतात, तसेच त्या अभ्यासक्रमांमध्ये यश मिळवण्यासाठी अभ्यासाची कौशल्येच अंगी बाणवावी लागतात. ज्याची अभ्यास करण्याची पद्धत उत्तम असेल, तोच विद्यार्थी पुढच्या स्पर्धेत चांगलं यश मिळवू शकतो. याच समस्या लक्षात घेऊन गेल्या १९ वर्षांपासून खास अभ्यासाच्या पद्धती आणि अभ्यास तंत्रांचं प्रशिक्षण देणारं एक निवासी शिबिर दरवर्षी आयोजित केलं जातं. ”साधना हे त्या शिबिराचं नाव. विविध देशांमधल्या अध्ययन तज्ज्ञांनी संशोधन करुन विकसित केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची अभ्यास कौशल्यं या शिबिरात मुलांना शिकवली जातात. ”लर्निंग सिस्टिम्स हाच या शिबिराचा मुख्य विषय असतो. चार दिवस मुलं पूर्णवेळ शिबिरातच राहतात, त्यांची निवास आणि शाकाहारी भोजनाची उत्तम सोय केलेली असते. मुले आणि मुली यांची राहण्याची सोय वेगवेगळी असते.   अत्यंत शांत आणि खऱ्याखुऱ्या निसर्गाच्या सानिध्यात हे शिबिर घेतलं जातं. आजुबाजूला सुंदर निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट, थंडगार पावसाळी वातावरण आणि मुलांना विचलित करतील अशा प्रत्येक गोष्टीला पूर्ण बंदी असल्यामुळे मुलांचं प्रशिक्षण उत्तम होतं.

       अत्यंत मय्राादित विद्यार्थी संख्या आणि अभ्यासाशी संबंधित असणारी विविध कौशल्यांची २१ सेशन्स हे या शिबिराचं वैशिष्ट्य असतं. पालकांसाठीही एक विशेष सेशन शिबिरात असतं. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक मुलाच्या घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चार मानसशास्त्रीय चाचण्या..! खरोखरच पालकांनी अजिबात चुकवू नये, असंच हे शिबिर आहे. यंदा हे विसावं "साधना शिबिर" दिनांक १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलं आहे. ९१३५३२९६७५ या क्रमांकावर संपर्क साधून शिबिरासाठी आपल्या मुलाचं नाव नोंदवता येईल. - मयुरेश उमाकांत डंके,  मानसतज्ज्ञ, संचालक प्रमुख,आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे  

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ग्रंथालयीन सेवासुविधांच्या उन्नतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (राष्ट्रीय ग्रंथपाल दिन विशेष १२ ऑगस्ट )