महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
कऱ्हेच्या खळखळत्या पाण्यात
मनात कोलाहल सुरु होते तेव्हा स्वतःशी विचारीत असतो! मी कोण आहे? का जन्माला आलो? माझ्या जगण्याचा कारण काय असावं? मग मी उत्तरं शोधण्यासाठी हिंडत असतो! उत्तरं मिळत नाहीत! तरी शोध सुरूच असतो!
कधी कधी वाटत असतं
शांतस्थळी जाऊन रहावं!
किल्मिष मनातलं तें तें
सारे वाईट सोडूनि यावं!
जीवन आपुले शोधित पुढे
श्रद्धा द्वारी शरण जावं
मागचे मागे सोडूनी सारे
गाव नव आपुले करुनी घ्यावं
कधी कधी खूप वाटत असतं, आपली ओळख तरी काय आहे? आपण जन्माला का आलो असू बरे? आपण कोण आहोत? मुंग्या वारूळ बनवितात! वारूळ, पाऊस वाऱ्यात वाहून जातो! मुंग्या पुन्हा नवजोश्यात वारूळ बनविण्यात दंग होऊन जातात! आपलंही असंच असावं?
भटकंतीत स्वतःचा शोध घेत राहतो! जन्माचा उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न करीत राहतो! कुठंतरी उत्तरे लपून बसलेली ं असतात! उत्तराच्या आशेने शोध सुरूच राहतो! पवित्र धरतीची माफी मागून माती, चिखल, धूळ तुडवत चालत राहायचं! उराशी जिद्द बाळगून शोधक व्हायचं असतं! हाती काही गवसेल, काहीतरी लागेल म्हणून पळत राहायचं! आजही असंच झालं! घाट माथा, हिरवळीवर नजर फिरवत, मी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्या ठिकाणी सासवडला येऊन पोहचलो! मनाची बेचैनी शांत बसू देत नव्हती! मी संत शिरोमणी सोपान काकांच्या समाधी स्थळी जाऊन पोहचलो!
सत, संत, सात्विक गोळा करीत खळखळून वाहणाऱ्या कऱ्हा नदीकाठी जाऊन पोहचलो! काठावर उभी आलेली झाडं, त्यावर बसलेले पक्षी हितगुज करीत होती! संत शिरोमणी सोपानदेव काकांच्या समाधी मंदिराला लागून कऱ्हेचं खळखळणं कानात भरून घेत होतो! डोळ्यात भरून घेत होतो! कऱ्हेचं खळखळून वाहणं, खडकावरून उड्या घेत दुधाळ पाणी पुन्हा प्रवाहासोबत वहात होतं! खळखळण्यातील लहरी आनंद देत होत्या! प्रवाह दूर दूर वहात निघून चालला होता! आपलंही वाहणं निर्मळ, स्वच्छ सुंदर होईल का?
आज मी सासवड नगरीत आलो आहे! सभोंवताली उत्साही हिरवळ वाऱ्याच्या झूळकीवर पानं हलवीत आहेत! हालचाल परिवर्तनाचा संदेश देत असतो!अशा या वैशिष्ट्यपूर्ण नगरीत आल्यावर सासवडचं ऐतिहासिक महत्व शोधीत बसलो! एक एक वैशिष्ट्य अनमोल आहेत! सासवडच्या गळ्यात गौरवाच्या सुंदर पुष्पमाला पडत राहिल्या! त्या अशा.......सासवड!.. प्राचीन शहर! सासवड..श्रद्धेचं प्राचीन चांगवटेश्वरवर मंदिर असलेलं पवित्र स्थळ! सासवड.. प्राचीन संगमेश्वर मंदिर असलेलं शहर! सासवड... प्राचीन ग्रामदैवत भैरवनाथांचं श्रद्धा स्थळ! सासवड...संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू संत शिरोमणी सोपानदेव काकांचं श्रद्धेय समाधीस्थळ! सासवड... खळखळून वाहणाऱ्या कऱ्हा नदीचं शहर! सासवड... झेंडूच्या फुलांचं शहर! सासवड... प्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी, चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, राजनेता, हास्य सम्राट, समाजसेवक, पत्रकार, संपादक, चित्रपट निर्माता, गोवामुक्तीसाठी लढा देणारे स्वातंत्र्य सेनानी अशा बहुआयामी व्यवितमत्व पूजनीय प्रल्हाद केशव अत्रे यांचं जन्मगांव!... सासवडची सिताफळं अन अंजीर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत! अशा या शुद्ध, शांत, हवेशीर शहरात जाण्याची ओढ प्रत्येक माणसाला होत असते! - नानाभाऊ माळी