महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आम्ही नामधारी, भारवाही...देणारे दुसरेच कुणी!
दारात पोस्टमन काहीतरी पार्सल घेऊन येतो. आपल्याला त्याचा चेहरा दिसतो; पण देणारा कुणीतरी वेगळाच असतो! तसंच काहीसं आहे...मी फक्त पोस्टमन. मी काहीच देत नाही. फक्त योग्य पत्त्यावर पोहोचवतो.. देणारे आपण! दारापर्यंत पोचवणारा पोस्टमन मी. माझा फक्त चेहरा दिसतो. मी जोडलेल्या अंध, अपंग, वृद्ध आई-वडिल आणि आजी आजोबांनी केलेले प्रॉडक्ट प्रोफेशनल आहेत! पण म्हणावा तसा खप, विक्रीसाठी प्लॅटफॉर्म नाही, मार्केटिंग/बिझनेस हा माझा पिंड नाही; मला एक ठिणगी हवी आहे..त्यांची चूल पेटवण्यासाठी..एक फुंकर हवी आहे, त्यांच्यातला निखारा धुमसता ठेवण्यासाठी...दोन हातांची ओंजळ हवी आहे, पेटलेली ज्योत तेवती ठेवण्यासाठी..
असं म्हणतात गुडघे दुमडता आले तर कोणतीच चादर छोटी पडत नाही...! आयुष्यात तडजोड ही करावीच लागते...!!! नात्यांसाठी तडजोड करणे हा तर आयुष्याचा एक भागच आहे...नाती टिकवायची असतील तर कोणाला तरी झुकावंच लागतं.... आपल्या माणसांपुढे झुकण्यात कसली आलीय शरम? आणि असं आहे, डोंगरा वर चढणारा माणूस कायम झुकलेला असतो... पण तो वर जात असतो! उताराला लागलेला माणूसच छाती पुढे काढून भराभरा चालत असतो, पण तो ”खाली” येत असतो! ज्याच्याकडे उंची असेल तोच झुकू शकतो...
झुकणं म्हणजे हरणं नव्हे, नाती जिंकण्यासाठी केलेला तो प्रणाम असतो...! "झुकणं” आणि "हरणं” समजण्यात गल्लत झाल्यामुळे, अशी कित्येक नाती छिन्नविच्छिन्न होऊन रस्त्यावर आली आहेत, जगण्याचा शाप घेऊन, मरणाची याचना करत जगत आहेत...! अशा याचकांचं जगणं कुठंतरी सुसह्य करता यावं, सन्मानाने त्यांना जगता यावं, यासाठी आपणा सर्वांच्या साथीनं केलेल्या काही प्रयत्नांचा, जुलै महिन्याचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर! या महिन्यात, नेहमीप्रमाणे रस्त्यावरील गोरगरीब आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणारे गोरगरीब यांना अन्नपूर्णा प्रकल्पातून आपण जेवणाचे डबे दिले आहेत....! सणासुदीला गोडधोड दिले आहे...! रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांच्या तपासण्या रस्त्यावरच करून... गंभीर रुग्णांना दवाखान्यात ॲडमिट केले, बरे झाल्यावर त्यांना आपण व्यवसाय टाकून देणार आहोत.
जुन जुलै महिने पोरांच्या शिक्षणाचे.... "भीक नको बाई शिक” या प्रकल्पांतर्गत या महिनाअखेर, पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता शाळा कॉलेजला जाणाऱ्या ५२ मुले आणि मुली यांच्या शाळा कॉलेजच्या फी आणि शैक्षणिक साहित्य घेऊन दिले आहे. सांगायला अत्यंत आनंद होतोय की एके काळी भीक मागणारी मुलगी यावर्षी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये फर्स्ट क्लासने ग्रॅज्युएट झाली, सध्या माझ्या या मुलीसाठी जॉब शोधतो आहे रस्त्याकडेला पडलेल्या, या कोमेजलेल्या फुलांचा आता एक सुंदर हार तयार होईल...! या सर्व पोरा-पोरींना सांगून ठेवलंय, आयुष्यात जिंकाल तेव्हा आवरायला शिका आणि हराल तेव्हा सावरायला शिका...! हरणं हे मिठासारखंच असतं; परंतु बाळांनो आयुष्याला चव त्यामुळेच येते...! हरणं चवीपुरतंच घ्यायचं... कैरीच्या फोडीवर घेतो तसं...!!! आणि हो, खूप पैसे कमवले म्हणजे यशस्वी झालात असं समजू नका....दुसऱ्याच्या आनंदासाठी काहीतरी करायची इच्छा जेव्हा मनात निर्माण होईल, त्यावेळी यशस्वी झालात असं समजा...आपल्याला पाहून कोणाला भीती वाटेल असा वाघ आपल्याला व्हायचंच नाही....
संकटात सापडलेलं कुणी, आपल्याला पाहून गळ्यात पडून म्हणेल, बरं झालं, तुम्ही आलात, तुम्हाला पाहून मला खूप धीर आला, तुमचीच वाट पाहत होतो ! तेव्हा समजा तुम्ही यशस्वी झालात. बाळांनो, स्वतःसाठी वापरतात ते नुसतंच धन असतं. दुसऱ्याच्या आनंदासाठी वापरता त्यावेळी ते धन, लक्ष्मी होतं...! आणि शेवटी काय रे.... चंदनाचा टिळा दुसऱ्याच्या कपाळावर लावला, तरी आपले हात सुगंधी होतातच की! आषाढाच्या शेवटच्या दिवशी अमावस्या येऊन गेली, पण जाताना श्रावण देऊन गेली...
या अमावस्येला सुद्धा आमचे "मध्यरात्रीचे सूर्य” मात्र चमकतच होते. एका महोदयांनी मला विचारले, तुमच्या सेंटरवर किती भिकारी काम करतात ? किती कामगार आहेत ? त्यांना म्हणालो, 'माऊली, ते आता भिक्षेकरी नाहीत; कष्टकरी झाले आहेत, आणि आपल्या सेंटरवर ते कामगार म्हणून नाही; तर भागीदार म्हणून काम करतात.' हो! या सेंटरमुळे जवळपास ५० अंध अपंग आणि वृद्धांना रोजगार मिळाला आहे. आणि ते कामगार नाहीत, आपले पार्टनर आहेत!
त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे...कोमेजलेल्या मनात हिरवळ दाटली आहे...डोळ्यातला पाऊस थांबला आहे... आयुष्यात कोवळं ऊन पडलं आहे... स्वतःच्या ”जीवाला” श्रमिक करून..."शिवाची पूजा” या श्रावणात त्यांनी मांडली आहे...! श्रावण... श्रावण म्हणजे अजून काय असतो? आपल्या या उपक्रमाची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आणि दूरदर्शन या सरकारी चॅनलवर त्याची बातमी करून संपूर्ण देशभर प्रसारित केली. स्वतःला टीव्हीवर पाहताना त्यांना झालेला आनंद कोणत्या रंगात रेखाटू ? माऊली, स्वतःला टीव्हीवर पाहताना, त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यात मला आख्खं विश्व दिसलं! त्यांच्या आनंदाचं गाणं गायला शब्द कुठून आणू?
मला नेहमी असं वाटतं चित्रकला म्हणजे मूक गाणं...आणि गाणं म्हणजे बोलणारी चित्रकला! त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर, एक "भावगीत”, "चित्र” म्हणून उमटलं होते...! मी कसे गावून दाखवू हे भाव गीत? हे चित्र कसं दाखवू मी तुम्हाला? अर्थात या भावगीताचे कवी आणि संगीतकार दानिश भाई शहा, विपुलभाई शहा आणि चित्रकार आपण सर्वजण!!! मी नामधारी, भारवाही हमाल ....!!! दारात पोस्टमन काहीतरी पार्सल घ्ोऊन येतो... आपल्याला त्याचा चेहरा दिसतो..पण देणारा कुणीतरी वेगळाच असतो! तसंच काहीसं आहे...मी फक्त पोस्टमन. मी स्वतः काहीच देत नाही. फक्त योग्य पत्त्यावर पोहोचवतो.. देणारे आपण आहात. दारापर्यंत पोचवणारा पोस्टमन मी आहे. माझा फक्त चेहरा दिसतो. माऊली मी फक्त पोस्टमन नामधारी!
आपण धनी! धन्याचा तो माल, मी फक्त भारवाही हमाल...! माऊली आपल्या सर्वांना माझा आणि मनीषाचा शिरसाष्टांग नमस्कार...! आपल्या सर्वांमुळे हे सर्व काम सुरू आहे.... हे आम्ही जगत असताना.... दुसऱ्याला जगवत असताना.... मरेपर्यंत लक्षात ठेवू. एक खंत आहे, प्रोफेशनल कंपनीने तयार केलेल्या प्रॉडक्टप्रमाणे माझ्या अंध अपंग वृद्ध आई-वडिल आणि आजी आजोबांनी केलेले प्रॉडक्ट प्रोफेशनल आहेत...! पण म्हणावा तसा खप नाही, विक्रीसाठी प्लॅटफॉर्म नाही, मार्केटिंग/बिझनेस हा माझा पिंड नाही, लोकांचे पगार करायच्या दिवशी दानिश भाई, विपुल भाई धावून येतात, तरीही क्रेडिट कार्ड वरती लोन काढावेच लागते... पुढे काही दिवसाच्या आत ते फेडावेच लागते...ते कुठून फेडावे कळत नाही! प्रकल्प चालू होऊन चारच महिने झाले, कौतुकाचा वर्षाव होऊन, या चार महिन्यात विविध स्तरातून मला ६-७ पुरस्कार मिळाले! पण माऊली मला पुरस्कार नको. मला मिळालेल्या पुरस्कारामुळे माझ्या रस्त्यावरच्या माणसांची चूल पेटणार नाही.
माझं कोणतंही कौतुक नको, पाठीवर शाबासकीची थापही नको.. कारण कौतुक आणि शाबासकी मला जगण्याचं बळ देतात; परंतु या बळाची गरज माझ्यापेक्षा, माझ्या रस्त्यावरच्या अंध अपंग आई-वडिलांना आहे.! आणि माझ्या होणाऱ्या कौतुकामुळे त्यांची पोटं भरत नाहीत..मला एक ठिणगी हवी आहे..त्यांची चूल पेटवण्यासाठी...फक्त एक फुंकर हवी आहे, त्यांच्यातला निखारा धुमसता ठेवण्यासाठी... दोन हातांची ओंजळ हवी आहे, पेटलेली ज्योत तेवती ठेवण्यासाठी...एक शब्द हवा आहे, त्यांच्या आयुष्याची कविता लिहिण्यासाठी!
आपले स्नेहांकित,
-डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट पुणे