महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
दानाकडून जाऊ कृतज्ञतेकडे
रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते पण अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मेल्यानंतरदेखील जगात जिवंत राहायचे असेल तर अवयवदानासारखे दुसरे पुण्य नाही. अवयवांच्या रुपात केलेले दान हे माणसाला मेल्यानंतरही जग दाखवू शकते व किर्तीमानदेखील बनवते. म्हणूनच ‘मरावे परी अवयवरूपी उरावे' असेदेखील म्हणता येईल.
राज्यात ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागामार्फत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माणूस आपल्याला मिळालेल्या अवयवांची विशेष काळजी घेत असतो. कान, नाक, डोळे, हात, पाय ही नीटनेटकी व व्यवस्थित असतील तर मनुष्य आयुष्यात कितीही मोठया संकटाला सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे हे अवयव जपण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. मात्र समाजात आज एक किंवा अधिक अवयव नसणारे लोकदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत हेदेखील विसरून चालणार नाही. त्यातूनच अवयवदानाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात दृढ झाली.
आज अवयवदानाने अनेक लोकांना नवसंजीवनी मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. माणसाचे शरीर असंख्य अवयवांनी भरलेले आहे. जिवंतपणी माणूस या सर्व अवयवांचा पुरेपुर उपयोग करतो. मात्र आज जगात अनेक लोक असे आहेत जे विविध अवयवांच्या कमतरतेमुळे पिडामय जिवन जगत आहेत. अवयव निकामी झाल्याने दैनंदिन जिवन जगत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी मृत्यूदेखील ओढवतो. यावर उपाय म्हणून अवयव प्रत्यारोपण ही संकल्पना अस्तित्वात आली ज्यायोगे एका व्यक्तीचे अवयव दुस-या गरजवंत व्यक्तीस दान करुन त्याला जीवनदान देणे शक्य होते. माणूस आपले अवयव निर्माण करु नाही मात्र हेच अवयव तो दान करु शकतो. मृत्यूला रोखण्याची ताकद या अवयवदानात आहे. असहाय लोकांना केलेले अवयवदान ही त्याना जिवनभराची अमूल्य अशी भेट ठरेल. मानवाचा जिव लाखमोलाचा आहे. कायदयानुसार मानवी अवयवांची विक्री करता येत नाही मात्र त्यांचे दान करता येते. अवयवदानानंतर मिळालेल्या अवयवाचे व्यवस्थीत प्रत्यारोपण व्हावे व त्यादरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून शासनाने त्यासाठी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आणला आहे.
सन १९९४ साली ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा' आपल्या देशात अस्तित्वात आला व अवयव प्रत्यारोपणास कायदेशिर मान्यता मिळाली. अवयवदान जिवंतपणी आणि मृत्यूनंतरदेखील करता येते. जिवंत असताना एक मूत्रपिंड (किडणी), यकृताचा (लिव्हरचा), आतडयाचा, स्वादुपिंड व फुफुसाचा काही भाग आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना सरकारची परवानगी काढून कायदयाने दान देता येतो. रक्ताच्या नातेवाईंकांत सुधारीत कायदयानुसार आई-वडील, भाऊबहिण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, आजी- आजोबा, नातवंडे यांचा समावेश होतो. माणसाच्या मृत्यूनंतर ह्रदय क्रिया बंद पडते व त्यानंतर सर्व अवयव दान करण्यासाठी निकामी होतात. केवळ नेत्र, त्वचा, अस्थी (हाडे) इत्यादी मरणानंतर ४ ते ५ तासांच्या कालावधीत दान करता येऊ शकतात. गंभीर जळालेल्या व्यक्तीचे प्राण त्वचेच्या दानाने वाचवता येतात तर नेत्रदानाने अंध व्यक्तीस दृष्टी प्रदान करता येते. जिवंतपणी अथवा मृत्यूनंतर अवयवदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण कायदयाने प्रतिबंधित आहे. कायदयाचे उल्लंघन झाल्यास मोठी शिक्षादेखील होते. त्यामुळे अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया कायदेशिररित्या पार पाडावी लागते. सध्या आपल्या राज्यात किडनीच्या तसेच लिव्हरच्या प्रतिक्षेत अनेक लोक आहेत. काही रुग्ण ह्रदयप्रत्यारोपण व इतर महत्वाचे अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान समजले जाते पण अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मेल्यानंतरदेखील जगात जिवंत राहायचे असेल तर अवयवदानासारखे दुसरे पुण्य नाही. अवयवांच्या रुपात केलेले दान हे माणसाला मेल्यानंतरही जग दाखवू शकते व किर्तीमानदेखील बनवते. म्हणूनच ‘मरावे परी अवयवरूपी उरावे' असेदेखील म्हणता येईल. आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या माध्यमातून अनेकांना जीवदान तर देता येतेच पण त्यांना जीवन जगण्याचे शारीरिक बळ देखील मिळते. एका घटनेत, दिल्लीच्या एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर भावनांवर नियंत्रण ठेवत मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मृत पावलेल्या ह्या कुटुंबातील मुलाचे किडनी, यकृत यांसह एकूण ३२ अवयव काढण्यात आले. त्यापैकी ३ अवयव तातडीने त्या अवयवांची गरज असलेल्या व्यक्तींना देऊन त्यांचे व्यंग कायमचे दूर करण्यात आले तर त्याच्या इतर अवयवांनी आणखी ३० जणांना नवसंजीवनी मिळणार आहे.
आपल्या समाजात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहन वा दफन विधींची परंपरा असून अवयवांशिवाय हे विधी अनिष्ट मानण्याची प्रथा आजही काही ठिकाणी मानली जाते. पण मृत्यूनंतर मानवासाठी निरुपयोगी ठरणारे हे अवयव अनेकांना जगण्याचे बळ व संजीवनी देऊ शकतात हि गोष्ट समाजमनात रुजवणे गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ठिकठिकाणी अवयवदानाबद्दल लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. दुस-या एका घटनेत, सांगलीतील एका ५५ वर्षीय महिलेला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर तिच्या इच्छेनुसार तिच्या नातेवाईकांनी तातडीने तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला व त्यांच्या या निर्णयाने लगेचच पाच जणांच्या आयुष्यात नवी पालवी फुटली. या महिलेवर उपचारादरम्यान अशुद्ध रक्त शुद्ध करून मेंदूला रक्तपूरवठा करणारी यंत्रणा निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही बाब डॉक्टरांनी नातेवाईकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर लगेचच त्यांनी रुग्णाच्या इच्छेनुसार अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवदानासाठी त्यांच्या नातेवाईकांच्या पुढाकाराने पाच रुग्णांना जीवनदान देण्यात आले. त्यांचे दोन डोळे, दोन मूत्रपिंडे व यकृत यांचे पाच गरजु रुग्णांना पुण्यामध्ये रोपणही करण्यात आले. एका व्यक्तीने अवयवदान केले तर अनेकांना त्याचा लाभ मिळू शकतो ही बाब जनमानसात रुजवली पाहिजे. एकेकाळी असणारा ‘रक्तदान केल्याने शरीरातील रक्त कमी होते, अशक्तपणा येतो' हा समज कालांतराने लोकांच्या मनातून निघून गेला व रक्तदानाने निर्माण झालेली रक्ताची उणीव मानवी शरीरात अल्पावधीतच भरून निघते ही समज आल्यामुळे आज अनेक रक्तदाते पुढे येतात. त्याचप्रमाणे अवयवदानांबद्दल समाजात असलेले गैरसमज दूर झाले पाहिजेत व अवयव दानासाठी लोक स्वतःहून पुढे आले पाहिजेत.
आज विविध मानवी अवयवांची गरज असलेले व अनेक व्यंग असलेले रुग्ण अवयवांविना समाजात वावरू शकत नाहीत, गरज आहे ती त्यांना जगण्याचे शारीरिक बळ देण्याची. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानाचा वसा लवकरात लवकर स्वीकारावा. अनेक गरजू रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत असून एका व्यक्तीच्या अवयवदानाच्या निर्णयाने अनेकांच्या जीवनात पालवी फुटू शकते. त्यामुळेच अवयवदान हे जीवनदानच आहे. माणसाचे अनेक अवयव मेल्यानंतरही इतरांच्या कमी येतात. त्यामुळे मेल्यावरही जिवंत राहायचे असेल तर अवयवदानासारखा श्रेष्ठ निर्णय नाही. ‘मरावे परी अवयवरूपी उरावे' ही उक्ती म्हणूनच माणसाला दानाकडून कृतज्ञतेकडे घेऊन जाणारी आहे. - वैभव मोहन पाटील