महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
खरे मित्रप्रेम त्यागात !
समाजमाध्यमांवर हजाराेंच्या संख्येने मित्र/फॉलोअर्स असण्याला मैत्री म्हणावे का? आपल्यावर कठीण प्रसंग ओढवल्यावर सामाजिक माध्यमांवरील किती मित्र आपल्या मदतीला धावून येतील? मित्रत्वाचे नाते केवळ मनगटावर रिबिनी बांधून, पेनाने नावे लिहून आणि सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन व्यक्त करता येत नाही. त्यामागे लागते ती त्यागाची भावना. कुठूनतरी परदेशातून आलेले फॅड चालवत एक दिवसाचे मित्रप्रेम सार्वजनिकरित्या प्रकट करण्याऐवजी या देशाच्या मातीत घडून गेलेल्या अपार मित्रप्रेमाच्या, त्यासाठी केलेल्या त्यागाच्या कथा आज शाळा-महाविद्यालयांतून विद्यार्थीमनावर बिंबवायला हव्यात.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी राष्ट्रीय मैत्री दिन देशभरात साजरा केला जातो. भारतात बहुतांश शाळा महाविद्यालये, कार्यालये यांना रविवारी सुट्टी असल्याने हा दिवस आदल्या दिवशी शनिवारी किंवा दुसऱ्या दिवशी सोमवारी साजरा केला जातो. दरवर्षी भारतात उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या ‘फ्रेंडशिप डे'ला तसा कोणताही ऐतिहासिक आधार नाही. पेरुग्वेमध्ये सुरु झालेला हा मैत्री दिन आज भारतातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
अमेरिकेत १९३५ मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. खून झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या मित्राला ही घटना कळताच त्यानेही निराशेने आत्महत्या केली. मित्रांमधील हे प्रेम पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे' साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला. शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये या दिवसाची विशेष क्रेझ असते. हल्ली सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आणि त्यात अनलिमिटेड इंटरनेट डाटा आल्याने सोशल मीडियावर या विदेशी दिवसांचे भलतेच पेव फुटले आहे. मैत्रीचे नाते हे रक्ताचे नाते नसले तरी ते सर्व नात्याच्या पलीकडचे पण अत्यंत जिवाभावाचे असते. जीवनात एकतरी मित्र असावा ज्याच्याशी आपले सुख दुःख व्यक्त करता येईल, आपल्या भाव भावना, मनातील विचार त्याच्यासमोर प्रकट करता करता येतील, कठीण काळात तो आपला आधार बनून आपल्यासोबत उभा राहील. प्रसंगी आपल्याला योग्य सल्ला देईल आणि आपल्याकडून चूक झाल्यास ती परखडपणे आपल्याला सांगेल.
आजमितीला स्मार्ट फोनच्या दुनियेत मैत्रीच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत. फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर हजाराेंच्या संख्येने मित्र आणि फॉलोअर्स असणे याला मैत्री म्हणावे का? आपल्यावर कठीण प्रसंग ओढावल्यावर सामाजिक माध्यमांवरील किती मित्र आपल्या मदतीला धावून येतील? मित्रत्वाचे नाते केवळ मनगटावर रिबिनी बांधून, पेनाने नावे लिहून आणि सोशल मीडियावर शुभेच्छा देऊन व्यक्त करता येत नाही. त्यामागे असावी लागते ती त्यागाची भावना. कुठूनतरी परदेशातून आलेले फॅड चालवून एक दिवस आपले मित्रप्रेम सार्वजनिकरित्या प्रकट करण्याऐवजी या देशाच्या मातीत घडून गेलेल्या अपार मित्रप्रेमाच्या आणि त्यासाठी केलेल्या त्यागाच्या कथा आज शाळा महाविद्यालयांतून विद्यार्थी मनावर बिंबवायला हव्यात. सुदामासाठी आपले सारे वैभव लुटवू पाहणारा श्रीकृष्ण, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात प्राणाची बाजी लावून लढलेले सवंगडी मावळे, संभाजी महाराजांची शेवटच्या श्वासापर्यंत साथ न सोडणारे मित्र कवि कलश अशी एक ना अनेक उदाहरणे या भारत भूमित घडली आहेत. ज्यांच्या मित्रप्रेमाच्या कथा आजही प्रेरणादायी आहेत. या कथा आणि त्यामागील त्यागाची भावना आजच्या पिढीमध्ये रुजवायला हवी म्हणजे मित्रप्रेम हे एक दिवसापुरते सीमित नसते हे त्यांनाही कळेल. - जगन घाणेकर