तिन तिगाडा काम बिगाडा?

 ३ हा अंक बऱ्याच जणांना अशुभ वाटतो. "तिन तिगाडा काम बिगाडा” अशी आपल्याकडे म्हण पण प्रचलित आहे. आता जमाना बदलतो आहे आणि आता ३ हा अंक शुभ मानणाऱ्यांची संख्या जोमाने वाढते आहे. खरंच असे काही आकड्यांत असते काय? शुभशकुनी अपशकुनी आकडे असू शकतात?

कुणाची जन्म तारीख ३ असते/कुणाचा जन्म महिना ३ असतो/काहींच्या जन्म तारखेच्या सगळ्या अंकांची बेरीज ३ होते, म्हणून ते स्वतःला नशीबवान समजतात. बरेच जण येन-केन प्रकारे ३ अंकाशी कनेक्ट राहण्याचा प्रयन्त करतात, जसे गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरची बेरीज ३ झाली पाहिजे /मोबाईल नंबरच्या अंकांची बेरीज ३ झाली पाहिजे. यावरून मला एक जुनी घटना आठवली..

नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो.  बायको सकाळी योगा क्लासला जाते, त्यामुळे मी नेहमी एकटाच असतो. फिरत फिरत मारुती मंदिराजवळ आलो आणि नेहमीच्या ठिकाणी, आज चक्क केव्हा तरी भेटणाऱ्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मेघना आणि मनवा यांची भेट झाली. तारीख होती  २५ /०३/२०१८.

मनवा : काका आज तारखेमधल्या सगळ्या अंकांची बेरीज सिंगल डिजिटमधे किती होते.

(मी आधी तोंडी बेरीज करायचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. मग आपल्या जुन्या सवयीप्रमाणे हातावरची कांडी मोजून ३ हे उत्तर काढले)  

मी : 3

मनवा : काका उत्तर एकदम बरोबर आहे. इस बात पे, एक एक चाय हो जाये.

मी : मला तोंडी बेरीज करता आली नाही, म्हणून, पेनल्टी म्हणून, आजचा चहा माझ्याकडून.

मनवा : काका, काही जणांचा डावा मेंदू तल्लख असतो, ते लोक आकडेमोडीत हुशार असतात. तुमचा उजवा मेंदू तल्लख आहे, त्यामुळे तुम्हाला प्रेमाचे गणित चांगले जमते. Nothing wrong in that.

मेघना : काका ३ या आकड्यावरून तुमच्या डोक्यात लगेच काय विचार येतो.

मी : तिन तिगाडा काम बिगाडा.

मनवा : काका, इथेच आपण नेहमी चूक करतो. Think only positive.

मी : आपण ३ हा नेहमीच अशुभ मानत आलो आहोत. कुठलेही शुभ कार्य आणि ३ यांचे कधीच जमत नसते, अशी आपली परंपराच आहे. एखाद्याला ओवाळायचे असेल आणि तीनच बायका असतील, तर ते अशूभ होते, म्हणून एक स्त्री पुन्हा एकदा ओवाळते. महत्वाच्या कामाकरता कुठे जायचे असेल, आणि ३ जणं असतील,  तर आपण एक सुपारी बरोबर नेतो.

मेघना : काका, आपल्याला यातूनच बाहेर पडायचे आहे. आपण नेहमी तिघे भेटतो. मजा येते ना? कधी वादावादी झाली आहे का ? आपल्या गप्पांमध्ये आपण कधी कुणाविषयी वाईट बोलतो का? मग ३ अंक अशुभ कसा काय?

मनवा : काका, एखादे मोठे काम सुरु करायचे असेल;  काही छोटी कामे  करायची असतील, काही चांगल्या सवयी सुरु करायच्या असतील, जसे - रोज फिरायला जायचे आहे, रोज व्यायाम करायचा आहे, रोज योगा करायचे आहे, रोज घरच्यांबरोबर गप्पा मारायला वेळ काढायचा आहे, रोज या वेळात टीव्ही बंद ठेवायचा आहे, जंकफूड खाणे बंद करायचे आहे, वजन कमी करण्याकरता  दीक्षित पॅटर्न सुरू करायचा आहे /दिवेकर पॅटर्न सुरू करायचा आहे, असे जे जे मनात असेल, त्यांचा श्री गणेशा करताना आपण ब्रह्मा - विष्णू - महेश, या त्रिमूर्तींना श्रद्धा पूर्वक नमस्कार करतो आणि मग कामाला सुरुवात करतो.  मनातलं अस्तित्वात उतरणार हे नक्की. कारण त्यामागे शक्ती असणार आहे, या ३ देवतांची.

मेघना : काका, देवानी आपण कायम आनंदी असावं, याकरता आपल्या चेहेऱ्यावर ३ च अवयव दिले आहेत, जे आपल्या मर्जीप्रमाणे आपण उघडू शकतो आणि नको तेव्हा बंद ठेऊ शकतो. कान, डोळे आणि तोंड. नाक हे सतत उघडेच ठेवावे लागते. आपल्या चेहऱ्यावरच्या या ३ अवयवांचा आपण योग्य वापर केला, तर आपण कायम आनंदी राहू शकतो. कशी घ्यायची या तिघांची मदत --

तोंड -  आवश्यक तेवढेच बोलणे
डोळे - न पटणाऱ्या घटनांकडे डोळेझाक करणे.
कान - वाद विवाद घडवणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा करणे.

मी : ३ ची ही बाजू आधी कधी माझ्या लक्षातच आली नाही !

मी : तुमच्या दोघींच्या नावांमध्ये मेघना / मनवा ३ - ३ अक्षरे आहेत, त्यामुळेच तुम्हाला असे सुंदर विचार सुचत असणार हे नक्की.

मनवा : काका, तुमच्या सुधीर या नावात पण अक्षरे ३ च आहेत, हे विसरला का ?

      म्हणजे आपण तिघे आहोत आणि नावातली अक्षरं पण ३ - ३ - ३ आहेत. आपण नेहमी भेटतो मारुती मंदिराजवळ. त्या देवाच्या नावामध्ये अक्षरं पण ३ च आहेत.
मेघना : काका, आमच्या दोघींच्या जन्म तारखेतल्या सगळ्या अंकांची बेरीज ३ होते, म्हणूनच आम्ही एकदम लकी आहोत. काका, तुम्हीपण कायमच लकी असता, तुमच्या जन्म तारखेतल्या अंकांची बेरीज करुन सांगा जरा. हमखास ३ च असणार!

मी  ः  नशिबानी मला कायमच साथ दिली आहे हे नक्की, तुमच्या दोघींशी ओळख झाली, हे लकी असल्यामुळेच. पण त्याचा ३ शी काही संबंध असेल, असा मी विचारच कधी केला नव्हता आणि जन्मतारखेच्या अंकांची बेरीजपण कधी केली नव्हती. बेरीज करून बघतो.  मी अंकांची बेरीज केली, आणि अहो आश्चर्यम म्हणजे बेरीज ३ आली. मी उडालोच.

मी :  नशीब कायम माझ्या पाठीशी का असते, याचे कोडे मला आज तुमच्यामुळे  उलगडले. माझी बेरीजपण ३ आहे. माझी जन्म तारीख आहे  २०/५ /१९४९.

मनवा आणि मेघना : वाह, क्या  बात है.  अंदाज एकदम परफेक्ट.

आमच्या गप्पा सुरू असताना बाजूला बसलेले चहा पिणारे पण आपापल्या खुर्च्या आमचेभोवती सरकवून आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झाले होते.

एक जण : आज ३ या अंकाविषयी खूपच छान माहिती मिळाली. मी ३ या अंकाला अशुभच मानत होतो. यापुढे मात्र आता नाही.

दुसरे एक जण : (चहावाल्यांना उद्देशून) दादा, या तिघांचं आजचं चहाचं बिल माझ्या नावावर मांडा. मजा आली. माझ्या मुलीची जन्मतारीख ३ मार्च आहे.

चहाचे दुकानदार : वा, वा, क्या बात है. मी पण तुमच्या गप्पा ऐकल्या, खूप नवीन विचार समजले. ३ अक्षरी नावे असणाऱ्या, जन्म तारखेच्या अंकांची बेरीज ३ असणाऱ्या, तुम्हा तिघांना माझा नमस्कार. आजपासून मी रोज ३ गरीब लोकांना चहा फ्री देणार आहे.
 

आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. आणि एकमेकांना बाय-बाय करून आपापल्या मार्गाने निघालो. - सुधीर करंदीकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 खरे मित्रप्रेम त्यागात !