ज्याची त्याची फ्रेंडशिप (३ ऑगस्ट : फ्रेंडशिप डे)

मैत्री हे खूपच पवित्र नातं, संबंध आहे. आई-वडील, भाऊ-बहीण, मामा-मामी, काकू-काकू, नवरा-बायको व इतर नातेवाईक हे रक्ताची नाती संबंधातून आपली इच्छा असो की नसो निर्माण झालेली असतात. परंतु मैत्री ही आपण स्वतः निर्माण केलेलं पवित्र असं नातं असत. ह्यात जात-पात, धर्म, रंग, लिंग-वय हे बघितले जात नाही. वयाने लहान मोठ्यांची मैत्री होऊ शकते. आपल्या ऑफिसचे सहकारी हे चांगले मित्र असू शकतात. ही खरी मैत्री असू शकते बऱ्याचदा ही घट्ट मैत्रीसुद्धा असते. एकमेकांवर खूप विश्वास असतो.

आपल्या आयुष्यात कधी कोण भेटेल हे सांगता येत नाही. तसेच कधी कोणाशी मैत्री होईल हेसुद्धा सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी माझा मुलगा देवांशूने एक कुत्रा पाळला. मला कुत्रा अजिबात आवडत नाही. पण काही दिवसांनी त्याला सकाळी फिरवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी त्याला रोज सकाळी फिरायला नेतो. ह्या कुत्र्याचे नाव ‘सुक्या' असे आहे. मला कुत्रा कधीच आवडला नाही आणि आमच्या अख्या खानदानात कधी कोणी कुत्रा पाळला नाही. कधी काय कोण जाणे ह्याच्यासोबत लळा लागला हे कळले सुद्धा नाही. ‘सुक्या' रोज नित्यनियमाने मला सकाळी पाच वाजता उठवायला येतो आणि सकाळी साडे सात वाजतापासून त्याची फिरायला नेण्यासाठी चुळबुळ सुरु होते.
सकाळी फिरता फिरता सुक्याची बऱ्याच जणांशी मैत्री झाली. त्यात एक मित्र मात्र ह्याचा खूपच खास झाला. सुक्या आणि त्याचा मित्र हे हमखास दररोज एकमेकांना भेटतातच. ते एकमेकांच्या अंगावर खेळतात. इकडून तिकडे उडया मारतात. सुक्याचा मित्र तर पार सुक्याला सोडायला आमच्या घरापर्यंत येतो. दोघांची ही स्वारी एकमेकांना भेटून अगदी खुश असते. कधी मधी सुक्याच्या अंगावर पाच-सहा कुत्री येतात. हे जेव्हा सुक्याच्या मित्राला कळते तेव्हा हा सुक्याचा मित्र त्या पाच-सहा कुत्र्याच्या अंगावर धावून जातो आणि त्यांना पिटाळून लावतो. तो सुक्याच्या केसालाही धक्का लावू देत नाही. एव्हढी मोठी जोखीम तो सुक्यासाठी घेतो. ह्याला म्हणतात मैत्री. ना भाषा, ना बोली, ना संवाद पण एकमेकांची मैत्री मात्र एकमेकांच्या भावना समजतात. किती प्रेम, किती निस्वार्थीपणा. सुक्याचा मित्र पाच-सहा कुत्र्यावर एकटाच भिडतो आणि त्यांना पिटाळून लावतो. ह्याला म्हणतात मैत्री प्रेम. नाही तर आपल्या मित्रावर जर हमला होत असेल तर आपण बरेच मित्र असे पळून जाताना बघितले आहे व त्याने बिचाऱ्याने एकट्याने मार खाल्ला आहे. हे असे आपले मित्र असतात माणसांचे.

हा प्रसंग आठवण्याचे कारण असे की, ‘फ्रेंडशिप डे' हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारच्या दिवशी भारत आणि अमेरिकेत साजरा केला जातो. फ्रेंडशिप म्हणजे काय? तर, दोन व्यक्तींमध्ये असलेली स्नेहाची भावना, आपुलकी आणि परस्पराबद्दलची जवळीक. मैत्री म्हणजे केवळ ओळख किंवा संबंध नसून ते एक घनिष्ठ आणि मजबूत नातं आहे. मैत्री म्हणजे दोन व्यक्तीमध्ये असलेले प्रेम, आपुलकी आणि भावनात्मक संबंध होय. मैत्री म्हणजे परस्परांबद्दलची काळजी. मित्र एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना समजून घेतात आणि अडचणीच्या काळात मदत करतात. मैत्री म्हणजे, मैत्रीमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. मैत्री म्हणजे आपुलकी, मित्र एकमेकांसोबत बोलण्यात, हसण्यात आणि वेळ घालवण्यात आनंद घेतात.मैत्री म्हणजे, सामूहिक अनुभव, मित्र अनेक गोष्टी एकत्र अनुभवतात ज्यामुळे त्याचे नाते अधिक दृढ होते. मैत्री हे एक मौल्यवान नातं आहे, जे आपल्याला आनंद, आधार आणि सकारात्मकता देते.

हे सर्व झालं पुस्तकी ज्ञान व माहिती. पुस्तकातील, सिनेमातील, गोष्टीतील आणि काल्पनिकपणे ऐकलेली माहिती. पण खरं सांगा ही काय खरंच मैत्री असते ? मैत्री की अंधश्रद्धा? काय खरंच अडचणीच्या वेळेस मित्र धावून येतात?  काय खरंच बिनस्वार्थाने मैत्री झाली असते? हल्ली बरीच मैत्री ही स्वार्थासाठी निर्माण झालेली आहे असे आपण अनुभवलेले आहे. कालपर्यंतचे खूपच सख्य असलेले मित्र नंतर आपण हे वैरी झालेले बघितले आहे. काही सुरुवातीला एकमेकांचे वैरी असलेले नंतर आपण सख्ये मित्रसुद्धा अनुभवलेले आहेत. आपला अनुभव मैत्रीचा हा फारच वेगळा आहे. तो जसा पुस्तकात, सिनेमा, पौराणिक कथेमध्ये वर्णिलेला आहे तो तसा नक्कीच नाही आणि जे मैत्रीमध्ये बलिदान असते ते तर कधीच खऱ्या अर्थाने अनुभवलेले नाही. आपण बरेच कपटी मित्र अनुभवलेले आहेत. बरेच धोकेबाज मित्र अनुभवलेले आहेत. हा असा आपला मैत्रीचा अनुभव आहे. जेव्हा खरी गरज असते तेव्हा मित्र असे काही कारण सांगून गायब होतात की ते नंतर दिसतच नाहीत.

आपण काय मैत्री अनुभवलेली आहे की, ज्या मित्राची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, तो समृद्ध आहे, तो श्रीमंत आहे त्याच्याशी मैत्री केली जाते. कारण हल्ली पैशाला खूप महत्व दिले जाते आणि अशी मानसिकता झाली आहे की पैशाने सर्व काही मॅनेज केले जाते. म्हणून पैसेवाला मित्र हवा.अगोदरच्या काळी असे नव्हते मित्र ज्याला केले जातं होते जो वर्गात/अभ्यासात हुशार असायचा. म्हणजे त्याच्या संगतीने अभ्यासाची गोडी लागायची. पालक आवर्जून अभ्यासू आणि हुशार वर्गमित्रासोबत मैत्री करायला सांगायचे. परंतु आज तसे चित्र नाही. आता अभ्यासू आणि हुशारीला महत्व राहिलेले नाही. अगोदरची मैत्री ही गप्पा गोष्टी, एकमेकांचे विचार शेयर करणे, संवाद साधने, प्रत्यक्ष भेटणे ह्यावर अधिक जोर दिल्या जातं असे. सोबत राहणे, सोबत सिनेमा बघणे, मैदानी खेळ खेळणे एकमेकांच्या घरी जाणे, कौटुंबिक कार्यक्रमात मदत करणे ह्यावर जोर दिला जातं असे.
सुदामा आणि कृष्ण ही एक आदर्श म्हणून मैत्री सांगितले जाते; पण ह्यावर कोणी अंमल मात्र करत नाही. ह्याचा फक्त दाखला दिला जातो. अनुकरण कोणीही करत नाही; पण अपेक्षा दुसऱ्यापासून कमालीची केली जाते. निभावत मात्र कोणी नाही. आता आपली आदर्श मैत्री आणि त्याची आदर्श संहिता ही बियर बार मधेच तयार होते आणि ‘आपण बसू या' ह्या आदर्श तत्वावर ती घट्ट टिकून राहते. जणू काही हा अलिखित नियमच आहे. जो मदिरा घेत असेल त्यालाच जास्त मित्र असतात आणि तेच टिकतात. बमफर आणि चिल्ड असेल तर मैत्रीपूर्ण वातावरण असते. बस ह्या बियर बारपुरती मैत्री शिल्लक राहिलेली आहे.  ह्या परिघाच्या बाहेर गेला की मैत्री संपुष्टात येते. हे सध्याच्या मैत्रीचं वास्तविक स्वरूप आहे.

मैत्री हे खूपच पवित्र नातं, संबंध आहे. आई-वडील, भाऊ-बहीण, मामा-मामी, काकू-काकू, नवरा-बायको व इतर नातेवाईक हे रक्ताची नाती संबंधातून आपली इच्छा असो की नसो निर्माण झालेली असतात. परंतु मैत्री ही आपण स्वतः निर्माण केलेलं पवित्र असं नातं असत. ह्यात जात-पात, धर्म, रंग, लिंग-वय हे बघितले जात नाही. वयाने लहान मोठ्यांची मैत्री होऊ शकते. आपल्या ऑफिसचे सहकारी हे चांगले मित्र असू शकतात. ही खरी मैत्री असू शकते बऱ्याचदा ही घट्ट मैत्रीसुद्धा असते. एकमेकांवर खूप विश्वास असतो. जेव्हढा विश्वास हा नातेवाईकांवर नसतो तेव्हढा हा सहकाऱ्यांवर असतो; पण हे प्रमाण मात्र फारच कमी असत. ह्या नात्यावरसुद्धा इतरांचा आक्षेप असतो. काहींना हे नातं किंवा ह्यांचं बरं चाललेलं रुचत नसत. ह्यात विरुद्धलिंगी सहकारी  असले तर मग सोडाच.

मैत्री ही निखळ असली पाहिजे. साधारणतः ही मैत्री दहाव्या वर्गापर्यंत निखळ, निस्वार्थी असते. ह्याला जात-पात, धर्म हे माहित नसत. तो/ती कोणासोबतही मैत्री करतो. जस-जसं ह्याच वय वाढत तस-तसं ह्याच्यात वैचारिक बदल होतो आणि ह्यातील निस्वार्थी, निखळपणा निघून जातो. पण एक दुसऱ्याकडून निस्वार्थी आणि निखळपणाची अपेक्षा केली जाते.

हल्ली मित्र आणि मैत्री हरवलेली आहे. ह्या मैत्रीमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे. हा प्रदुर्भाव दुसरं-तिसरं काही नसून ते म्हणजे स्वार्थीपणा, अहंपणा, ॲटिट्युड आणि इगो आहे. ह्या किटाणूंवर फवारणी करणे फार गरजेची आहे. ह्या किटाणूंचा नाश झाला तर आपल्याला खरी मैत्री मिळेल व आपण खरा मैत्री दिवस (फ्रेंडशीप डे) साजरा करू शकू.
प्राण्यांना मैत्रीचं महत्व कळलं; पण माणसाला नाही. कधी-कधी माणूस विचित्र वागतो आपणच त्याला जनावर झाला असे म्हणतो. पण जनावर झाला तरी चालेल, त्याला किमान मैत्रीच तर महत्व कळेल ना? दुसरे म्हणजे आपली मैत्री खरंच जन्मभर टिकवायची असेल तर उधार मागू नका. उधार पैसे दिल्याने बऱ्याच मैत्री संपुष्टात आल्या आहेत. मन गढूळ झालेले आहे. जीव जरी गेला तरी मित्राला उधार पैसे मागू नका व त्याच्याकडून अपेक्षा ठेऊ नका. जर मैत्री टिकवायची असेल तर.

माणसांची मैत्री ही केवळ कागदावर राहिलेली आहे किंबहुना ती मैत्री दिनापूर्ती राहिलेली आहे. ह्याला नक्कीच काही अपवाद जरूर असतील. ज्यांची खरी निस्वार्थ  मैत्री असेल ते खरोखर भाग्यवान आहेत. त्यांचे खूप-खूप अभिनंदन. प्रत्येक नात्यात मैत्री असावी लागते मग ते पती-पत्नी, आई-वडील, सहकारी, मित्र-मैत्रीण, आजोबा-नातूचे कोणतेही नाते असो. मगच मन मोकळे करता येईल. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येकासोबत मैत्री करा म्हणजे दुःखाचे निवारण होईल. ‘सुक्या'ला जसा मित्र मिळाला तसा मित्र सर्वाना मिळो हीच सदिच्छा ! मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. - अरविंद सं. मोरे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 तिन तिगाडा काम बिगाडा?