कहाणी : चातुर्मास माझ्या आवडीचा

दानाचं महत्त्व सांगणाऱ्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या कहाण्या, देव प्रसन्न कसा होईल? जगात कसे वागावे? चूक नसताना दोष देऊ नये, प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले. ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून  परत नीट वाचायला हव्या आहेत..हे तिच्या लक्षात आले. या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे हे आता तिच्या मनाला पटले. सुखाने नांदायचं असेल तर रोज जगताना कसं वागलं पाहिजे हे या कहाण्या शिकवतात.

परंपरेनी चालतं आलेलं स्तोत्र, मंत्र, आरत्या, पूजा हे सगळं तिला फार आवडायचं. ती मनोभावे ते करायची. पुढच्या पिढीचा मात्र तिला मनातून फार राग होता. यांना काही सांगायची सोय नाही. .. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं ... हे का ..आणि ते का..जाऊ दे....पण आपलं आपण तरी करायचं हे तिने ठरवलं होतं.

आज श्रावणी सोमवार होता. तिची पूजा आरती झाली. कहाणी वाचून झाली. फराळ करायच्या आधी तिला देवदर्शन करायचे होते. म्हणून ती शंकराच्या देवळात जायला निघाली. निघताना नवऱ्याने, घरच्यांनी तिला जरा टोकलंच.... पण त्यांचं न ऐकता ती निघाली.

मैत्रिणीला तरी विचारावे म्हणून ती पलीकडे राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली.

मैत्रिणीने दार उघडले. ती गडबडीत होती.

"ये गं”...म्हणाली.

"तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?”

"अगं आता कसं ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नात शाळेतून येणार, कामवाली....”

"दे दे आयुष्यभर तू न येण्याची शंभर कारणं दे.”

 ती जरा रागावली मैत्रिणीवर.

"आज एवढा श्रावणी सोमवार आहे तुला काही नाही त्याचं..”

"तसं नाही गं...जबाबदारी आहे. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या उद्योगाला जावं लागतं.”

"संसार आयुष्यभर पाठी लागलेला आहे... त्याच्यात किती गुंतून राहणार आहेस? मग देवधर्म तू कधी करणार?”

"अगं नात लहान आहे. जरा मोठी झाली की...”

मैत्रीण बोलत होती पण तिचं काही न ऐकता ती निघाली...

साडेनऊ झाले होते. रिक्षा दुसऱ्या  रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,

"अरे रिक्षा इकडे कुठे?”

"आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूप गर्दी आहे.श्रावणी सोमवार आहे ना..”

"हो का? बरं..”

तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे..ती रांगेत उभी... बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती.पाऊण तास झाला होता. देऊळ अजून दूर होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं...मनातल्या मनात "शिवमहिमा” म्हणायचं होत....."जय शीव ओंकारा” आरती म्हणायची होती... पण गोंधळ गडबड आवाज...ईतका होता की बस्स.... त्यामुळे  मनाला  शांतता नव्हती..

दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळं दिसत होतं. आता रेटारेटी सुरू झाली. ताट हातात धरून हात भरून आला होता. लांबून दर्शन घेतलं. समोर ठेवलेली शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. तिथल्या गुरूजींनी, नारळ, हार देवाला स्पर्श करून बाजुला ठेवला...जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं...चार माणसं गर्दी हटवायला होते.

"चला  पुढे चला ...” म्हणत होते.ती आपोआप पुढे सरकली...आज देवं नीट दिसले नाहीत....केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासाने ती आली होती... देवळात तिच्याबरोबर न आलेल्या मैत्रिणीची तिला आठवण झाली... लांबून कसंतरी दर्शन झालं. खरंतर दर्शन झालं असं उगीच म्हणायचं....रुखरुख लागली तिला....रिक्षा करून  ती घरी निघाली. दमली होती...दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही...त्यामुळे मनाला आज   समाधान वाटत नव्हते.मैत्रिणीचे दार उघडे होते. समोर  ती खुर्चीवर बसली होती. मैत्रिणीची नात नाचत समोर आली म्हणाली.

"आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये ना...”

घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता. त्याला हार, फुलं  घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता. मैत्रीण म्हणाली..

"झालं ना दर्शन ..आता  ये गं ...बैस  थोडा वेळ.  तुला कॉफी करते. दमल्यासारखी दिसतेस...” असं म्हणून मैत्रीण आत गेली.

ती  थकून खुर्चीवर बसली. मनात विचार चक्र सुरू झाले ... सकाळी गडबडीत असलेली मैत्रीण आता शांत होती. सुनबाई, नवरा, मुलगा ऑफिसला गेले होते. कामवाली बाई येऊन घर साफ करून गेली होती. नात शाळेतून आली होती. सकाळी  पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली....ईतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली...मैत्रिणीने केलेली पूजा बघूनतीला आज ते मनोमन जाणवले..त्यात लपलेला खोल मतितार्थ  आपण कधी समजून घेतला नाही. तिला आठवली शुक्रवारची कहाणी... सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला  बोलवत नाही.तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो.  काही दिवसांनी तीचं दारिद्रय जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती दागिन्यांवर एक एक पदार्थ ठेवते ....या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल..

दानाचं महत्त्व सांगणाऱ्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या कहाण्या, देव प्रसन्न कसा होईल? जगात कसे वागावे? चूक नसताना दोष देऊ नये, प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले. ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून  परत नीट वाचायला हव्या आहेत..हे तिच्या लक्षात आले. अरेच्या....म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या....देवा चुकले रे मी..खुलभर दुधातल्या कहाणीतल्या म्हातारीसारखा मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा  आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती. समाधानानी मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज मला कळले रे...या कहाण्यात   सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे आता तिच्या मनाला पटले. आपल्याला बऱ्यापैकी भान आलेल आहे. आता आपण  स्वतःला बदलायचचं...उतायचं नाही मातायचं नाही .आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही  असं मनोमन तिने ठरवलं. तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल.......

हे तिच्या लक्षात आले. सुखानी नांदायचं असेल तर रोज जगताना कसं वागलं पाहिजे हे या कहाण्या शिकवतात. मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला.आणि नातीला म्हणाली, "तु पाठ केलेलं आजीला म्हणून दाखव”

नातं फोटोसमोर  हात जोडून ऊभी राहून म्हणायला लागली..

"कैलास राणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी
 कारुण्य सिंधू भवदुःखहारी
 तुजविण शंभो मज कोण तारी”

नातीने तिला प्रसाद दिला. तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले....पुढच्या पिढीला नुसती नावं ठेवून उपयोग नाही तर त्यांना आपण  शिकवले पाहिजे ..तरच ती शिकतील हे तिच्या लक्षात आले. आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे ....तिने देवासमोर  कबुली दिली...कहाणी संपली.तिचे डोळे भरून आले होते...  - नीता  चंद्रकांत कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिक्षण