महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
तो श्रीराम आम्हाला देतो रे
अनेकांच्या कष्टांतून आपल्या ताटात पौष्टिक, सुग्रास अन्न उपलब्ध होत असते. पण मुख्य अन्नदाता भगवंत आहे हे कधीच विसरता कामा नये. म्हणूनच त्या अन्नाचाही अत्यंत आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. अन्नाचा नाश करणे, ते वाया घालवणे हे पाप आहे. ते घडू नये, अन्न आणि अन्नदाता दोन्हीचा सन्मान व्हावा यासाठी भोजनाआधी भगवंताचे स्मरण करावे, जेवताना हरीस्मरण करीत जेवावे हे समर्थांचे सांगणे आहे.
जगी पाहता देव हा अन्नदाता।
तया लागली तत्वता सार चिंता।
तयाचे मुखी नाम घेता फुकाचे।
मना सांग पां रे तुझे काय वेचे?। श्रीराम ९३।
भगवंताने ही जीवसृष्टी निर्माण केली तेव्हाच सर्व जीवांच्या भरण-पोषणाची व्यवस्थाही केली. त्याने अशी अन्न साखळी निर्माण करून ठेवली, ज्यायोगे प्रत्येक जीवाला त्याच्या देहाला, प्रकृतीला आवश्यक असलेले अन्न त्याच्या जवळपास उपलब्ध होईल. सृष्टीच्या व्यवहाराचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येते की अन्नासाठी एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. निसर्गाचा समतोल राखण्याची ही अद्भुत व्यवस्था जगन्नियंत्याने करून ठेवली आहे. या अन्नसाखळीचा विचार केला तर केला तर असेही दिसून येते की प्रत्येक जीव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतो. पण त्या वनस्पतीचे पोषण कोण करतो? त्यासाठी लागणारी माती, पाऊस आणि सूर्यप्रकाश यांची व्यवस्था कोण करतो? या एका प्रश्नावर विचार केला तरी लक्षात येईल की देवाला अन्नदाता का म्हटले आहे. वनस्पती हे शाकाहारी प्राण्यांचे अन्न आहे. मांसाहारी प्राणी अशा प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरतात. छोटे छोटे कृमी-कीटक फुले-फळे यातून अन्न मिळवतात. लहान मोठे पक्षी या कीटकांवर जगतात. मनुष्यप्राणी तर शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारचे अन्न सेवन करतो.
मृत्यूनंतर सर्व जीवांचे देह मातीत मिसळून जातात. त्याच मातीतून वनस्पतींचे पोषण होते. भगवंताचे हे नियोजन विस्मयकारकच म्हटले पाहिजे. प्राणी कितीही लहान असो वा महाकाय असो, भगवंताला सर्वांची सारखीच चिंता आहे. प्रत्येक प्राण्याला आपले अन्न मिळवता यावे यासाठी त्या त्या प्रकारची शरीर रचना, शरीर सामर्थ्य भगवंताने देऊन ठेवले आहे. इतर प्राणी या कशाचाही विचार करू शकत नाहीत. पण मनुष्यप्राण्याला विचार करण्याची क्षमता देवाने दिली आहे. ज्या देवाने आपली एवढी सोय करून ठेवली आहे त्याचे फुकट उपलब्ध असलेले नाव घ्यायला आपले खरोखर काय जाते? आपले जीवन चालविणाऱ्या भगवंताबद्दल आपण काही कृतज्ञता तरी बाळगायला हवी. आपल्याला वेळेवर, पोटभर अन्न मिळते ही भगवंताची कृपा आहे याची जाणीव तरी ठेवायला हवी.
समर्थ म्हणतात, निदान अन्नदाता म्हणून तरी त्याचे स्मरण करा. भोजन झाल्यावर ”अन्नदाता सुखी भव!” असे म्हणण्याची पध्दत आहे. त्यामागे हाच कृतज्ञ भाव आहे. अनेकांच्या कष्टांतून आपल्या ताटात पौष्टिक, सुग्रास अन्न उपलब्ध होत असते. पण मुख्य अन्नदाता भगवंत आहे हे कधीच विसरता कामा नये. म्हणूनच त्या अन्नाचाही अत्यंत आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. अन्नाचा नाश करणे, ते वाया घालवणे हे पाप आहे. ते घडू नये, अन्न आणि अन्नदाता दोन्हीचा सन्मान व्हावा यासाठी भोजनाआधी भगवंताचे स्मरण करावे, जेवताना हरीस्मरण करीत जेवावे हे समर्थांचे सांगणे आहे. नामाची महती माणसाला पटावी आणि कोणत्या तरी कारणाने-निमित्ताने त्याच्या मुखात भगवंताचे नाम यावे म्हणून समर्थ अनेक प्रकारे बोध करीत आहेत.
माणूस बरेचदा अन्नासाठी दुसऱ्या माणसांसमोर लाचार होतो. भूक भागविण्यासाठी नीती-धर्म विसरतो. मर्यादा सोडतो. लोकांसमोर लाचारी पत्करण्याऐवजी तो भगवंतासमोर दीन झाला तर भगवंत कधीच त्याची उपेक्षा करणार नाही ही श्रध्दा त्याने मनात जागवायला हवी. श्रध्दा जागृत करण्याचे आणि ती दृढ करण्याचे काम नामस्मरण करते. ”राम सर्वकर्ता-धर्ता” या वचनावर स्वतः समर्थांची एवढी दृढ श्रध्दा आहे की ते म्हणतात, ”आम्ही काय कुणाचे खातोरे। तो श्रीराम आम्हाला देतो रे” हे भक्तीचे सामर्थ्य आहे. भक्तीची मिजास आहे. नामाचा छंद लागला की हा अनुभव निश्चित येतो.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ.आसावरी भोईर