महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
दिवंगत श्री गणेश पाटील.. एक चटका लावून गेलेला पोलिस मित्र!
श्री. गणेश पाटील हे पोलिस निरीक्षक श्री.आत्माराम पाटील यांचे चिरंजीव होते, तर भाऊ श्री.राजेंद्र पाटील हे पत्रकार आहेत. त्यांचा मुलगा दहावीत आणि मुलगी नववी वर्गात शिकत आहेत. मुळचे खानदेशातील सामनेर, जिल्हा जळगांव येथील असणारे दिवंगत गणेश पाटील हे एक हसतमुख, कर्तव्यनिष्ठ आणि सदा सर्व जनतेसोबत एक खाकी वर्दीतील देव माणूस म्हणून वावरत होते. वाहतूक नियम न पाळता लोक सुसाट सुटत असतात, त्यातून समोरील व्यक्तीचा जीव जातो, त्या एका जाणाऱ्या जीवनामुळे..अनेक जीव उघड्यावर पडतात, ते शल्य फार मोठं आहे.
हायड्रा क्रेनच्या धडकेत पोलिस हवालदार श्री. गणेश पाटील यांचा गुरुवारी २४ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास महापे, नवी मुंबई येथे कर्तव्यावर असताना दुर्देवी अपघातात अंत झाला. श्री गणेश पाटील हे, वयाच्या फक्त ४३ व्या वर्षी, इतक्या कमी वयात जातील, इतक्या लवकर जातील, हे कुणास स्वप्नातदेखील वाटत नव्हते. त्यांच्या मागे असणारे कुटुंब आणि लेकरांचे पप्पा, वडील, बाप गेल्याने होणारे दुःख आभाळाहून मोठं आहे, खूप मोठे आहे. हया अपघातातून आपणं सावरू, वावरू आणि बावरू शकत नाहीत इतके त्यांच्या जाण्याने पोरकेपणा समस्त पोलिस प्रशासनात आहे. सर्वच पोलिस बांधव मोठ्या दुःखात आहेत, कर्मचारी यांच्या भावना डोक्यात आसवे आणणाऱ्या आहेत. सर्व पोलिस बांधव यांच्या तसेच स्वर्गीय गणेश पाटील यांच्या कुटुंबाच्या दुःखात समस्त नवी मुंबईकर सहभागी आहेत. मात्र, या अपघातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, मुख्य रस्त्यावर वाहतूक नियम न पाळता लोक सुसाट सुटत असतात, त्यातून समोरील व्यक्तीचा जीव जातो, त्या एका जाणाऱ्या जीवनामुळे..अनेक जीव उघड्यावर पडतात, ते शल्य फार मोठं आहे.
सकाळी एक कर्मचारी कामावर जाण्यासाठी निघतो, कामावर हजर असल्याचे, लोकेशन ट्रॅक करून फोटो कार्यालयात पाठवतो, आणि एक बेशिस्त असा क्रेन ड्रायव्हर उभ्या माणसाच्या अंगावरून निघून जातो, ही घटना जितकी दुःखदायक आहे तितकीच स्वतःचा जीव किती आपण संकटात टाकावा, यासाठी देखील पोलिस मित्रांना एक धडा आहे.वीर मरण, हौतात्म्य, शहीद होणे एक दोन दिवस लोकात वीर रस उफाळतो; पण ज्याचं जातं, त्याला त्याच्या जाण्याने सर्व आयुष्य छळत असतं. घरातील वृद्ध आई वडील, मुले, पत्नी यांची घरातील कमवता, राबता व्यक्ती गेल्यावर होणारी तडफड, तगमग, मरमर ही उभ्या जन्माची होळी होण्यासारखे असते. यासाठी जनतेच्या सुरक्षेसाठी असणारे पोलिस बांधव यांच्या आत एक कुणाचा तरी बाप, नवरा, मित्र, काका, चुलता, मुलगा असतो की नाही? हा विचार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्कीच केला पाहिजे. सर्व पोलिस यांना रोडवर ट्रॅफिक नियंत्रण करत असतां ना हलक्या वजनाचे ड्रेस किंवा सेपटी किट्स पुरवले जाणे गरजेचे आहे. पोलिस मित्रांनादेखील हात जोडून विनंती, कुणी सिग्नल तोडला, तुम्ही हात दिला आणि तो तरीही थांबला नाही, पळून गेला... अशा स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. चिता, वाघ समजून त्याचा पाठलाग करू नका, सोडून द्या त्याला, कारण शिर सलामत तो पगडी पचास असे समजून कर्तव्य निभवा. पळून जाणारा बेशिस्त ड्रायव्हर, गुन्हे करणारा गुन्हेगार हा कुठल्या तरी रस्त्यावरील कॅमेऱ्यात सापडेल, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. आज विज्ञान खूप पुढे गेले आहे, त्याचा वापर करून पोलिसांनी रस्त्यावर काम करावे.
एकतर पोलिस प्रशासनात नाही म्हटले तरी अती काम, वेळेवर आराम नाही, कधी झोप घेणार तेही माहित नाही, योग्य तो, विविध खात्यातील समन्वय अभाव आणि रोडवर काम करण्याचे नियोजन कधीतरी रस्त्यावर उभे राहून अनुभव असलेल्या किंवा कर्तव्य तत्पर करणाऱ्या अधिकारी यांनी केले तर..कदाचित पोलिस मित्रांसाठी, महिला पोलिस यांच्यासाठी पाणी आणि स्वच्छता गृह यांची देखील माणसास गरज असते, याची जाणीव वरिष्ठांना एक अधिकारी म्हणून कळू शकते, मात्र या सुविधा देण्याबाबत काय?
श्री.गणेश पाटील हे पोलिस निरीक्षक श्री.आत्माराम पाटील यांचे चिरंजीव होते, तर भाऊ श्री. राजेंद्र पाटील हे पत्रकार आहेत. त्यांचा मुलगा दहावीत आज मुलगी नववी वर्गात शिकत आहेत. मुळचे खानदेशातील सामनेर, जिल्हा जळगांव येथील असणारे दिवंगत गणेश पाटील हे एक हसतमुख, कर्तव्यनिष्ठ आणि सदा सर्व जनतेसोबत एक खाकी वर्दीतील देव माणूस म्हणून वावरत होते. मुळात अध्यात्म आणि अध्ययन आवड असणारे संस्कार असल्याने घरातील संस्कार, वारसा हा कामाच्या ठिकाणी देखील दिसत होता. कितीदातरी बोनेट वरून पोलिसांना फरफटत नेण्यात येते, कंटेनर खाली मुद्दाम चिरडण्यासाठी पोलिसांना दिवंगत घेण्यात येते, कधी तर पोलिसांच्या अंगावरदेखील हात उगारला जातो. एकूणच काय, समाज आता समज असलेला राहिला नाही,हे मात्र खरं आहे. दिवंगत श्री.गणेश पाटील आज नाहीत; मात्र या घटनेतून बोध घेण्यासाठी सर्वांनी शिस्त, नियम, सन्मान यांना वाव दिला पाहिजे. अवजड वाहने, स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ नेणारी वाहने यांच्या वेळा पाळल्या आणि सांभाळल्या गेल्या पाहिजेत.
- प्रा.रवींद्र पाटील