तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते चौदावे दलाई लामा

‘दलाई लामा याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. त्यांचा जन्म ताकत्सर, छिंगहाय, चीन मध्ये ६ जुलै १९३५ रोजी झाला. हे १४ वे नि विद्यमान दलाई लामा आहेत. तिबेटी बौद्ध मतातील गेलुग्पा पंथाच्या प्रमुख आचार्यांना ”दलाई लामा अश्या संज्ञेने उल्लेखले जाते. १७ नोव्हेंबर १९५० रोजी चौदाव्या दलाई लामांनी पदाची सूत्रे हाती घेतली. या दलाई लामांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी हयातभर कार्य केले असून १९८९ साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो यांचे आई वडील शेतकरी होते. त्यांच्याकडे असलेल्या शेती व गाई, म्हशींवर ते आपला उदरनिर्वाह चालवायचे. हे कुटुंब १९३९ मध्ये दलाई लामांच्या चौथ्या वाढदिवसानंतर आपले छोटसे खेडेगाव सोडून ल्हासा येथे आले. दलाई लामांच्या निवडीसाठी असलेल्या विविध कसोट्या यशस्वीरीत्या पार केल्यावर २२ फेब्रुवारी १९४० रोजी पो ताला प्रासादात एका विधिपूर्व समारंभात तेंझिन गियात्सो चौदावे दलाई लामा म्हणून आसनस्थ झाले. त्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. पुढे त्यांचा र्धमविषयक सखोल अभ्यास सुरू असताना १९५० मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले.आणि हा प्रदेश चीनचा भाग असल्याचे घोषित केले. त्याचवेळी तिबेटच्या राजकीय सत्तेची सर्व सूत्रे दलाई लामांच्या हातात आली. या काळात तिबेटवर चिनी राजवटीचा अनियंत्रित अंमल सुरू झाला. धाक,दडपशाही,जुलूम, जबरदस्ती, छळवणूक, पिळवणूक इत्यादी अत्याचार तिबेटच्या जनतेवर चिनी राज्यकर्तांकडून व लष्कराकडून होत होते.

भगवान गौतम बुद्धाच्या शांतताप्रिय देशात हिंसाचार, लाठीमार अश्रुधूर व गोळीबार या अत्याचारांनी परिसीमा गाठली. जनतेच्या सर्वप्रकारच्या स्वातंत्र्यावर र्निर्बंध लादले गेले.तिबेटीय कला, संस्कृती व परंपरा यांचा ऱ्हास केला गेला. चीनच्या वाढत्या जाचामुळे व अत्याचारामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामांना त्याच्या कुटुंबीयांसह १९५९ मध्ये तिबेट सोडावे लागले. ते भारतात शरण आले. काही लोक नेपाळ, भूतान व इतरत्र शरण गेले. जवाहरलाल नेहरू आणि लामा यांची १९५९ मध्ये मसूरी येथे भेट झाली. आज जगभरातील विविध देशांमध्ये तिबेटीय माणसे निव्राासितांचं आयुष्य कंठत आहे. त्यातील बहुतांश मात्र भारतात आहेत. हिमाचल प्रदेशातील धरमशालात दलाई लामा वास्तव्यास आहेत. येथे त्यांनी लोकशाही मूल्यांच्या तत्त्वावर तिबेटीय निव्राासितांची संसद स्थापन केली आहे. आज ही संसद किंवा निव्राासितांचे सरकार दलाई लामांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. दलाई लामा तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीने मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी दलाई लामांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना १९८९ मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. देश-विदेशांत धर्म, तत्त्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता, करुणा, मानवी हक्क इत्यादी विषयांवर ते व्याख्याने देत असतात. देश-विदेशांतील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननिय डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांना मानचिन्हे व गौरवपत्रे दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी जगभरातील ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२ पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यापकी ‘फ्रीडम इन एक्झाईल व ‘माय लॅन्ड ॲन्ड माय पीपल ही दोन त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके आहेत.

१९८९ साली त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कारण त्यांनी जगातील मानवांच्या दुख मुक्तीसाठी दलाई लामाचे १० असे विचार, जे प्रत्येक मानवाचे जीवन सुखी करू शकतात.
१) चुका दाखवणारे मित्रच चांगले असतात. कमजोरी दाखवून ते आपल्या व्यक्तिमत्त्वातील लपलेल्या खजिन्याबाबत सांगत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान केला पाहिजे.
२) समस्या उभ्या करणाऱ्या लोकांवर चिडू नका. कारण समस्यांच्या सामना केल्यामुळेच आंतरिक शक्ती विकसित होते. सहिष्णुता आणि धैर्य दाखवण्याची संधीदेखील मिळते.
३) प्रत्येक कष्टाचे कारण अज्ञानता आहे. आनंद मिळवण्याच्या आपल्या लालसेपोटी आपण दुसऱ्यांना कष्ट पोहोचवतो.
४) करुणेचा संबंध धार्मिक विश्वासाशी नसून मानवीय आहे. आपली शांती मानसिक स्थिरतेसाठी आवश्यक आहे. करुणेशिवाय मनुष्याचे अस्तित्व शक्य नाही.
५) अडचणींनाच आपली शक्ती बनवा. त्या कितीही गंभीर आणि कष्टदायी असेनात. उत्तमातील उत्तमाची अपेक्षा कायम ठेवा. जर आपण अशा करणे सोडून दिले तर ही सर्वात मोठी चूक असेल.
६) प्रसन्नता अनेकदा बाहेरून येत नसते. ही कर्मानेच निर्माण होते.
७) नातेसंबंध गरजांवर आधारित नसतात. सर्वश्रेष्ठ नाते तेच असते ज्यामध्ये दोन्ही बाजुंनी प्रेम हे त्यांच्या गरजेपेक्षा अधिक महत्त्वाचे असते.
८) जीवनातील सर्वात मोठे लक्ष्य इतरांची मदत करणे हे आहे. जर आपल्याला कोणाचीही मदत करणे शक्य नसेल तर त्याच्यासाठी अडचणी तरी निर्माण करू नयेत.
९) चिंता ही कुठल्याही समस्येचे समाधान नाहीच. जर एखाद्या समस्येचे निराकरण करायचे असेल तर त्यासाठी चिंता करू नका.जर त्यातून मार्ग काढू शकत नसाल तर फक्त चिंता करत राहणे व्यर्थ आहे.
१०) जर आपण स्वतःवर प्रेम करू शकत नसाल तर इतरांवरही प्रेम करू शकणार नाहीत. स्वतःबद्दलच स्वतःला करुणा नसेल तर इतरांसाठीदेखील आपण करुणेचा भाव दाखवू शकत नाहीत. दलाई लामा आपल्या तीन वचनबद्धतांसाठी जगभर अविश्रांत प्रवास करतात. या तीन वचनबद्धता म्हणजे पहिली मनुष्यरूपातून आलेली करुणा, क्षमाशीलता,सहनशीलता आणि स्वयंशिस्त, दुसरी धर्मगुरु म्हणून धार्मिक सहिष्णुता आणि धार्मिक शिकवण आणि तिसरी तिबेटी नागरिक म्हणून अहिंसा आणि शांतताप्रिय तिबेटी बौद्ध संस्कृतींचं जतन. असे गुण भारतातील कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूकडे दिसत नाही. म्हणूनच त्या त्या धर्मात विसंगती ठळकपणे दिसतात. शेवटी आपण मानव म्हणून काय घ्यावे हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे. तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते चौदावे दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस देशभरात नव्हे तर जगभरात प्रेरणादायी लक्षवेधी ठरला. त्यांच्या बाबत गुगलवर विपुल प्रमाणत माहिती उपलब्ध आहे. पण काय घ्यावी आणि काय नाही हे खूप जबाबदारीचे काम आहे.
-सागर रामभाऊ तायडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सापाबद्दलचे समज गैरसमज