श्रावण : सृजनाचा अनोखा आविष्कार

श्रावण महिना हा धार्मिक आणि पवित्र मानला जातो, या महिन्यात सात्विक जीवनशैली आणि शुद्धतेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यात उपवास, पूजा आणि दानधर्म यांसारख्या धार्मिक क्रिया केल्या जातात. देवाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जातात, त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

श्रावण महिना म्हणजे लहानपणी शिकलेली कवी बालकवी यांची ‘श्रावणमासी' ही कविता लगेच समोर येते. श्रावण महिना हा आनंदाचा आणि उत्साहाचा काळ असतो, कारण या महिन्यात निसर्गात नवचैतन्य येते. पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र हिरवेगार रान पसरलेले दिसते. हे दृष्य डोळ्यांना आनंद देणारे असते. कधी पाऊस पडतो, तर कधी दुसऱ्या क्षणी ऊन पडताना दिसते. असा हा ऊन, पावसाचा लपंडाव सुरू असतो. पावसाळ्यात निसर्गाचे रुपडं पार पालटून गेलेलं असतं. कवी श्रावण महिन्यातील आल्हाददायक वातावरण, पावसाची सर, हिरवीगार झाडे, विविध रंगांची फुले आणि पक्षांचे किलबिलाट यांसारख्या निसर्गातील घटकांचे सुंदर चित्रण करीत असतो. श्रावण महिन्यातील प्रसन्न आणि उल्हसित वातावरणाची अनुभूती येते, तसेच कवी निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन करीत असतो.

शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना  बहरून टाकणारा, पशु-पक्षांना सुखावणारा, मनामनाला  फुलवणारा, चित्त उल्हसित करणारा, अवघ्या चराचराचं रुपडं पालटून देणारा  म्हणजे श्रावण. सृजनाचा अनोखा आविष्कार  असलेला हा श्रावण ... श्रावण म्हणजे  ऊनपावसाच्या खेळात नभात सप्तरंगी इंद्रधनू अवतरणे ... एक आनंदपर्वणी.

आबालवृद्धांना मोहित करणारा हा श्रावण, सर्वांना निश्चितच भुरळ घालतो. निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्द-सुरलहरींचा प्रवासी म्हणजेच कवी त्याच्या प्रेमात पडणार नाही असे होणार नाही.

‘हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकित
भिजल्या मातीत श्रावण आला'

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ह्या कवितेत श्रावण महिन्याचे सुंदर आणि मोहक चित्रण करण्यात आले आहे, ज्यात निसर्गाची चैतन्यमयता आणि कोमल रूप दर्शाविले आहे. श्रावणाला ‘हसरा', ‘नाचरा', ‘लाजरा' आणि ‘सुंदर साजिरा' असे विशेषण देऊन कवीने त्याचे सचेतन आणि मनमोहक रूप रेखाटले आहे.

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा

ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कविता केवळ श्रावण महिन्यातील पावसाचे वर्णन करणारी नाही, तर ती प्रेम, निसर्ग, आठवणी आणि मानवी भावना यांचा एक सुंदर संगम आहे, जो मनाला नेहमीच आनंदित करतो. अशी किती तरी कविता श्रावण महिन्यावर कवींनी केल्या आहेत.

श्रावण महिना हा धार्मिक आणि पवित्र मानला जातो, या महिन्यात सात्विक जीवनशैली आणि शुद्धतेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यात उपवास, पूजा आणि दानधर्म यांसारख्या धार्मिक क्रिया केल्या जातात. देवाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जातात, त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही, त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे ते गाणे त्यांच्या मुखावरुन वाचता येते. नागपंचमीच्या सणाला सासरी गेलेल्या लेकींना माहेरची ओढ लागते. आपल्या आईवडिलांना, भावाला तिला भेटावयास यावंसं वाटतं. श्रावण महिन्यात ह्या मुलींची पावलं माहेरच्या ओढीनं वळू लागतात. श्रावण महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी शेतकऱ्यांच्या मित्राची म्हणजे नागाची भक्तिभावाने पूजा केली जाते. नारळी पौर्णिमा आगरी-कोळी बांधव दर्यासागराला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ वाहण्याची प्रथा आहे, तसेच याच दिवशी रक्षाबंधन असते, बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून जन्माष्टमी साजरा करतात. जन्माष्टमीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे गोपाळकाला. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या  हा दिवस ‘मातृ दिन' म्हणून  साजरा करतात, तसेच या दिवसाला बैल पोळा म्हणून ओळखले जाते, या दिवशी बैलांची पूजा करतात. श्रावण महिन्यात येणारे सर्व सोमवार व शनिवारी उपवास करतात. या महिन्यात मांसाहार करीत नाहीत. असा हा भक्ती आणि चैतन्य निर्माण करणारा श्रावण, जीवनात रंग निर्माण करणारा श्रावण ...
म्हणून ...

असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
सृष्टीचा ग चित्रकार हिरवा देखावा रेखितो

श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय व मनोहर दृश्याचे वर्णन करताना कवी ऐश्वर्य पाटेकर म्हणतात, श्रावण हा रंगाचा जादूगार आहे तो सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत येतो सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो. सारी सृष्टी नवा हिरवा शालू नेसून, चैतन्य निर्माण करते. - प्रा. जयवंत पाटील 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दिवंगत श्री गणेश पाटील.. एक चटका लावून गेलेला पोलिस मित्र!