गेट टुगेदर

‘मला येऊन लवकर भेट, माझ्याकडे फार दिवस नाहीत' असे म्हणणाऱ्या शालिनीला पुढील वर्षी तिच्या मुंबईतील घरी पुन्हा आम्ही भेटलो. त्यापुढील वर्षी माझ्या घरी. जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य असलेल्या शालूने दोन्ही कार्यक्रमाची मजा घेतली. आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याला चार वर्षे झाली, वर्गमित्र भेटल्याने शालूची जीवनाची आसक्ती वाढली, मध्ये छोटे ऑपरेशन झाले, ते तिने सहन केले आणि आता ती वाट पहात आहे, पुढील वर्षाच्या गेट टूगेदरची.

माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरचा कॉल आला, मी असे फोन टाळतो पण का कोण जाणे मी फोन घेतला.

"हॅल्लो, अर्जुनचा नंबर काय?"

कुणीतरी स्त्रीचा आवाज पलीकडे होता.

"होय मी अर्जुन, आपण कोण?"

"अरे अर्जुन, मी शालू.. शालिनी नाईक.. वर्गातली."

"अगो शालू तू? किती दिवसांनी? खय आसत?"

"अरे मी मुलुंडमध्ये रवतंय, तू खय रवत?"

"मी वांद्रा, तुका माजो नंबर कोणी दिलो,?"

"इच्छा आसली म्हणजे मार्ग सापडता म्हणतात, गेली दोन वरसा मी तुजो पत्तो शोधताय, आज नवशक्तीमधी तुजो लेख इलोवा ना छापून, त्याच्या खाली तुजो नंबर होतो'.
बरा बरा, छान वाटला शाळेतल्या सुंदरीचो फोन इलो म्हणून ".

"सुंदरी खयची बाबा, ता सगळा संपला."

"म्हणजे?"

"तुझ्याशी बोलाचा होता, तुझी मदत होयी माका, एकदा ये इकडे, जास्त दिवस नाय माझ्याकडे."

"म्हणजे? काय बोलतस?"

"ये वेळ काढून.. तुका खुप सांगाच आसा. पत्तो पाठ्‌वतय व्हाट्‌सअपवर, मी तसा घरातच आसतंय, तरी हॉस्पिटलमध्ये गेलंय तर म्हणून फोन करून ये".

फोन बंद केला आणि माझ्या डोळ्यासमोर शालू आली, शालिनी नाईक. आम्ही एका वर्गात होतो सातवी ते दहावीपर्यत. तिचे वडील पोस्टमास्टर म्हणून आमच्या गावात बदलून आले, मूळचे ते तिकडे आराेंदा शिरोडा भागातील, शालू आणि तिची लहान बहीण अरुणा. अरुणा शालूपेक्षा दोन वर्षांनी लहान.तिच्या वडिलांनी त्त्यांचे बिऱ्हाड आमच्या वाडीत केले. कारण पोस्ट आमच्याच वाडीत होते, वेळी अवेळी एसटीने टपाल यायचे, पोस्टमन हजर नसला तर शालूचे बाबा स्वतः टपाल उतरवून घ्ोत. आमची शाळा थोडी लांब होती, वाटेत मोठा ओढा होता, पावसाळ्यात त्याला पूर येई. वाटेत जाग पण फारशी नव्हती, त्यामुळे शालू आणि तिची बहीण अरुणा आम्हा मुलासमवेत शाळेत जाईत आणि येईत. शालू हुशार आणि शांत, अरुणा अभ्यासात कच्ची आणि भांडखोर. अरुणा नेहेमी वर्गातल्या मुलामुलींबरोबर भांडणे काढी आणि शालू त्या मिटवी. त्यांच्या आईची शालू जास्त आवडीची होती तर बाबांना अरुणा आवडे.

शालूची आई माझ्याआईकडे नेहेमी येई मग दोघी जोडीने महिला मंडळात जात, सायंकाळी देवळात जात. भाजी आणायला, किराणा आणायला एकदम जात. शालू वर्गात आली आणि तिने माझा पहिला नंबर घेतला आणि मी दुसरा. अरुणा माझ्या बहिणीच्या वर्गात होती, ती कशीबशी पास होतं होती. त्या वयात मला शालू आवडत होती, पण माझे एकतर्फे प्रेम ते. शालू नेहमी आपले आईवडील, अभ्यास आणि धाकटी बहीण या विश्वात असायची. एकदा अकरावीच्या दोन मुलांनी शालूला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी तिने मला त्याची तक्रार सांगितली होती आणि मग आम्ही मित्रांनी त्या मुलांना चोप दिला होता, हे आता आठवले. दहावीनंतर तिच्या बाबांची बदली वेगुर्लेला झाली आणि ती मंडळी इथून गेली. मग फारशा भेटी नाहीतच. तिच्या बाबांनी दोघी मुलींना कॉलेजसाठी सावंतवाडीला ठेवल्याचे कळले.

आज जवळजवळ चाळीस वर्षांनी शालूचा फोन आला, भेटायला ये म्हणून, पण ती आपले थोडेच दिवस राहिले असे का म्हणाली?शनिवारी ऑफिस सुटले की शालूकडे जायचे असे मी ठरवले.शालूने व्हाट्‌सअपवर तिचा पत्ता पाठवला, मी शनिवारी ऑफिस सुटल्यावर तिच्या घरी जायला निघालो. शोधत शोधत तिच्या घरी आलो, बेल वाजवताना छातीत धडधडत होते, चाळीस वर्षे मध्ये गेली, दहावीत असतानाची शालू डोळ्यसमोर येत होती.. शाळेच्या ड्रेसमधली, निळा स्कर्ट.. पांढरा ब्लाउज, पायात सॅन्डल्स.दार उघडलं आणि एका कृश स्त्रीने ये म्हंटलं.

मी आत आलो, लख्ख प्रकाशात मला शालू दिसली.. तिच्याच घरात आलो म्हणून मला समजले ती शालू आहे म्हणूंन.. माझ्यसमोर केस गेलेली, कृश झालेली, चेहेऱ्याची रया गेलेली अंदाजे साठ सत्तर वयाची बाई उभी होती.

"मला ओळखणार नाही तू, आजाराने माझी रया गेली रे."

मी दोन क्षण गप्प झालो, मग हळूच म्हंटले "कसला आजार?"

"माझ्या केमो सुरु आहेत, त्यावरून काय ते ओळख".

"ओहो, सॉरी, केंव्हापासून?"

"सहा वर्षे झाली, ट्रीटमेंट सुरु आहे, चार महिने बरे जातात.. परत सुरु".

"घरी कोणकोण असत तूझ्या?"

"माझे मिस्टर, मुलगा शिप्सवर असतो, सध्या जपानच्या बाजूला आहे, आता तीन महिन्यांनी येईल".
"मग घरी तू एकटीच?"

"केअरटेकर आहे, आता दुपारी जरा घरी गेली, पाच वाजता येईल, नवरा सहा वाजता येतो".

"तुझे आईबाबा, अरुणा?"

"तुला सर्व सांगायचेच आहे, म्हणून मुद्दाम तुझा नंबर मिळताच तुला फोन करून बोलावल"'.

"सांग, मी वेळ काढून आलोय, माझा फोन बंद करतो"

असं म्हणून मी फोन बंद केला, आतमध्ये जाऊन शालूने पाणी आणुन दिले.

शालिनी
    .. खुप दिवसापासून वाटतं होतं.. कुणाशी तरी बोलावं... आपलं मन मोकळं करावं.. मनात साचलेलं, त्याचा निचरा करावा.. अर्जुनची आठवण येत होती.. सातवी ते दहावीपर्यंतचा र्वगमित्र अर्जुन.. त्याच्या शेजारीच आम्ही रहायचो. शाळेत जाताना यशवंत, मनोज, यमुना, सरोज, विलास आम्ही सर्वजण मजा मजा करत जायचो. एकमेकांवर पाणी उडवायचो, जांभळे, करवंदे खायचो. दुपारचा डबा पण एकत्र उघडायचो, त्यात लीडर असायचा अर्जुन. शाळा सुटली मग कॉलेज, पण तसें मित्र मैत्रिणी मिळाल्याच नाहीत.बाबांची वेगुर्लेमध्ये बदली झाली आणि ही मित्रमंडळी भेटायची बंद झाली. मग कॉलेज, नोकरीं आणि लग्न करून मुंबईत. कोकणातल्या मुलींची दिशा ठरलेली असते, त्याचप्रमाणे. अरुणाने मात्र नर्सिंग केल आणि ती जिल्ह्यातच राहिली. तीचं लग्न त्यांच्याच डिपार्टमेंटमधील तिनेच ठरवले आणि दुसऱ्या जातीतील. बाबांना ते पसंत नव्हते, खुप वादविवाद झाले, रडाराडी झाली पण अरुणा ऐकली नाही, त्यामुळे बाबांनी तिचे नाव टाकले. मी लग्न करून मुंबईत आले, सासऱ्यांचे घर माहीममध्ये होते. माझे मोठे दीर आधीच वेगळे बोरिवलीत राहायला गेले होते, ती दोघं नोकरीं करत होती, माझा धाकटा दीर लग्नाचा होता. माझे सासरे कटकटी, फटकलं, त्यामुळे त्यांच्याशी कुणाचे पटायचे नाही, माझी मोठी जाऊपण तोडीस तोड, त्यामुळे दोघं समोरासमोर आली, की तू.. मी.. तू मी व्हायचंच. माझी कंपनी जोगेश्वरीमध्ये, त्यामुळे मला माहीमहुन कंपनीत जाणे बरे पडायचे. मी तोंड मिटून असायची, त्यामुळे सासू सासरे मला बरी म्हणायचे. माझा नवरा केमिकल कंपनीत, त्याच्या शिपट असायच्या. पण तो कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही.. नाकासमोर बघून चालणारा.

पण धाकट्या दिराचे लग्न ठरले आणि आम्हाला जागा शोधावीच लागली, मग मुलुंडच्या या जागेची बातमी समजली आणि दोघांनी कर्ज काढून ही जागा घ्ोतली. मुलुंडला आलो खरे पण मला रोज कंपनीत जाणे त्रासदायक होऊ लागले. मुलुंडहुन दादर आणि दादरहुन दुसरी ट्रेन पकडून कंपनीत जायचे. त्यात कंपनीत माझ्यावर मोठी जबाबदारी. त्यात मला दिवस गेले आणि अभयचा जन्म झाला. माझी खूपच धावपळ, याकाळात माझी आई आणि बाबा माझ्याकडे आले. कारण बाबा निवृत्त झाले होते.आणि माझ्या बहिणीबरोबर त्यानी संपर्क ठेवला नव्हता. या काळात माझा आईने मला मोठी साथ दिली. तिच्या विश्वासावर मी अभयला सोडून नोकरीला जाऊ लागले. अभय मोठा होतं होता, माझे वडील त्याला शाळेत सोडायचे, आणायचे. माझी छोटी जाऊ नोकरीं करणारी, तिचे आणि सासूबाईचे एक मिनिट पटेना. सास़ऱ्यांंचे कुणाशीच पटत नव्हतेच. मोठया दिराने आणि जाऊने आधीच हात वर केलेले. त्यामुळे माझी सासूसासरे माझ्याकडे येऊन राहिले.आता छोटया घरात चार ज्येष्ठ माणसे. लहान मुलगा. नवऱ्याच्या शिपट्‌स. माझी  लांब नोकरीं. माझे खुप हाल होत होते, माझ्या सासऱ्यांना रोज मासे हवे असायचे तर माझे बाबा शाकाहारी जेवणारे. सासूबाई देव देव करणारी; तर आईला त्यात रुची नव्हती.
चार वेगळ्या स्वभावाची माणसे एका घरात राहत होती, मी रात्री आले की प्रत्येकाची एकमेकांची तक्रार. माझ्या नवऱ्याने आपल्या भावांना आईवडिलांना काही काळ तरी न्यायला सांगितले; पण ते दुर्लक्ष करत होते. शिवाय माझे सासरेपण त्यांच्याकडे जायला तयार नव्हते.  नंतर तर माझ्या अडचणी वाढल्या. सासऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यानी बेड पकडला. त्यांच्या सुश्रुशेसाठी एक माणूस घरी येऊ लागला. त्यांचे सर्व जाग्यावर असल्याने घरात दुर्गंधी पसारायची त्यामुळे माझे आईवडील चिडायचे. यात भरीस भर म्हणून आईचा दमा वाढू लागला. वडिलांना हार्ट अटॅक आला, हॉलमध्ये दोन बेड वर दोन पेशन्ट. सासूचे गुढगे दुखत होतेच. माझ्या सुट्टीच्या दिवशी मी कुणाला न कुणाला हॉस्पिटलमध्ये नेत होते, आणत होते. या सर्व परिस्थितीत माझ्या मुलाचं शिक्षण सुरु होतं. यात भरीस भर म्हणून माझ्या नवऱ्यानी कंपनी बंद पडली. नवरा घरी, पण त्याला पहिल्यापासून घरचे काही करायची सवय नव्हती. आता सांगितले तर चिडचिड होतं होती.

त्या काळात मी पहाटे चार वाजता उठत होते, आई चिरून कातून द्यायची.. मग मुलाचा डबा.. मग घरचे जेवणं.. पाणी दूध तापवणे.. सकाळची न्याहारी करणे.. चहा. सारे करून आणि डबा घेऊन मी आठला बाहेर पडायचे.. मग गाडीची गर्दी.. दादरला जिने चढून पश्चिम रेल्वेला धावत जायचे, तिथे परत रेल्वे.. पुन्हा बस पकडून कंपनी.. तिथली रोजची टेन्शन. सायंकाळी पुन्हा उलट प्रवास.. मुंबईची मोठी गर्दी. त्यात नवऱ्याची कंपनी बंद.. म्हणजे नोकरीं सोडू शकत नाही. सायंकाळी मुलाचा अभ्यास. आई बाबांना औषधे देणे. रात्रीचे जेवणं.. शाकाहारी मावसाहारी.. रात्री पाठ टेकायला बारा वाजत, परत पहाटे चारचा गजर. मग पुढील काही वर्षात कोण ना कोण आजारी, जास्त आजारी.. सिरिअस.. हॉस्पिटल.. नर्सिंग सुरु झाले. मग सासरे गेले. मग वडील गेले. आई गेली, सासूबाई गेल्या. दरम्यान नवऱ्याला दुसऱ्या कंपनीत नोकरीं मिळाली. मुलगा बारावीनंतर मरीन इंजिनीरिंगला गेला. आता मला थोडी शांतता मिळेल असे वाटतं असताना, अचानक या आजाराने गाठले. मग तपासण्या, सोनोग्राफी, एमआरआय, केमो.. न संपणारी साखळी. एकदा बरा होतोय आजार म्हणता म्हणता पुन्हा त्याने गाठलेच. मी नोकरीं सोडली, रजा तरी किती घेणार? नवऱ्याची नोकरीं आहे.. मुलगा नोकरीला लागला. आता पैशाची ओढाताण्ड नाही; पण माझे स्वास्थ्य?

आता दिवस दिवस मी घरात एकटी, बाई येऊन फरशी पुसून, भांडी घासून जायची.. मग मात्र मी एकटी. मग सगळ्या आठवणी पिंगा घालायच्या. आयुष्यात सुख मिळालेच नाही.. फक्त धावपळ.. मुंबई नावाच्या मगरीच्या तोंडात सापडले.. स्वतःच्या मुलाकडे लक्ष देता आले नाही. आयुष्यात ॲडजस्ट करण्याचा स्वभाव, कुणाला न दुखावण्याचा स्वभाव.. त्याचा इतरांनी फायदा घेतला.. दोन्ही दिरानी, जाऊंनी आपल्या आईवडिलांना माझ्याच संसारात ठेवलं आपण मस्त वेगळा संसार, ट्रिप्स, नाटक सिनेमे केले. माझी बहीणपण नशीबवान, तिने लग्न केले आणि आईवडिलांना ती विसरली, आपल्या हौसमजा करत राहिली. दुर्दैवी मीच..आता थोडी उसंत यावी तर हा जीवघेणा घाणेरडा आजार.. आयुष्याच्या अंताकडे नेणारा..यात आनंद मिळाला तो शालेय जीवनात.. त्या शाळेची.. त्या बालमित्रांची हल्ली वारंवार आठवण होते.. अर्जुन, यशवंत, यमुना, चित्रा, मनोज. कुठे असतील हे सर्व? ती वर्षे खुप आनंदाची होती, किती मजा केली या सर्वाबरोबर.. शाळेत जाताना..पुराच्या पाण्यात एकमेकांचे हात पकडून पलीकडे जाताना.. बोडू, करवंदे, जांभळे खाताना.. एकमेकांचे डबे उघडून खाताना..ते प्रेम, तो जिव्हाळा परत मिळालाच नाही. या सर्वाना आयुष्याच्या या टप्प्यावर भेटावेसे वाटते.. आपले आयुष्य फार थोडे राहिले आहे.. या सर्वाना एकदा भेटावेसे वाटते.. एकदाच.. एकदाच.  असे विचार मनात येत असताना अर्जुन काल तुझा लेख पेपरमध्ये पाहिला, त्याखाली तुझा फोन होता, त्या फोन वर तुला फोन केला आणि आज तू आलास.

शालिनी उठून आत गेली आणि तिचा भूतकाळ ऐकून मला वाईट वाटले. चांगल्या स्वभावाचा लोक फायदा घेतात तो असा. सर्वांनीच तिचा फायदा घेतला. शालूने आत जाऊन चहा आणला. एक कप माझ्या हातात दिला, एक कप आपण घेतला.

मी - मग तुझी बहीण अरुणा, ती कधी चौकशी करत नाही?

शालू - मघापासून मी माझ्या घरच्या गोष्टी सांगत बसले अजून माहेरच्या गोष्टी तुला ऐकायच्या आहेत.

मी - माहेरच्या गोष्टी? तूझ्या माहेरी म्हणजे तुझी बहीण अरुणा..

शालू - होय, अरुणाने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न जमवले म्हणून बाबांनी तिच्याशी संबंध तोडले हे मी तुला सांगितलं पण अरुणाला माझ्या सर्व गोष्टी कळत होत्या. बाबा गेले, मग आई गेली हे तिला कळले. गेली दोन वर्षे ती आईचे दागिने मागते आहे.

मी - काय? आईचे दागिने?

शालू -माझ्या या व्हाट्‌सअपवरील तिचे मेसेज वाच म्हणजे तुला खरे वाटेल.

शालूने अरुणा या नावाचा व्हाट्‌सअप उघडून माझ्या हातात मोबाईल दिला. मी नजर टाकली, अरुणाने खालच्या भाषेत दागिन्याची मागणी केली होती. मी वाचून तिच्या हातात मोबाईल दिला.

मी - मग? तू काय ठरवलेस?

शालू -अर्जुन, मला दागिन्याचा मोह नाही.. खरंतर आईने हे दागिने आमच्या गावच्या काकांच्या मुलाच्या लग्नात त्याच्या बायकोच्या अंगावर घालायला सांगितले होते. म्हणून मी जपून ठेवलेत.. पण आता मी ठरवलंय, अरुणाला हे दागिने देऊन टाकायचे.. पण मी तिला बोलावून तिची आईवडिलांची जबाबदारी तिने पार पडलेली नाही, हे सुनावणार आहे आणि मगच हे तिला देईन.

अर्जुन, मी निराश झाले आहे. सर्व जवळच्या माणसानी मला निराश केले आहे. यावेळी मला आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणीची आठवण येते आहे. माझे आयुष्य कमी आहे, कदाचित सहा महिने किंवा जास्तीत जास्त वर्ष.. अर्जुन, मला आपल्या वर्गातील मित्रांना भेटायचं आहे..याकरिता तुला शोधत होते. सुदैवाने तुझा नंबर मिळाला, तू इतरांना शोधून काढ आणि आपण एकदा भेटू.. कदाचित ही शेवटची.

मी - हा, शालू पुढे बोलू नको.

आपण शक्य होतील तेव्हढे भेटू.. लवकरच. मी येतो, तुला कळवितो. मी बाहेर पडलो.

मी शालूच्या घरातून बाहेर पडलो, आता मला वर्गातील इतर सवंगड्यांचा शोध घ्यायचा होता. मनोजचा फोन माझ्याकडे होता, मी त्याला फोन लावला आणि त्याचेकडे अजून कुणाचे नंबर आहेत का आणि जास्तीत जास्त मंडळींना जमवायचा प्रयत्न कर असे सांगितले. यमुना आणि चित्रा गावात रहात होत्या, मी माझ्या पुतण्याला सांगून त्यांचे नंबर मिळविले, त्यानी आणखी चार नंबर दिले. म्हणता म्हणता आठ दिवसात वर्गातील पंधरा वर्गमित्रांचे नंबर मिळाले आणि मी व्हाट्‌सअप ग्रुप तयार केला. शालूपण व्हाट्‌सअपवर होतीच, पंधरा सोळा शाळासोबती खुप दिवसांनी भेटत होते, मग काय चेष्टा मस्करी यांनी उत आणला. शालू यात हिरीरीने भाग घेत होती, हे मी पहात होतोच. शाळेत असताना तिच्या मैत्रिणी तिला ‘डोंगळो' म्हणायच्या, डोंगळो म्हणजे मोठी काळी मुंगी, ती साखर दिसली की धावते, शालूला साखर आवडायची, तिच्या डब्यात रोज साखर असायची आणि ती आवडीने खायची.

यमुनेने तिला ‘काय डोंगळ्या? कसा आसास? असे विचारले आणि सर्वजणं तिला ‘डोंगळो' म्हणू लागल्या. शालूला ते आवडायचे. मी जास्तीत जास्त वर्गमित्र मैत्रिणी एकत्र करण्याच्या प्रयत्नात होतो.. आता मला गेटटूगेदर जमवायचे होते, दिवस थोडे होते, डॉक्टरनी शालूला जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य दिले होते. आपल्या शाळेत पुन्हा मुलांनी जमावे असे मला वाटतं होते, मी शालूला तुला प्रवास जमेल का असे विचारले. तिची इच्छा होती, एकदा शाळा, आपला वर्ग डोळे भरून पहाण्याची. मी आम्हांला शिकविलेल्या शिक्षकांचा शोध घेतला, त्यातील वझे बाई, सामंत बाई, प्रभू सर, वालावलकरबाई येऊ शकत होत्या.

   मग २६ जानेवारी हा दिवस ठरविला. शाळेतील सर्व व्यवस्था यमुना, चित्रा, मनोज सांभाळणार होते. मी २४ जानेवारीला चांगली इनोव्हा गाडीत शालू, तिचे यजमान, मी, माझी पत्नी निघालो. चार तासाने थांबत थांबत रात्री माझ्या गावच्या घरी पोहोचलो. घरी सर्व तयारी होतीच. जवळजवळ चाळीस वर्षांनी शालू या गावात आणि माझ्या घरी येत होती. या परिसरात तिचे लहानपण गेले होते, ती खूश झाली. तिला रात्री छान झोप लागली.

     दुसऱ्या दिवशी शाळेत तीस र्वगमित्र मैत्रीणी जमले होते. कितीतरी वर्षांनी एकमेकाला भेटत होती. सर्वांनी शालूची म्हणजे  ‘डोंगळो'ची खुप काळजी घेतली. माझे लक्ष शालूकडे होते, पण ती मजेत होती..हसत होती.. खिदळत होती..मस्करी करत होती. मग एक एक शिक्षक वर्गात आले. वालावलकरबाईंनी कविता शिकवायला सुरवात केली.
‘खबरदार  जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एव्हड्या'.

बाईच्या डोळ्यात पाणी होते, चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या, आम्ही सर्व सदगदित झालो. माझे शालूकडे लक्ष होते, ती पण डोळे पुसत होती.

मग वझे बाई आल्या. संस्कृत शिकवायला लागल्या  ‘हसतास्य भूषण दानम, सत्य कंठस्य भूषणम'....सर्वाना आठवणी.. डोळे पाणावलेले.कंठ दाटलेले..दुपारी सर्वाना जेवणं, मग करमणूकीचे कार्यक्रम.. यमुनाने आणि चित्राने ‘मुंगळा.. मुंगळा' या गाण्याच्या चालीवर ‘डोंगळा..डोंगळा' म्हणत जोरात नाच केला आणि शालूला हस हस हसवले. सायंकाळी निघताना मी जाहीर केले, ‘आता पुढील भेट पुढील जानेवारीत, शालूच्या मुंबईतील घरी. तेंव्हा या भागातील मंडळींनी मुंबईत यायचे.' शालू कावरीबावरी होऊन माझ्याकडे पहात होती आणि हाताने ‘नाही.. नाही' म्हणत होती, माझ्या लक्षात आले, पुढील जानेवारीत मी नसेन, असे तिला सांगायचे होते, पण मी हातानेच तिला गप्प केले. दुसऱ्या दिवशी आम्ही शालूच्या चुलत भावाला भेटलो, आईच्या दागिन्यातील अर्धे दागिने तिने भावाला दिले, मग कणकवलीजवळ अरुणाला भेटलो आणि आईचे निम्मे दागिने तिला दिले.

पुढील वर्षी शालूच्या मुंबईतील घरी पुन्हा आम्ही भेटलो. पुढील वर्षी माझ्या घरी. जास्तीत जास्त एक वर्षाचे आयुष्य असलेल्या शालूने दोन्ही कार्यक्रमाची मजा घेतली. आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याला चार वर्षे झाली, वर्गमित्र भेटल्याने शालूची जीवनाची आसक्ती वाढली, मध्ये छोटे ऑपरेशन झाले, ते तिने सहन केले आणि आता ती वाट पहात आहे, पुढील वर्षाच्या गेट टूगेदरची.  - प्रदीप केळुस्कर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

श्रावण : सृजनाचा अनोखा आविष्कार