महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
७/११ चा बॉम्बस्फोट केला तरी कुणी ?
११ जुलै २००६ या दिवशी मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन्समध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी पकडल्या गेलेल्या आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या निर्दोष सुटकेमुळे साऱ्या देशाला चक्रावून सोडले आहे. बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलिसांनी तपास करून १२ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबाच्या आधारावर सत्र न्यायालयाने १२ आरोपींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली तर अन्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
ज्या पुराव्याच्या आधारावर सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती तो पुरावाच उच्च न्यायालयाने अस्वीकार्य ठरवल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे जनमानसांत संतापाची लाट उसळली आहे. ११ जुलै २००६ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेमार्गावरील वांद्रे ते भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान सायंकाळी ६.२४ ते ६.३५ या ११ मिनिटांच्या काळात एकामागोमाग एक असे ७ लोकल गाड्यांमध्ये भीषण स्फोट झाले. १९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रमाणे या स्फोटांसाठीही आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. हे स्फोट इतके भीषण होते की रेल्वे डब्यांच्या चिंधड्या झाल्या. १८९ निष्पाप नागरिकांचा यामध्ये बळी गेला तर ८०० हुन अधिक घायाळ झाले होते. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेक जण पोरके झाले; तर कितीतरी जण आयुष्यभरासाठी कायमचे जायबंदी झाले. ज्यांनी आपल्या घरातील माणूस गमावला त्यांची उणीव भरून येणारी नसली तरी सत्र न्यालयालयाच्या निकालाने त्यांना दिलासा नक्कीच मिळाला होता. आता मात्र उच्च न्यायालयाने सर्वच आरोपींना निर्दोष सोडल्याने दोष द्यायचा तरी कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमच्यावर टाकलेली जबाबदारी आम्ही पार पाडली, आरोपींचा विरोधात सरकारी पक्ष एकही आरोप सिद्ध करू शकला नाही, अशी टिपणी या निकालानंतर न्यायमूर्तींनी दिली आहे, यावरून आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्र न्यायालयाने दिलेला निकाल उच्च न्यायालय खोटा ठरवते तर कोणाचा निकाल खरा समजावा? देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या अत्यंत महत्वाच्या गुन्ह्याच्या बाबतीत पोलिसांनी त्यावेळी तपासात उणीव सोडली का? पुरावे गहाळ करण्यात आले का? त्यावेळी पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? यामध्ये तत्कालीन सत्ताधारी पक्षावर कोणाचा दबाव होता का? तपासात त्रुटी ठेवणाऱ्या तपास अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार का ? आरोपी जर निर्दोष आहेत तर बॉम्बस्फोट तरी कोणी केले ? बॉम्बस्फोटात ज्यांचे नाहक बळी गेले त्यांच्या प्राणांना काहीच मोल नाही का? बळी गेलेल्यांच्या नातेवाइकांना न्याय केव्हा मिळणार? की त्यांनी आयुष्यभर न्यायाची वाट पहात जीवन कंठायचे? पैशाने न्याय विकत घेता येतो, न्यायाचा आवाज दाबता येतो असे चित्रपटांतून पाहिले होते, कथांतून वाचले होते. इथे तर दहशतवादी कृत्याच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान दिले गेले होते आणि हे आव्हान तर आपल्याला पेलता नाहीच आले; उलट आपल्याच नागरिकांना न्याय देण्यात आपण अपयशी ठरलो. सबळ पुरावे नाहीत म्हणून उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडले आहे; मात्र न्यायालयाचे याआधीचे निकाल पाहता निर्दोष सोडलेले अनेक आरोपी पुन्हा तशाच प्रकारच्या आरोपांमध्ये पकडले गेलेले आहेत. या निकालातून न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या आरोपींच्या बाबतीतही असेच काही घडले तर ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते किती घातक ठरू शकते याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. - जगन घाणेकर