ऐटदार श्रावण

वर्षातल्या बारा महिन्यांपैकी श्रावणाचा  रुबाबच वेगळा, त्याची तयारीसुध्दा तितकीच दमदार, जोरदार करावी लागते. दिव्यांची अवस झाली की दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारा श्रावणमास हा सणवार व्रतवैकल्य यांची रेलचेल असणारा. मनुष्याच्या विविधतेची उर्मी पुरेपूर करणारा हा मास .सृष्टीतील मांगल्याचा पावित्र्याचा ठसा मनावर ठसावा , ईश्वरभाव जागा व्हावा असा हा मास.

आषाढी अमावस्येचे दिपपूजन म्हणजे जणू श्रावणाच्या स्वागताची मंगलदिपाने केलेली मंगलारतीच !  त्यानंतर सुरू होतात नैमित्तिक वारांची व्रत,पूजा. अहो इथे प्रत्येक वाराला महत्व श्रावणी सोमवार,मंगळवारी मंगळागौर, बुधवार बृहस्पतीचा, शुक्रवार जिवतीचा आणि महालक्ष्मीचा, शनिवार मारुती रायचा आणि संपत शनिवार.

या व्यतिरक्त नारळीपौर्णीमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोकुळाष्टमी गोपाळकाला. श्रावणातल्या सत्यनारायणाच्या पूजेचे महत्वही विशेष बर का ! कित्येक घरात श्रावणातल्या शनिवारी सत्यनारायणाची पूजा केली जाते.

असो! या प्रत्येक वारांच्या कहाण्या आहेत.कहाणी हा लोकवाडःमयाचा एक प्रकार. धार्मिक भावनेवर आधारलेली लोककथा म्हणजेच कहाणी ! थोडक्यात वृतवैकल्यांच्या निमित्ताने सांगितली जाणारी गोष्ट.त्याचे प्रकारही अनेकविध. आता सोमवारचीच बघा ह ! एक साधी, एक खुलभर दुधाची, एक शिवामुठीची, एक फसकीची आणि परत एक सोमवारची एकूण ५  कहाण्या. नागपंचमीच्या सुध्दा २ कहाण्या आहेत , मंगळागौरीची, शुक्रवारी जिवतीची आणि देवीची एकूण २ शनिवार २ मारुतीची आणि संपत शनिवारची.
गोपद्ममांपासून सुरू झालेल्या कहाण्या दिव्यांची अवस, आदित्यराणुबाई, वर्णसठी, शिळासप्तमी, बुधबृहस्पती, पिठोरी, हरितालिका, ऋषिपंचमी, ज्येष्ठागौरी अगदी पुढे ललितापंचमी, महालक्ष्मी, वसुबारस, सोळासोमवार ते बोडणांपर्यंत चालत असत  आणि या सगळ्या कहाण्या लहानपणी मी मोठ्याई (म्हणजे माझ्या वडिलांची आई. माझी आज्जी ) जवळ बसून वाचत असे. खर तर तीने या सगळ्याची गोडी लावली आणि म्हणूनच व्रतवैकल्ये, सणवार हौसेने निगुतीने मी करू लागले. पुढे ती गोडी माझ्या लेकीलाही लागली आणि आता तिसरी पिढी माझी नात तिला सुध्दा हे सगळे आवडते. दिव्यांच्या अवसेला विचारत होती आज्जी आज एवढे दिवे का लावलेत? मग तिला समजेल उमजेल असे सर्व मी तिला गोष्टरुपात सांगण्याचा प्रयत्न करते. जीवतीच्या फोटोत नृसिंंहाचा फोटो बघून विचारत होती आज्जी हा बाप्पा एवढा रागावलाय का? तो चिडचिडा आहे का ? असे अनेक बालसुलभ प्रश्न आम्हाला पडत असतात. त्याचे निरसन अतिशय विचारपूर्वक करावे लागते.

असो ! तसे पाहिले तर आठवड्याचे सात वार नित्याचेच; पण श्रावणाच्या नजरेतून पाहिले तर मात्र ते सप्तरंगी होवून नवचैतन्य आणतात. आपल्या पूर्वजांनी कालानुरूप ज्या प्रथा सुरू केल्या, त्यामागे काही सर्वसमावेशक विधायक विचार निश्चित असणार. कौटुंबिक स्वरुपाचे हे सर्व सणवार असल्यामुळे सर्व कुटुंबाला त्यानिमित्ताने एका रंगात रंगविण्याची किमया त्यात आहे .आणि म्हणूनच श्रावणाची ऐटच न्यारी आहे. - सौ. नुपुर विश्वजित अष्टपुत्रे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शूर सैनिकांच्या बलिदानाच्या तुलनेत आपण कुठे आहोत? (२६ जुलै - कारगिल विजय दिवस विशेष )