जादूची दौलत..

बऱ्याच दिवसांची असलेली सुप्त इच्छा मनाने माझ्याकडून पूर्ण करून घेतली अन्‌ मी काउंटरवर जाऊन विचारलं तर त्यांनी १५ टक्के डिस्काउंट जाऊन ५५२ रुपये किंमत सांगितली. हजार रुपयांच्या वर जर खरेदी केली तर डिस्काउंट २० टक्के मिळेल असंही समजलं. म्हणून अजून दोन चांगली पुस्तकं घेऊ म्हणजे मनालापण बरं वाटेल आणि महिनाभर तरी वाचायला मेंदूला खुराक मिळेल. म्हणून सध्याच्या जागतिक स्तरावरील सर्वच सोशल मीडियाचे मालक मार्क झुकरबर्ग आणि डॉ.केशव बळीराम हेडगेवार साहेब अशी तीन जणांची चरित्रे घेऊन मी घरी येण्यासाठी मोटरसायकलवर बसलो.

 साधारणतः दोन अडीच वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी नगरच्या बळवंत वाचनालयात मी माझी पत्नी सुवर्णाला सोबत घेऊन गेलो. आतमध्ये प्रवेश केल्यावर भारतीय व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्यानुसार मी माझी आणि ती तिची स्वतंत्रपणे पुस्तके बघू लागलो. प्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, कविता, ललित ग्रंथ, अनुवादित अशी वेगवेगळी मांडलेली पुस्तके चाळू लागलो. तिने थोड्या वेळात बराच मोठा चक्कर मारून माझ्यापाशी आली तरी मी आत्मचरित्र या एकाच ठिकाणी लावलेल्या मांडणीजवळ रेंगाळलो होतो. किती वेळापासून आपला नवरा एकाच ठिकाणी टाइमपास करतोय असं तिला नवल वाटलं अन्‌ मला म्हणाली, "घ्यायचंय का ते पुस्तक तुम्हाला? का उगाच चाळताय?” मी माझ्या गुंगीत असल्यानं तिच्याशी काही न बोलता मागच्या पानावर ६५० रुपये किंमत पाहून माझी थोडी हिंमत खचली अन्‌ ते पुस्तक आहे त्या जागी ठेवत तिला म्हणलो, "घ्यायचंय; पण थोडं वेळ आल्यावर बघू” तेव्हा मी नवरा बायको काहीही न घेता तसंच घरी आलो. मनाला मात्र काहीही न घेता परत आलो त्याची रुखरुख लागून होती!

  मध्ये साधारण माझ्या तिन्ही पुस्तकांच्या लिखाणात मी दोन वर्षांपासून व्यस्त होतो पण पुढे लेखक म्हणून या जगात नवा जन्म घेतल्यावर औरंगपुरातलं बळवंत वाचनालय आणि तिथलं ग्रंथदालन यांचा आणि माझा सतत संपर्क वाढतच गेला. प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा तिथं जात होतो तेव्हा तेव्हा मला त्या पुस्तकाशी स्पर्श करावा असं आतून वाटायचं! आड यायच्या त्या दोन गोष्टी! पहिली त्याची ६५० रुपये किंमत आणि दुसरी म्हणजे त्याला लावलेलं प्लास्टिकचं कव्हर..! किंमत बाहेरून प्लास्टिकच्या पारदर्शकतेमुळे दिसायची पण आतमध्ये कसं काय लिहिलेलं असेल अशी सतत उत्सुकता वाटायची! मनात असं यायचं, ‘कमीत कमी प्लास्टिकने बंदिस्त न केलेलं पुस्तक ठेवायला काय झालं होतं यांना, निदान चित्रतरी पाहून समाधानी झालो असतो पण नाही. माझ्या मनावर जादू केलेलं ते पुस्तक होतं शरद पवार साहेबांची आत्मकथा ‘लोक माझे सांगाती!!'

साध्या माणसाच्या खिशाला परवडणारी पुस्तकं असली म्हणजे तो लगेच कशाचाही विचार न करता खिशात हात घालतो.  किंमतीचा हा प्रश्न माझ्या एकट्या वाचकाचा नाहीतर सर्वांनाच बऱ्यापैकी भेडसावतो. ग्राहक म्हणून पुस्तकं घेताना बऱ्याच जणांची द्विधा मनस्थिती फक्त किंमत बघून होताना मी स्वतः पाहिलंय.

दुसऱ्यांचं काय सांगायचं? मी स्वतः वर्ग दोनचा कृषी अधिकारी असूनही शरद पवार साहेबांची ही आत्मकथा ‘घेऊ का नको?' असा वारंवार विचार करीत मी बरेच दिवस चालढकल केली; परंतु सध्या लिखाणाला बऱ्यापैकी ब्रेक दिल्याने आज मुद्दामहून मी बळवंत वाचनालयातून चांगली दोन-चार पुस्तकं खरेदी करूनच माघारी फिरणार या उद्देशाने मी १२ जुलै २०२५ आतमध्ये पाऊल टाकलं! पहिलं गेल्या गेल्या मनावर जादू केलेलं शरद पवार साहेबांचं ‘लोक माझे सांगाती - राजकीय आत्मकथा' पहिलं ताब्यात घेतलं! तिथंच उचकून बघावं की काय! परंतु मनाला थोडा आवर घातला. बऱ्याच दिवसांची असलेली सुप्त इच्छा मनाने माझ्याकडून पूर्ण करून घेतली अन्‌ मी काउंटरवर जाऊन विचारलं तर त्यांनी १५ टक्के डिस्काउंट जाऊन ५५२ रुपये किंमत सांगितली. हजार रुपयांच्या वर जर खरेदी केली तर डिस्काउंट २० टक्के मिळेल असंही समजलं. म्हणून अजून दोन चांगली पुस्तकं घेऊ म्हणजे मनालापण बरं वाटेल आणि महिनाभर तरी वाचायला मेंदूला खुराक मिळेल. म्हणून सध्याच्या जागतिक स्तरावरील सर्वच सोशल मीडियाचे मालक मार्क झुकरबर्ग आणि डॉ.केशव बळीराम हेडगेवार साहेब अशी तीन जणांची चरित्रे घेऊन मी घरी येण्यासाठी मोटरसायकलवर बसलो.

जाता जाता मनाला आनंद देणाऱ्या अनेक घटना समोर आल्या. त्यात पुस्तकांवर मिळालेली २० टक्के सवलत, शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा नेता आणि सर्वसामान्य घरातून उच्चपदस्थ पोहोचलेले शरदचंद्र पवार साहेब, जगातील सर्वांवर सोशल मीडियाद्वारे अधिराज्य गाजवणारा मार्क झुकरबर्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे अवघ्या भारतभूमीला शिस्त लागेल असे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले व त्या संघाची स्थापना केली असे डॉ. केशव बळीराम हेडगेवार या तिघांची पुस्तके अशी खूप मोठी जादूची दौलत घेऊन मी घरात पाऊल टाकलं.

घरात आल्या आल्या पुस्तकं समोरच टेबलावर ठेवलेली बायकोने बघितली. लगेच ती कुतूहलाने बघत तिला मागचा प्रसंग आठवला आणि ती शरद पवारांचं मुखपृष्ठ असलेल्या पुस्तक हातात घेत म्हणाली, "तेव्हा तर हे पुस्तक नुसतं बघत होते? घ्यायचं नाव नाही अन्‌ आज कसं काय आणलं?” तिचंही एकदम बरोबर होतं; परंतु मी मनोमन म्हणालो,  
"आज खरं वेळ आलीय अन्‌ मीही लेखनातून वाचायला मोकळा आहे म्हणून.”  गेल्या चार-पाच वर्षांपासून कृषी खात्याचं कामकाज करताना जसा वेळ मिळेल तसा माझं मी लिखाण सुरू ठेवलं. पहिलं ‘तडजोड' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक सकाळनेच जानेवारी २४ ला प्रकाशित केलं. दुसऱ्याच वर्षी एप्रिल २५ मध्ये ‘खटपट' हे आत्मचरित्रात्मक दुसरं तर ‘दागिना' कथासंग्रह तिसरा अशी सलग सकाळ प्रकाशनेच पुस्तके प्रकाशित केल्यावर मीही सर्वच पुस्तकांतून मराठी वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला! मला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल; परंतु लेखणीने मला भरपूर उंच नेलं! प्रसिद्धी आणि पुस्तके यांचा ताळमेळ घालताना मला ‘लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथने खूपच भुरळ घातली आणि ते मी आनंदाने ते वाचू लागलो.. - निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, ता.गंगापूर, संभाजीनगर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

७/११ चा बॉम्बस्फोट केला तरी कुणी ?