प्रिय पावसा

माणसाचं संपूर्ण जीवन हे पाण्यावर अवलंबून असतं आणि तू तर मुख्य ‘वॉटर सप्लायर'! तू दिलेलं पाणी निगुतीनं वर्षभर वापरायचं नि तू येण्याची वाट पाहत बसायचं. पण हल्ली काय झालंय, कुणाला कसलाच धरबंध राहिला नाही. तुझ्या पाण्याचा वापरापेक्षा गैरवापरच जास्त व्हायला लागला. एवढंच नाही; तर तू आला नाहीस तरी आम्ही कृत्रिम पाऊस पाडू शकतो असं म्हणत निसर्गाच्या पुढे एक पाऊल जायला लागला. पण त्याला हे कुठे माहीत आहे की, तू चकटफू मध्ये एवढं पाणी देतोस नि त्यांना थोड्याशा पाण्यासाठी करोडो रुपये खर्चून ते पाडावं लागतंय.

   हो, प्रियच ! कारण तू कसाही वागलास तरी मला तू प्रियच होतास, प्रियच आहेस आणि प्रियच राहशील. कारण आपली दोस्तीच तशी आहे. तू जरासा चुकीचा वागलास तर काय लगेच अप्रिय होणार कां? माझं हे पत्र दुसरं कुणी वाचलं ना तर लोक मला अगदी   वेड्यातच  काढतील. पण खरं सांगू, आजकाल तुझं वागणं पाहून लोकांना असं वाटलं तर त्यात काही नवल नाही. मला आठवतंय... अगदी लहानपणी म्हणजे मी शाळेत सुद्धा जायला लागलो नव्हतो. तेव्हा तू आलास की, घरातून बाहेर पळायचं. भिज भिज भिजायचं आणि घरात आल्यावर आईचे चार धपाटेही खायचो. पण लगेच तीच माऊली जवळ घेऊन पदराने ओलं डोकं पुसायची नि खायला काहीतरी द्यायची. तोपर्यंत तू मात्र अलगद निघून जायचास.

       बाबा तर काय, कागदाच्या निरनिराळ्या आकाराच्या  होड्या बनवायचे आणि त्या पाण्यात सोडायला पिटाळायचे. मला मज्जा वाटायची पण आई बाबांचं त्यावरुन एकमेकांवर रागावणं चालू असायचं. बोलबोलता मी पाच वर्षांचा झालो नि आमची वरात शाळेत पोहोचली. तेव्हाही तू सोबत होतासच.सात जूनला न चुकता तू यायचास नि नंतर शाळा सुरू व्हायच्या. तेव्हा काही कळत नव्हतं की, ‘परफेक्शनिस्ट' म्हणजे काय. पण आता माझी नातवंडही त्याचा अर्थ सांगतात...इंग्लिश मिडियमला आहेत ना! सात जून तू कधी चुकवलीसच नाही. त्यानंतर हळूहळू एकेक इयत्ता पुढे गेलो आणि गुरुजींनी शिकवलेलं खरं व्हायचं. वर्षाचे तीन ऋतू...पावसाळा, हिवाळा नि उन्हाळा. शहाण्या मुलासारखे अगदी वेळेवर यायचे नि वेळेवर जायचे.  एकमेकांच्या वेळेमध्ये कधी ‘घुसखोरी' नाही केली कुणी. असं खूप वर्ष चाललं होतं म्हणजे माझ्या जन्माच्या कितीतरी वर्ष आधी आणि नंतरही !

          जसाजसा मी मोठा होत गेलो तसं आजुबाजुचं सर्व बदलत चाललं होतं. झाडं लावण्याचे जेवढे कार्यक्रम व्हायचे तेवढीच, किंबहुना त्यापेक्षा जास्तच झाडं तोडली जायची. आजुबाजूची घरं मोठी होत गेली. इमारती बांधल्या गेल्या. रस्ते सिमेंटचे झाले. नवीन सुखसोयी निर्माण करण्यासाठी निसग्रााविरुद्ध वागणं सुरु झालं. समुद्र मागे हटवून ती जागा सुद्धा माणसाला हवीशी व्हायला लागली. या सा-याचा परिणाम झाला तो पर्यावरण नि ऋतुचक्रावर. थंडीत उन्हाळा जाणवू लागला तर भर उन्हाळ्यात तुझं आगमन व्हायला लागलं. सगळं गणितच बदलून गेलं आणि तुझ्या वाट्याचे चार महिने सोडून तू वर्षभरातले कोणतेही दिवस वापरायला लागलास.

        मित्रा, अरे, कसं असतं ना, आपल्या मुलाची दंगामस्ती कौतुकाने पाहिली जाते, पण दुस-याच्या मुलाने तसं केलं तर त्याला नावं ठेवायला लगेच तयार ! तुझंही नेमकं तसंच झालंय. खरंतर यात तुझी काहीच चूक नसूनही ‘पापाचा धनी' मात्र तू ठरलास. ‘परफेक्शनिस्ट' म्हणून नावाजलेला तू लोकांच्या रोषाला कारणीभूत व्हायला लागलास. माणसाचं संपूर्ण जीवन हे पाण्यावर अवलंबून असतं आणि तू तर मुख्य ‘वॉटर सप्लायर'! तू दिलेलं पाणी निगुतीनं वर्षभर वापरायचं नि तू येण्याची वाट पाहत बसायचं. पण हल्ली काय झालंय, कुणाला कसलाच धरबंध राहिला नाही. तुझ्या पाण्याचा वापरापेक्षा गैरवापरच जास्त व्हायला लागला. एवढंच नाही; तर तू आला नाहीस तरी आम्ही कृत्रिम पाऊस पाडू शकतो असं म्हणत निसर्गाच्या पुढे एक पाऊल जायला लागला. पण त्याला हे कुठे माहीत आहे की, तू चकटफू मध्ये एवढं पाणी देतोस नि त्यांना थोड्याशा पाण्यासाठी करोडो रुपये खर्चून ते पाडावं लागतंय. असो !

         मानवाची प्रगती होणं हे केव्हाही चांगलंच असलं तरी निसर्गावर मात करणं त्याला कधी जमलं नाही आणि जमणारही नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तर पुन्हा एकदा असो ! पण मित्रा, मलाही कधीकधी तुझा राग येतो हं ! कारण जो चुकतो त्याला शिक्षा मिळणं एकदम मान्य; पण त्याबरोबर निरपराधीसुद्धा त्यात भरडले जाताहेत त्याचं काय?

        आपल्या मराठीत (तुझा वावर सर्व पृथ्वीवर असतो त्यामुळे तुला सर्व भाषा अवगत असणारच ) एक म्हण आहे  ‘करावं तसं भरावं'! आज त्याच म्हणीचा प्रत्यय येतोय. तसं 'चुकीला माफी नाही' असंही एक छान वाक्य आहे. अगदी तसंच तू करतोयस. ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा करण्यासाठी तू केव्हाही, कुठेही, कधीही नि कसाही पडतोस नि होत्याचं नव्हतं करुन टाकतोस. तुझ्या मित्राची म्हणजे वादळाचीही तुला साथ असते. आत्तापर्यंत अनेक वेळा तू तुझी ताकद दाखवून दिलीस तरी माणूस सुधारत नाही, बदलायला तयार होत नाही. म्हणूनच की काय, तू तुझं रौद्ररूप दाखवतो आहेस. अशाने काय होतंय मित्रा, ये रे ये रे पावसा म्हणण्याऐवजी जा रे जा रे पावसा असं म्हणायची वेळ आलीय.

     पावसा, माझ्या मित्रा, आत्ता हे पत्र लिहित असतानाही तू सोबत आहेसच. गेल्या आठवड्यापासून तू जो काही उच्छाद मांडला आहेस त्याच्या बातम्या वाचून-ऐकून मन सुन्न झालंय रे ! पूरग्रस्तांचे हाल पाहवत नाहीत रे. तुझ्या पुराच्या पाण्यात अश्रूंचं पाणी कधी वाहून जातंय ते कळतही नाही अशावेळी नं तुझा अस्सा काही राग येतो ना, की तुझ्याशी कट्टी फूच करावं असं वाटतंय. पण आता खूप झालं तुझं धडा शिकवणं. आता तरी थांब ना रे बाबा !

      अरे लहानपणापासून आपण मित्र आहोत हे खरं असलं तरी आता मीही थकलो रे. तुझ्याबद्दल कुणी वाईट साईट बोललेलं नाही ऐकवत नि आवडत ही नाही मला. तुझ्या मित्रासाठी एवढं तरी करशील ना रे? आजपर्यंत मी तुझ्याकडे काही नाही मागितलं कारण आपली मैत्री निःस्वार्थी, निर्व्याज्य होती आणि न मागता ही तू मला खूप सारंकाही दिलंस. पण आज मात्र तुझ्याकडे हक्काने आणि मित्रत्वाच्या नात्याने एकच मागतोय... मोठ्या मनाने सर्वांना माफ करुन टाक आणि पहिल्यासारखा ‘परफेक्शनिस्ट' हो. आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला...!

  तुझ्या मित्र परिवारातील वादळ, वारा, वीज वगैरेंनाही माझा निरोप नि नमस्कार सांग हं !

                                       तुझा बालपणापासूनचा  मित्र
                                               - विलास समेळ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जादूची दौलत..