म्हणे ‘शास्त्र' असतं ते!

समाजातील काही प्रस्थापित कर्मकांडी लोक त्यांच्या मनाला वाटेल त्या प्रथांना ‘शास्त्र' म्हणून रुढ करुन ठेवतात व इतरांनी मेंढ्यांप्रमाणे त्या ‘शास्त्रा'चे अनुकरण करावे अशी वातावरण निर्मिती करत असतात. अनेकजण मुकाटपणे  या असल्या कालबाह्य रुढी कवटाळतात. तरुणाईने या भलत्या ‘शास्त्रा'त अडकून न पडता समाजमान्य, कालसुसंगत रुढी, परंपरा यांचे पालन करत आपले आयुष्य जगले पाहिजे.

   काळ वेळ सांगुन येत नसते. हल्लीचं जीवन इतकं गतिमान, धकाधकीचं, असुरक्षित, बेभरवशाचं बनलं आहे की कोणत्या वेळी कोणती बातमी, फोन, निरोप येईल आणि आपल्याला बेचैन करुन जाईल याचा कोणताही नेम राहिलेला नाही. सदर लेख लिहिला जात असताना माझ्यासमोर मुंबई उपनगरी लोकल गाड्यांमधील बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सोडलेल्या लोकांच्या बातम्यांची वृत्तपत्रे आहेत. सुमारे २०० लोकांचे प्राण घेणाऱ्या व ८०० हुन अधिक जणांना कायमचे किंवा अंशतः जखमी करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यात यंत्रणांना यश येऊ नये? त्यांच्या तपासात ढिलाई रहावी? एका कोर्टाने सजा फर्मावलेल्या आरोपींना दुसऱ्या कोर्टाने खुशाल मोकळे सोडावे? विद्यमान मुख्यमंत्र्यांनी भले या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा केलीही असेल, पण पकडलेले हे सगळेच आरोपी जर निर्दोषच होते तर या लोकलमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी स्वतःच आत्महत्या केल्या की काय? की या सगळ्या प्रवाशांनी एकमेकांवर बॉम्ब फेकत परस्परांचे खून केले? रेल्वेने आपल्याच गाड्यांचे नुकसान करुन घेतले? याही प्रश्नांची उत्तरे आता मिळायला हवीत. तर ते असो.

   आता सुरु असलेल्या पावसाळ्यात पूर, रोगराई, वाहून जाणे, पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला गेलेल्यांमध्ये प्रवासात बाचाबाची, वाहने ओव्हरटेक करण्यावरुन वाद व त्यातून होणारा खूनखराबा, धरणे-नद्या-तलाव-जलसाठे-धबधबे येथे जाऊन फाजील शौर्य दाखवायच्या प्रयत्नात पाय घसरुन किंवा दारुच्या अंमलाखाली मर्कटचाळे करताना आलेले मृत्यू अशा प्रकारच्या बातम्या यांचे आधिक्य आहे. अशावेळी मृताचे पार्थिव मिळवणे, दवाखान्यातील कागदपत्रांचे सोपस्कार, नातेवाईकांना कळवा कळवी, अंत्यसंस्कार, सुतक, तेरा दिवसांचा दुखवटा, त्या घरातील कातर-दुःखी वातावरण, काही ठिकाणचे भजनांचे कार्यक्रम, केशवपन, दशक्रिया, तेरावे विधी, सांत्वनासाठी भेटायला येणारे या साऱ्या प्रकारातून त्या त्या परिवाराला जावे लागते. अपघातीच का, कोणत्याही प्रकारे मृत्यू झाला तरी हे सारे प्रकार जणू अटळ असतात. शहरात त्या मानाने कमी; पण खेडेगावात अद्यापही मृत्यू व त्यानंतरची कर्मकांडं जणू ‘साजरा' करण्याचा प्रकार असावा अशा रीतीने विविध क्रियाकर्म, विधी, सोपस्कार पार पाडले जात असतात. त्यावर कुणी काही बोललेच तर ‘शास्त्र असतं ते' असं सांगून बोळवण केली जाते. आपल्याकडे विविध नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांनी याविरोधात प्रबोधनाचा प्रयत्न केला आहे. राज्याचा माजी मंत्री असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीमत्वाने एखाद्याच्या मृत्युनंतर तेरा दिवस त्या संपूर्ण कुटुंबाला दुःखी समजून त्यांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा ‘मरणोत्तर तिसऱ्याच दिवशी सारे विधी करुन घ्या व त्या परिवाराला मोकळे करा' अशी सूचना केली होती. पण तिकडे अनेकांनी लक्षपूर्वक दुर्लक्ष केले. मी यावर एका वर्तमानपत्रात त्या सूचनेची बाजू घेत लिहीलेला पत्रलेख वाचून एका विद्वान अभिजन महिलेने मला फोन करुन विचारले..‘तुम्हाला काही कळतं का? सारा समाज त्या दुःखी परिवारासोबत आहे हे सांगण्याचा तो काळ असतो. तीन दिवसात ते सगळं कसं जमेल? तेरा दिवस दुखवटा हा हवाच!' असं म्हणत मला झापण्याचा प्रयत्न केला होता.

   मी तर म्हणतो...तेरा दिवसच का? वर्षभर दुखवटा का नसावा? माझे आई-वडील निधन पावले त्या त्या वर्षात मी अनेक कार्यक्रमांना जाणे टाळले. आनंदाच्या प्रसंगांत सहभागी झालो नाही. मौज-मस्तीच्या घटनांपासून दूर राहिलो. पण माझे दुःख मी माझ्यापुरते ठेवले. त्याचा इतरांना कसल्याही प्रकारे उपद्रव होणार नाही हे पाहिले. पण इकडे ‘शास्त्र असतं ते' म्हणायचे आणि दुःखाच्या त्या तेरा दिवसांच्या काळातही मयतघरी हसणे खिदळणे सुरु असल्याचे पाहायला लागावे हा प्रचंड मोठा विरोधाभास म्हटला पाहिजे. अशा काही घरांमध्ये मी पाहिले की त्या दुखवट्याच्या तेरा दिवसात जेवणाचे मेन्यू ठरवले जातात. एकीकडे गरुड पुराण, विष्णू पुराण, अग्नि पुराण, शिव पुराण, भगवद्‌गीता असे ग्रंथवाचन, भजन वगैरे होत असते. त्याचवेळी त्या घरी विविध भौतिक-सुखासीन-विलासी प्रकारच्या बाबींवर चर्चा रंगतात. खरे तर त्या परिवारावर, घरावर मृत्युकळा असते. वातावरण शोकाचे असते. अशावेळी त्या दुःखात सामीलकीचे, आपण आधाराला आहोत, तुम्ही एकाकी नाहीत अशा दिलाशाची वागणूक इतरेजनांकडून अपेक्षित असते. पण मूळ दुःखी परिवारालाच याची जाण नसेल आणि तेच लोक ताळतंत्र सोडुन वागत असतील तर मग इतरांनी काय करावे? माझ्या परिचयातील एका परिवातल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर केवळ काही महिन्यांतच तिच्या नातवंडांपैकी एकाचे लग्न झाले. त्या लग्नात म्हणे त्या महिलेची मुले, सूना, जावई, अन्य नातवंडे नाचत होते. आता बोला! अशा वेळी ‘शास्त्र' कुठे जाते बरे? मयतघरी ‘बसायला' अर्थात सांत्वनपर जाण्याची, दुःखी परिवाराची विचारपूस करण्याची प्रथा आहे. पण अनेकदा त्यावर वेळ काळ पाळली जात नाही. आपापल्या सोयीप्रमाणे जो तो बेधडक त्या घरी जाऊन दाखल होतो. माझ्या एका मित्राने यावर स्वतःपुरता इलाज शोधला होता. त्याने सरळ एक बॅनर बनवून घराजवळ लावला व त्यावर कोणत्या वेळी भेटायला यावे याबद्दल वेळापत्रकच प्रसिध्द करुन टाकले होते.

   आता तरी कुटुंब नियोजनाची वाढती साधने, शिक्षण, प्रबोधन यामुळे कमी मुले जन्माला घालण्याचा प्रघात आहे. पण एकेकाळी एकेका परिवारात ढीगभर मुले असत. त्यामुळे वर्षभर कुठे ना कुठे तरी नातेसंबंधांत कुणी तरी जन्माला येत तरी किंवा ज्येष्ठ नागरिकांपैकी कुणाचा तरी मृत्यू होत असे. म्हणजेच सुयर व सुतकाच्या चक्रात अनेकजण अडकून पडत असत. त्यामुळे ‘शास्त्र असतं ते' असं म्हणणाऱ्यांचं फावत असे. या बाबतीत मी थोडासा नशिबवानच! माझ्या आई किंवा वडिलांकडील नातलगांनी माझे सततचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन काही लांबच्या नात्यांमधील जन्म व मृत्यूच्या खबरा वेळीच देणे टाळले आहे. माझे कधी जाणे झाले की मग ते सांगतात...अमूकांच्या घरातले तमूक गेले मागील महिन्यात. आता आलाच आहेस तर भेटून ये. किंवा त्या घरात मुलगा/मुलगीचा जन्म झाला आहे..बाळाला पाहुन ये. आपला समाज बऱ्यापैकी परिवर्तनशील राहिला आहे. मात्र त्याला तसे करण्यात अनेकांना योगदान द्यावे लागले आहे. कर्मठ, पुराणमतवादी, कर्मकांडी लोकांचा उपद्रव सहन करावा लागला आहे. महात्मा जोतिबा फुले, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, गोपाळ गणेश आगरकर या व अशा अनेकांना जुनाट मानसिकतेच्या लोकांनी खूप छळले, त्यांच्या जीवंतपणीच प्रेतयात्रा काढल्या हा इतिहास आहे. पूर्वी सतीची प्रथा आपल्या समाजात रुढ होती. त्या काळातलं ते जणू शास्त्रच! पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पित्याच्या निधनानंतर राजमाता जिजाऊंना सती जाऊ दिले नाही हे विशेष! राजाराम मोहन रॉय यांच्या पाठपुराव्यानंतर इंग्रजकाळात सतीची प्रथा कायदा करुन बंद करण्याचा प्रयत्न झाला.

   आपल्याकडे हेच ‘शास्त्र' म्हणवलं जाणारं अस्त्र हे त्या त्या व्यक्तीचं समाजातील स्थान, श्रीमंती-गरीबी, प्रतिष्ठा, वर्ण, वर्ग वगैरे पाहुन परजलं जातं की काय असं म्हणायला जागा असावी. म्हणजे पाहा...मध्यमवर्ग किंवा कनिष्ठ मध्यमवर्ग किंवा गरीब वर्गातील कुणा महिलेने एका पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केले तर तिच्यावर भरपूर टिका केली जाते. खरे तर ऐन तरुणपणात काय किंवा मध्यमवयात काय किंवा उतारवयात काय... एकमेकांच्या साथीविना आयुष्य कंठणे ही तशी कठीणच बाब. पण पुरुषांना ती मोकळीक दिली जाते व महिलांना मात्र ‘शास्त्रा'चा बडगा दाखवला जातो. त्यामुळे मनात दुसऱ्या विवाहाचा विचार येऊनही अनेक तरुण विधवा दुसरे लग्न करायचे धाडस दाखवीत नाहीत, हे कठोर वास्तव आहे. एका विख्यात मराठी गायिकेने पळून जाऊन विवाह केल्यावर कालांतराने दुसरा (किंवा तिसराही !) विवाह केला. पतीच्या निधनानंतरही ठसठशीत कुंकु लावले, मंगळसूत्र घातले, हिरव्या बांगड्या परिधान केल्या..यावर सारे गप्प राहतात. (खरे तर असे करायची इच्छा असलेल्या महिलांना ती परवानगी द्यायला हवी!) मात्र ती गायिका प्रतिष्ठीत, पैसेवाली, सडेतोड जवाब देणारी असल्याने कुणी हरकत घेण्याचा प्रश्न उद्‌भवला नाही. एका मराठी विनोदी अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या आकाशवाणी निवेदिका असलेल्या पत्नीने एका मराठी संगीतकाराशी दुसरा विवाह केला होता व तो साऱ्यांनी स्विकारला, त्यांना ‘लक्ष्य' केले नाही. लक्ष्मीकांत बेर्डे यानेही त्याची पहिली पत्नी रुही हिच्या मृत्युनंतर दुसरा विवाह केला होता. मात्र समजून घेण्याचा मनाचा एवढा मोठेपणा, मोकळेपणा हा सर्वसामान्य जनमानसामधून दिसून येत नाही. त्यांच्या मते ‘पति किंवा पत्नी गेली ना...मग संपली तुमची मौजमजा; आता तुम्ही विरक्त जीवन जगायचे'... हेच ‘शास्त्र' अनेक वर्षे आपल्याकडे रुढ आहे. पति गमावलेल्या पत्नीने नीटनेटके राहण्यात काय अडचण आहे? तिने संन्यासिनीसारखे कशापायी राहावे? याबद्दलचे माझे एक पत्र एका नामांकित दैनिकात माझ्या फोन नंबरसह प्रसिध्द झाल्यावर ठाण्यामधील वैधव्य प्राप्त झालेल्या एका डॉवटर महिलेने मला फोन करुन सांगितले की ‘मला गेली अनेक वर्षे टापटीप, व्यवस्थित केशभूषा, वेषभूषा करुन राहायला आवडते. पण माझे पति गेल्यावर विधवांसाठीच्या ‘शास्त्रा'च्या नावाखाली मला नणंदा, जावा, दीर, नंदावा अशांकडून सारख्या सूचना येत आहेत की मी अत्यंत साधेपणाने राहावे, फॅशन वगैरे करुच नये म्हणून! नीटनेटके राहावे हा माझ्या व्यवसायाचा एक भागच आहे. रुग्णांसमोर मी सुतकी चेहरा करत त्यांची चिकित्सा करावी हे मला कसे जमावे?'

खरंच या असल्या ‘शास्त्रा'ची आवश्यकता आहे काय?

 - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रिय पावसा