महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आठवणीत राहणारे गायक गणेश भगत
गणेश भगत गेले..अन् मी गतकाळात हरवून गेलो. गणेश भगतांशी माझा संबंध खरंतर दोनच वेळा आला. माझ्या पहील्या कॅसेटची निर्मिती होत असताना सानपाडा गावातील रमाई स्टुडिओमध्ये मी त्यांना पाहिलं. पण पाहण्यापेक्षा त्यांचा आवाज ऐकल्यावर मी त्यांना मनोमन धन्यवाद दिले. कारण तसा मी कमी बोलणारा माणूस. म्हणून मी पहील्या भेटीत मनोमन धन्यवाद दिले. माझ्या गीतांना त्यांनी असा सुर लावला की मी ते गाणं ऐकून हरखुन गेलो.
त्या दिवशी गणेशजी भगत रेकॉर्डिंग संपवून गेल्यावर मी त्यांनी गायलेली गाणी कितीतरी वेळा रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये ऐकत बसलो होतो...त्यानंतर उमेश ठाकूर यांच्या कॅसेट करीता मी दोन गीतं लिहिली. दोन्हीही गीत इतर गाण्यांच्या चालीवर बेतली होती. त्यातील एक गाणं तेव्हा खूप लोकप्रिय झाले होते. म्हणून मी त्या गाण्याच्या चालीवर गणपती गीत लिहीलं. ते गीत सेम टु सेम होवू नये म्हणून मी त्या गाण्यात बराच बदल केला. त्या गाण्यातील अंतऱ्याच्या सहा ओळी होत्या. मी माझ्या गाण्यात चार ओळी केल्या. गाण्याचे शब्द पूर्णपणे बदललेले होते. हा बदल मी निर्माते उमेश ठाकूर यांनाही सांगितला होता. हे गाणं तयार केल्यावर मी निर्मात्याकडे दिलं. निर्मात्याने हा बदल संगीत संयोजकाला सांगितला नसावा. त्यांनी ते गाणं खारघरमधल्या एका स्टुडीओत संगीत देण्यासाठी पाठविले.
तेव्हा मी नवी मुंबईच्या परिवहन सेवेत वाहकाचं काम करीत होतो. वाहकाचं काम अतिशय त्रासाचं. त्या दिवशी माझ्या गाण्याचं रेकॉडिंग होतं. मला निर्माते उमेश ठाकूर यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘मढवी, आज तुम्ही लिहिलेल्या गाण्याचं रेकॉडींग खारघर येथे आहे. तुम्ही नवकी या. गायक गणेश भगत येणार आहेत.' मी माझी ड्युटी संपल्यावर खारघरला स्टुडीओमध्ये पोहचलो. माझ्या अगोदर गणेश भगत आले होते. मी त्यांना नमस्कार केला. म्हणालो, ‘भगतजी, आपली पहिली भेट झालीय सानपाड्यात. रमाई स्टुडीओत.' त्यांना ते आठवलं. त्यांनी मला हस्तांदोलन केलं. रेकॉडीस्ट रेकॉडींगला सुरुवात करण्या अगोदर मला म्हणाले, ‘मढवीजी, रेकॉर्डिंग सुरु करण्याअगोदर तुमच्या गाण्यातील अंतऱ्यातील ओळी कमी आहेत त्या पूर्ण करुन द्या.' त्यावर मी त्यांना म्हटलं, ‘अहो मी त्या ओळी मुद्दाम कमी केल्या आहेत. कारण आपलं गाणं सेम टू सेम होवू नये. तसं मी निर्मात्यांनाही सांगितलं होतं. त्यावर रेकॉडीस्ट म्हणाले, ‘मी तर मुळ गाण्याच्या अंतऱ्याप्रमाणे संगीत तयार केलं आहे. तेव्हा बघा, काहीतरी करुन ओळी पूर्ण करा.' मुळ गाण्याच्या अंतऱ्यात सहा ओळी होत्या. एकूण गाण्यात चार अंतरे होते. म्हणजे प्रत्येक अंतऱ्याच्या दोन ओळी अशा चार अंतऱ्याच्या आठ ओळी लिहायच्या होत्या. मी विचारात पडलो. आधीच ड्युटी करुन त्रासलेला होतो. आता पुन्हा आठ ओळी लिहायचं टेन्शन आलं होतं. माझी एक सवय आहे. मी गीत लिहिलं नी जर ते गीत कुणाला दिलं की मी अगोदरच त्या निर्मात्याला सांगत असतो. काही बदल करायचा असेल तर अगोदर सांगा. ऐनवेळी मला काही सुचत नाही आणि जरी सुचलं तरी तो बदल माझ्या नि निर्मात्याच्या मनासारखा होईल याची खात्री नाही. त्या दिवशी तसंच झालं. ऐनवेळी चार अंतऱ्यांच्या आठ ओळी मला लिहायच्या होत्या. अर्धा तास होवून गेला तरी मला काही सुचत नव्हतं. मी पार गोंधळून गेलो होतो. माझ्यामागे वाघ लागावा तशी माझी अवस्था झाली होती.
माझी गोंधळलेली अवस्था पाहून गणेश भगतजी म्हणाले, ‘मढवीजी, मी गाण्याच्या ओळी सुचवतोय. आपण रेकॉर्डिंग सुरु करु. मी सुचवलेली ओळ तुम्हाला योग्य वाटली की आपण तो अंतरा पूर्ण करु.' असं म्हणत रेकॉडिंग सुरु झालं. एक एक ओळ सुचवून गणेशजी म्हणायचे, ‘बरोबर आहे का मढवी?' मी ‘हो' म्हणायचो. असं करीत करीत गणेश भगत यांनी त्या गाण्याच्या आठही ओळी पुर्ण केल्या आणि कसा बसा गणेशजींना ‘थंँक्यु' बोलून मी स्टुडीओ बाहेर विमनस्क अवस्थेत बाहेर पडलो..
त्या दिवशी खूप वाईट वाटलं. कारण मी शीघ्र गीतकार नव्हतो. त्यामुळे मला त्या आठ ओळी सुचल्या नाही. त्या रात्री मला जेवणसुध्दा गोड लागलं नाही. उगीच मला पराभुत झाल्याची भावना खात होती. आज गणेश भगतजी आपल्यात नाहीयेत. पण तरीही ते मला त्या दिवसाच्या प्रसंगापासून कायमच माझ्या स्मरणात राहीले आहेत. गणेशजी, तुम्ही हयात असताना तुम्ही माझं गाणं पुर्ण केलंत. हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. गणेशजी, तुम्ही फवत कसलेले गायकच नव्हता... तर तुमच्यात एक गीतकारही दडलेला होता. तो गीतकार त्या दिवशी माझ्या मदतीला धावून आला. तुम्ही हे जग सोडून गेलात. पण तुमच्या आठवणी सदैव माझ्यासारख्या सामान्य गीतकाराच्या स्मरणात राहातील... -एकनाथ मढवी, गोठिवली