अमर्याद सागराला मर्यादा

या वनस्पतीच्या खोडापासून निघणारी जाडजूड आणि लांब मुळे वाळूयुक्त जमिनीत खोलवर जातात. जवळपास तीन फूट लांबीची ही मुळे त्या जमिनीला घट्टपणा आणतात. साखळ्यांसारखी लांबलचक पसरलेली ही वेल आपल्या ‘सागरमेखला' या संस्कृतनामाला जागत ‘वालुकाबंधन' घडवून आणते. कधी कधी ही लांबी सलगपणे शंभर मीटरपर्यंत जाते. तिची लांब देठाची, मांसल व गुळगुळीत पाने आपट्याच्या पानांची आठवण करून देतात.

दूरवर पसरलेल्या अथांग सागराच्या लाटा किनाऱ्यावर निरंतर येऊन आदळत असतात. आपल्या फेसाळत्या लाटांनी तो भूमीवर सातत्याने आक्रमण करतच राहतो. ओहोटीच्या वेळेस पीछेहाट झाली तरी भरतीच्या वेळेस हे आक्रमण अधिकच विशाल होत जाते. लाटांच्या प्रत्येक हल्ल्यात किनाऱ्याची झीज होत राहते. कधीकधी समुद्राचे पाणी वेस ओलांडून लोकवस्त्यांमध्ये घुसते. मानवाच्या दृष्टीने या निरंकुश पाण्याला अंकुश लावणे गरजेचे असते. त्याला रोखण्यात मानवी प्रयत्न तोकडे पडत असताना, बऱ्याच वेळेस निसर्गच सहाय्य करतो. सागरकिनारी वसलेल्या सजीवसृष्टीतील काही वनस्पती या अमर्याद सागराला आपल्यापरीने मर्यादा घालण्याचे काम करतात; ‘मर्यादा वेल' ही त्यातलीच एक.

‘मॉर्निंग ग्लोरी' अशी ओळख असणाऱ्या आणि हजारो जाती असणाऱ्या वनस्पती प्रकारातील ही वेल. समुद्रकिनारी उगवते म्हणून ती ‘बीच मॉर्निंग ग्लोरी'. आयपोमोई पीस-कॅप्रे (Ipomoa pescaprae) हे तिचे शास्त्रीय नाव. यातील ‘आयपोमोई' हा ग्रीक शब्द वेलीचे ‘वळवळणाऱ्या किड्यांसारखे' दिसण्याशी संबंधित आहे. वेगाने उगवणाऱ्या आणि सदानकदा टवटवीत दिसणाऱ्या या वेलीचा समुद्रकिनाऱ्यावर एक सुंदर नक्षीदार गालीचाच तयार होतो. या वनस्पतीच्या खोडापासून निघणारी जाडजूड आणि लांब मुळे वाळूयुक्त जमिनीत खोलवर जातात. जवळपास तीन फूट लांबीची ही मुळे त्या जमिनीला घट्टपणा आणतात. साखळ्यांसारखी लांबलचक पसरलेली ही वेल आपल्या ‘सागरमेखला' या संस्कृतनामाला जागत ‘वालुकाबंधन' घडवून आणते. कधी कधी ही लांबी सलगपणे शंभर मीटरपर्यंत जाते. तिची लांब देठाची, मांसल व गुळगुळीत पाने आपट्याच्या पानांची आठवण करून देतात. दोन भागात खोलपर्यंत विभागलेल्या या पानांमुळेच तिला मराठीत ‘दुपानी लता', हिंदीमध्ये ‘दो पत्ती लता' तर लॅटिनमध्ये ‘बायलोबा (Biloba) असेही संबोधले जाते. या पानांचा आकार कोणाला शेळीच्या खुराप्रमाणे भासतो तर एखाद्याला तो आकार सशाप्रमाणे वाटतो.  यामुळेच  मर्यादा वेलीला ‘गोटस्‌फूट (Goat's foor vin)”, हेअर लीफ अशी गंमतीशीर नावे लाभली आहेत. लॅटिन नावातील पीस-कॅप्रेचा अर्थदेखिल शेळीचे खूर असाच होतो. कधीकधी आपला नेहमीचा वाळुमार्ग सोडून ती जुन्या वापरात नसलेल्या लोहमार्गांच्या कडेलाही आढळते, त्यामुळे तीला ‘रेल रोड वाईन असेही म्हटले जाते. ह्या वेलीला साधारणपणे वर्षभर आकर्षक फुले येतात. गुलाबी जांभळ्या रंगाच्या फुलांचा आकार पाहून तुम्हाला ग्रामोफोनची आठवण होईल.

मर्यादावेलीचे उपयोग त्यांच्या प्रजातींसारखेच अमर्याद आहेत. अनेक जाती मानवाला आणि जनावरांनाही अन्न म्हणून उपयोगी आहेत. तिच्या पानांची भाजी केली जाते. मुळांची देखील भाजी होते. पण ही भाजी मुळातच रेचक (Iaxative) असल्याने रात्री खाणे उत्तम. अर्थात बद्धकोष्ठता सारख्या आजारांसाठी ती उपयुक्त ठरते. जलोदर तसेच काही मूत्रविकारांमध्ये पानांचा औषध म्हणून वापर होतो. पानांच्या रसातील जंतुरोधक व वेदनाशामक  गुणधर्मामुळे जखम, भाजणे, सूज येणे यांसारख्या त्रासांवर उपचार करता येतात. या वेलीच्या पानांचा लेप संधिवात, मस्तकशूळ इत्यादींवर लावतात. मलेशियामध्ये वेलीच्या पानांचे पोटीस गळवे, सूज, जखमा व काळपुळी यांवर लावतात. बिया पोटदुखीवर आणि पेटके आल्यास वापरतात. अलिकडच्या काळात काढ्याला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले असताना मर्यादावेलीचा वापर या राष्ट्रीय (!) पेयासाठी होऊ शकेल का, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. याचे उत्तर अर्थातच ‘हो आहे. खोकल्यासाठी या वेलीचा काढा उपयोगी ठरतो. त्याचबरोबर पानांचा चहा बनवून देवीच्या रोगात उपचार म्हणून वापरला जातो. समुद्राच्या कडेला राहून ही वनस्पती या परिसरात वावर असणाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पावर प्रदान करते. जेलीफिश, स्टोनफिश सारख्या जलचरांनी दंश केल्यास मर्यादावेलीची ताजी पाने वापरून उपचार केला जातो. काही ठिकाणी स्थानिक लोक या वेलींपासून पारंपरिक पद्धतीने दोरखंडासारखे बंध तयार करतात. होड्या तयार करताना लाकडी जोडण्यांमधील फटी बुजवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने सुकवलेल्या पानांचा वापर होतो.

 जमीन व समुद्र यांच्या सीमेवर वाढणाऱ्या या वेलीवर तीव्र उन, खारे वारे यांचा फारसा परिणाम होत नाही. या वनस्पतीचा बीजप्रसार सागरी मार्गानेसुद्धा व्यवस्थित होत असल्याने ‘आमच्या शाखा सर्वत्र आहेत” असा फलक लावल्यासारखीच ती सर्वत्र आढळते. पण तिला रुजण्यासाठी आवश्यक असणारी ‘जमिन” बळकावणाऱ्या मनुष्यापुढे तीने आपली पाने टेकलीत. भविष्यात लोकवस्त्यांमध्ये समुद्राला हात पाय पसरू द्यायचे नसेल तर मर्यादावेलींसारख्या जीवसृष्टीला पसरण्यास मदत करायला हवी. थोडक्यात... समुद्राचे आक्रमण रोखायचे असेल, तर आपल्यालाही किनारी जमिनींवरील अतिक्रमण रोखावे लागेल. -तुषार म्हात्रे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 चातुर्मास आणि खाद्यसंकृती