ही भारताची सेना आहे

भारतीय सैन्य जीव देतेही, घेतेही, वाचवतेही आणि जन्मालाही घालते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! रेल्वेच्या प्रवासात ती होऊ घातलेली माता आणि जन्माला येऊ घातलेले बालक...दोघांच्याही जीवाला प्रचंड धोका होता...तिथून तिला हलवणे अशक्यप्राय होते. अगदी काही क्षणांतच बाळ या जगात प्रवेश करणार होतं...पण त्याचा मार्ग सुकर नव्हता! निष्णात वैद्यकीय हातांची गरज होती...अन्यथा दोन्ही जीव या जगाचा निरोप घेणार होतेच. अशा या कसोटीच्या क्षणी ‘भगवान के हिसाब' एक देवदूत तिथूनच जात होता. देवदूताचे नाव होते भारतीय सैनदलाच्या वैद्यकीय विभागाचे मेजर डॉक्टर रोहित बच्वाला.

   जन्मगावापासून दूरच्या शहरात राहणारी ती पोटुशी बाळंतपणासाठी बहुदा माहेरी निघाली होती. नऊ महिने भरलेले होतेच...फक्त उरलेल्या नऊ दिवसांचा प्रश्न होता. निसर्गाचा हिशेब कुणाला कधी कळलाय का? तिला वाटलं होतं...बाळ घरी पोहोचल्यावर येईल या जगात त्याला हवं तेंव्हा. पण तसं व्हायचं नव्हतं. प्रत्येक जीवाची या जगात येण्याची घटका आणि स्थळही ठरलेलं असतं. जगाचा पोशिंदा नाही का कारावासात प्रगटला?

१५०६६ डाऊन पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस रेल्वेगाडीत तिला बी-३ बोगीत आसन मिळाले होते. सोबत अर्थात तिचे नातलगही होतेच. आणि तिला अस्वस्थ वाटू लागले. काहीतरी गडबड होणार असे ध्यानात येताच तिच्या नातलगाने भारतीय रेल्वेच्या रेल मदद या हेल्पलाईनवर तात्काळ मदत मागितली आणि झांशी रेल्वे स्टेशनवर आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली. वीरांगना राणी लक्ष्मीबाई रेल्वेस्टेशनवर डॉक्टर सुजित राय आणि त्यांचे वैद्यकीय साहाय्य पथक तयार झाले. गर्दीतून वाट काढत ही सेवाभावी मंडळी बी-३ बोगीत पोहोचली. डॉक्टर सुजित राय यांनी तिला तपासले आणि सांगितले की प्रवास इथेच थांबवा...कोणत्याही क्षणी प्रसूती होऊ शकते. पण तिच्या नातेवाईकांना वाटले की औषधे मिळाली तर त्याच्या जोरावर घरापर्यंत जाता येईल. परंतु डॉक्टरसाहेबांनी त्यांना समजावले. व्हील चेअरवरून तिला लिपटपर्यंत आणण्यात आले. रेल्वे स्टेशनवर रुग्णवाहिका तयार होती. परंतु व्हील चेअर दादरवर आणली जात असतानाच तिने जोरदार किंंकाळी फोडली. कुणाला क्षणभर काही सुचेना! पण ‘भगवान के हिसाब' एक देवदूत तिथूनच जात होता. देवदूताचे नाव होते भारतीय सैनदलाच्या वैद्यकीय विभागाचे मेजर डॉक्टर रोहित बच्वाला..झांशी येथील सैन्यकेंद्रावर कर्तव्यावर होते. आणि त्यावेळी ते त्यांच्या मूळगावी  हैदराबादला सुट्टीवर येथे निघाले होते...त्यांच्या रेल्वेगाडीला आणखे काही मिनिटे अवकाश होता!

मेजर डॉक्टर साहेबांनी ती किंकाळी ऐकली आणि ते अक्षरशः वायुवेगाने त्या महिलेच्या दिशेने धावले..साध्या वेशात असलेल्या मेजरसाहेबांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचा-यांना त्यांची ओळख सांगितली आणि तो रुग्ण हाती घेतला. ती होऊ घातलेली माता आणि जन्माला येऊ घातलेले बालक...दोघांच्याही जीवाला प्रचंड धोका होता...तिथून तिला हलवणे अशक्यप्राय होते. अगदी काही क्षणांतच बाळ या जगात प्रवेश करणार होतं...पण त्याचा मार्ग सुकर नव्हता! निष्णात वैद्यकीय हातांची गरज होती...अन्यथा दोन्ही जीव या जगाचा निरोप घेणार होतेच.

मेजर डॉक्टर रोहित..रोहित म्हणजे सूर्याचे पहिले किरण...लालबुंद लोहगोल. या दोघांच्याही जीवनात यांच्या रूपाने सूर्योदय होणार होता...असा भगवान का हिसाब होता!
मेजरसाहेबांनी त्याच ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, शस्त्रक्रियागृह उभारले. रेल्वे वैद्यकीय पथक आणि रेल्वे पोलिस मदतीला होतेच. मेजरसाहेबांनी त्यांच्याजवळचा pocker knife चाकू उपयोगात आणायचे ठरवले...आणि केस एकत्रित ठेवण्यासाठी महिला वापरतात त्या क्लिप्स. रेल्वेतील बेडशीट्‌स पडद्यासारख्या उभारल्या गेल्या...बघे हटवले गेले...आणि सुरु झाली वेळ आणि काळ यांच्यातील  शर्यत. देर से आनेवाली गाडीयां कुछ समय मिला सकती है..या चालीवर मेजरसाहेबांनी अत्यंत वेगवान हालचाली केल्या. त्यांनी प्राप्त केलेले सर्व वैद्यकीय कसब आणि मुख्य म्हणजे सैनिकांच्या अंगी बाणवलेलं धैर्य, समयसूचकता प्रत्यक्ष या operation मध्ये दाखवायला विलंब लावला नाही. काही क्षणांतच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नगरीत कन्यारत्न अवतरले...पण रडण्याचा आवाज काही कानी येईना! मेजरसाहेबांनी पुन्हा जोरदार प्रयत्न केले आणि त्या बालिकेने तिच्या येण्याची ललकारी सबंध platform दणाणून गेली. दूरवर उभ्या असलेल्या लोकांनी बहुदा टाळ्याही वाजवल्या असतील...पण फक्त डॉक्टर साहेबांनाच समजू शकेल अशी वैद्यकीय गुंतागुंत झाली होती...कोणतीही साधने हाताशी नसताना त्यांनी कशीबशी त्या महिलेची सुटका केली होती खरी...मुलगी वाचली होती...पण आईचे प्राण तिच्या गर्भात अडकून राहिले होते. तोवर कुणीतरी हातमोजे आणून दिले...आणि केवळ हातांनी मेजर साहेबांनी तिचा जीव मोकळा केला. नाळ कापण्यासाठी तो चाकू आणि नाळ बांधण्यासाठी हेअरपिन...क्लिप्स! एका अर्थाने त्यांनी त्या मुलीची आणि भारतीय सेनेची नाळ जोडून दिली होती.

हे आता सांगायला सोपे वाटत असले तरी तेवढी मिनिटे म्हणजे एक लढाईच होती...आणि मेजर साहेबांनी त्यात फत्ते हासील केलीच. डॉक्टर साहेब नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी उपस्थित होते...ही तर देवाचीच कृपा असे ते म्हणालेत...सब कुछ भगवान के हिसाब से हुआ असे त्यांनी आवर्जून सांगून श्रेय स्वतःकडे घेतले नाही. बाळाच्या, मातेच्या चेह-यावरील हास्य हेच धन्यवादाचे द्योतक मानून मेजर डॉक्टर रोहित बच्वाला तिथून निघाले...त्यांची रेल्वे निघण्याच्या बेतात होती! त्यांने अक्षरशः चालती गाडी पकडली! जणू आपण काही केलेच नाही, अशा अविर्भावात त्यांनी प्रवास सुरु केला.

भारतीय सैन्यदलाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ माननीय श्री. उपेंद्रजी द्विवेदी साहेब यांच्यापर्यंत या Operation Jhaansi ची माहिती आणि महती गेली...आणि त्यांनी  अर्थातच मेजर डॉक्टर रोहित बच्वाला यांचा विशेष पुरस्कार  (commendation) प्रदान करून गौरव केला! मेजर साहेबांचे वडील भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाले आहेत.

मेजर साहेबांनी त्यांना साहाय्य केलेल्या सर्वांनाच धन्यवाद दिले...लिली कुशवाहा या रेल्वे कर्मचारी महिलेनेही या कामी त्यांना मोठी मदत केली. नवजात बालिकेला त्यांनी नवे कपडे घेऊन दिले..माता आणि नातलग यांची व्यवस्था पहिली. महिलेचे नातलग मोहम्मद जुबैर कुरेशी यांच्याकडे तर मेजर साहेबांचे आभार मानायला पुरेसे शब्दही नव्हते. 

    भारतीय सैन्य जीव देतेही, घेतेही, वाचवतेही आणि जन्मालाही घालते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! मेजर डॉक्टर रोहित बच्वाला साहेब...आम्हांस आपला अभिमान वाटतो. जय हिंद!  - संभाजी बबन गायके 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चंद्रमौलेश्वर मंदिर, अंकल धारवाड-हुबळी