दीप अमावस्या : एक दीप संस्कार

संध्याकाळी देवासमोर दिवा लावून "शुभं करोति कल्याणम” म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यान्‌पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक  जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.

दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिना सुरु होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. भरपूर पाऊस व अंधारून येणे, हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. संपूर्ण घर स्वच्छ करून हे सर्व दिवे तेल किंवा तूप टाकून संध्याकाळी पेटवून त्यांची पूजा करतात. घराला फुलांचे तोरण लावतात, घरासमोर रांगोळी काढतात. काही ठिकाणी संपूर्ण घरांभोवती दिवे लावतात. काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते.

दीप, दिवा जेथे आहे तेथे प्रकाश आला, तेथून अंधःकार जातो, तेथे मांगल्य येते, आरोग्य व धनसंपदा येते. बुद्धिमध्ये प्रकाश पडला तर शत्रूचा विनाश निश्चित होतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू जीवनात अड्डा करून बसलेले असतात. जीवनात ज्ञानरुपी दीप प्रगटताच हे सारे रिपू नाश पावतात. अज्ञानाच्या तिमिराला दूर घालवितो.
अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतिक आहे. दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी व शांती आपल्या आयुष्यामध्ये नांदावी, या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदूधर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरूवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते.

‘दीप अमावस्या' म्हणजे दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. दीप अमावस्या हा पितृ तर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते. पितरांचे स्मरण केले जाते. काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते. घरामध्ये सुख, समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात.

आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत. त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे. परंतु, या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी. गुरू जगात ज्ञानाचा प्रकाश सतत पसरत राहावा यासाठी अखंड अध्ययन व अध्यापन करीत ज्ञानदीप तेवत ठेवतो. म्हणून ‘ज्ञानदीप लावू जगी' ही परंपरा कायम राहावी. अज्ञानरुपी अंधःकार ज्ञानरुपी दिव्यांनी नष्ट होत असतो, यासाठी सद्या बऱ्याच शाळांमध्ये दीप पूजन केले जाते. विद्यार्थी शाळेत दिवे प्रज्वलित करून, प्रार्थना करतात.

काही लोक दीप अमावसेला ‘गटारी अमावस्या' असे देखील म्हणतात. कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये काही ठिकाणी मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे ही लोकं दीप अमावसेच्या दिवशी मांसाहार करतात, मद्यपान करतात आणि काही लोक अति मद्यपान करून रस्त्यावर किंवा घाण जागेवर पडतात. अशी विकृत वृत्ती वाढत आहे. त्या लोकांनी या अमावास्येला ‘गटारी अमावस्या' असे नाव दिले आहे. परंतु ही ‘दीप अमावस्या' अशाप्रकारे साजरी करण्याची चुकीची प्रथा आहे. ‘दीप अमावस्या' हा एक दीप संस्कार आहे. - प्रा. जयवंत पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वर्षावासास प्रारंभ