बेचैनी

 जानेवारीत मालती लग्न करून अजयच्या घरी आली आणि चार महिन्यात अजयला तीन महिन्यासाठी सिंगापूरला जावे लागले. अजय आणि मालती दोघेही कष्टी झाले; पण तीन महिन्यात तो परत मुंबईला येणार होता. मालती नोकरी करत नव्हती..पण या मोठया पलॅटमध्ये तिची सासू विदयाताई, दीर विराज आणि त्याची पत्नी लक्ष्मी.. त्याचा मुलगा अनिकेत एकत्र राहत होती. प्रभादेवीसारख्या उच्चभू वस्तीत तीन बेडरूमचा प्लॅट.. प्रत्येक बेडरूमला गॅलरी.. उंची फर्निचर, उत्तम किचन.. पार्किंग लॉट मध्ये दोन मोठया गाड्या.. ड्रायव्हर इत्यादी. अजित एका मल्टिनॅशनल औषध कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आणि त्याचा मोठा भाऊ विराज चार्टर्ड अकाटंट.. त्यांच्या वडिलांची पण  फर्म होती.. तीच विराज सांभाळत होता. त्याची पत्नी लक्ष्मीपण श्रीमंत कुटुंबातील आणि मालतीपण एका इन्कम टॅक्स ऑफिसरची मुलगी.

लक्ष्मी आणि मालती जरी नोकरी करत नव्हत्या, तरी त्यांच्या माहेरहून भरपूर दागिने घालून आणि सासरच्या मंडळींना मोठया गिपट देऊन या घरात आल्या होत्या. दोघींच्या माहेरहून भरपूर दागिने घातले होते. असे असले तरी मालतीच्या अंगावर एक ग्रॅमपण सोने नसे.. त्याची तिला आवडच नव्हती;  पण तिची जाऊ आणि सासू मात्र कायम अंगावर दागिने घालून मिरवत. मात्र मालतीला हे आवडत नव्हते.. तिला साधे आयुष्य आवडे.. त्यांच्या गाड्या होत्या.. ड्रायव्हर होते. पण ती बाहेर जाताना चालत किंवा बस ट्रेनने जाई. तिची खरेदीपण साधी असे. एकदा नात्यात लग्न होते म्हणून तिच्या सासूबाईंनी दोन्ही सुनांना खरेदीसाठी मुंबईतील मोठया दुकानात नेले. गाडीतून उतरून दुकानाकडे जाताना तिला अचानक तिची वर्गमैत्रीण अनुजा समोर आली. तिला अनेक वर्षांनी पहाताच ती थांबली आणि तिने मागून तिला मिठी मारली.. अनुजा भांबवली.. मालतीला पहाताच तिला आनंद झाला.

"माले.. किती वर्षांनी.. कुठे असतेस?”

"अगं लग्न झालं माझं यावर्षी.. नवरा सिंगापूरला गेलाय चार महिन्यासाठी.. या काय सासूबाई आणि ही जाऊ लक्ष्मी...”

"बरं बरं.. तू नोकरी करतेस ना?”

"नाही गं.. करायची इच्छा होती..पण.. घरच्यांचं म्हणणं काही गरजच नाही तर..तू नोकरी करतेस ना?”

"हो तर.. नोकरी न करून भागेल कस आमचं? मी फोर्टमधील खादी भंडारात सेल्सगर्ल आहे  आणि नवरा एका खाजगी लायब्ररी मध्ये आहे... तू राहतेस कुठे मालती?”

"प्रभादेवी.. गणपतीमंदिर आहे ना.. त्याच्या समोर टॉवर आहे.. राजव्हिला.. सतराव्या मजल्यावर रहातो आम्ही.. आणि तू गं अनुजा?”

"नालासोपारा. नालासोपारा स्टेशनच्या बाहेर असते..तिथून अंदाजे अर्धा तास.. मग दहा मिनिटे चालायचं..”

मालतीने पटकन अनुजाचा हात पकडला.. "खुप त्रास होत असणार तुला अनु..”

"त्रास होतोच.. पण काय करू.. आमची दोघांची मिळून मिळकत ती किती? इकडे फोर्टमध्ये कुठे तुम्ही तिघीजणी?”

"अगं नात्यात एक लग्न आहे म्हणून खरेदी.. सासूने मला इकडं आणलं.. पण यात फार इंटरेस्ट नसतो..”

"बापरे..असल्या दुकानात खरेदी करायचे आम्ही स्वप्नातपण आणू शकत नाही... आमची खरेदी रस्त्यावर.. मस्त आणि स्वस्त..” विशादाने अनुजा हसली आणि चालू लागली. मालती तिला पाठमोरी पहात राहिली आणि जड पायांनी त्या श्रीमंत आणि महागड्या दुकानात शिरली तेंव्हा तिची सासू आणि जाऊ नवीननवीन शालू घेण्याच्या घाईत होत्या.. बरेच शालू पारखून शेवटी त्यानी प्रत्येकी दोनदोन शालू खरेदी केले. मालतीने काहीच खरेदी केली नाही.. तिच्या सासूला आश्चर्य वाटले..

"का गं,? निवडलेस नाहीस अजून?”

"नकोच मला... लग्नातील आहेत चार.. तेच नेसणे होत नाही आणि नवीन घेऊन काय करू?”

"अगं पण लग्न आहे माझ्या भाच्याचं.. त्याला तू लग्नातील शालू नेसून जाणार?”

"हो.. मला आवड नाही नटण्याची.. उगाच वायफळ खर्च.. त्यातीलच शालू नेसीन मी..”

"बरं बाई.. तुझी मर्जी. पण अजयला म्हणशील.. आईनी आणि लक्ष्मीने आपल्याला शालू घेतले.. मला विचारले नाही..”

"मी मुळीच म्हणायची नाही.. त्यांनापण कळले आहे मी कशी आहे ती..”

लक्ष्मीने नाक मुरडलं आणि गाडीच्या दिशेने निघाली. मालती गाडीत बसली.. तिची सासू आणि जाऊ लक्ष्मी नवीन शालूच्या किमती आणि रंग तिला सांगत होत्या; पण ते तिच्या डोक्यपर्यत पोहोचत नव्हते. तिच्या डोळ्यांसमोर येत होती.. अनुजा. अनुजा काळे.. वर्गातील सर्वात हुशार मुलगी पण गरीब. तिच्या बुद्धिपुढे आपण कुठेच नव्हतो. पण आज आपण अजयसारख्या देखण्या आणि कर्तबदार पुरुषाची पत्नी आहोत.. प्रभादेवी सारख्या श्रीमंत वस्तीत राहतोय.. पैसा, दागिने.. गाड्या सर्व आहे आणि वर्गातील सर्वात हुशार अनुजा... खादी भंडारात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करते आहे आणि नालासोपाराहुन रोज फोर्टमध्ये लटकत लटकत नोकरीसाठी येते आहे. असे का? का असा विरोधाभास? कारण तिची गरिबी हे कारण.. आपले वडील इनकम टॅक्स ऑफिसर.. म्हणजे भरपूर पैसे खाल्ले असणारं.. त्यातून पाली हील सारख्या भागात अलिशान घर.. त्याना शोभेल असा त्यानी जावई शोधला अजयसारखा.. दोन्ही बाजू श्रीमंत.. भरपूर दागिने.. सोन्याचे. हिऱ्याचे.. पण यात माझे क्रेडिट कोणते? मग का मी पैसे खर्च करू? गरज नसताना उंची शालू नेसू?

     चार दिवसांनी विदयाताईच्या भाच्याचे लग्न. विदयाताई आणि लक्ष्मीची जोरात तयारी सुरु होती; पण मालती शांत होती.. लग्नाला जाताना दोघीनी नवीन शालू आणि भरपूर दागिने अंगावर घातले.. तर मालतीने एकही दागिना घातला नाही.. तिला अशी पाहून विदयाबाई कडाडल्या. ”काय हे लंकेच्या पार्वतीसारखे.. एकही दागिना नाही अंगावर..”
"मला दागिन्याची हौसच नाही.”

"अगंपण माझ्या माहेरचं लग्न.. सर्वजण तयारी करून येणार आणि माझी सून.. अशी?”

"लक्ष्मी आहे ना दागिने घालून.. एका सुनेने नाही घातले तर काय होते?” विदयाताईचा नाईलाज झाला.. रागारागाने त्या गाडीत बसल्या. त्यांच्या बाजूलाच मालती दागिने न घालता बसली. रात्री अजयचा फोन आला.. "मालू.. तुला कसला त्रास होतो आहे का?”

"नाही..”

"मग आजच्या लग्नात साधी साडी.. दागिने घातले नाहीस..” तिच्या लक्षात आले सासूने मुलाला फोन करून सांगितले असणार.

"नाही रे.. खरं तर मला नटणे आवडत नाही.. दागिन्याची हौस नाही..”

"कमाल आहे.. कुठल्या स्त्रीला दागिन्याची हौस नसते.. हे मी प्रथमच पहातो आहे..तुझे असे विचार पहिल्यापासून आहेत काय?”

"काही प्रमाणात होते.. पण त्या दिवशी अचानक माझी वर्गमैत्रीण अनुजा भेटली आणि तिची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झाले.. मी उंची साडया नेसाव्या, दागिने घालावे असा काय मोठा पराक्रम केला आहे? मी श्रीमंत बापाची लेक आणि श्रीमंत घरातली सून.. एवढाच माझा पराक्रम..”

"खरे आहे.. जगात अशी विषमता आहे खरी.. पण त्याला आपण काय करणार?”

"काही तरी करावे असे वाटते.” अजयने फोन ठेवला.

एक दिवस तिच्या जाऊने लक्ष्मीने तिच्या मुलाला अनिकेतला पार्कमध्ये न्यायचे ठरविले. सासू आणि मालतीपण सोबत होत्याच.. अनिकेत पार्कमध्ये थोडा खेळला आणि शेवपुरी मागायला लागला.. मालती त्याला घेऊन कोपऱ्यातल्या भैय्याकडे गेली.. तिने चार शेवपुरी बांधून घेतली, इतक्यात तिचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या भिकाऱ्यांच्या मुलाकडे गेलं.. ती दोन मूलं.. अंगात धड कपडे नाहीत.. केसाला कित्येक दिवस तेल नाही.. तिच्याकडे काही तरी मागत होती.. मालतीला गलबलून आलं.. काय ही गरिबी.. तिने झटकन हातातील शेवपुरीची पूडी त्या मुलांना दिली. तिने भैय्याला पुन्हा ऑर्डर दिली. ती घेऊन जाताना ती पहात होती... ती दोन मुले त्या शेवपुरीवर तुटून पडली होती.. तिच्या डोळ्यात समाधान होतं.

तिची सासू आणि जाऊ सर्व पहात होत्या.. तिने त्या भिकारी मुलांना ती पूडी दिल्याचे त्यांना आवडले नव्हते.

"अशाने भिकारी कमी होत नाहीत.. वाढतात.. काम न करता खायला मिळाले ना.. मग काम कशाला करायला हवे?”

"ती करतील हो.. करतील... गरिबी हा त्यांचा दोष नाही.. समाजाचा आहे..समाजात श्रीमंत गरीब अशी दरी पडली आहे.. आहे त्यांना त्याचे काय करावे असा प्रश्न पडला आहे.. आणि नाही त्यांना.”. तिला अनुजा आठवली.. धक्के खात रोज नालासोपारा.. मग चालत.. पुन्हा दुसऱ्या दिवशी उलट प्रवास..

मालतीला रात्रभर झोप आली नाही.. पार्कमधील ती दोन पोरे.. त्यांंचे आसूसलेले डोळे, तिचा पिच्छा पुरवत होते. आज या मुलांना आपण शेवपुरी दिली पण उदया कोण देणार? बहुतेक लोक आपल्या सासुसारखे त्यांना हिडीसफिडीस करणार.. मग काय करतील ती मुले..दुसऱ्या दिवशी अजयचा फोन आला तेंव्हा तिने कालचा पार्कमधील प्रसंग सांगितला.. पण त्या आधीच त्याच्या आईने तो सांगितला होता. अजय म्हणाला..."अशी दरी आहेच, पण आपण काय करू शकतो..अशा किती मुलांना आपण जेऊखाऊ घालू शकतो..” तिने फोन ठेवला.

त्यांच्या घरात सरस्वती बरीच वर्षे  कामाला येत होती.. मालती लग्न होऊन आली, त्या दिवसापासून सरस्वती होती.. घरातील भांडी.. लादी.. कपडे.. तीच करायची. अचानक ती यायची बंद झाली. तिचा नंबर लक्ष्मीकडे होता.. ती रोज फोन करायची पण कुणीच उचलायचा नाही.. घरातली कामे करायची सवय नसल्याने पंचाईत झाली.. पण मालतीने तिची कामे केली. पण तिच्याही मनात येत होते.. सरस्वती यायची बंद झालीच; पण फोन पण बंद? तिने लक्ष्मीला तिच्या घरचा पत्ता विचारला आणि चौकशी करत करत ती सरस्वतीच्या झोपडीत येऊन पोचली... ते दारिद्रय. ती उघडी गटारे.. नागडी पोरं.. डुकरे घुशी, उंदीर यांचा सुळसुळाट... दारू, जुगार.. नशिले पदार्थ..भडक कपडे घातलेल्या मुली.. सगळीकडे नुसती घाण.. मुंबईची ही दुसरी बाजू मालतीने फक्त सिनेमांत पाहिली होती. तशाच एका झोपडीत सरस्वती झोपली होती.. नागीण नावाच्या आजाराने तिला घेरले होते. पाठीपासून छातीपर्यत नागीण पसरली होती.. मालतीने टॅक्सी मागवली आणि सरस्वतीला केइएम हॉस्पिटलमध्ये पोचवले.. सरस्वतीच्या घरातील आणि आजूबाजूची गरिबी पाहून ती अस्वस्थ झाली.. कशी राहतात ही माणसे? यांना कसे बाहेर काढता येईल या घाणीतून? काय करावे?अनेक प्रश्न तिला पडत होते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या सरस्वतीची ती चौकशी करत होती.. उपचारानी सरस्वती बरी होत होती.

 .. तीन महिन्याचे काम संपताच अजय परत आला आणि मालती खूष झाली.. तिच्या विचाराचा आदर करणारा घरात तिच्या हक्काचा माणूस अजय होता. ती आता अजयशी या विषयावर बोलू लागली. अजयलापण तीचं कौतुक होतं.. लहानपणापासून श्रीमंतीत राहूनसुद्धा तिला गरिबांबद्दल दया वाटतं होती.. जगातील दारिद्रय कमी व्हायला हवे यासाठी तिला प्रयत्न करायचे होते.. पण सुरवात कशी करावी हे कळत नव्हते. अजयने तिला एक मॅगेझीन आणून दिले.. त्यात पुण्यातील एक डॉक्टर भिकाऱ्यांच्या मुलासाठी शिक्षण हा उपक्रम राबवत होता.. त्यासाठी समाजातील बरीच मंडळी आर्थिक आणि शारीरिक मदत करत होती. ती अजयला घेऊन पुण्याला गेली आणि या डॉक्टरना भेटली.. त्यांंचे काम पाहिले.. ती प्रभावित झाले. ती डॉक्टरना म्हणाली.. ”तुमच्यासारखें मलाही काम करायचे आहे.. सुरवात कुठून करू?”

"तुम्ही ओळखता अशा एखाद्या दरिद्री कुटुंबापासून सुरवात करा.. त्या कुटुंबाला आधार द्या.. मुलांना सुशिक्षित करा..”

मालती विचार करत राहिली.. कुठून सुरवात करू? अचानक तिच्या डोळयांसमोर सरस्वतीची झोपडी आली.. त्या झोपडीत सरस्वतीची नवऱ्याने टाकलेली मुली आणि तिची दोन मुले होती.. सरस्वती आता बरी होऊन घरी आली होती. ती सरस्वतीच्या घरी गेली.. सरस्वतीच्या मुलीची दोन मुले अजून शाळेत जात नव्हती.. आजूबाजूला अशीच आणखी बारा मुले होती. तिने अजयला सांगून एक गाडी ठरवली आणि या चौदा मुलांना दादरच्या शाळेत प्रवेश घातले. सरस्वती सून घरात बसुन होती तशीच आजूबाजूला सहा मुली घरात रिकाम्या होत्या. कुर्ल्याच्या गार्मेंट कंपनीत या मुलींना नोकरी मिळवून दिली..ही बातमी कळताच अजून स्त्रिया तिला भेटायला आल्या.. त्या सर्वाना तिने हॉस्पिटल, मॉल, कुरिअर सेवा, हॉटेल्स अशा ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्या भागात आता तिच्या शब्दाला किमत आली.अजय कौतुकाने सर्व पहात होता.. मालती खूष होती.. पुण्याचे डॉक्टरपण फोन करून चौकशी करत होते.

मालतीचा व्याप वाढला.. मग संध्या, मीना तिच्या मदतीला आल्या.. काही कार्पोरेट्‌सकडून मदत मिळू लागली. पेपरमधून मुलाखती येऊ लागल्या. मुलाखतीत ती म्हणाली "मी बेचैन स्त्री आहे.. मी अस्वस्थ असते.. मला पैसे-दागिने यात समाधान नव्हते.. समाजातील बरीच लोक दारिद्रयात आहेत, त्या सर्वाना आपण बाहेर काढू शकत नाही.. पण निदान काहीजणांना. पुण्यातील एक डॉक्टर भिकारी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.. प्रत्येकाने स्वाभिमानाने जगायला हवे. भीक मागून नव्हे..”

 खुप दिवसांनी अजय आणि मालती गप्पा मारत चहा घेत होती.. अजय गमतीने म्हणाला "मालू.. झोपड्यातून शाळेत न जाणाऱ्या मुलांना तू शाळेत पाठविलेस..पण आता आपण आपल्या मुलांचा विचार करूया का..त्याच्या गमतीने मालती लाजली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली,  होय.. आता विचार करूयाच.”
  -प्रदीप केळूसकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दीप अमावस्या : एक दीप संस्कार