अजूनही रेंगाळते..चव जिभेवर

आम्ही विकत होतो ते फरसाण म्हणजे मिक्स फरसाण, भावनगरी, पोहा चिवडा, मका चिवडा, शेव चिवडा, उपवासाचा बटाटा नि साबुदाणा चिवडा, शेव, तिखट शेव, लसूण शेव, नायलॉन शेव, नडियादी भुसा, मूगडाळ, मसाला शेंगदाणे, कचोरी, बाकरवडी असे नाना प्रकार. प्रत्येक वस्तूची चव खासच ! ज्यांनी ज्यांनी माझ्या दुकानातील हे सर्व खाल्लंय ते ती चव विसरूच शकत नाहीत. ‘अजूनही रेंगाळते.. ती चव जीभेवरी.    

      कोणत्याही श्लोक किंवा ओवीतील ही ओळ नाही , तर आमच्या असंख्य ग्राहकांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. आमच्या दुकानातील फरसाण' ज्यांनी ज्यांनी खाल्लंय त्यांना ती चव आजही आठवते हेच आमच्या यशाचं गमक आहे.

    आमचं अरुण स्टोअर्स' दुकान म्हणजे हवं ते मिळण्याचं हमखास ठिकाण. जेव्हा चालू केलं तेव्हा किडुकमिडूक, मग कटलरी, त्यानंतर स्टेशनरी आणि सगळंच एकत्र आहे म्हणून जनरल. असं बदलत बदलत गेलं. काळाबरोबर चालताना खूप काही बदलावं लागतं. स्वतः काय विकायचं यापेक्षा लोकांना काय हवंय याकडे जास्त लक्ष असायचं. त्यातच भर पडली ती औषधांची.. शेवटी नुसतं असलेलं अरुण स्टोअर्स हे मेडिकल आणि जनरल स्टोअर्स असं ओळखलं जाऊ लागलं. अर्थात त्यासाठी केलेले कष्ट म्हणजे एक तपश्चर्याच होती. या सा-या उलथापालथीत एक महत्वाचं तत्व होतं ते म्हणजे दुकानातून जे जे विकायचं ते उत्तम दर्जाचंच. ते तत्व शेवटपर्यंत सांभाळलं. आजही दुकान बंद करुन एक तप होऊन गेलं तरी ग्राहकांच्या मनात आमचं स्थान तसंच आहे. असो.  आता वळू या आजच्या आठवणीकडे...ती आठवण म्हणजे मी विकत होतो त्या फरसाण' बद्दलची...

     आजकाल नव्हे, तर पूर्वीपासूनच ब-याच दुकानातून फरसाण मिळतं. आम्ही विकत होतो ते फरसाण म्हणजे मिक्स फरसाण, भावनगरी, पोहा चिवडा, मका चिवडा, शेव चिवडा, उपवासाचा बटाटा नि साबुदाणा चिवडा, शेव, तिखट शेव, लसूण शेव, नायलॉन शेव, नडियादी भुसा, मूगडाळ, मसाला शेंगदाणे, कचोरी, बाकरवडी असे नाना प्रकार. प्रत्येक वस्तूची चव खासच ! ज्यांनी ज्यांनी माझ्या दुकानातील हे सर्व खाल्लंय ते ती चव विसरूच शकत नाहीत. ‘अजूनही रेंगाळते.. ती चव जीभेवरी..!'

   अर्थात तुम्ही म्हणाल, यात एवढं स्पेशल काय होतं? तर ते फ्रेश, उत्तम तेलात बनवलेलं आणि कायम एकाच चवीचं असायचं... त्यात कधी फरक नसायचा. शहापूर-ठाणे येथील कारखान्यात ते बनायचं आणि रत्नागिरीपर्यंत सप्लाय व्हायचा. सचिन नावाचे सेल्समन होते. ठाण्याहून कोकणात जाताना केवळ माझ्यासाठी ते वडखळपासून चोंढी पर्यंत येत. बाकी कुठेही न देता ते परत जात. अर्थात माझी मागणीही मोठी असायची. गणपती, दिवाळी, होळी, कोजागिरी अशावेळी दिडशे दोनशे किलोही माल मी घ्यायचो. काही ग्राहक तर फक्त फरसाणसाठी माझ्या दुकानात येत असत. तसंच आजिवली-पनवेल येथून शतरंज कंपनीचे बटाटा वेफर्स, तिखट नि साधी बटाटा सळी आणि केळा वेफर्स यायचे.

      मी दुकान बंद केल्यानंतर भेटलेला प्रत्येक ग्राहक एकच तक्रार करायचा की, आता तुमच्यासारखं फरसाण आम्हाला कुठेच मिळत नाही. माझ्या दुकानातील प्रत्येक वस्तूची गि-हाईक अजुनही दुस-याशी तुलना करताना पाहून मन भारावून जातं..   - विलास समेळ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

असंघटित कामगारांच्या हवकांसाठी कुणीही नाही!