छत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा मानांकनाने सन्मानित!

युनेस्को कडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकूण १२ किल्ले यांना जागतिक वारसा स्थान प्राप्त झाल्याने खूप आनंद आहे.यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रातील असून उर्वारित एक किल्ला हा तामिळनाडू येथे आहे. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड,लोहगड, साल्हेर, खांदेरी, सिंधुदुर्ग, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि जिंजी यांना हा मान, सन्मान प्राप्त झाल्याने साहजिकच दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्यामध्ये आनंदाचे उधाण आले आहे.

      एकूणच जागतिक वारसा स्थान प्राप्त झाल्याने आपणास पर्यटन विकास, स्थानिक रोजगार संधी, वारसा संरक्षण, आर्थिक मदत आणि जागतिक पातळीवर आपणास छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्याकाळी असलेले आधुनिकतेला साजेशे धोरण जगाला समजण्यास, बघण्यास मदत होणार आहे. आज भारतातील ज्या स्थळांना, जसे वेरूळ, अजिंठा लेणी, कोणार्क सूर्य मंदीर, ताजमहाल यांना युनेस्कोकडून दर्जा प्राप्त आहे,त्या स्थानाचा विचार करता, खूप फरक पडू शकतो. यातून खूप महत्वाचे म्हणजे प्राचीन स्थळांचे संवर्धन पुढील अनेक पिढ्या,युगांसाठी आपणास करता येईल.

     युनेस्को कडून दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी माणूस खूप आनंदी असेल, प्रश्नच नाही; मात्र ज्या हिंदू धर्मात चार धाम, अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचे जीवन मुक्तीसाठी कर्तव्य आहे, त्यांनातरी आपण निदान आता युनेस्कोने ज्या गड किल्ले यांना जागतिक वारसा म्हटलं आहे, ते बघावे असे वाटले पाहिजे. किती लोकं, किल्ले बघतात हादेखील उत्कंठा वाढवणारा प्रश्न असेल. मुळात आपण आजकाल शिवराय यांचे नाव घेतो, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागा पावित्र्य समजून घेतले पाहिजे. जगाला कळले ते आपणास वळले तर खूप काही होऊ शकते. जागतिक वारसा प्राप्त झाल्याने या सर्व गड किल्ले यांच्यावर पर्यटक यांच्यासाठी राहणे, फिरणे, निवास, मूलभूत सुविधा यावर भर दिला गेला पाहिजे. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात, सर्वच गडावर सुलभ असे शौचालय उभारले होते, आज मात्र आपणास ती सुविधा, त्या ठिकाणी देताना नाकी नऊ येते, असे वाटते.

  जागतिक वारसा स्थान प्राप्त झाले; मात्र बाहेरील पर्यटक आल्यावर त्यांना हवं ते देणे, निर्माण करणे, तशी व्यवस्था, व्यवस्थेने उभारणे गरजेचे आहे. एक पर्यटक येतो तेव्हा तो, त्याचे पोटदेखील घेवून येतो, म्हणून भारतीय खाद्य पदार्थ यांना जगापर्यंत नेण्यासाठी, आपणास वाव आहे. बाहेरील पर्यटक आल्यावर तो फक्त पन्हाळा करून घरी न जाता कोल्हापूर देखील त्याच्या पाठोपाठ कुतूहल विषय ठरू शकतो, म्हणजेच पर्यटन व्यवसाय हा जितका आपण वाढवू तितका वाढवू शकतो.

     वरील सर्व ठिकाणी जाण्यासाठी..येण्यासाठी आपणास रस्ते, रेल्वे, विमानतळ, जलमार्ग असे विविध प्रवास व्यवस्था अद्ययावत द्यावे लागणार आहे. एकतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपणास स्वच्छता ही लक्ष्मी असते, हे लक्षात घेऊन काम उभे करावं लागेल. मूलभूत विकास कामे करताना जागतिक वारसा प्राप्त स्थळांना लक्षात घेऊन नियोजनपूर्वक कामे करावी लागतील. निकषांचे पालन न केल्याने ओमानमधील अरेबियन आवरिक्स हे अभयारण्य आणि जर्मनीतील डेस्टडन व्हॅली यांचा जागतिक वारसा दर्जा काढून घेण्यात आला आहे, हेदेखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

      मानवाचा सांस्कृतिक इतिहास हा १५ लाख वर्षापेक्षा जास्त आहे. आजमितीस जगात १२२३ स्थळांना हा दर्जा प्राप्त असून, १६८ देशांमध्ये हा वारसा आज वसला आहे. ९५२ सांस्कृतिक,२३१ नैसर्गिक, ४० संयुक्त, मिश्र स्थळे आहेत. आपल्या देशात आजपर्यंत ४२ स्थळांना हा दर्जा प्राप्त असून, भारतातील ४३ वे जागतिक वारसा स्थळ म्हणून, भारताचा मराठा लष्करी भूप्रदेश हा गौरवलं जाणे एक मोठा अभिमान आहे.

    जागतिक वारसा प्राप्त स्थळे आज जगात हजारो आहेत, त्या सर्वच स्थळांना काही लाखो पर्यटक भेटी देत नाहीत, हे देखील खरं आहे. त्या स्थळांना पर्यटक पसंदी कमी असल्याचे कारण म्हणजे आपण मार्केटिंगसाठी कमी पडलो, पडतो हे वास्तव आहे.

    खासकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपणास खूप मोठा असा सर्व महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुधारेल असे काम करण्यास खूप मोठी संधी आहे,तिचे सोने करणे गरजेचे आहे. आपणास जर ही संधी घेता आली नाही तर ते एक दुर्भाग्य असेल.

      दुबई, सिंगापूर मलेशिया थायलंड हे देश त्यांच्याकडे काही नसतानादेखील, वाळूत इमारती, किल्ले, बगीचे, करमणूक केंद्र उभारून करोडो रुपये छापत आहेत. त्यांना पिण्याचे पाणी, फळं, भाजीपाला देखील आयात करावा लागतो तरी ते देश, आपल्या देशाची सर्व अर्थव्यवस्था पर्यटन व्यवसाय हा जीवन. मार्ग ठरवून काम करत आहेत.

    यासाठी जे,जे अधिकारी यांनी जीवाचे रान केले त्यांचे आणि भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांचेदेखील शिवभक्त म्हणून मनापासुन आभार! -प्रा. रवींद्र पाटील (शिव व्याख्याता) अध्यक्ष, शिव तुतारी प्रतिष्ठान, नवी मुंबई 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा महोत्सव