अंगतपंगत

आपल्याच शेजारी पाजारी बनणारे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ घेऊ या आपल्या ताटात, तेंव्हाच समोरच्यांच्या आयुष्याचीही चव लक्षात येईल संवादातून मग कळेल अरे संघर्षात जगणारे फक्त आपणच नाही; तो प्रत्येकाला आहे. फक्त प्रत्येकाच्या संघर्षाचा रंग वेगवेगळा आहे, कुणाला लेकरू नसल्याचा, कुणाला नोकरी नसल्याचा, कुणाला पैश्याने कुणाला आजाराने संघर्ष करावाच लागतोय,..मग ह्यात काय जशी दुसऱ्याची भाजी अंगतपंगतला ताटात घेतल्यावर बरं वाटतंय तसं दुसऱ्याला पण संघर्ष आहे आपण काही एकटे नाही ही भावना बळावून जगण्याला आणखी उत्साह येणार आहे.

 "चल कल्पना जरा शेवयाची खीर करून घेतेस का? मी समोरची खोली झाडून घेते..खरंतर आमची अंगतपंगत नेहमी गच्चीवर लिंबाच्या सावलीत असते पण आज नेमकं आभाळ आहे ना त्यामुळे आपल्याकडे ठरलंय, तू आटपून घे लवकर कारण बायकांचा घोळका आला ना की गप्पांमुळे काही सुचणार नाही.”

  कल्पनाने शेवया परतायला घेतल्या, एकिकडे दूध तापवायला ठेवलं, तिला वहिनींनमधला सकाळचा नवरा बायकोचा संवाद आठवला, "अहो जरा दूध जास्त आणायचं आहे, आज आमची अंगतपंगत आहे काहितरी गोडधोड म्हणून खीर करते, जोशी काकु येतील. आज नवरा वारल्यानंतर त्यांना बोलवायचं राहिलं, पलीकडच्या अविच्या बायकोची गोड बातमी आहे, सुमती आजीची नात मोठी झालीए. तिचंही कौतुक करायचं आहे, माणकेबाईंचा पोरगा मेरीटमध्ये आला त्या माऊलीचं कौतुक गोडधोडाने होईल.” त्यावर त्यांचे नवरोबा म्हणाले, "अहो राणीसरकार, तुमचा निर्णय आम्ही नाही थोडीच म्हणणार आहे, हे घ्या शंभर रुपये आणि हवं ते आणा म्हणजे तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी गजरेही आणा हवे तर आणि तुम्ही लावा एखादा, तुम्हालाही गोड खीर हवी ना! आपलं सगळं आहे त्यात धकवून नेहमी आनंदी राहता तुम्ही.” ...वहिनी लगेच म्हणाली होती,"अहो हे आनंदी राहणं ना तुमच्या चाळीतल्या बायकांनी शिकवलं आहे मला..ह्या अंगतपंगत मधून, सहा एक महिन्यात कधीतरी आम्ही भेटतो रोजच्यापेक्षा वेगळं एकमेकींचे लाड पुरवायला,  वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी भरते, कुणाच तिखट तर कुणाच आंबट, कुणाचं गोड तर कुणाचं साधं जेवण आणि त्या सोबत संवादाची असणारी देवाणघेवाण ह्या पदार्थांसारखीच सुरू असते. कुणीतरी आयुष्यातला गोड अनुभव सांगते तेवढ्यात कुणाचं तरी जखमेवर मीठ चोळलं जावं, असा आयुष्याचा अनुभव असतो, कुणीतरी साधं सरळ काहितरी नात्यातला मांडत तर कोणी अध्यात्माचं सार गप्पांतून मांडून जातं,..चला बोलत बसायला विषय तसा आवडीचा आहे द्या. ते पैसे तुम्हालाही मिळेल हो आज गोड खीर” असं म्हणत उत्साहाने वहिनींनी सगळी तयारी केली होती, विनयच्या ऑफिसच्या कामामुळे आपण दोन दिवस पाहुण्या असलो तरी आपली अडचण न वाटून त्यांनी अंगतपंगत करायचं ठरवलंच होतं, कल्पनाला मनात वाटलं खरंच हाय सोसायटीत असला आनंद नाहीच घेता येत, प्रत्येक जण आपल्या मोठेपणाची प्रौढी मिरवतो आता अंगतपंगत तर आपल्या सोसायटीत होतच नाही; पण भिशी पार्टी अशीच काहीशी पण पदार्थांपासून इतर सगळ्याच गोष्टींचं प्रदर्शन करणारी. खरंच ही अशी अंगतपंगत व्हायलाच हवी असं कल्पनालाही वाटून गेलं.

  वहिनी आत आल्या तेंव्हा कल्पनाने हे बोलून देखिल दाखवलं,..त्यावर वहिनी म्हणाल्या, "खरंतर मी आले त्या वातावरणात असलं काही नव्हतंच, शिष्टाचाराने दार लावून जेवणं, कोणी आलं तरी हॉलमधून ताट घेऊन आत पळत जाणाऱ्या संस्कृतीतून मी आले. मला नवीन नवीन रुळायला वेळ लागला; पण आवडायला लागलं हे असं अंगतपंगत मधुन होणारं वेगवेगळ्या आयुष्याची देवाणघेवाण करणं, आपण जगत असतो आपलीच सुखदुःख कुरवाळत फारसं कोणाशी विचारांची देवाणघेवाण न करत अगदी आपल्या रोजच्या जेवणासारखं आपलं आपलं जेवून घ्यायचं; पण त्यात ही संकल्पना आवडली जुनीच असली तरी हल्ली बऱ्यापैकी बंद पडलेली.. पण ह्या सोसायटीत अखंड चालू असलेली अंगतपंगत देवाणघेवाण. आपल्यापेक्षाही संघर्ष करत जगणारे आयुष्य असतात. त्यांना बघून शिकता येतं, ह्या विचारांच्या अंगतपंगत मधुन भावना आणि पदार्थ दोन्ही खुप काही शिकवून जातात. एक वेगळाच उत्साह, एक वेगळी किनार आयुष्याला मिळते. तू बघच आज.” म्हणत वहिनींनी मघाशी आणलेले गजरे दोन दोन तुकड्यात केले. "अगं, सगळ्यांना पुरवायला हवे," दाराशी सुंदर रांगोळी सजली, देवासमोर सुंदर सुवासिक उदबत्ती लावली आणि छोटयाश्या वाटीत खिरीचा नैवेद्य देवासमोर ठेवत वहिनी म्हणाल्या, "आमच्या अंगतपंगत मधला तू मुख्य पाहुणा प्रत्येकाच्या चैतन्यातून डोकावणारा मग पहिले आजची स्पेशल डिश तू घे आणि अशीच सगळ्यांच्या विचारांनी आयुष्याची अंगतपंगत आनंदी होऊ दे.”

    चाळीतल्या छान आवरून एकएक जण येत होत्या आपले डबे मध्यभागी मांडून पटापट पान मांडत होत्या, काही ज्येष्ठ बायका हे सगळं परंपरेने चालू आहे आपल्या सोसायटीत ह्याच कौतुक करत होत्या..पदार्थांची ताटात रेलचेल झाली होती,.. खिरीच्या वाट्या सजल्या.. ‘वदनी कवळ घेता' म्हणत हसत खेळत जेवणं सुरू झाली,..गप्पांना वेग आला, अगदी मनमोकळेपणाने पदार्थांसारखीच भावनांची देवाणघेवाण सुरू होती, कुणाचं एखादं दुखणं त्यावर दहातरी उपाय सापडत होते, कुणाच्या आर्थिक अडचणींसाठी घरगुती तोडगे सांगितले जात होते, कुणी फार दिवसात कुणाशी बोलणं झालं नाही म्हणत मनसोक्त गप्पा मारत होत्या, कुणी कुठे काय छान मिळतं याची यादी देत होत्या. एकंदर सगळं हलकेफुलकं वातावरण होतं,..तेवढ्यात जोशी काकूंना ठसका लागला, डोळ्यातून खळखळ पाणी आलं, ठसक्याचं पाणी काकांच्या आठवणीने वहायला लागलं हे सगळ्यांनी ओळखलं, सगळ्यांचेच डोळे पाणावले कारण ही अंगतपंगत चाळीत काकांनीच सुरू करायला लावली होती बायकांना,..काका म्हणायचे,.."तुम्ही बायका एकट्या असल्या की विचार तुमच्यावर राज्य करतात, जरा महिनाभरात एकमेकींना भेटत जा एकमेकींचे लाड करत जा, ह्या अंगतपंगत मध्ये सगळ्याच तुम्ही सासुरवाशिणी आपलं माहेरचं अंगण सोडून आलेल्या इथे एकत्र येऊन एकमेकींना आई, मावशी, ताई बनवा आणि चालू द्या विचारांची अंगतपंगत. म्हणजे मोकळ्या राहताल, साचत गेल्या तर मानसिक उपचार करायची वेळ येईल. मी बघतो आमच्या दवाखान्यात येतात अश्या बायका तेंव्हा वाईट वाटतं. ह्यांना कोणीच कसं जमवता आलं नाही आयुष्यात, मग वाटतं आपल्याच भोवताली असतात हे माणसं म्हणून ही अंगतपंगतची कल्पना सुचली, आपल्याच शेजारी पाजारी बनणारे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ घेऊ या आपल्या ताटात, तेंव्हाच समोरच्यांच्या आयुष्याचीही चव लक्षात येईल संवादातून मग कळेल अरे संघर्षात जगणारे फक्त आपणच नाही; तो प्रत्येकाला आहे. फक्त प्रत्येकाच्या संघर्षाचा रंग वेगवेगळा आहे, कुणाला लेकरू नसल्याचा, कुणाला नोकरी नसल्याचा, कुणाला पैश्याने कुणाला आजाराने संघर्ष करावाच लागतोय,..मग ह्यात काय जशी दुसऱ्याची भाजी अंगतपंगतला ताटात घेतल्यावर बरं वाटतंय तसं दुसऱ्याला पण संघर्ष आहे आपण काही एकटे नाही ही भावना बळावून जगण्याला आणखी उत्साह येणार आहे. जसा दुसऱ्याच्या घरचा पदार्थ खाऊन जेवणाला चव येते तसंच आहे हे ह्यातून जगण्याचा सोहळा करायला शिका एखादा गोड पदार्थ निमित्त म्हणून खाऊ घाला. सगळ्यांना मनाला आनंद मिळतो; पण तो मिळवण्याची तयारी पाहिजे..” इतकं साधं अंगतपंगतचं गणित मांडून काका आज ही परंपरा चालू ठेवून निघून गेले होते,..सगळ्यांनी डोळे पुसले. परत विषयांतर झालं,..हसत खेळत अनेक विषय हाताळले. मनं मोकळी झाली. संवादाची देवाणघेवाण होऊन गजऱ्याच्या सुगंधी निरोपाने अंगतपंगत संपली..घरभर मोगऱ्याची दरवळ झाली.. - स्वप्ना मुळे (मायी) 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

छत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा मानांकनाने सन्मानित!