दडपण... एक कविता

कोमसापच्या रत्नागिरीमधील पहिल्याच साहित्य संमेलनात स्वलिखित ‘दडपण' ही आठ ओळीची मराठी कविता मी सादर केली. अगदी मोजक्या शब्दांत...कसलेही हातवारे न करता कविता थेट दर्दीपर्यंत पोहोचली, ते मला टाळ्यांचा आवाज ऐकून कळले कविवर्य वसंत बापट यांनी "कवितेला विषय आहे, सादरीकरण उत्तम!” त्यांचे तसे बोलणे अनपेक्षित होते,  पण स्फूर्ती देणारं नक्कीच होते. याला म्हणतात मनाचा मोठेपणा!  मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट हे मराठी कवितेचे महामेरू, त्रिदेव! एका अनोळखी कविची शाब्दिक दखल घेतात, तोच मोठा पुरस्कार.

चिपळूण येथील (कोमसाप) कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या काव्य स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मला लाभला. पोस्टाने दोन कविता पाठवल्या होत्या, त्यांतून दडपण शीर्षक असलेली कविता निवडण्यात आली, जी व्यासपीठावर उपस्थित राहून सादर करायची होती. तसें लिखित पोस्टकार्ड आयोजकांनी पाठविले होते. तो काळ सोशल मिडियाचा नव्हता. अन्यथा व्हिडिओ कॉल करुन कवीने कविता वाचली असती आणि व्हाट्‌सएपद्वारे प्रमाणपत्रही मिळवले असते! कदाचित सादरीकरण करतानाचा फोटो सुध्दा शेअर करता आला असता.

कोमसापचे रत्नागिरीतील ते कदाचित पहिलेच साहित्य संमेलन असावे.  श्री.मधु मंगेश कर्णिक सर आणि सर्वश्री नाना जोशी यांचे अचूक मार्गदर्शन त्यांस लाभले होते. सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरुन गेले होत. मी काहिसा बावरुन गेलो होतो. २६-२७ डिसेंबर, १९९२ हा तो मराठी साहित्य संमेलनाचा नियोजित काळ होता. किमान माझ्यासाठी तरी संपूर्ण माहोल पूर्ण अनोळखी होता. असा हा मराठीचा जयघोष करणारा जमावडा मी याआधी केव्हाच पहिलाच नव्हता. तसे पाहता त्याआधी मी इतरत्र मराठी, हिंदी, उर्दू स्वलिखित काव्य लहानसहान मैफलीतून सादर केले होते. पण तेथे बहुतांशी लोक आपल्या ओळखीचे असत. येथे चार पाचशेच्या रसिक श्रोत्यांसमोर कविता सादर करणे माझ्यासाठी तसे नवीनच होते. पूर्वी कॉलेजात असतांना, मित्रांसोबत सहजपणे गाणी सादर करत असे. अगदी तरन्नुममध्येही काव्य गायचो. विदेशात संमिश्र असा काव्यानुभव घेतला होता. पण यावेळी ज्या कवितेची निवड करण्यात आली होती ती मी लिहिलेली मुक्तछंदातली मराठी कविता होती. व्यासपीठावरुन काव्य, ‘गाऊन'  सादर करणे तसे आक्षेपार्ह होते. माझ्या नावाची घोषणा होईपर्यंत इतर कवी-कवयित्रीं आपापल्या कविता कशा सादर करतांत त्याचे मी बारकाईने निरीक्षण करु लागलो. जे हातात कागद घेऊन कविता सादर करत होते त्यांस उपस्थित श्रोते कंटाळून गेले होते. कविता ज्यांना तोंडपाठ होती ते हातवारे करुन श्रोत्यांच्या टाळ्या वसूल करत होते. सादरीकरण पूर्ण होताच व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांच्या हस्ते कवीचे नाव लिहिलेले छापील प्रमाणपत्र तात्काळ दिले जात होते. स्पर्धा... हा विषय नव्हता. हे तेंव्हाच कळले. माझे नाव ध्वनीक्षेपातून पुकारण्यात आले. स्वलिखित ‘दडपण' ही मात्र आठ ओळीची मराठी कविता मी सादर केली. अगदी मोजक्या शब्दांत...कसलेही हातवारे न करता कविता थेट दर्दीपर्यंत पोहोचली, ते मला टाळ्यांचा आवाज ऐकून कळले. त्या शिवाय व्यासपीठावर स्थानापन्न झालेले तत्कालीन नामवंत कवीश्रेष्ठींनी माझ्या कवितेची तत्काळ शाब्दिक दखल घेतली. मी दचकलो! कविवर्य वसंत बापट यांनी ”कवितेला विषय आहे, सादरीकरण उत्तम!” त्यांचे तसे बोलणे अनपेक्षित होते,  पण स्फूर्ती देणारं नक्कीच होते. याला म्हणतात मनाचा मोठेपणा!  मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट हे मराठी कवितेचे महामेरू, त्रिदेव! एका अनोळखी कविची शाब्दिक दखल घेतात, तोच मोठा पुरस्कार मिळाला, असे मला वाटू लागले. कवी संमेलनात सहभागाचे छापील प्रशस्तीपत्र कार्यक्रम अध्यक्ष श्री. केतन घाग यांचे कडून स्वीकारून मी पुन्हा श्रोत्यांमध्ये जाऊन आसनस्थ झालो.

दडपण
सुरक्षित अंतर ठेवून देखील
अपघात हे होतातच
विडी सिगारेट न ओढूनदेखील
कन्सरने लोक मरतातच
अर्थ याचा असा नव्हे
माणसाने जगावे वाटेल तसे
नको ते दडपण
जगण्यावर आणून
आनंद जगण्याचा घेऊ नये
तर ते जीवन कसले?

माझे गाव
१९९४ मध्ये प्रकाशित पुस्तकातून.

वरील कविता सादर केल्यानंतर थोड्याच दिवसांनी मला आकाशवाणी रत्नागिरी केंद्राकडून बोलावणे झाले. छान असा आटोपशीर कवितेचा कार्यक्रम रेकॉर्ड झाला. तसे पाहता रेडिओला अजून महत्व होते. पण आजच्यासारखे व्हिडीओ क्लिप शेर करणे शक्य नव्हते. फक्त सागर आणि रत्नभूमी या स्थानिक पेपरात सचित्र बातमी छापून आली, तेवढेच समाधान. आमच्या निमुर्डे गावांत सकाळी रेडिओ आवडीने ऐकला जायचा. ११च्या बातम्या होताच मस्त मराठी गाणी सादर केली जायची. व्हॉल्यूम फुल असायचा, बळीअण्णा पोळेकर हे हौशी माणूस.  यांच्या घरी रेडिओ लागला की मग संपूर्ण गाव ऐकायचा. त्यांचा मुलगा गुरुनाथ मिशीत हसायचा, कारण रेडिओत सेल त्यानेच भरलेले असायचे!

 रेडिओ हे माध्यम गावाखेड्यात वीज नसली तरीही बॅटरी सेलवर त्याचा आनंद घेता यायचा! कोकणातील ग्रामीण भागात आजही विजेच्या तारा सजवलेल्या दिसतील, त्यांत वीजप्रवाह असेंलच ह्याची गॅरंटी चक्क वानरसुद्धा देऊ शकणार नाही, असो. रत्नागिरी आकाशवाणीने कवितेचा रेकॉर्ड केलेला  माझा तो कार्यक्रम नाईलाजाने मी स्वतः एकट्यानेच ऐकला. आडगावात राहून आपला शेती-बागायती व्यवसाय सांभाळून साहित्यिक क्षेत्रात वावरणे तसे कठिणच होते. म्हणूनच ठाण्याचे ललित कला फौंडेशनचे अध्यक्ष आणि मित्र नेहमी प्रश्नार्थक वाक्य बोलतात..."तुम्हांस कोकणात ओळख नाही, याला कारण काय हो?

त्यांच्या या प्रश्नातच उत्तर दडलेले आहे. अर्थातच शांत राहणे ज्यास्त बरे. लेखणी मोठी, हे सर्वश्रुत आहे.

एका मराठी साहित्य संमेलनाच्या पुस्तक विक्री दालनात कवी इलाही जमादार यांची योगायोगाने भेट झाली. काही निवडक विषयांवर थोडक्यात चर्चा झाली. अनुभवाने ते मोठे होते. त्यांचा आदर करुन मी त्यांच्याकडून काही टिप्स मागितल्या. ”लेखी निमंत्रणाशिवाय साहित्यिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये. एका दमात ते हे वाक्य बोलून गेले. त्या दिवशी संमेलनात गुलजार साहेबांनी त्यांना भेटायला बोलावले होते. इलाही यांचा एक कार्यक्रम दापोलीत झाला होता पण काही कारणास्तव मला त्यांत सहभागी नाही होता आले.

माझे एक पुस्तक ‘सहित पब्लिशिंग कंपनीद्वारा' प्रकाशित ‘एक अपूर्ण रचना' दाभोळ येथे डॉ. एम. बी. लुकतुके यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. त्यांस वाचकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी लाभला होता. त्या पुस्तकाची चिंचवड-पुणे येथेही त्यांच्याच बुक स्टॉलवर विक्री सुरु होती. एक वाचक म्हणून लांबून मी हे निरीक्षण करत होतो. संमेलनालगत पुस्तक दालनांत खूप हिंडलो. काही निवडक पुस्तके विकत घेतली.  कुरआनची मराठी प्रत हदिया देऊन बॅगेत जपून ठेवली. विशेष म्हणजे बुक गंगा.कॉम या वेबसाईटवर ‘एक अपूर्ण रचना'  हे पुस्तक ऑर्डर केल्यास एक प्रत घरपोच मिळू शकेल, आजही!

बातें सुनी जासक्ती हैं...रवय्या मेहसुस किया जाता है...

इलाही ऊर्दूतील हे वाक्य बोलून गुलजार साहेबांकडे वळले. काही लोक बरंच काही बोलतात, पण त्यांची वागणूक मनास स्पर्श करुन जाते. इलाही शब्दप्रभू होते, त्यांनी लिहिलेल्या गजला भीमराव पांचाळे हे नेहमी मैफलीतून गातात. दर्दीपर्यंत ती गजल थेट पोहोचते, हे विशेष!

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी झल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
           -इलाही

अनेकदा मी विविध मराठी साहित्य संमेलनाच्या श्रोतेवर्गात आवडीने जाऊन बसतो. एक निरीक्षक म्हणून तसे करणे मला भावते. गुहागर येथील साहित्य संमेलनात ‘वाऱ्यावरची वरात नाटक पाहिले. तेथील सर्व लॉज फुल्ल असल्याने नाटक बधून झाल्यावर गाडीतच झोपायचे, असे मी व चालक सुरेश दोघांनी ठरवले. पण ‘वाऱ्यावरची वरात मध्यांतरपर्यँत पाहुन झाल्यावर तेथून निघून जायचे ठरवले... कारण नाटकातला विनोद... हसून हसून पोट दुखू लागल्याने मला तसा निर्णय घ्यावा लागला.  वाटेत दोन जागी कटिंग चहा घेत शेवटी घर गाठले. तोवर दाभोळ-घोपावे फेरीबोट सेवा सुरु झालेली नसावी.

मराठी साहित्य संमेलन आणि त्यातील नियोजित काव्य मैफलीत एक श्रोता म्हणून पुन्हा आपल्या जागी जाऊन बसलो. मी पाहिले, माझ्याकडे कुणीही निरखून पहात नव्हते...असा भास होऊ शकतो.

‘दडपण कविता सादर केल्यानंतर पुढे मला मंच शोधावे लागले नाही. गतकाळातील प्रख्यात गायक गजानन वाटावे आणि समीक्षक मधुकर टिल्लू यांनी माझ्या काव्य गायनास वाखाणले. आशिर्वाद दिला. उतारवयाचे दडपण अजिबात नाही, पण लांबचा प्रवास सध्या होत नाही. जोवर शरीर साथ देत आहे तोवर साहित्यिक कार्यक्रमात  सहभागी होत राहायचे, अर्थातच इलाही जमादार यांच्या सुचनेस मान देऊनच! तोवर मस्त जगाचे, गाणी रचत, रेकॉर्ड करत स्वतः तसेच काव्य रसिकांनी आनंदाची देवाणघेवाण करत रहायची, अहंकारी जाळ्यात न फसता ...मस्त जगायचे! -इकबाल शर्फ मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं?