गॉड इज ग्रेट...

अण्णा कुणाची तरी वाट पहात होते.. एवढ्यात वाड्याचा दरवाजा करकरला आणि दादा आत आले..

"नमस्कार आण्णासाहेब.. निरोप मिळाला म्हणून..”
"बस बस दादा.. मीच निरोप दिला होता.. अगं ये..” म्हणून अण्णांनी बायकोला हाक मारली तशी त्त्यांची बायको चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली.
"का बरं हाय नव्हे सर्व.. शेती..” तिने दादांना विचारले..
"हाय.. घरची हाय म्हणून करायची.. बाकी..” आणि ते हसले.
"का निरोप दिला अण्णा..”
"व्हय.. तेच सांगतुया.. माझा पोरगा सचिन दिल्लीला जातोय म्हणतोय.. नाटक शिकायला.. म्हणजे दिल्लीला सरकारी नाटकशाळा हाय.. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा.. त्याचे नाव..”
"बर.. मग..”

"आरं तुजा पोरगा गणपत तोपण नाटकात मस्त काम करतोय.. दोघे मित्र हायेत, गणपतला पण इच्छा आहे दिल्लीला जाऊन या शाळेत शिकण्याची.. तर माज्या सचिनसोबत त्यालाबी पाठवितोस का.. असं विचारायचं होत. म्हणून निरोप दिलेला..”

"पण आण्णा.. किती वर्ष?”
"आता जायचे आहे ते निवड होण्यासाठी.. म्हणजे हजारो विद्यार्थी येतात.. त्त्यांची परीक्षा घेऊन चाळीस की पन्नास मूल निवडतात.. निवड झाली तर तीन वर्षे कोर्स.. नाही झाली तर परत यायचं..”
"पण आण्णा.. त्याला जमेल का.. आणि खर्च?”
"सध्यातरी परीक्षेसाठी जायचं.. पास झाल तरी सगळा सरकारी खर्च.. फी, हॉस्टेल, जेवण फुकट.. जर तू पाठवणार असशील तर खर्चाची काळजी करू नकोस.. त्याच मी बघतो.. तू फक्त गण्याला आठ दिवसासाठी सचिनबरोबर पाठव. जाऊ दे पोरांना.. त्यांना बी जग कळायला हवं..”

"बरं आण्णा.. तुज्या शब्दाबाहेर न्हाई मी.. धाडतो गण्याला.. येतो..”

दादा गेले. आतल्या खोलीतून त्यांचे बोलणे ऐकत असलेल्या. सचिन आणि गण्याने एकमेकांना टाळी दिली. या आधी मुंबई पुण्याचीच लोक या संस्थेत जाऊन नाट्य प्रशिक्षण घेत होती.. रोहिणी हत्तंगडी, ओम पुरी, अतुल कुलकर्णी, हृषीकेश जोशी, नासिरभाई..अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष.. अशी काही नावे. आम्ही लहान शहरात राहणारे.. अशीच स्वप्ने पहात होतो.. आणि आमच्या स्वप्नांना खतपाणी घालणारे माझे वडील अण्णा. माझे वडील अण्णा हे उत्तम नट आणि दिग्दर्शक... त्यानी उत्तम नाटकें बसवली.. पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे ते जास्त काही करू शकले नाहीत, पण त्यांना इच्छा होती  मी दिल्लीला जावं आणि NSD मधून नाट्य प्रशिक्षण घ्यावं. पंचवीस जूनपासून चार दिवस NSD मध्ये ट्रेनींग होत आणि मग मुलाखती.. त्या दृष्टीने दिल्लीला पोचायचं होत.एकवीस तारखेची पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या गोवा दिल्ली एक्सप्रेसची तिकिटे काढली.. आमच्या शहरातील नयना पण NSD मध्ये ऍडमिशन मिळावी म्हणून मुलाखतीला निघाली होती.. तिची आईपण सोबत होती. म्हणजेच आम्ही चार लोक पुण्यात गोवा दिल्ली सुपर एक्सप्रेसमध्ये बसणार होतो. आम्ही आदल्या दिवशी पुण्यात आलो. नाट्यस्पर्धेमुळे आमचे अनेक मित्र पुण्यात होते.. त्यातील काही मंडळींना भेटलो.. एका ग्रुपच्या नाटकाच्या तालमीलापण बसलो. रात्री माझ्या बहिणीच्या घरी झोपलो. दुसऱ्या दिवशी पुण्यात थोडीफार खरेदी केली.. दुपारी दोनची ट्रेन.. स्टेशनवर नयना आणि तिची आई भेटली..आम्हा सर्वांचा एकच डबा होता..नयनाने रात्रीसाठी भाकऱ्या, दही, ठेचा आणलेला.. त्यामुळे जेवणासाठी पैसे लागणार नव्हते..माझ्याकडे अण्णांनी थोडे पैसे दिलेले.. गण्याच्या वडिलांनी त्याला पाचशे रुपये दिलेले. जायची यायची तिकिटे काढलेली.. तरीपण काटकसर करून, वायफळ खर्च न करता परत यायचं होत. गाडीत बर्थ पकडले, सामान ठेवलं; पण गण्या मात्र मधल्या पसेजमध्ये उभा राहून हवा खायला उभा राहिला.. तेथे अजून काही तिकिटे कन्फर्म नसलेली लोक बोचकी, बॅगा खाली ठेऊन बसलेली. मी गण्याला म्हंटले अरे, आत बस.. दरवाजात बसू नकोस बाबा.. पटकन तोल जायचा..

"काही होत नाही रे सचिन.. मला हा वारा फार आवडतो.. मी कुठ प्रवास केलाय लेका.. एकदा मुंबई फक्त.. या प्रवासात बाहेरचं जग पहाणार आणि मनसोक्त वारा खाणार.”.
"बर बाबा.. वारा खा. तसा तो फुकटच आहे.. पण जास्त दारात जाऊ नकोस..”

आम्ही दरवाज्यात उभे राहून काय बोलतोय हे पहायला नयना तेथे आली. नयना आमच्या एका नाटकात होती.. त्यामुळे तिची खास ओळख.”
"काय बोलताय रे सचिन..”

"अगं काही नाही ग. मी गण्याला सांगत होतो.. दारात जास्त पुढे जाऊ नकोस.. तोल जायचा आणि आम्हाला सगळ्यांना उद्योग लागायचा..”
एवढ्यात गण्या ओरडला "नयने, तू ये इकडे.. मस्त वारा खा..फुकट आहे..”

नयना हसली, "हो रे गणपत.. मलापण रेल्वेत प्रवास करताना असं बाहेर उभे राहायला आवडते..” मी वैतागून माझ्या बर्थकडे आलो आणि मुलाखतीची तयारी करू लागलो. गाडी दौंड मागे टाकून मनमाडच्या दिशेने धावत होती. ताशी साठ ते सत्तर मैल वेगाने धावणारी गोवा दिल्ली एक्सप्रेस. मी मध्येच टॉयलेटला जायला निघालो तेंव्हा पाहिले, गण्या आणि नयना यांच्या गप्पा रंगल्या होत्या. तिच्यावर एम्प्रेशन मारण्यासाठी असेल कदाचित..पण गण्या थोडासा गाडीच्या बाहेर झुकला होता.. त्याच्या बाजूलाच नयना उभी राहून त्याच्या विनोदावर टाळी देत होती.. मी बर्थकडे आलो तेंव्हा पाहिले.. नयनाची आई झोपी गेली होती. तेंव्हा माझ्या लक्षात आले.. आईला झोपवून नयना मोकळी हवा खात होती. गोवा दिल्ली एक्सप्रेस तुफान वेगाने धावत होती.. आता हळूहळू सायंकाळ संपून रात्र व्हायला आली होती.. एवढ्यात मोठी किंकाळी ऐकू आली आणि पाठोपाठ  "पडला.. पडला.. गीर गया. गीर गया.. अशा ओरडी ऐकू आल्या.. मी झटकन उठलो आणि दरवाज्याच्या दिशेने धावलो.. तर नयना मोठमोठयाने किंचाळत होती... रडत होती.. बाकी लोक गाडीतून मागे पहात होती.. मला पहाताच नयना ओरडली.. "गण्या खाली पडला.. गण्या पडला...काय करायचे हे लक्षात येताच मी धावत गेलो आणि गाडीची चेन ओढली. गाडी हळू हळू थांबत होती.. सारा डबा जमा झाला होता.. दरवाज्यात बसलेले गण्या कसा खाली पडला हे सांगत होते...मी गाडी थोडी थांबली हे पाहिले आणि दरवाज्यातून खाली उडी मारली आणि उलट्या दिशेने धावू लागलो. सचिनने गाडीतून उडी मारली आणि तो उलट्या दिशेने ट्रॅकवरुन धावू लागला.. त्याचवेळी त्याचे मन त्याला सांगत होते..सुपर एक्सप्रेसमधून पडून गण्या वाचणे अशक्य.. पण धावायला पाहिजे..प्रयत्न करायचा.. त्याचवेळी त्याच्या डोळयांसमोर गण्याचे आईवडील येत होते.. त्यांना काय सांगायचे?

 किती धावले तरी गण्याचा ठिकाणा लागत होता.. स्पीडमुळे गाडी बरीच पुढे आली होती.. एवढ्यात सचिनला ट्रॅकच्या बाजूला एक सायकल दिसली. सायकलवाला कदाचित लघवीला थांबला असेल.. काही विचार न करता सचिनने ती सायकल उचलली आणि ट्रॅकवरुन चालवू लागला. काही मिनिटात त्याला पांढरे कापडं दिसू लागले.. त्याच्या लक्षात आले.. गण्याने आज पांढरा शर्ट घातला होता.. जोरात पैंडल मारत मारत सचिन त्या पांढऱ्या कपडाच्या दिशेने जात होता..आता त्याला ट्रॅकपासून थोडा लांब पडलेला गण्या दिसला.. सायकल टाकून सचिन जवळ गेला.. त्या अंधारात त्याला कण्हणारा गण्या दिसला.. सर्व शक्ती लाऊन त्याने त्याला उचलला आणि कमरेत वाकत वाकत सायकलच्या मधल्या दांडीवर ठेवला आणि सायकल ढकलत रेल्वेच्या दिशेने नेऊ लागला.. रक्ताने सचिनचे दोन्ही हात चिकट झाले.. पण त्याला पर्वा नव्हती.. लवकरात लवकर याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज होती. एवढ्यात त्याच गाडीतील काही प्रवासी तिथे येऊन पोचले.. एका सरदारजीने कुणाची तरी मोटरसायकल आणलेली.. पुढे सरदारजी..मध्ये गण्या आणि त्याला धरून सचिन असे तिघे रेल्वेच्या दिशेने निघाले.

सरदारजीने बेशुद्ध गण्याला गार्डच्या केबिनमध्ये आणले.. सगळी लोक जमा झाली होती.. एव्हड्यात प्रवाशांत असलेले बेळगावचे दोन डॉक्टर पुढे आले..त्यानी गण्याची नाडी पाहिली...पेशन्ट अजून जिवंत आहे.. पण किती काळ जिवंत राहील याची खात्री नसल्याचे त्यानी सांगितले. पुढचे स्टेशन मनमाड होते.. गार्डनी तेथील स्टेशनला संपर्क केला आणि गाडी सोडली. जखमी गण्यासोबत डोवयाला हात लावून बसलेला सचिन, नयना आणि तिची आई होती. गाडी मनमाड स्टेशनमध्ये शिरली. सचिनने हमालांच्या मदतीने गण्याला रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये आणले.. पण तेथे डॉक्टरच नव्हता.. पुन्हा त्याला गाडीत घेतला आणि गाडी भुसावळ स्टेशनवर आली..गार्डने कल्पना दिली असल्याने येथे रेल्वेचा डॉक्टर होता..त्याने सलाईन चढवले.. पण टाके घालायला त्याच्याकडे साहित्य नव्हते.. मग स्टेशनमास्टरनी ॲम्ब्युलन्स मागवली आणि पेशन्टला सिव्हीलमध्ये ॲडमिट केले. मग पोलीस कम्लेट झाली.. आणि पोलीस स्टेशन वरुन सचिनचा घरी फोन लावला गेला. रात्रीचे दोन वाजले होते.. अण्णासाहेब झोपले होते.. एव्हडयात त्यान्च्या घरचा लँडलाईन खणखणू लागला..कोण एवढ्या रात्रीच.. असं पुटपुटत अण्णासाहेबानी फोन उचलला..

"हॅल्लो.. कोण?” "मी इन्स्पेक्टर मोहोळ बोलतोय.. तुमचा मुलगा दिल्लीला जात होता काय? आणि त्याचा मित्र?” अण्णाच्या घशाला कोरडं पडली.. असा रात्री अपरात्री पोलीस स्टेशनवरून फोन येतो, तेंव्हा...
"व्हय.. काय झालाय?”
"मनमाडच्या अलीकडे त्यातील एक गाडीतून पडला..
"कोण, पण?”
"गणपत नावाचा मुलगा पडला.. सध्या भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमध्ये आहे.. दुसरा मुलगा त्याच्यासोबत आहे.. असे भुसावळच्या पोलीस स्टेशनवरून मेसेज आलाय..
"पण कसं आहे त्याचं?” त्यांनी चाचरत विचारले.
"त्याची मला कल्पना नाही पण धावत्या एक्सप्रेसमधून पडल्यावर काय होत माहित आहे ना.”

पोलीस स्टेशनवरचा फोन बंद झाला. अण्णांना घाम आला.. त्या बोलण्याने त्यांची पत्नी जागी झाली.. त्यांनी तिला फोनवरील बोलणे सांगितले. लगेच त्यानी मुंबईच्या मोठया मुलाला फोन लावला. अण्णाच्या डोक्यात झिंणझिण्या आल्या.. हातपाय थरथरू लागले.

आता गण्याच्या बापाला दादाला काय सांगायचे? आपणच आग्रह करून गण्याला सचनसोबत पाठविला.. पण हा चालत्या गाडीतून खाली पडला कसा? आता सचिनसोबत संपर्क कसा करायचा? भुसावळ रेल्वे हॉस्पिटलमधून सिव्हिलमध्ये नेलाय म्हणे? पण तिथे फोन करावा काय?   एवढ्यात त्त्यांचा मोठा मुलगा प्रमोदचा फोन आला.. ”अण्णा.. मी भुसावळ सिव्हिलला फोन लावलेला..गण्याला बराच मार लागलाय.. पाठ सोलून निघालीय.. एक हात मोडलाय.. डोके फुटले होते त्याला आता टाके घातलेत.. अजून मेंदूला कितपत मार पडलाय कळत नाही.. त्यासाठी मोठया हॉस्पिटलमध्ये टेस्ट कराव्या लागतील.. पण अजून गण्या जिवंत आहे.. पण मेंदूमध्ये आतमध्ये ब्लीडींग चालू असेल तर काही खरे नाही.. सचिनशी संपर्क होत नाही.. तो हॉस्पिटलमध्ये गण्यासोबत आहे बहुतेक. पण तुम्ही गण्याच्या बाबांना कल्पना द्या.. उदया काही बरेवाईट झाले तर वेळेवर कळले नाही म्हणायचे. तेंव्हा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन कल्पना द्या..”

पहाटेचे चार वाजलेले.. आण्णांनी कपडे घातले आणि बाहेर जाण्याच्या तयारीत पाहून त्यांच्या पत्नीने विचारले..कुटं चाललंय या वेळी?”दादाला सांगून येतो.. संदीप म्हणाला... त्यांना कळवायला हवं.

"पर या वेळी? सकाळ होउदे.. आणि तुमची स्कुटर नेऊ नका... तुमची मनस्थिती बरोबर न्हाई.. रिक्षा घेऊन जा..पहाट होता होता अण्णा त्त्यांची मोडकी स्कुटर घेऊन दादाच्या घरी निघाले. दादा सकाळी सकाळी गाईचे दूध काढत होते.. अचानक अण्णाला पाहून त्याना आश्यर्य वाटले..

"अण्णा.. सकाळी सकाळी?”
"होय बाबा.. यावंच लागलं.. तुज्या गण्याला रेल्वेत अपघात झालाय म्हणे.. बरा हाय आता.. सचिन हाय सोबत..तेवढ्यात चहा घेऊन आलेल्या गण्याच्या आईने हे ऐकले आणि तिने किंकाळी ठोकली..

"वहिनी.. शांत व्हा.. गण्या बरा हाय.. संदीप बोलला डॉक्टर सोबत...”
"नाय नाय.. माजा ईश्वास न्हाई.. मला डोळ्यांनी खात्री करायला पायजे.”

"चला.. तुम्ही दोघे.. माज्या घरी... मग बघूया..त्याच गावातील एक रिक्षा बघून त्यात ती बसली आणि अण्णा आपल्या मोडक्या स्कुटरवरुन घरी आले.. गण्याच्या आई बाबांनी त्याला भेटायचा ध्यासच घेतला..मग अण्णांनी एक भाड्याची गाडी ठरवली आणि अण्णा जोडी आणि दादा जोडी पुणे मार्गे भुसावळला निघाली.तो संपूर्ण दिवस गण्या सिव्हिलमध्येच होता..सचिन बाजूलाच बसला होता..दुपारी सचिनने आपल्या घरी फोन लावला.. पण कुणी उचलला नाही.. मग त्याने मुंबईला मोठया भावाला फोन लावला तेंव्हा त्याला कळले.. दादा, आई आणि गण्याचे आईवडील भुसावळला यायला निघाले आहेत. रात्रीपर्यत सचिनचा बहिणीकडे येतील.. सचिनने डोक्याला हात लावला.. गण्याच्या एवढ्याश्या चुकीने कितीजणांना त्रास होतो आहे.. पण तोसुद्धा काही करू शकत नव्हता.

दुपारी चार वाजता गण्याने डोळे उघडले.. तो आजूबाजूला पाहू लागला..सर्व अपरिचित वातावरण.. आपण कुठे आहोत हे त्याच्या लक्षात येईना.. हाताला सलाईन लावले होते.. एका हाताला प्लास्टर होते.. पाठ ठणकत होती.. त्याने बाजूला पाहिले..

सचिन हात उशीला घेऊन एका बेडवर झोपला होता..त्याने हाक मारली.."सच्या.. कुटं आहोत आपण.. दिल्लीला पोचलो काय?"  सचिन लगबगिने उठला.. त्याच्या डोळ्यात पाणी आले.."बरा आहेस ना गण्या.. मी किती घाबरलो होतो..”

"काय झालाय? माझा हात मोडला कसा? पाठ ठणकते आहे.. काय झाले?”

सचिनने मग मनमाडच्या आधी तू कसा गाडीतून पडलास.. सायकल घेऊन मी कसा पोचलो.. मग एक सरदारजी कुणाची तरी मोटरसायकल घेऊन कसा आला.. गाडीतील भेटलेले दोन डॉक्टर.. मग मनमाड.. तेथून भुसावळ आणि आता भुसावळ सिव्हिल हॉस्पिटल...हे सर्व सांगितले..गण्या रडू लागला... ”माझ्या मूर्खपणामुळे तुला त्रास झाला रे सच्या..”

"झालं ते झालं.. पण आता कसं वाटतंय?”

"पाठीत दुखतंय.. अंग दुखतंय.. पण बाकी मी बरा आहे.. आपण जाऊया का दिल्लीला? माझ्यामुळे तुजं नुकसान व्हायला नको..”
"पण तुला जमेल का प्रवास? अजून दहाबारा तासाचा तरी असेल.. गोळया दिल्यात डॉक्टरनी.. त्याने पाठदुखी, अंगदुखी कमी होईल म्हणालेत.. ॲन्टीबीओटीक पण दिलीत.. त्यानी जखमा भरून निघतील म्हणाले..”

"मग जाऊ आपण दिल्लीला... घरी माहित आहे काय?”
"होय रे.. तुझे दादा आई, माझे अण्णा.. आई मिळून गाडी करून निघालेत.. रात्रीपर्यत ताईला घरी पोचतील पुण्यात..”

"मग ताईकडे फोन करून सांग.. मी बरा आहे आता आणि आम्ही दिल्लीला जातोय रात्री. त्यामुळे तुम्ही येऊ नका..”

"होय.. करतो मी फोन.. चला मी डॉक्टरना जाऊन भेटतो आणि डिस्चार्ज घेतो.”

सचिन डॉक्टरना भेटला आणि पेशंटल डिस्चार्ज द्या असे म्हणू लागला, पण डॉक्टर तयार होईनात.. मग सचिनने स्वतःच्या जबाबदारीवर डिस्चार्ज घेतला. गण्या धरून धरून हळू हळू चालत होता.. रेल्वे स्टेशनवरुन त्यानी सचिनचा बहिणीकडे फोन केला.. आणि आता आम्ही मिळेल त्या गाडीने दिल्लीला जातोय.. तेंव्हा अण्णा आणि दादा यांना इकडे पाठवू नकोस असा निरोप दिला.

दोघे वेटिंगरूममध्ये आले. सचिन गाडीची चौकशी करायला गेला..त्याला दोन हमाल भेटले. त्याने दिल्ली गाडीची चौकशी केली. बंगलोरहुन येणारी एक्सप्रेस रात्री दोन वाजता येणार होती. त्याने सोबतच्या गण्याची सर्व परिस्थिती त्याना सांगितली. ते हमाल गण्याला भेटायला वेटिंग रूममध्ये आले.. त्यातील म्हादू हमाल गण्याला म्हणाला.."भाऊ.. नशीबवान हाय तुमी.. म्हनून धावत्या गाडीतून पडून वाचलात.. तुमचा मित्तर तुमच्यासाठी एव्हडं करतोय.. काळजी करू नका.. तुमास्नी बंगलोर गाडीत बर्थ ठेवतो.. TC हितलाच हाय. तुमास्नी आत चढवून देतो..”

खरोखर त्या दोन हमालांनी गण्याला उचलून घेतले आणि बंगलोर गाडीत झोपवले.

 -सचिन-
भुसावळ स्टेशनवरील दोन हमालांनी गण्याला उचलून बर्थवर ठेवले.. आता उदया सायंकाळी दिल्ली. केवढा प्रसंग आला होता.. जर गण्याला काही झालं असतं तर मी काय सांगणार होतो? धावत्या गाडीतून पडून सुद्धा गण्याला मार बसला; पण जीव वाचला.. तरीपण दिल्लीत गेल्यावर न्युरो फिजिशियनकडून तपासणी करायला हवी. दिल्लीत पोचलो तर ऱ्ए मध्ये जाऊन ट्रेनिंगला हजर रहाता येईल.. शेवटी एवढा प्रवास त्यासाठीच तर केला होता.. किती चांगल्या माणसांनी मदत केली.. मनमाडमध्ये कुणाची तरी मोटरसायकल घेऊन आलेला तो सरदारजी.. गाडीतील दोन डॉक्टर, भुसावळमधील दोन हमाल... अण्णा.. आई.. गण्याचे आईवडील, संदीप दादा.. सर्वाना खुप त्रास झाला.. शेवट गोड झाला म्हणजे झाले. चार वाजता दिल्लीत पोचलो. खिशातील पैसे संपत आले होते.. पण नयना आणि तिची आई पुढे दिल्लीत पोचलीत..नयनाची मावशी इथेच असते म्हणे..तिच्याकडुन पैसे घेता येतील. दिल्लीत पोचल्यावर एका हमालाला सांगून चाकाची गाडी मिळवली आणि ढकलत ढकलत गण्याला बाहेर आणले. बाहेर येऊन नयनाच्या मावशीच्या घरी फोन लावला.. तिची मावशी म्हणाली.. तुम्ही दोघे इथेच या.. माझे मोठे घर आहे.. तिने दिलेल्या पत्यावर रिक्शाने गेलो.. मावशींनेच रिक्षाचे पैसे दिले.. मी चालत आणि गण्या लंगडत घरात गेलो. जिवंत गण्याला पाहून नयना रडूच लागली.. तिची आई, मावशीपण भावुक झाली..

”सचिन..तू फार धडपड केलीस..साखळी ओढून उडी मारून धावत सुटलास..म्हणून गण्या जिवन्त मिळाला..नाहीतर काय सांगणार होतो आपण दादांना?”

आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली.. मी थोडा फ्रेश झालो.. दोन दिवसानंतर दोन घास पोटात गेले. नयनाच्या मावशीने त्याच रात्री न्यूरो फिजिशियनची अपॉइंटमेंट घेतली आणि गण्याची तपासणी केली. डॉक्टरनी सिटी स्कॅन केले , इतर तपासणी केली.. सर्व रिपोर्ट व्यवस्थित.. मग डॉक्टरनी मला विचारले..

"कहा से गिरा ये आदमी..”
"रनिंग ट्रेनसे.. सुपर फास्ट गोवा.. दिल्ली एक्सप्रेससे..”
"कमाल है.. तो भी ये जिंदा है.. इसकी ब्रेनको कुछभी नही हुवा है.. "गॉड इज ग्रेट..”
मी म्हणालो.."सच है डॉक्टर, गॉड इज ग्रेट..”
डॉक्टरनी गण्याचा हात हातात घेतला. "तुम बच गये यंग मॅन.. यू आर सेफ.. फिर कभी  ऐसी हरकते मत करना.. से थँक्स टू गॉड..”

-गणपत-

  आम्ही आज दिल्लीहुन पुण्याला परत चाललोय.. पुन्हा गाडीत मी, सचिन, नयना आणि तिची आई.. केवढा प्रसंग आला होता.. पण बचावलो.. ते डॉक्टर म्हणाले तसें.. ”गॉड इज ग्रेट.. देवाला मला वाचवायचं होतं.. म्हणून मी रुळावर न पडता बाजूला पडलो”. पंचवीस तारखेला आम्ही तिघे     NSD मध्ये पोचलो.. माझा हात प्लास्टरमध्ये.. सर्वांनी चौकशी केली.. पुढील चार दिवस वेगवेगळे प्रयोग करण्यात गेले.. माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला सर्व व्यवस्थित करता येत नव्हते.. शेवटी निवड करण्याचा दिवस उजाडला.. देशाच्या कानाकोपऱ्यातून सहाशे मुले आली होती.. कठोर परीक्षेनंतर चाळीस मुले पुढील तीन वर्षासाठी निवडली गेली.. त्यात सचिनची निवड झाली.. माझी आणि नयनाची झाली नाही.

आज परत गावी जाताना संमिश्र भावना आहेत.. सचिनने माझ्यासाठी जे केले ते पुढील अनेक जन्मात मी विसरू शकणार नाही. शेवटी मी वाचलो.. मी माझ्या आईवडिलांना मी भेटणार आहे.. मला NSD मध्ये ॲडमिशन मिळाली नाही; पण मी नाटक सोडणार नाही.. नाटक हा माझा श्वास आहे..मी आता व्यवसायात स्थिरावलो आहे.. नयना माझी आयुष्याची पार्टनर झाली.. आम्ही दोघे आमचा व्यवसाय सांभाळून नाटक करतोच आहोत. सचिन आज मराठी हिंदी रंगभूमी आणि सिनेमामधील मोठा नट आहे. अजूनही लोक आमचा गोवा.. दिल्ली प्रवासातील थरार आठवतात आणि "तू कसा वाचलास?” असेही विचारतात.. मी उत्तर देतो. "गॉड इज ग्रेट.. गॉड इज ग्रेट..”  -प्रदीप केळूसकर 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दडपण... एक कविता