मुखी नाम घ्यावे मनी रूप आठवावे

भगवद्‌स्मरणाचा कंटाळा येतो. कारण भगवंत अतींद्रिय आहे. दिसत नाही. त्याला आकार, रंग, रूप नाही. परंतुजगातील विषय मात्र विविध आकर्षक रंग-रूप युक्त आहेत. मोहविणारे, भुलविणारे आहेत. म्हणून तर समर्थ लावण्यरूप घनश्याम श्रीरामाची उपासना करायला सांगतात. निर्गुण रामापर्यंत पोचण्यासाठी सगुण रामाची उपासना हे साधन आहे.

नको वीट मानू रघुनायकाचा।
अती आदरे बोलिजे राम वाचा।
न वेचे मुखी सापडे रे फुकाचा।
करी घोष त्या जानकीवल्लभाचा । श्रीराम ९१।

जीवाला मानवदेह मिळतो तो मोठ्या भाग्याने. ईश्वराने त्याला जन्म-मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी दिलेलीती सुवर्णसंधी आहे. मानवाला प्रगत बुध्दीची देणगी आहे. विचार-विवेक करण्याची विशेष शक्ती आहे. तिचा उपयोग आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्यासाठी, आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी करायचा असतो.भौतिक प्रगती, विषयांचा उपभोग, पदार्थांचा संग्रह हे मनुष्यजन्माचे ध्येय नाही. प्रारब्धाने जे नियोजित असेल ते प्रयत्नपूर्वक प्राप्त करून घ्यावे, पुरुषार्थ करावा हे योग्यच आहे. पण धर्म, अर्थ, काम याबरोबरच ‘मोक्ष' हा पुरुषार्थही साधायचा आहे हे विसरता कामा नये. खरे तर मोक्षप्राप्तीसाठीच आधीचे तिन्ही पुरुषार्थशास्त्र विहित पध्दतीने साधायचे आहेत.

वेद, शास्त्रे, पुराणे, संत, महानुभाव सर्वांचे एकमुखाने सांगणे आहे की भगवंताला स्मरून केलेले कर्म निर्दोष होते. भगवंताला अर्पण केलेले कर्म भवबंधनातून मुक्त करते. म्हणून समर्थ मनाला सांगत आहेत की नित्यकर्म करत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना रघुनायकाचे नित्य स्मरण कर. त्याचा कंटाळा करू नकोस. नामस्मरणाचा त्रास मानू नकोस. चंचल मनाला एकाच गोष्टीत फार वेळ रमता येत नाही. त्याला सतत वेगवेगळे विषय लागतात. दृश्य जगात असे अनंत विषय उपलब्ध असल्याने मन भ्रमरासारखे एकावरून दुसऱ्या, तिसऱ्या, अनेक विषयांवर भिरभिरत राहते. त्यामुळे एकच एक भगवंतावर टिकून राहणे मनाला कंटाळवाणे वाटते. कदाचित म्हणूनच माणसे आठवड्याच्या वारागणिक वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करतात. त्या उपासनेचेही अनेक प्रकार अवलंबले जातात. स्तोत्रपठण, पोथीवाचन, जपमाळ, पूजा, भजन, श्रवण, इ.इ. कुठेही स्थैर्य नाही. एकाग्रता नाही. समर्थ म्हणतात, भगवंताचे नामस्मरण हे विनाकष्टाचे, फुकटचे एकच साधन सहज उपलब्ध असताना मोठ्या आदराने, प्रेमाने एका रामनामाचे तेवढे स्मरण करावे. त्याचे सामर्थ्य सर्व संत-सज्जनांनी तर सांगितलेच आहे, शिवाय भगवान शंकरांनीही सांगून ठेवले आहे. नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही. ते एका जागी बसून करावे किंवा आपले नित्य कर्म करताकरता करावे. वैखरीने उच्चार करावा किंवा मनातल्या मनात जपावे. पण मनाला एकाच साधनावर, एका नामावर स्थिर करावे. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत बुध्दी ज्ञानग्रहणासाठी योग्य होत नाही. जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पडत नाही तोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही. आणि तोपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाचीओळख होत नाही. आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही. परब्रह्म हेच आपले स्वरूप आहे. त्याचा साक्षात अनुभव येणे हाच मोक्ष आहे. मोक्ष ही काही मृत्यूनंतर मिळवण्याची गोष्ट नाही. याच मनुष्य देहात ज्ञानदृष्टीने मोक्षप्राप्ती करून घ्यायची असते. त्यासाठी ‘मोक्ष' हेच साध्य मानून साधना करायची असते. साधनेसाठी एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. म्हणून भगवंताचा कंटाळा करून बाहेर जगात भटकणाऱ्या मनाला मोठ्या निर्धाराने आवरावे लागते.

भगवंताचा कंटाळा येतो. कारण तो अतींद्रिय आहे. दिसत नाही.त्याला आकार, रंग-रूप नाही. परंतु जगातील विषय मात्र विविध आकर्षक रंग-रूप युक्त आहेत. मोहविणारे, भुलविणारे आहेत. म्हणून तर समर्थ लावण्यरूप घनश्याम श्रीरामाची उपासना करायला सांगतात. निर्गुण रामापर्यंत पोचण्यासाठी सगुण रामाची उपासना हे साधन आहे. दाशरथी रामाच्या मोहक रूपात रंगून जाणे सोपे होते, त्याच्या गुणांचे, लीलांचे वर्णन ऐकून त्यात रमणे सहज होते. रामाचे नामस्मरण करताना त्याच्या रूप-गुणांचे स्मरण आपोआप होते. तिथे तल्लीनता सहज होते. आपले खरे स्वरूप "आत्माराम” आहे. परंतु तिथे पोचण्यासाठी जानकीवल्लभ श्रीरामाचे स्मरण करणे हे साधकाच्या, भक्ताच्या दृष्टीने तुलनेने सोपे आहे. म्हणूनच न कंटाळता, आवडीने, प्रेमाने, आदराने रामाचे नाम घेत जावे. आपण मनात नित्य स्मरण करावे तसेच मोठ्याने घोष करून इतरांनाही त्या नामात, त्या आनंदात सहभागी करून घ्यावे.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

महाराष्ट्राचा विवेकी आवाज : प्रा. डॉ. एन डी पाटील