महाराष्ट्राचा विवेकी आवाज : प्रा. डॉ. एन डी पाटील

प्रा. डॉ. नारायण ज्ञानदेव म्हणजेच एन डी पाटील यांनी लिहिलेली शेती जमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा, समाज विकास योजनेचे वस्त्रहरण, वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट, कांँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट, शेतीमालाला किफायतशीर किंमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण, महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप, शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?, महर्षी वि्ील रामजी शिंदे ही पुस्तके गाजली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातही काम केले. राज्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात प्रा. डॉ एन डी पाटील हे एक धडाडीचे आणि लढाऊ नेत, विवेकाचा आवाज म्हणून ओळखले जात.

    फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा पुरोगामी वारसा चालवणारे सत्यशोधक विचारवंत प्रा. डॉ. एन डी पाटील यांचा आज जयंती. प्रा. डॉ. एन डी पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे असून त्यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागाव मधील ढवळी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती गरिबीची असूनही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रा डॉ एन डी पाटील यांनी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रातून एम ए आणि एल एल बी चे शिक्षण घेतले.

         प्रा डॉ एन डी पाटील यांनी १९५४ ते १९५७ या कालावधीत सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अध्यापनाचे कार्य केले. याशिवाय त्यांनी कमवा आणि शिका योजनेचे रेक्टर म्हणूनही काम पाहिले. १९६० साली ते इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य म्हणून रुजू झाले. त्यांच्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. कर्मवीरांच्या विचारातून प्रेरणा घेऊनच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ( १९६२ ) त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. प्रा डॉ एन डी पाटील यांनी १९७६ ते १९७८ या कालावधीत शिवाजी विद्यापीठात  समाजशास्त्र विभागाचे डीन म्हणूनही काम पाहिले. याचबरोबर १९९१ साली त्यांनी  महाराष्ट्र राज्य शिक्षण आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहिले. प्रा डॉ एन डी पाटील हे १९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल मॅनेजमेंट सदस्य म्हणून कार्यरत होते. १९९० साली रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती झाली. प्रा डॉ एन डी पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवला.

     राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळे ठरले. १९४८ साली त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर १९५७ साली त्यांनी  मुंबईतील गिरणी कामगारांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. प्रा डॉ एन डी पाटील यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत १८ वर्ष सदस्य म्हणून काम केले. १९७८ ते १९८० या काळात ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. १९८५ साली ते कोल्हापूर मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणूनही निवडून गेले. १९९९ ते २००२ या काळात ते लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक होते.

   आपले आयुष्य समाज कार्यासाठी घालवणाऱ्या प्रा डॉ एन डी पाटील यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक विद्यापीठाने त्यांना मानाची डी. लिट पदवी देऊन गौरवले.
    प्रा डॉ एन डी पाटील यांनी अनेक विषयांवर सखोल लेखन केले. शेती जमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा, समाज विकास योजनेचे वस्त्रहरण, वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट, काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट, शेतीमालाला किफायतशीर किंमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण, महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप, शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?, महर्षी वि्ील रामजी शिंदे ही त्यांनी लिहिलेले पुस्तके गाजली.

     प्रा डॉ एन डी पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातही काम केले. त्यांची मते ठाम होती. महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात प्रा. डॉ एन डी पाटील हे एक धडाडीचे आणि लढाऊ नेते म्हणून ओळखले जातात. प्रा डॉ एन डी पाटील म्हणजे महाराष्ट्राचा विवेक आवाज. १७ जानेवारी २०२२ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.  त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा पुरोगामी आवाज हरपला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन! - श्याम ठाणेदार 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वेडा