महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
''बोलता बोलता" : अशी हवी संभाषण कला
लवचिकतेचं आवरण असलेल्या मुशाफिरी या सदराला कोणताही विषय वर्ज्य नाही. त्यामुळे चिंतन, निबंध, लघुकथा, अनुभव कथन, पुस्तक परिचय, व्यक्ती परिचय, प्रवास वर्णन, एखाद्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आदि सारे टप्पे या सदरातून हाताळत गेली सुमारे सत्तावीस वर्षे पुढे जाता आले. माझे मित्र श्री. महेंद्र काेंडे यांचे ‘बोलता बोलता' हे पुस्तक त्यांनी छानपैकी स्वाक्षरी करुन ७ नोव्हेंबर २०२४ रोजी माझ्या घरी येत हाती सोपवले होते. कोणत्याही विषयावर लिहीण्यापूर्वी तशी मनोभूमिका योग्यरित्या तयार व्हावी लागते. ‘उचलली बोटे नि टेकवली की बोेर्डवर' करुन चालत नाही...विशेषतः आपल्याला आवडणाऱ्या माणसांबद्दल! म्हणून लिहायला विलंब झाला. पण आता असे वाटते की या पुस्तकावर खूप आधीच लिहायला हवे होते.
‘बोलायला सुरु करण्यापूर्वी' ते ‘बोलणे संपताना' अशा सुरेख, समर्पक शीर्षकांनी प्रकरणे सजवलेले ‘बोलता बोलता' हे श्री. महेंद्र काेंडे लिखित २०४ पानांचे पुस्तक हे तुम्ही लेखक असा, वाचक असा, निवेदक असा, सूत्रसंचालक असा, निरुपणकार असा, एखाद्या संस्थेचे पदाधिकारी असा..तुम्हा साऱ्यांना विविध अंगांनी उपयुक्त ठरणारे आहे. कारण तुम्ही आम्ही आणि प्राणी यातला प्रमुख भेद म्हणजे आपण सारे बोलणारे आहोत. मग ते कसे बोलावे, किती बोलावे, कुठे व कसे सुरु करावे, कुठे थांबावे, बोलणे रंगतदार-प्रभावी ठरण्यासाठी काय करावे, त्यासाठी काय वाचावे, काय ऐकावे, बोलण्याचे-श्वसनाचे कोणते व्यायाम करावे, ऐनवेळी मंचावर आलेल्या अडचणींना कसे तोंड द्यावे, नाऊमेद करणारे प्रसंग अचानक उद्भवल्यास त्यावर आपल्या संवादकलेने कशी मात करुन कार्यक्रम कसा सुविहितपणे पुढे न्यावा याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात आहे.
या पुस्तकाला विख्यात साहित्यिक व श्री. महेंद्र काेंडे यांचे तत्कालिन अध्यापक श्री. प्रवीण दवणे यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. ‘चांगले बोलणे ही कला असली तरी योग्य व निवडक बोलणे ही महाकला आहे', असे महेंद्रजी लिहुन जातात त्याचा प्रवीणजींनीही प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला आहे. या पुस्तकातील ४६ प्रकरणांतून निवेदन, सूत्रसंचालनाबद्दल जी माहीती मिळते तिचे वर्णन मी केवळ ‘अमूल्य' याच शब्दांत करीन. अनेकदा निवेदक, सूत्रसंचालक हा मधल्या जागा भरण्यासाठी असतो, बाकीचे स्टेजवर बसलेले असतात म्हणून त्याने वेळ मारुन न्यायची असते, सोबत दिलेल्या चिठ्ठीवरील नावे नीट न चुकता वाचायची असतात, मधूनच कुणी बडे नेते, मंत्री, विविध पदाधिकारी स्टेजवर आले तर त्यांच्या पदांसकट सारे उल्लेख व्यवस्थित करायचे, कुणाची गाडी पार्किंगमध्ये उभी-आडवी कशीतरी लावली असेल तर त्याचीही घोषणा करायची, कुणाची वस्तू हरवली, काही सापडले तर तेही माईकवरुन सांगायचे अशा विविध समजुती काही लोकांनी करुन घेतलेल्या असतात. काही काही कार्यक्रमांतील काही हौशी लोकांना माईकशी लगट, झटापट करताना पाहुन त्यात काहीसे तथ्य असल्याचेही जाणवते. पण निवेदक, सूत्रसंचालक हे त्याहुन वेगळे.. त्यातही हे दोन्हीही वेगवेगळे घटक आहेत, निवेदक/सूत्रसंचालक हा वक्ता नव्हे; त्याला वाचिक, कायिक, वेशभूषाविषयक, सार्वजनिक कार्यक्रमविषयक, ताज्या घडामोडींंविषयक चांगली जाण असावी लागते. त्यासाठी त्याचा लोकांना ‘वाचण्याचा' अभ्यास पवका असावा लागतो, चांगले वाचन असावे लागते, अभिनयाचीही बऱ्यापैकी ओळख असावी लागते, आवाजाची पट्टी कुठे, किती असावी याचा अदमास घेत पुढे जायचे असते अशा कित्येक बाबींवर हे पुस्तक प्रकाश टाकते. गल्लीतील गणेशोत्सव हे कार्यकर्ते तयार करण्याची कार्यशाळा असतात, तसेच येथूनच अनेकजण आपल्या निवेदनाचा श्रीगणेशाही करत असतात, हेही ध्यानात घेतले पाहिजे. सभाधीटपणा अर्थात स्टेज डेअरींगला खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात होत असते, हेही या पुस्तकातून पुन्हा एकदा समजून घेता येते.
नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी जरी असले तरी महेंद्रजींच्या बालपणाचा, तरुणपणाचा मोठा काळ हा ठाण्यात गेला आहे, त्यांचे शालेय, महाविद्यालयीन शिक्षणही ठाण्यातच झालेले असल्याने या पुस्तकात ठाणे शहराचा वारंवार उल्लेख होणे हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे ठाण्यातील नरेंद्र बेडेकर, वासंती वर्तक, भास्कर पळणीटकर, संपदा जोगळेकर, धनश्री लेले यांच्याशी त्यांचा संपर्क येत गेला. त्यांनी क्रिकेटचे समालोचनसुध्दा मनःपूर्वक ऐकले. वि. वि. करमरकर, बाळ पंडित, चंद्रशेखर संत यांची समालोचनाची भाषाही मनात मुरवली. संदीप कोकिळ, मंदार खराडे, सुचित ठाकूर, किशोर देसाई, राजेंद्र पाटणकर, सुशिल चोरगे, अमित काकडे या निवेदकांना ते ऐकत आले. मी महेंद्रजींना नशिबवान यासाठी समजतो की त्यांना मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे, सिंधुताई सपकाळ, ॲड. उज्वल निकम, दशरथ पुजारी, प्रा. प्रवीण दवणे, रविंद्र व स्मिता कोल्हे या व अशा अनेक नामांकितांच्या प्रकट मुलाखती घ्यायची त्यांना संधी मिळाली. प्रत्येक संधी, प्रत्येक कार्यक्रम, मिळणारा भला-बुरा अभिप्राय, चांगले-खवचट शेरेही अंतिमतः आपल्याला समृध्दच करुन जात असतात ही महेंद्रजींची सकारात्मक मानसिकता मला भावते. त्यातही ‘ऑल इंडिया रेडिओ'ने निवेदकाच्या परिक्षेत अमिताभ बच्चन, अमिन सायानी यांना नापास केले होते. पण तरीही हेच लोक नाऊमेद न होता कार्यरत राहिले व त्यांना पुढे जाऊन लोकांनी सदियोंके शहनशाह, सर्वाधिक लोकप्रिय निवेदक म्हणून नावाजले ह्याचेही उदाहरण त्यांनी या पुस्तकात जाता जाता दिले आहे. कुणाशीही स्पर्धा नाही, कुणाचाही द्वेष-तिरस्कार नाही, कसलाही अभिनिवेश नाही, कुणाचाही चुकूनही अपमान करावा या विचाराचा मनी लवलेशही नाही असे महेंद्रजींचे वागणे असल्याचा मी गेल्या तीस वर्षांपासूनचा साक्षीदार आहे. जे वागण्या-बोलण्यात..तेच पुस्तकात सहीसही उतरले आहे. ‘या....आता मी तुम्हाला निवेदन-सूत्रसंचालनाचे मंत्र आणि तंत्र समजावून सांगतो' असा पवित्राही श्री. काेंडे कधी घेताना दिसून येत नाही..(तेवढा अधिकार असूनही हे विशेष! म्हणून त्यांचे खास कौतुक करावेसे वाटते.) चमकदार वाक्ये, सुभाषिते, संत वचने, कुठेतरी वाचलेले-मनाला भावलेले आपण एखाद्या वहीत लिहुन ठेवावे; ते निवेदन, सूत्रसंचालन करताना कसे कामी येते याबद्दल काेंडेजी मनापासून सांगतात. वर हेही सांगून टाकतात की अशा टीपण वहीला रद्दी न समजणारी, या कात्रणांचे खरे मूल्य समजणारी सहधर्मचारिणी आपणास लाभली, हे त्यांच्यातल्या गुणग्राहकतेचाही पडताळा देणारे आहे. ‘तुमच्याकडे बोलण्यासारखे काही खास नसेल तर तुम्ही बोलूच नका' असे जे कार्लाईल सांगतो तेही ध्यानात ठेवायला हवे व ‘आपल्याकडे सांगण्यासारखे काही आहे म्हणून आपण निवेदन करतो किंवा आयोजक आपल्याकडे ती जबाबदारी सोपवत असतात' ह्याची जाणीव या प्रकारच्या कामात व्यस्त असणाऱ्या प्रत्येकाला असायला हवी. ‘कार्यक्रमाची सूत्रे जो संचालित करतो तो सूत्रसंचालक..जणू कार्यक्रम नावाच्या युध्दाचा तो सारथी. तो सारथी जर श्रीकृष्ण असेल तर कार्यक्रम नावाचे युध्द जिंकणे सोप्पे' असे ते लिहुन जातात यातून हे काम काय प्रकारचे आहे, याचे भान इतरांना यायला हवे. ‘निवेदन, सूत्रसंचालन ही ऐनवेळी करायची नव्हे, तर २४ तास करण्याची गोष्ट आहे' असे विख्यात निवेदक सुधीर गाडगीळ म्हणत असल्याचा उल्लेख जो या पुस्तकात आहे तो किती सार्थ आहे, हेही ‘बोलता बोलता' वाचताना पटते.
काळ जसजसा पुढे सरकत चालला आहे तसतशा निवेदन, सूत्रसंचालन करणाऱ्यांना व्यापक संधी कशा मिळताहेत याचेही विवेचन ‘बोलता बोलता' मध्ये आहे, रेडिओ जॉकी, डबिंग, संहिता लेखन, लघुपट, जाहिराती, माहितीपट, जिंगल्स अशी विविध क्षेत्रे या मंडळींना खुणावताहेत. फक्त हवी भरपूर ऐकण्याची, शिकण्याची, त्यासाठी विविध पथ्ये पाळण्याची, लोकांचा मान राखण्याची, विनम्रभाव अंगी बाणवण्याची, समयसूचकता-प्रसंगावधान दाखवण्याची मानसिकता. ज्यांना हे जमले त्यांना या क्षेत्रात खूप पुढे जाता येईल, चांगला लोकसंग्रह करता येईल, चांगला पैसाही हाती लाभेल.
या संपूर्ण पुस्तकातले तुम्हाला काय आवडले असा प्रश्न मला कुणी केला तर त्याचे मी एका वाक्यात असे उत्तर देईन की ‘या पुस्तकात ठायी ठायी दिसून येणारी महेंद्रजींची विनम्रता, कितीही चीड आणणारा प्रसंग उद्भवला तरी त्यातून हसतखेळत मार्ग काढण्याची मानसिकता.' मीही गेली कित्येक वर्षे छापील व दृकश्राव्य अशा दोन्ही माध्यमांसाठी मुलाखतकार म्हणून भूमिका बजावत आलो आहे. ‘मुलाखत जमून आली तर ठीक; नाहीतर प्रश्नोत्तराचा खेळ; ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्याबद्दल अत्यंत आदर हवा' ही जी दोन वाक्ये या पुस्तकात महेंद्रजींनी लिहिली आहेत ती सगळ्यांनीच मनावर कोरुन ठेवायला हवीत. आपल्या अवतीभवती मुलाखती घेणारे, अनेकांना प्रश्न विचारुन उत्तरासाठी माईकचे दांडके त्याच्या तोंडाला टेकवणारे अनेक माध्यमकर्मी आहेत. मात्र हे करताना अनेकांच्या देहबोलीतून समोरच्याप्रति आदर, आपुलकी ज्या प्रमाणात दिसायला हवी, तशी दुर्दैवाने दिसून येत नाही..मग या साऱ्याचा काय फायदा?
दै. लोकमतच्या हॅलो ठाणे पुरवणीतून २०१९ या वर्षात साप्ताहिक सदर स्वरुपात प्रसिध्द झालेल्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘बोलता बोलता' या पुस्तकातून महेंद्रजींनी लेखक, वाचक, सूत्रसंचालक, निवेदक, संहिता लेखक, डबिंग कलावंत, समालोचक या व प्रसारमाध्यम जगतात वावरणाऱ्या, माईकशी सलगी असणाऱ्या अनेकांसाठी जणू आचारसंहिता लिहुन ठेवली आहे...तीही एखाद्या निष्णात सर्जनच्या कुशलतेने, कुणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घेत. अक्षरओळख असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. मग तुम्ही निवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार असा किंवा नसा!
बोलता बोलता - लेखक : महेंद्र काेंडे
प्रकाशक : व्यास पब्लिकेशन हाऊस वितरक : व्यास क्रिएशन
प्रथमावृत्ती : २५ ऑगस्ट २०२४
पृष्ठे : २०४ मू्ल्य : ३२५ /-रु.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई