महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
गुरूंची जीवनातील आवश्यकता
‘गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः' अर्थात गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो. आपण जीवनात शिकत असतांना ज्या ज्या गोष्टींकडून शिकतो, ते आपल्यासाठी गुरुस्वरूपच असतात. त्यामुळे प्रत्येकाला गुरूंची आवश्यकता जीवनात पदोपदी असतेच. या तत्त्वावर विचार करतांना आपल्या लक्षात येते की, गुरु-शिष्य परंपरा हाच महान हिंदु संस्कृतीचा पाया आहे.
हिंदु धर्मशास्त्रामध्ये वरील श्लोक सांगितला आहे. एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्न विचारला, ‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे कराल ?' तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘गुरु-शिष्य परंपरा' ! गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत. भारतावर इंग्रजांनी किंवा त्यांच्या आधी मोगलांनी केलेल्या राज्यामध्ये प्रजा कधीही समाधानी नव्हती; कारण ते आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले राज्य होते. चैतन्य वगैरे गोष्टींपासून ते फार लांब होते.
आपण जीवनात शिकत असतांना ज्या ज्या गोष्टींकडून शिकतो, ते आपल्यासाठी गुरुस्वरूपच असतात. त्यामुळे प्रत्येकाला गुरूंची आवश्यकता जीवनात पदोपदी असतेच. या तत्त्वावर विचार करतांना आपल्या लक्षात येते की, गुरु-शिष्य परंपरा हाच महान हिंदु संस्कृतीचा पाया आहे. भारतावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक आक्रमणकर्त्याने याच पायावर घाला घातला आणि भारताची आजची स्थिती आपल्या समक्ष आहे. वर्ष १८३५ मध्ये लॉर्ड मेकॉले याने तत्कालीन इंग्रज संसदेत पुढील सूत्र मांडले, ‘मी भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला. या काळात मी कुठेही दारिद्रय किंवा चोर पाहिलेले नाहीत. अशी संपन्नता आणि असे वैभव या ठिकाणी आहे. इतकेच नाही, तर येथील लोकांचे उच्च विचार, नीतीमत्ता आणि गुण पहाता ‘या लोकांवर आपण शासन करू शकू, असे मला वाटत नाही. या लोकांवर शासन करण्यासाठी आपल्याला त्यांच्या परंपरा, संस्कृती, शास्त्र आणि आध्यात्मिकता यांच्या एकत्वाने बनलेल्या कण्यावर आघात करावा लागेल. यासाठी येथील परंपरागत चालू असलेल्या शिक्षणपद्धतीला (गुरु-शिष्य परंपरेला) पालटावे लागेल. त्यासाठी येथील लोकांच्यात असा समज आणि श्रद्धा निर्माण करावी की, जे इंग्रज आणि विदेशी आहेत, ते भारतियांहून चांगले अन् उच्च आहेत. यातून ते स्वतःचा आत्मसन्मान आणि संस्कृती विसरतील अन् त्यातूनच आपले वर्चस्व आपण त्यांच्यावर अंकित करू शकतो.'
यातून आपल्या लक्षात येते की, इंग्रजांनी स्वार्थापोटी भारताच्या संस्कृतीवर आक्रमण करून तिला नष्ट-भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. या दुष्कृत्याचे परिणाम आपण स्वातंत्र्यानंतरही कित्येक दशके भोगत आहोत. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताच्या कोणत्याही शासनकर्त्याने देशाला योग्य पद्धतीने चालवण्यासाठी धर्मगुरु किंवा संत यांचे मार्गदर्शन घेतलेले नाही. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश नसल्याने स्वैराचारी आणि दुराचारी राजाला शिक्षा देण्याची व्यवस्था नाही. पूर्वीच्या काळी प्रत्येक राजघराण्याचे राजगुरु असत आणि राजा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असे. काही चुकीचे दिसल्यास राजाला त्याविषयी खडसावण्याचे आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून देण्याचे कार्य राजगुरु करत. अशा प्रकारे राजगुरूंच्या माध्यमातून राजसत्तेला धर्मसत्ता नियंत्रित करत असे.
सौजन्य : सनातन डॉट ऑर्ग
- जगन घाणेकर