महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
तुषारकी
दिसायला आकर्षक, परंतु तितकेच धोकादायक असणाऱ्या ब्ल्यू बॉटल जेलीफिश या समुद्री घुसखोरांनी अनेकांना दंश केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी या समुद्री पायरेटसच्या कहाण्यांमध्ये मीठ मिसळून माध्यमांद्वारे अधिकच रंगवून सादर केल्या. त्यामुळे या घुसखोरांकडे लोकांचं अधिकच लक्ष गेले. खरंतर या पाहुण्यांचं घर आहे समुद्र आणि समुद्रात त्यांचं अस्तित्व आढळणे ही अतिशय सामान्य बाब आहे. विचार करा आणि ठरवा समुद्रातला खरा घुसखोर कोण? ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश'.. ज्याचं घरंच समुद्र आहे तो की ‘मानव' ज्याचं घर जमिनीवर असूनही समुद्रात मुक्तपणे संचार करण्याचा प्रयत्न करतो तो?
‘पायरेटस् ऑफ द कॅरेबियन' नावाचा एक धम्माल हॉलिवूडपट ठाऊक असेलच. डिस्ने पिक्चर्सची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे आतापर्यंत पाच भाग प्रदर्शित झालेत. या चित्रपटात पायरेटस् म्हणजेच समुद्री लुटारू आणि त्यांचा जॅक स्पॅरो नावाचा एक धूर्त स्वयंघोषित कप्तान अशी पात्रे आहेत. या लुटारु टोळ्यांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विविध कथानके या चित्रपटात गुंफली आहेत. या कॅरेबियन चाच्यांच्या टोळीसारख्याच एका ‘खारे'बियन टोळीने आपल्या मुंबई, गोव्याच्या खारपट्टयांतदेखील शिरकाव केला आहे. ते कसे आले ठाऊक नाही. पण पावसाळ्याच्या उत्तरार्धात त्यांचं दर्शन वारंवार होऊ लागलंय. त्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे सर्व माध्यमांना त्यांची नोंद घ्यावी लागली. पाहुणे म्हणून मुंबईच्या किनारपट्टीवर आलेल्या या जीवांना समुद्री घुसखोरच म्हणावे लागेल इतकी त्यांची सध्या दहशत आहे. अवेळी आलेल्या या अतिथींना सध्यातरी ‘अतिथी तुम कब जाओगे?' असे म्हणायची वेळ आलीय. मनुष्यप्राण्याने इंच न इंच जागा व्यापलेल्या मुंबईच्या दाट वस्तीमध्ये किनारपट्टीलगत घुसखोरी करणारे हे अतिथी कोण आहेत?
सध्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दहशत पसरवणारे हे समुद्री चाचे म्हणजे ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश.'
‘पायरेटस् ऑफ द कॅरेबियन' या चित्रपटात समुद्री लुटारूंच्या टोळीचे व्यवस्थापन दाखवले आहे. यात जहाजाचे खलाशी, लढणारे चाचे, सफाई कामगार, वल्हे चालवणारे गुलाम, आचारी अशी कामाची विभागणी केलेली असते. या सर्वांच्या समन्वयातून टोळीचे काम चालते. आपण ज्या ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश'बद्दल बोलतोय तो देखील या टोळ्यांप्रमाणेच आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश' हा जेलीफिशच नाही. ‘पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर या नावाने ओळखला जाणारा हा प्राणी एक सिफोनोफोर आहे. म्हणजे सोप्या भाषेत अनेक जीवांपासून बनलेला. हो तुम्ही वाचलंत ते बरोबर आहे. ब्ल्यू बॉटल जेलीफिश ‘हा' प्राणी नसून ‘हे' प्राणी आहेत. फायसेलिया फायसेलीस असे शास्त्रीय नाव असणारी ही प्रजाती चार वेगळ्या जीवांनी मिळून बनलेली आहे. एखाद्या संघटीत टोळीप्रमाणे यातील चार जीव आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. या प्राण्याची ओळख असणारा निळ्या जांभळ्या बाटलीसारखा आकार या टोळीतल्या पहील्या प्राण्यापासून बनलाय. हवेने भरलेला हाच बाटलीसारखा फुगीर आकार या जीवाला तरंगण्यास मदत करतो. याला निमॅटोफोर म्हणतात. हा पारदर्शक भाग जेलीफिशसारखा असल्यामुळेच या सजीवाच्या नावात जेलीफिश हे विशेषनाम जोडलं गेलं.
या टोळीतल्या दुसऱ्या प्राण्यापासून ऑक्टोपसच्या हातांसारखे भासणारी शुंडके बनली आहेत. त्यांना डॅक्टीलोझॉइडस् म्हणतात. ही शुंडके लांबलचक असतात. त्यांची लांबी एक फुटापासून ते शंभर फुटाहूनही अधिक असू शकते. मासे आणि कोलंबी प्रजातीसारखे आपले भक्ष्य पकडण्यासाठी या शुंडकांचा उपयोग होतो. ही शुंडके म्हणजे या निळ्या घुसखोराच्या टोळीतील शस्त्रधारी सैनिकच. या शुंडकांनी दंश करू शकणाऱ्या पेशी धारण केलेल्या असतात. त्यात इमोबिलाईझ नावाचे विष असते. दंश केल्यानंतर हे विष वेगाने भक्ष्याच्या शरीरात पसरते, परिणामी ‘ब्ल्यू बॉटल'ला आपले भक्ष्य मिळवणे सोपे होते. संरक्षण, आक्रमण आणि अन्न मिळवणे अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ही शुंडके पार पाडतात. मनुष्य प्राणी हा काही या लहानशा जीवाचे अन्न नाही. परंतु जेलीफिशच्या संपर्कात येणाऱ्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करताना या विषारी डंखाचा तडाखा मानवालाही कित्येक वेळा बसलाय. एखाद्या अपघाताने किंवा अन्य कारणाने तुटलेल्या स्वतंत्र शुंडकांना स्पर्श होऊन देखिल त्याचा विषारी दंश होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या समुद्रकिनारी गणेशविसर्जन सोहळ्यात असे दंश झाल्याच्या घटना घडल्यात. सामान्यतः ब्ल्यू बॉटल जेलीफिशचे विष माणसाला मारण्याइतपत घातक नसते, परंतु त्याचा डंख झालेल्या जागी भयंकर वेदना होऊन सूज येणे अशी लक्षणे दिसतात. काही घटनांमध्ये छातीत वेदना होणे, रक्तदाब वाढणे, थकवा येणे अशी जीवघेणी लक्षणेही आढळली आहेत.
या टोळीतील तिसरा सदस्य आचाऱ्याचे काम करतो. या भागाला गॅस्ट्रोझॉइडस् म्हणून ओळखले जाते. तरंगत्या भागाच्या खालच्या बाजूला लागून असणारे हे प्राणी शुंडकांनी मिळवलेल्या अन्नाचे विशिष्ट संप्रेरकांच्या साह्याने पचन करतात. त्यानंतर मोठ्या अन्नकणांचे उपयुक्त अशा लहान कणांमध्ये रूपांतर करून त्याचे उर्वरीत सदस्यांना वाटप केले जाते. थोडक्यात संपूर्ण टोळीच्या पोषणाची जबाबदारी या सदस्याकडे असते.
या टोळीतला शेवटचा सदस्य म्हणजे गोनोझॉइडस. वंशवृद्धीचे काम या सदस्याचे. हा भाग द्विलिंगी म्हणजे नर आणि मादी दोन्ही प्रकारांचे एकत्रिकरण असलेला. या भागातूनच पुढे अलैंेगिक पद्धतीने प्रजनन होऊन नविन टोळीची निर्मिती होते.
दिसायला आकर्षक, परंतु तितकेच धोकादायक असणाऱ्या या समुद्री घुसखोरांनी अनेकांना दंश केल्यामुळे त्यांचे अस्तित्व माध्यमांना जाणवले. त्यांनी लगेचच या समुद्री पायरेटसच्या कहाण्यांमध्ये याच समुद्राचंच मीठ मिसळून माध्यमांद्वारे अधिकच रंगवून सादर केल्या गेल्या. त्यामुळे या घुसखोरांकडे लोकांचं अधिकच लक्ष गेले. खरं तर या पाहुण्यांचं घर आहे समुद्र आणि समुद्रात त्यांचं अस्तित्व आढळणे ही अतिशय सामान्य बाब आहे. त्यांनाही आपल्यासारखं गरम पाण्यात डुंबायला आवडतं, त्यामुळे पाण्यांच्या प्रवाहाबरोबर, बदलत्या तापमानाबरोबर त्यांच्याही जागा बदलत राहतात. या सर्वांच्या जोडीला आणखी एक मानव नावाचा प्राणी आहे, ज्याचं घर जमिनीवर आहे. त्याचं शरीर पाण्यातल्या जीवनासाठी अनुकूल नाही. पण तो प्राणी स्वतःला सर्वशक्तिमान समजतो आणि समुद्रामध्ये स्वतः घुसखोरी करतो आणि या घुसखोरी दरम्यान मूळ समुद्रातल्याच जीवांनी त्याला काही अपाय केला तर असे कसे घडले म्हणून आकांडतांडव करतो. या पाहुण्यांना पिटाळून लावण्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याचे ठरवतो. त्यांना दुसऱ्या प्रदेशातून आलेले म्हणून घुसखोर ठरवतो. पण ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश' खरंच घुसखोर आहेत का?
विचार करा आणि ठरवा समुद्रातला खरा घुसखोर कोण?
‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश' ज्याचं घरंच समुद्र आहे तो की ‘मानव' ज्याचं घर जमिनीवर असूनही समुद्रात मुक्तपणे संचार करण्याचा प्रयत्न करतो तो? - तुषार म्हात्रे