गुरू महती

गुरु आणि देव यांत गुरु श्रेष्ठ आहे कारण गुरु हेच देवाचे दर्शन घडवून आणतात. व्यक्तीला अज्ञान आणि अहंकाराच्या अंधकारातून ज्ञान आणि विवेकाच्या मार्गावर आणतात ते गुरु होय. सामान्य जिवात असामान्य शक्ती जागृत करतात ते गुरु होय. मातीच्या चिखलाला विशिष्ट आकार देऊन विशेष आकृतीबंधात उतरवितात ते गुरु होय. व्यक्तिला ताप, दोष, विकार मुक्त करून गुण संस्काराने ज्ञानयुक्त करता ते गुरु होय.

व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असो, जीवनाच्या सर्वच क्षेत्रात मार्गदर्शकाचे म्हणजेच गुरुचे स्थान वादातीत आहे. शालेय जीवनापासून शिक्षकांच्या रूपात भेटणारे गुरु ते आपापल्या क्षेत्रात स्व-अस्तित्व निर्माण करून डंका वाजविण्यापर्यंत प्रत्येकाला गुरु हा असतोच. आजवर जेवढे संत-विचारवंत, महापुरुष झाले त्या सर्वांच्या जीवनात गुरूंचे अढळ स्थान होते आणि त्यांनी मुक्तकंठाने गुरूमहती गायली आहे.

खरंतर जन्मदाते आई-वडील हेच आपले पहिले गुरु असतात. जन्मापासून ते शेवटपर्यंत आपल्यासाठी-आपल्या पाठी गुरु आशीर्वाद असतो आणि म्हणून व्यक्ती आपल्या इच्छित ध्येयापर्यंत पोहोचते. व्यक्तीचा संघर्ष- प्रयत्न हे महत्त्वाचे असतातच पण;त्याला योग्य मार्गदर्शनाची जोड असावी लागते. गुरु आपल्याला मार्ग दावीत असतात. पदोपदी ते आपल्याला धीर देतात. बळ देतात. बऱ्याचदा आपण आपल्या प्रवासात प्रयत्न करूनही यश प्राप्ती होत नाही म्हणून हार मानतो, अशावेळी मरगळलेल्या मनाला शब्दरूपी प्रेरणा देऊन पुन्हा मार्गस्थ होण्यास गुरु साहाय्य करतात.

अनादी काळापासून आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. साक्षात भगवंतानी मनुष्य अवतार घेतल्यावरही त्यांना गुरु करावा लागला. गुरु वशिष्ठ-श्रीराम व गुरु सांदीपनी -श्रीकृष्ण ही गुरु शिष्य जोडी सर्वपरिचित आहे. गुरु द्रोणाचार्य-अर्जुन या गुरु शिष्य जोडीचे आजही दाखले दिले जातात. त्यांच्या नावाने शासनातर्फे पुरस्कारही दिला जातो. त्यानंतर प्रसिद्ध गुरु शिष्य जोडीमध्ये आचार्य चाणक्य व सम्राट चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद यांची नावे येतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु मातोश्री राजमाता जिजाऊ होत्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरुस्थानी मानत ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले होय.

गुरु हा विद्येचा दाता असतो. गुरुच्या मुखातून मंत्र शुद्ध होतो. गुरुचं काम सांगणं -शिकवणं असतं तर ते रुजवणं-सजवणं हे शिष्याचं काम असतं. गुरु हा शिष्याला योग्य -अयोग्य याची जाण करून देत असतो. आपल्या जवळील ज्ञान, अनुभव व स्व कष्टाने प्राप्त केलेली शक्ती आपल्या शिष्याच्या जडणघडणीसाठी देत राहतो. व्यक्ती जन्मल्यापासून त्याच्यावर अनेक ऋण असतात. यात प्रामुख्याने आई-वडिलांचे ऋण, गुरूंचे ऋण, देवाचे ऋण व समाजाचे ऋण या चार ऋणांचा अंतर्भाव होतो. आई-वडिलांची मनोभावे सेवा केल्याने त्यांचे ऋण फेडता येते. देवाची भक्ती केल्याने देवाचे ऋण फिटते. वेळोवेळी यथाशक्ती दान-धर्म करून समाजाचे ऋण फेडता येते पण;  गुरूंचे ऋण फेडणे अशक्यप्रायः असते. पृथ्वी जरी दान केली तरी गुरूंचे ऋण फेडता फिटत नाही असे गुरू महात्म्य असते.

संत कबीर म्हणतात,
 गुरु गोविंद दोऊ खडे । काके लागू पाय ।।
बलीहारी गुरु आपने  । गोविंद दियो बताये ।।

अर्थात गुरु हेच गोविंद म्हणजे देवाकडे घेऊन जातात. मार्ग दाखवितात. समर्थ रामदास स्वामी देखील असेच काही म्हणतात,
 गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा
आधी नमस्कार कोणाशी करावा
मला भासतो सद्‌गुरु थोर आहे
तयाचे प्रसादे श्री रघुवीर पावे

गुरु आणि देव यांत गुरु श्रेष्ठ आहे कारण गुरु हेच देवाचे दर्शन घडवून आणतात.

व्यक्तीला अज्ञान आणि अहंकाराच्या अंधकारातून ज्ञान आणि विवेकाच्या मार्गावर आणतात ते गुरु होय. सामान्य जिवात असामान्य शक्ती जागृत करतात ते गुरु होय. मातीच्या चिखलाला विशिष्ट आकार देऊन विशेष आकृतीबंधात उतरवितात ते गुरु होय. व्यक्तिला ताप, दोष, विकार मुक्त करून गुण संस्काराने ज्ञानयुक्त करता ते गुरु होय.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
सद्‌गुरुसारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी सद्गुरू आपल्या सोबत असतील तर आपल्याला कशाचीही चिंता करायची गरज नाही. संत ज्ञानेश्वर महाराज रचित हरीपाठामध्ये एक अभंग आहे ज्यात गुरु परंपरा सांगितली आहे.

 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।
  मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वळला गहिनीप्रती ।।
 गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ।  ज्ञानदेवा सार चोजविले ।।  आदियोगी आदिनाथ श्रीशंकरापासून मच्छिंद्रनाथ व पुढे ज्ञानदेवांपर्यंत ही गुरु -शिष्य परंपरा यात वर्णिली आहे.
शीख धर्मात ‘गुरु'ला विशेष स्थान आहे. केवळ शारीरिक अस्तित्वातीलच गुरु मानण्याची गरज नाही. मनामध्ये खरी उत्कटता व श्रद्धा असेल तर गुरु कोणत्याही स्वरूपात सापडतो. ‘गुरु ग्रंथ' याचे सर्वश्रुत उदाहरण आहे. म्हणूनच ग्रंथ हेच ‘गुरु' असे आपण म्हणतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, जर कोणी माझ्या संग्रहातील ग्रंथ मागितला तर जणू माझा प्राण मागितला असे मला वाटते. ग्रंथ वाचन जर आपली सवय झाली तर आपल्याला सर्व क्षेत्रात मार्ग सापडतो. म्हणून ग्रंथ वाचन आपण केले पाहिजे.

 संगीत,कला, क्रीडा इ. सर्व क्षेत्रात गुरूंना अनन्य साधारण महत्त्व असते. गुरु पाठीराखा असतो. गुरु मार्ग असतो. गुरु सहवास हाच खरा स्वर्ग असतो. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरूंप्रति आदर व श्रद्धा व्यक्त करण्याबरोबर त्यांनी दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरवली पाहिजे. त्यांनी दिलेले संस्कार आपण आपल्या वर्तनातून हा समाज अधिक सक्षम होईल आणि सर्वांचे जीवन सुंदर होईल हा प्रयत्न करायला हवा. हीच त्यांना दिलेली सर्वोत्तम गुरु भेट होईल. - प्रा. कवीश्वर शंकर कुंडलिक गोपाळे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुंबई : काल, आज आणि उद्या