महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
थंड हवेच्या माथेरानची ओळख पुसते आहे
थंड हवामान, प्रदूषणमुक्त वातावरण, दाट जंगलं, धुक्याची चादर पांघरलेली डोंगररांग, पक्ष्यांची किलबिल आणि शांतता.. माथेरानच्या नुसत्या आठवणीनेच मन प्रसन्न होतं. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांपासून अगदी जवळ असलेलं हे थंड हवेचं ठिकाण एकेकाळी पर्यटकांच्या मनाचा कोपरा जिंकून बसलेलं होतं. मात्र काळाच्या ओघात आणि बदलत्या जीवनशैलीत माथेरानची पारंपरिक ओळख हळूहळू धूसर होत चालली आहे आणि ही खंत मनात खोलवर घर करून जाते.
कधीकाळी माथेरान फक्त निसर्गासाठी नव्हे, तर इथल्या खास स्थानिक वस्तूंसाठी ओळखलं जात होतं. येथे मिळणाऱ्या अस्सल चामड्याच्या बुट, पट्टा, वॉलेट, चप्पल, वेताच्या काट्या, रानात मिळणाऱ्या झाडाच्या कांड्यांपासून बनवलेली आकर्षक घरटी, गवताच्या काड्यांवर बनवलेली पेंटिंग्स, विविध रंगीबेरंगी हाताने शिवलेल्या टोप्या आणि खास माथेरानी चिक्की या सर्व वस्तू पर्यटकांना भुरळ घालायच्या. ही कला इथल्या कारागिरांच्या हातात होती. त्या हातांनी फक्त वस्तू नाही, तर माथेरानचा आत्मा घडवला होता.
घोडेस्वारी, हात रिक्षा.. वेळेवर आणि नीटनेटके हे सारे अनुभव माथेरानच्या सौंदर्यात भर टाकायचे. पर्यटक घोड्यावरून किंवा रिक्षाने पॉइंटला जाताना वाटेतील हिरवळ, गार वारा, पक्ष्यांचा आवाज याचा मनमुराद आनंद घेत. ही अनुभूती फक्त इथेच मिळायची.
मात्र आज हे चित्रच उलटं झालं आहे. बाजारपेठेत पारंपरिक वस्तू हरवून गेल्या आहेत. त्यांची जागा साचेबद्ध, डुप्लिकेट, बाहेरून आलेल्या वस्तूंनी घेतली आहे. जुन्या कलावंतांचे हात थांबले आहेत. पारंपरिक घोडेस्वारीसारखी शिस्तीत चालणारी सेवा आज विस्कळीत झाली आहे. स्थानिक संस्कृतीकडे पाहण्याची दृष्टिकोनच बदलला आहे.
या बदलामागे अनेक कारणं आहेत ः स्थानिक उत्पादनांना ना मदत, ना प्रशिक्षण, ना मंच. स्थानिक कारागिरांच्या हाती कला आहे, पण पाठीवर कोणाची थाप नाही. दुसरं कारण बाजारात डुप्लिकेट वस्तूंची साखळी निर्माण झाली आहे. कमी दर, कमी गुणवत्ता पण जास्त आकर्षण! यामुळे खरी गोष्ट मागे पडली आहे. पर्यटकांची मानसिकताही बदलली आहे. आजचा पर्यटक सेल्फी पॉइंट, रील्स आणि कन्टेन्ट यामध्ये इतका गुंतला आहे की, त्या ठिकाणी घडणारी परंपरा, कला, आणि माणसं याकडे त्याचं लक्षच जात नाही. याचवेळी प्रशासनाच्या निष्क्रियतेने चित्र आणखी गडद केलं. माथेरानच्या सांस्कृतिक ओळखीसाठी कोणतीही योजना नाही, न लोकजागृती, न पायाभूत सुविधा. पण खरं सांगायचं तर, जबाबदारी ही फक्त प्रशासनाची नाही ती प्रत्येक माथेरानकराची आहे. आपल्याच गावात आपण जर आपली पारंपरिक कला, दर्जेदार वस्तू विकायला सुरुवात केली, त्यांचा अभिमान बाळगला, त्या ग्राहकांसमोर मांडल्या, तर पर्यटक नकळत त्या वस्तूकडे वळेल. किंमत जास्त असली तरी खरी गोष्ट कुठे आहे, हे ओळखण्याची समजूतदार नजर पर्यटकांमध्ये असतेच. कोणतीही परंपरा सरकारच्या फाईलमधून नव्हे, तर लोकांच्या हृदयातून टिकते. आपणच जर हातचे सोडून डुप्लिकेट वस्तूंना दुकानात जागा देणार, तर आपली कला हरवणारच!
आज काळाची गरज आहे स्थानिक व्यापारी, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्र यावं. माथेरानसाठी ‘वन टाऊन, वन प्रॉडक्ट सारखी योजना राबवावी. ‘हेरिटेज मार्केट ची कल्पना प्रत्यक्षात यावी. स्थानिक तरुणांना पारंपरिक व्यवसायात प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती व्हावी. सोशल मीडियाचा वापर करून आपल्या उत्पादनांचं डिजिटल मार्केटिंग करावं. माथेरान ही केवळ एक टेकडी नाही, ती एक संस्कृती आहे. ती इथल्या मातीशी, झाडांशी, घोड्यांशी, कारागिरांच्या हातांशी जोडलेली आहे. आपणच ती जपली पाहिजे.
हाताने शिवलेल्या गोधडीची ऊब ब्लँकेटला येऊ शकत नाही आणि हे सत्य आहे. आपल्याच देशातील कोल्हापुरी चप्पल परदेशातल्या रॅपरच्या पायात झळकते, पण त्याला ‘भारतीय असल्याचा उल्लेख होत नाही. पण वस्तू मात्र आपली आहे. आपली कला, आपली ओळख, आपला वारसा हे परदेशात झळकतात, फक्त दुर्दैव असे की, आपणच त्याचा अभिमान ठेवत नाही.म्हणूनच, आजचा क्षणच योग्य वेळ आहे.आपली परंपरा, आपली ओळख आपणच जपायची. कारण ओळख हरवली, की माथेरान फक्त एक पॉइंट उरेल, अनुभव नाही, आत्मा नाही. - चंद्रकांत सुतार, माथेरान