देवदूताची अविस्मरणीय रुग्णसेवा

त्या काळात पेण शहरापासून आठ किलोमीटरवर सोनखार गावात पोहोचण्यासाठी कोणतेही यांत्रिक वाहन नव्हते. रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या. पण डॉक्टरनी अंतराचं, वेळेचं किंवा अडचणींचं कधीच बंधन मानलं नाही.त्या दिवशी त्यांनी सोनखार गाठलं, माझ्या जीवासाठी.तात्काळ उपचार दिले आणि माझं आयुष्य वाचवलं. आजही त्या घटनेची जखम डोक्यावर डोक्यावर आहे, पण ती एक स्मृती ठरली आहे डॉक्टरांच्या सेवेची, करुणेची आणि वेळीच केलेल्या मदतीची.

सन १९७२ गाव सोनखार, पेण. शाळा असायची मठात, वर्ग तिसरीचा. माझे वय फक्त आठ वर्ष. घरात तांदळाच्या पोत्यांच्या रचनेवर ठेवलेला मोठा लाकडी वासा अचानक खेळत असताना डोक्यावर कोसळला आणि त्या एका क्षणाने माझ्या आयुष्यच चित्रच बदललं असतं जर तेव्हा तो माणूस, खरंतर तो देवदूत, वेळेवर पोहोचला नसता तर...
तो माणूस म्हणजे पेणचे त्या काळातील सुप्रसिद्ध डॉक्टर गजानन विनायक घाटे. माझे वडील  श्री. शंकर हिराजी पाटील, प्राथमिक शिक्षक यांचा आणि डॉक्टर घाटेंचा अत्यंत जवळचा संबंध.त्वरितच माझ्या वडिलांनी घाटे डॉक्टरांचा दवाखाना गाठला. पेण तालुक्याच्या हनुमान आळीतील एक साधे, पण अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व डॉक्टर घाटे. धोतर, स्वच्छ पांढरा शर्ट, त्यावर काळा कोट, डोळ्यावर चष्मा, हातात काठी, रात्र असेल तर सोबत कंदील आणि वाहन म्हणून घोड्याचा टांगा! त्यांच्यासोबत नेहमी असायचे त्यांचे विश्वासू कंपाउंडर श्री हरचन.

त्या काळात पेण शहरापासून आठ किलोमीटरवर सोनखार गावात पोहोचण्यासाठी कोणतेही यांत्रिक वाहन नव्हते. रस्ते नव्हते, सुविधा नव्हत्या. पण डॉक्टरनी अंतराचं, वेळेचं किंवा अडचणींचं कधीच बंधन मानलं नाही.त्या दिवशी त्यांनी सोनखार गाठलं, माझ्या जीवासाठी.तात्काळ उपचार दिले आणि माझं आयुष्य वाचवलं. आजही त्या घटनेची जखम डोक्यावर डोक्यावर आहे, पण ती एक स्मृती ठरली आहे डॉक्टरांच्या सेवेची, करुणेची आणि वेळीच केलेल्या मदतीची.

ते फक्त डॉक्टर नव्हते  ते एक चालतं-बोलतं आदर्श होतं. शिस्त, सेवाभाव, निःस्वार्थपणा आणि माणुसकी यांचा मिलाफ म्हणजे डॉक्टर घाटे. त्यांचा दवाखाना होता पेणमधील हनुमान आळीमध्ये आणि निवास झिराळ आळीमध्ये. त्यांची प्रत्येक हालचाल नेमकी, वेळेवर आणि नियमात असायची. रुग्ण ही त्यांच्यासाठी नुसती ‘केस' नव्हती.. ती एक जबाबदारी होती. सेवा हीच त्यांची पूजा होती.

आज मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यात ३६ वर्षांची सेवा करून निवृत्त झालो आहे. पण या संपूर्ण प्रवासाची खरी सुरुवात झाली ती त्या अपघाताच्या दिवशी आणि डॉक्टरच्या हातून. त्यांनी दिलेली सेवा, वेळेवर दाखवलेली तत्परता, आणि मनापासून केलेली मदत हे सगळं मला आयुष्यभरासाठी दिशा देणारं ठरलं. डॉक्टर दिनानिमित्त, त्यांच्या स्मरणात शब्द लिहिताना मन गहिवरून येतं. त्यांच्या सेवेचा ठसा केवळ माझ्यावरच नव्हे, तर संपूर्ण पेण तालुक्यातील गावागावांवर उमटलेला आहे. ते आज आपल्या सोबत नाहीत;  पण त्यांची शिकवण, त्यांचा सेवाभाव आणि त्यांची माणुसकी ही आजही आपल्यासाठी दीपस्तंभासारखी आहे. विशेष म्हणजे त्यांची कन्या उषा भागवत ह्यादेखील एक डॉक्टर आहेत, आणि त्यांचे पती सुरेश भागवत, म्हणजेच ‘नुक्कड' या गाजलेल्या हिंदी मालिकेतील लोकप्रिय पात्र  हे घाटे डॉक्टरचे जावई. तसेच डॉक्टर अदिती ही डॉक्टर घाटे यांची नात. हा वारसा आहे सेवाभावाचा जो पिढ्यान्‌पिढ्या पुढे जातोय.

या महान डॉक्टर घाटेंना, एक जीवनदायी देवदूत समजून मी व माझं संपूर्ण कुटुंब, डॉक्टर दिनी, मनःपूर्वक, भावपूर्ण विनम्र आदरांजली अर्पण करतो.
-जीवन शंकर पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता,
जल अभियंता खाते, बृहन्मुंबई महानगरपालिका. सोनखार, ता.पेण, जि. रायगड. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 थंड हवेच्या माथेरानची ओळख पुसते आहे