एक अस्त...एक उदय!

उदयमानला सख्खा भाऊ नव्हता..पण ती कसर त्याने फौजेत भरून काढली. महाराष्ट्राचे शूर सुपुत्र कर्नल सचिन निंबाळकर साहेब आणि आमचा उदयमान यांची पक्की गट्टी जमली होती. कित्येक अतिरेकी-विरोधी कारवायांमध्ये हे दोघे खांद्याला खांदा लावून लढले होते. निंबाळकर साहेब अधिकारी आणि उदयमान कनिष्ठ जवान...ग्रेनेडीयर! पूर्वीच्या काळात हातगोळे फेकत शत्रूवर समोरासमोर चाल करीत जाणा-या शूर सैनिकांना ग्रेनेडीअर्स म्हणत.

मी वीरमाता श्रीमती कांतादेवी ओमकार सिंग. श्रीनगर.

त्यादिवशी तो युद्धावर जायला निघाला तेंव्हा मी त्याला म्हणत होते ”तुझी सुट्टी अजून संपायची आहे...तू जाऊ नकोस! त्यावर तो म्हणाला, "माझ्या फौजेला माझी गरज असताना जर मी गेलो नाही, तर मग फौजेत भरती होण्याचा अट्टाहास केला तो कशासाठी? ओठांवर मिसरूड फुटू लागले होते तेंव्हापासूनच सेनेची ही वर्दी अंगावर मिरवण्याची स्वप्नं बघितली ती कशासाठी?”  

आणि तो गेला. त्याला काही फार दूरवर जायचं नव्हतं...किमान त्यावेळी तरी. आमच्या राहत्या घरापासून जवळच होती युद्धभूमी....कारगिल!

उदयमान...आमच्या संसाराच्या क्षितीजावर उदय पावलेला कुलसूर्य...दोन मुलींच्या पाठीवर मोठ्या नवसाने झालेला मुलगा...आमच्या कुलाचं नाव हाच तर पुढे नेणार होता. प्रत्येक आईला तिचं बाळ देखणं वाटतंच...पण माझा उदयमान होताच मोठा देखणा. खरं तर त्यानं शिकावं आणि मोठं कुणीतरी व्हावं असंच मला वाटे. आमची शेतीवाडी आम्हांला पुरेल एवढं धान्य देत होतीच..उदयमानला नोकरीही करण्याची गरज नव्हती. पण तो अवघ्या सतराव्या वर्षीच फौजेत भरती झाला..घरी किंचितही कल्पना न देता. तो गणवेशात घरी आला तेंव्हा एकदम रुबाबदार दिसत होता..तरीही त्याने फौजेत जाऊच नये, असे माझ्या मातृहृदयाला सारखे वाटत राही...एकुलतं एक लेकरू ते! त्या वर्षात तो एक दोनदा घरी आला, नाही असं नाही...पण त्याचं सारं लक्ष त्याच्या युनिटमध्ये... ग्रेनेडियर होता तो. मोठमोठे अधिकारी त्याला त्यांच्या धाकट्या भावाप्रमाणे वागवत असत.
तो पहिल्यांदा सुट्टीवर घरी आला होता तेंव्हा आम्ही शेजारीपाजाऱ्यांना मिठाई वाटली होती. पण का कुणास ठाऊक यावेळी त्याचे सुट्टी अर्धवट सोडून पलटणीत परत जाणं मला रुचलं नव्हतं...एक विचित्र भावना होती मनात दाटलेली...उदयमान सहीसलामत परतेल ना? सुट्टीवर आला होता, त्यावेळी त्याने त्याच्या काही लढाईच्या कहाण्या बरंचसं हातचं राखून आम्हांला सांगितल्या होत्याच. पण ते काही युद्ध नव्हतं. आमच्या श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेकी कारवाया आणि त्यावर भारतीय सैन्याच्या जबाबी कारवाया सुरूच असतात. पण १९९९ वर्षाच्या मे महिन्यापासून कानांवर भलतेच येत होते...पाकिस्तानी घुसलेत म्हणे भारतात. चिंतेने काळीज व्यापून टाकले होते. मन चिंती ते वैरी न चिंती...म्हणतात ते काही खोटं नाही!  

आणि एके दिवशी निरोप आला...उदयमान अस्तास गेला..कायमचा! जगाचा सूर्य तरी पुन्हा सकाळी उगवतो..पण आमचा सूर्य परत दृष्टीस पडणार नव्हता.

तो नेहमी म्हणायचा...आई, सैनिकाने छातीवर गोळ्या झेलाव्यात...पाठीवर नव्हेत! तसंच झालं होतं...त्याच्या काळजात गोळ्या घुसल्या होत्या. त्याच्या छातीवरच्या खिशात असलेल्या कातडी पाकिटातून एक गोळी आरपार गेली होती..ते छिद्र पडलेलं पाकीट मी आजही जपून ठेवलं आहे. त्यावरचे त्याच्या रक्ताचे डाग कालांतराने नाहीसे झालेत..पण माझ्या काळजावरच्या खुणा अजूनही ताज्याच आहेत.

उदयमानला सख्खा भाऊ नव्हता..पण ती कसर त्याने फौजेत भरून काढली. महाराष्ट्राचे शूर सुपुत्र कर्नल सचिन निंबाळकर साहेब आणि आमचा उदयमान यांची पक्की गट्टी जमली होती. कित्येक अतिरेकी-विरोधी कारवायांमध्ये हे दोघे खांद्याला खांदा लावून लढले होते. निंबाळकर साहेब अधिकारी आणि उदयमान कनिष्ठ जवान...ग्रेनेडीयर! पूर्वीच्या काळात हातगोळे फेकत शत्रूवर समोरासमोर चाल करीत जाणा-या शूर सैनिकांना ग्रेनेडीअर्स म्हणत...हल्लीचे ग्रेनेडीअर्स सर्वप्रकारची शस्त्रास्त्रे लीलया चालवतात. माझ्या उदयमानच्या हाती रायफल असायची...नेम पक्का होता त्याचा. आणि शत्रूवर बेधडक चालून जायला घाबरायचा अजिबात नाही..म्हणून प्रत्येक मोहिमेत नेहमी अग्रभागी असायचा.

त्या दिवशी ४ तारीख होती जुलै, १९९९ची. रात्रीचे साडेआड वाजले होते. उदयमान पहाड चढण्यातही माहीर होता. कमरेला दोर लावून तो आणि त्याचे साहेब, साथीदार रात्रीच्या अंधारात बारा-पंधरा हजार फुटांचा उभा पहाड चढू लागले. शत्रू वर लपून बसलेला होता...खाली खोल दरी,त्यात बर्फ, धुकं आणि वरून कधीही बरसू शकणा-या शत्रूच्या गोळ्या. शत्रू अगदी आरामशीर बसून खाली गोळीबार करू शकत होता..आणि त्यामुळेच त्यांनी आपले अनेक अधिकारी, सैनिक अचूक टिपून मारले होते...आणि त्याचाच बदला घ्यायला आपले वीर निघाले होते.

पण आपले सैनिक पहाडाच्या या बाजूने वर येतील याची शत्रूने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. या पर्वतराजीमध्ये शत्रूने अशी काही ठिकाणे काबीज करून ठेवली होती कि तिथे बसून ते भारतात सहज डोकावू शकत होते आणि भारतीय फौजेची रसद रोखू शकत होते. आणि म्हणूनच आधी तिथून त्यांना हुसकावून लावणे गरजेचे होते. काही मोहिमांमध्ये तर शत्रूच्या चौक्यांच्या अगदी आठ-दहा मीटर्सपर्यंत आपले जवान लपतछपत पोहोचायचे...आणि शत्रूच्या नजरेत यायचे. शत्रू मोठ्या संख्येने, हत्यारबंद असे. मग अशा वेळी पहाडाखाली असलेल्या बोफोर्स तोफा आणि त्या डागणारे कुशल हात यांचे साहाय्य मागितले जायचे. तोफेचे गोळे लक्ष्यापासून आठ-दहा मीटर्स मागे-पुढे पडले तरी ते नेम चुकले असे मानता येत नाही. आणि आपले सैनिक तिथेच आठ-दहा मीटर्स अंतरावर आहेत आणि शत्रूवर गोळा टाकायचा आहे...अशावेळी नशीब बलवत्तर हवे आणि आपल्या लोकांवर विश्वास. आणि हा विश्वास प्रत्येकवेळी सार्थ ठरला आपल्या सुदैवाने. उदयमान सहभागी होता त्या मोहिमेतही असेच झाले. भीतीने गर्भगळीत झालेल्या शत्रूने मग निकराचा गोळीबार आरंभला...अंदाधुंद. उदयमान अर्थात त्यांच्या दिशेने धावत गेलाच...हातघाईची लढाई..अगदी तलवारीच्या काळात होत असे तशी झाली...पण आधुनिक रायफलींच्या गोळ्यांना नेम धरावा लागत नाही...काही गोळ्या उदयमानच्या काळजाशी सलगी करायला धावल्या...थेट आत...खोलवर घुसल्या. डोळ्यात रक्त उतरलेला उदयमान थांबला नाही..जोवर श्वास थांबले नाहीत तोवर. काही बळी मिळवून शत्रू पायांत शेपूट घालून माघारी पळून गेला...पुन्हा लपून लपून येण्यासाठी!

या धुमश्चक्रीत उदयमानचा देह आणि त्याच्या सहकारी सैनिकांचे देह चार दिवस तिथेच पडून राहिले होते...आपल्या सैन्याच्या पुढच्या मोहिमांत हे दिव्यदेह हाती लागले..आणि उदयमान, तिरंग्यात गुंडाळलेला,पुष्पहारांनी सजलेला अंगणात आला! माझे दुःस्वप्न असे खरे ठरले होते...पण पाठीवर नव्हे तर छातीवर गोळ्या झेलून देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या माझ्या लेकाचा मला अभिमानही वाटला! पण आईच्या काळजाने काय करावे? लोकांती रडू लपवता येते.पण एकांत...खायला उठतो...मग आसवं येतात समजूत घालायला.

पण मग मला एकाएकी याद आली....एक लेक गेला..पण त्याचा थोरला भाऊ आहे की...मी त्याला पत्र लिहिलं! सचिन...माझा एक मुलगा गमावला..पण तुम्हीही मला मुलाच्या जागीच आहात! सचिन या नावाचा अर्थ सत्य, खरेपणा असा सांगतात. उदयमानचे हे बंधूसुद्धा नावाला जागणारे. लढाईतील यशाबद्दल इतर सैनिक, अधिकारी जल्लोष करीत असताना, उदयमानच्या आठवणीने व्याकूळ होऊन एकांतात बसणारे सचिनजी! माझा कोवळा उदयमान त्यांच्या नजरेपुढून जाता जात नव्हता. त्यांनी माझे शब्द फुलासारखे झेलले...आणि मला एक मुलगा लाभला. माझ्या मुलींना मोठा भाऊ लाभला. त्या दोघींच्या लग्नात सचिनजी यांनीच पुढाकार घेतला आणि कार्य सिद्धीस नेले. आम्हांला सर्वप्रकारे धीर,आधार दिला. जगात कुठेही नेमणुकीस असले तरी वर्षातून एकदा तरी आमच्या घरी भेट देण्याचा त्यांचा क्रम चुकत नाही...गेली सव्वीस वर्षे! मागील वर्षी तर ते ४ जुलै रोजीच घरी आले होते...होय...१९९९ मध्ये ज्या रात्री उदयमान मोहिमेवर गेला होता...ती ४ जुलै....कर्नल सचिन निंबाळकर यांच्या रूपाने जणू उदयमानच परतून आला होता!

हा लेख हुतात्मा सैनिक मरणोत्तर सेना मेडल प्राप्त ग्रेनेडियर उदयमान सिंग यांच्या मातोश्रींच्या भूमिकेतून लिहिला असून, प्राप्त माहितीवर आधारित आहे. काही बाबतीत कल्पनेचा आधार घेतला आहे. १९९९ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान कारगिल युद्धाने भारतीय सैनिकांचे अनेक पराक्रम पाहिले. भारतीय सैनिकांच्या अलौकिक साहसाच्या कथा अनुभवल्या. त्यातून सैनिक आणि अधिकारी कसा एकमेकांच्या जीवाला जीव देतात, हेही दिसून आले. महाराष्ट्राचे वीर सैन्याधिकारी कर्नल सचिन निंबाळकर साहेब यांनी त्यांचा बडी उदयमान यांचा बडा  भाई बनून त्याच्या कुटुंबाशी जन्मोजन्मीचे नाते जोडले. निंबाळकर साहेब पुढे सैन्यसेवेसाठी परदेशीही गेले होते. पण तशाही धामधुमीत साहेबांनी वर्षातून एकदा तरी कांतादेवी मातोश्रींना, त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्याचा क्रम चुकवला नाही...तो अगदी आजपर्यंत! वीर चक्र विजेते असलेल्या निंबाळकर साहेबांच्या पराक्रमाविषयी तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. परंतु सहकारी सैनिकाच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या त्यांच्या कृतीने भारतीय सैन्याची प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे. कर्नल सचिन आण्णाराव निंबाळकर साहेबांना अत्यंत मनःपूर्वक नमस्कार आणि शुभेच्छा! हुतात्मा उदयमान सिंग यांना वंदन. जय हिंद! छायाचित्रे आणि माहिती विविध माध्यमांतून,विडीओ मुलाखतीमधून साभार. लष्करी संज्ञा,संख्या,नावे इत्यादी लिहिणे हेतुपुरस्सर टाळले आहे. कारण माझ्या सारख्या सामान्य नागरीकाकडून काही चुका होतात. पण तरीही काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व! असामान्य भारतीय सैनिकांचा पराक्रम सामान्य भारतीयांपर्यंत मराठी भाषेत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. व्यावसायिक हेतू अजिबात नाही. - संभाजी बबन गायके 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 देवदूताची अविस्मरणीय रुग्णसेवा