आखाड तळण

आखाड तळणे म्हणजे या महिन्यात पंढरपूरच्या वारीप्रमाणे तळणीचे पदार्थ खाण्याचे सोहळे असतात. देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ते प्रबोधनी किंवा कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास पाळला जातो. म्हणून आषाढी एकादशी पूर्वी कांदे नवमी केली जाते.

 चातुर्मासात कांदा लसूण खाणे निषिद्ध मानले जाते. या दिवसात पाणी दूषित झालेले असते. त्यामुळे लहान मुले अगदी मोट्ठेसुद्धा आजारी पडतात. यासाठी शरीराला वंगण मिळावे म्हणून तळलेले चमचमीत पदार्थ खावेत असं म्हणतात.

कांदे नवमी
अहाहा! कांदा भजी, बटाटा, सिमला मिरची, पलॉवर, पालक केळ, पनीर, कॉर्न किती तऱ्हेची भजी (आत्ताच्या जनरेशनच्या भाषेत व्हरायटी ऑफ पकोडा) करुन अंगतपंगत करणे हासुद्धा एक सोहळा नाहीतर काय हो? आपल्या देशात प्रत्येक सणाचे महत्व विज्ञानाच्या कसोटीवरच योजलेले आहे. आषाढात टोम पाऊस पडत असतो. वातावरणात ही बदल होऊन ते थंड झालेले असते  मग अशावेळी गरमागरम तळलेले पदार्थ खाल्ले तर शरीरात चांगल्या प्रकारे उष्णता तयार होते त्याचबरोबर तेला तुपामुळे शरीराला उत्तम वंगणही मिळते. म्हणून फक्त कांदा भजी नाही तर तिखट मीठाच्या पुऱ्या शंकरपाळी काही ठिकाणी चकल्या सुद्धा करतात.

 मग अशावेळी बाहेरचे चमचमीत खायची ईच्छा होते आणि मग ते अरबटचरबट खाऊन उलट आजारी पडतात आणि म्हणूनच उन्हाळ्यात पापड कुरडयी लोणची घालून ठेवायची आपल्याकडे पद्धत आहे .केव्हाही तळून खाता येतात. आषाढ तळावा श्रावण भाजावा आणि भाद्रपदा उकडावा असे म्हणतात. बाहेरचे तापमान, हवामान, पाऊस-पाणी, उन, थंडी, वारा यांनी शरीरात बदल होतात. कोरडेपणा वात पित कफ. त्यामुळे अनेक आजार संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून अशा वेळी लहान मुलांबरोबर साऱ्यांनीच बाहेरचे खाणे टाळता येईल तेव्हढे टाळावे. घरचे गरम-गरम शुद्ध तेला तुपातले स्वच्छ सकस पदार्थ खाणे केव्हाही चांगलेच; पण वेळ नाही या सबबीखाली टाळले जाणे योग्य नाही. सुट्टीच्या दिवशी नक्कीच करता येईल आखाड तळण.

आता लगेचच श्रावण महिना सुरू झाला की त्यातील पदार्थ खाण्याची चंगळ वेगळीच. म्हणून म्हणते तुम्हीसुद्धा करून बघा आखाड तळण. - सौ. नुपुर विश्वजित अष्टपुत्रे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

एक अस्त...एक उदय!