झपूर्झा

अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या शुभांगी पासेबंदलिखित झपूर्झा कथासंग्रहात स्त्रियांच्या स्वभावाचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या कथा या कथासंग्रहात आहेत. काही कथा काल्पनिक तर काही अनुभवातून उतरल्या आहेत. शुभांगी पासेबंद यांची ४७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. एक ब्रेल व एक व्हिडिओ बुकही प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र दीप पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेकडून उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार, ठाणे गौरव, रेगे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. वर्तमानपत्रातही सातत्याने स्तंभलेखन त्या करीत असतात.

  झपूर्झा या कथासंग्रहात १८ कथा आहेत.

 पहिलीच कथा म्हणजे लेकीस पत्र-पत्रास कारण की. यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुलगी परदेशात जाते व तिकडेच नोकरी करू लागते. परत यायला तयार नाही. तसेच लग्नाचे नावही काढू देत नाही. यामुळे आईची होणारी तगमग ती पत्रातून व्यक्त करते. अर्थातच त्यात योग्य वयात जोडीदार निवडणे कसे योग्य आहे हे एक आई आपल्या मुलीला कळकळीने, काळजीपोटी सांगत आहे.

 एखादी गोष्ट व्हावी यासाठी व्रतवैकल्य करून, वाट बघून शेवटी जे घडायचे असेल तेच घडणार या निष्कर्षावर येणाऱ्या महिलेची कथा आहे-  पंच रात्री. अठरा वर्षाची मुलगी घरातून पळून जाते व अन्य धर्मीयाच्या प्रेमात पडते. आजूबाजूंच्या लोकांच्या टीकेला उत्तर म्हणून ती मुलगी आम्हाला मेली असे घरचे लोक सांगतात. मात्र काही दिवसांनी तिच्या प्रेताची ओळख पटवायला बोलावले जाते तेव्हा लोकापवादाला घाबरून घरचे लोक तिची ओळख चक्क नाकारतात. अतिशय वेगळा दृष्टिकोन यातून बघायला मिळतो.

 पूर्वी लग्न मोडण्यासाठी निनावी पत्रे लिहिली जायची. अशा निनावी पत्रामुळे निष्पाप मुलींची लग्न न होता त्यांची आयुष्य उध्वस्त होत असत. बरे अशी पत्रे कुटुंबा बाहेरील व्यक्तीच लिहीत असे नाही. तर चक्क मुलीच्या घरातीलच मंडळींचा यात सहभाग असायचा. मुलगी नोकरी करणारी असेल तर तिच्याकडून मिळणारा पैशाचा स्त्रोत कमी होईल, शिवाय आई-वडिलांची काळजी ही घ्यायला नको या विचाराने भाऊ भावजय हे सुद्धा अशी कारस्थाने करीत. याचे उत्तम वर्णन करणारी कथा आहे-- निनावी पत्र. या कथेत सख्खा भाऊच बहिणीच्या लग्नात मोडता घालतो. तिच्याच पैशाने तिला घरही घेऊ देत नाही. आई-वडील गेल्यानंतर तो स्वतः नवीन घर घेऊन जुने विकून बहिणीला बेघर करतो. तिला आश्रमाचा आधार घ्यावा लागतो. कालांतराने लग्न मोडलेल्या व्यक्तीकडून आपल्याच भावाने निनावी पत्र पाठवून लग्नात विघ्न आणल्याचे तिला समजते. तेव्हा भाऊ की वैरी हा प्रश्न तिला अखेरपर्यंत सतावत राहतो.

 शुभ मुहूर्तावर जन्म झालेल्या मुलीचे भाग्यवंती म्हणून कौतुक केले जाते. पण पुढे लग्नानंतर जेव्हा पतीचा मृत्यू होतो तेव्हापासून लगेच ती अभागी कशी होते या विचाराची कथा आहे-- भाग्यवंती.

 मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात लोकलने प्रवास करणाऱ्या स्त्रीचे भावविश्वही एका कथेत छान लिहिले आहे.

 लहानपणीच्या मामाच्या घराची आठवण येऊन लेखिका गावाकडे मामाच्या वाड्याचा शोध घेते. परंतु काळानुसार अगदी अल्पशा पुसट  खाणाखुणा सोडल्या तर सगळेच बदलले असते. भूतकाळाच्या आठवणीतून वर्तमान काळातील घराकडे भविष्यात जगण्यासाठी ती पुन्हा विमनस्क अवस्थेत येते.

 सगळ्याच कथा वाचनीय आहेत. अशा प्रत्येकच कथे  बद्दल सविस्तर लिहिता येईल. रोजच्या अनुभवांकडे वैविध्यतेने बघून ते शब्दात मांडण्याचे कसब शुभांगी ताईंना उत्तम साधले आहे.

 पार्थ प्रकाशनाने  झपूर्झा हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ जयंत गायकवाड यांनी केले आहे.
  झपूर्झा -  शुभांगी पासेबंद
 प्रकाशक - पार्थ प्रकाशन पुणे.
 पृष्ठ संख्या १३२. किंमत २५० रुपये
-यामिनी पानगावकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नमाज, प्रार्थना, प्रेअर आणि जून महिन्याचा लेखाजोखा...!